घरोघरी लखोपती Nagesh S Shewalkar द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

घरोघरी लखोपती


* घरोघरी लखोपती!*
दुपारची वेळ होती. अचूक भविष्य सांगणारे, उत्तम उपाय सांगून आलेले संकट दूर करणारे अशी ख्याती असलेल्या त्या महाराजांकडे भरपूर गर्दी होती. दोन-दोन महिने आधी नोंदणी करावी लागायची. त्यादिवशीही महाराज भक्तांच्या समस्या निवारणार्थ उपाय सांगत असताना अचानक दहा-बारा वाहनांचा ताफा त्यांच्या आलिशान बंगल्यात शिरला. तो ताफा एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांचा होता. त्यांची ना पूर्व नोंदणी होती ना त्यांनी फोन करून येण्याची परवानगी मागितली होती. जणू तिथेही व्हीआयपी कोटा चालत होता. त्या अध्यक्षांना आणि इतरांना सन्मानाने दिवाणखान्यात बसवून महाराजांच्या सचिवाने महाराजांना त्यांच्या आगमनाची सूचना दिली. महाराज जमलेल्या भक्तांना म्हणाले,
"काही महत्त्वाच्या कामासाठी आजचा हा दरबार रद्द करीत आहे. ज्यांच्या समस्या आज समजून घेऊ शकलो नाही त्यांना लवकरच पुढची तारीख कळवली जाईