सकाळी उठून नाष्टा करून शेतात जायचं. दिवसभर शेतात काम करायचं. बरोबर आणलेल्या डब्यातलं दुपारी जेवायचं. संध्याकाळी नदीवर जाऊन सूर्याचं दर्शन घ्यायचं व घरी परतायचं असा राजेशचा रोजचा दिनक्रम ठरला होता. रोज वृषालीला एकदा तरी फोन व्हायचा. पण काहीवेळा फोन लागायचा नाही. मग वृषालीशी बोलणं नाही झालं तर राजेशला खूप उदास वाटायचं.
पाहतापाहता निकालाचा दिवस उजाडला. राजेश संदीपला फोन लावणार होता तितक्यात वृषालीचा फोन आला. “अभिनंदन” राजेश काही बोलायच्या आतच वृषाली म्हणाली. “तू वर्गात तिसरा आलास.” राजेशला हे अपेक्षितच होतं, त्यामुळे त्याला काही वेगळं वाटलं नाही. “थँक्स. तुझं काय झालं. झालीस का मॅथस मध्ये पास.?” राजेशने विचारलं. “हो झाले एकदाची. मी काही तुझ्यासारखी टॉपर नाही पण मलापण सत्तर टक्के गुण मिळाले.” वृषाली म्हणाली. “अभिनंदन. आता मी आलो की आपण जोरदार पार्टी करूयात.” राजेश म्हणाला. “हो नक्की” एवढं बोलून वृषालीने फोन ठेवला. राजेशच्या फोनवर संदीपचे पाच मिसकॉल दिसत होते. त्याने संदीपला फोन लावला. फोन उचलताच संदीप सुरू झाला, “अरे मित्रा कुठे बिझी होतास! कितीवेळा फोन केला तुला! आपला रिसल्ट आला. अभिनंदन!” “मला कळला रिसल्ट. तुलाही अभिनंदन. कितवा आलास? पहिला की दुसरा?” राजेशने विचारलं. “आता समजलं एवढा वेळ कोणाशी बोलत होतास ते.” संदीप चेष्टेत म्हणाला. “अरे मी पहिला आलो वर्गात.” संदीप पुढे म्हणाला. “अरे वा! घरचे जाम खुश असतील ना?” राजेशने विचारलं. “हो, अजून घरी नाही गेलो, कॉलेजवरच आहे पण फोनवर बोलणं झालं. आता जातो पेढे घेऊन घरी.” संदीप म्हणाला. “बर, आणि माझ्या वहिनीचं काय झालं?” राजेश चिडवण्याच्या सुरात म्हणाला. “कोण रे? अच्छा तिचाही रिसल्ट चांगला लागला. बाकी कधी येतोयस पुण्यात परत?” संदीपने विचारलं. “हा आठवडा गावातच रहायला लागेल. पुढच्या आठवड्यात येईन. बर चल मी फोन ठेवतो. अजून घरी रिसल्ट सांगायचा आहे.” एवढे बोलून राजेशने फोन ठेवला.
निकालामुळे राजेशच्या घरचे सगळे खूप खुश होते. घरात उत्साहाचं वातावरण होतं. वडील तर एवढे खुश होते की त्यांनी राजेशला नवीन बाईक घेण्याची घोषणा केली.
X X X X X X
आता पुण्याला परत जाण्याची वेळ आली होती. राजेशने आई-वडिलांचा, संपत काकांचा, सर्व मित्रांचा निरोप घेतला व तो पुण्याच्या बसमध्ये बसला. इतके दिवस घरी राहून परत जाण्याची इच्छा त्याला होत नव्हती. आई-वडिलांची आठवण येणार होती तसेच आईच्या हातच्या जेवणाला तो मुकणार होता. पण जावं तर लागणारच होतं. तसेच वृषालीला आता भेटता येईल या विचाराने तो सुखावला होता. तिला भेटताच इतके दिवस जी गोष्ट तो करू नाही शकला ती तो करणार होता. आपल्या मनातील भावना तो वृषालीसमोर व्यक्त करणार होता. तिचा प्रतिसाद काय असेल याची जरी त्याला कल्पना असली तरी मनात एक प्रकारची धाकधूक होतीच. पण त्या धाकधुकीपेक्षाही उत्साह जास्त होता.
कॉलेज सुरू व्हायला अजून एक आठवडा बाकी होता. वृषालीला प्रपोज कसं करायचं हेच राजेशला समजत नव्हतं. इतर लोक करतात किंवा जसं फिल्ममध्ये दाखवतात तशा रटाळपणे त्याला प्रपोज करायचं नव्हतं. त्याला असं काहीतरी करायचं होतं जे आयुष्यभर दोघांच्याही स्मरणात राहील. पण त्याला काहीच सुचत नव्हतं, शेवटी त्याने रवीला विचारायचं ठरवलं.
नेहमीप्रमाणे रवी रात्री उशिरा घरी पोहोचला. राजेशला पाहताच तो म्हणाला, “कधी आला गावावरून अन अजून कसाकाय जागा. उद्या कॉलेज नाही का?” “आजच दुपारी पोहोचलो. कॉलेज पुढच्या आठवड्यात सुरू होईल.” राजेश रवीला म्हणाला. रवी फ्रेश होऊन आला व राजेशच्या बाजूला बसला. थोड्या वेळानंतर राजेशला म्हणाला, “तुला झोपायचं नाही का?” ”मला तुला काही विचारायचय.” राजेश गंभीर आवाजात म्हणाला. “विचार की मग.” रवी म्हणाला. “तुला मी मागे एका मुलीबद्दल बोललो होतो.” “अच्छा, आता मला समजलं तू एवढा वेळ जागा का ते.” रवी मिश्कीलपणे म्हणाला. “अरे मला पूर्ण सांगू तर दे.” राजेश म्हणाला व पुढे बोलू लागला, “खरंतर मला वृषाली फार आवडते आणि तिलाही मी आवडतो. पण अजूनपर्यंत आम्ही दोघेही याबद्दल एकमेकांशी काहीच बोललो नाहीये.” “अरे मग बिंदास्त बोल. डायरेक्ट जायचं अन बोलायचं, मला तू फार आवडते. अजिबात घाबरायचं नाय.” रवी म्हणाला. “मला तिला प्रपोज करायचंय पण टिपिकल फिल्मी स्टाईलने नाही तर काहीतरी वेगळं करायचंय, जे आमच्या कायम लक्षात राहील. पण काय करावं तेच कळत नाही म्हणून मी तुला विचारतोय. एखादी हटके कल्पना सुचव ना.” राजेशने मनातलं सांगितलं. रवी विचारात मग्न झाला. बराच वेळ विचार करून तो म्हणाला, “तुला काहीतरी वेगळं करायचंय ना? मग एक काम कर. एखादी मस्त रोमँटिक कविता लिही अन तिला पाठव. खाली तुझं नाव नको लिहुस. तीचं जर खरच तुझ्यावर प्रेम असेल तर तिला समजायचं ते समजेल.” “अरे मला कविता सुचतात पण मुद्दाम लिहायला गेलं तर नाही सुचत आणि तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. काहीतरी दुसरं सांग ना.” राजेश म्हणाला. परत थोडा वेळ विचार करून रवी म्हणाला, “मग असं कर, तुझ्या एका मित्राला तिला सांगायला सांग की तुझा जोरदार एक्सिडेंट झालाय. तू म्हणतोस तसं जर तिचं तुझ्यावर प्रेम असेल तर ती धावत येईल. मग ती आली की तुझ्या मनातील भावना बोलून टाक.” “नको रे. एक्सिडेंटवरून आधीच मोठं रामायण झालंय. असं काही नको करायला.” राजेश म्हणाला. “तू मला म्हंटला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून तुला सांगितलं. आता अजुन काय सांगणार.” रवी राजेशला म्हणाला. “ठीक आहे. तरी तूला अजून काही भन्नाट सुचलच तर मला सांग. मी आता झोपतो.” एवढे बोलून राजेश अंथरुणावर आडवा झाला.
राजेश अंथरुणावर बराच वेळ पडून होता. काही केल्या त्याला आज झोप लागत नव्हती. उद्या काय करायचं याचेच विचार त्याच्या मनात येत होते. बराचवेळ विचार केल्यानंतर एक कल्पना राजेशला सुचली व त्याने काय करायचं ते मनोमन ठरवलं.
क्रमशः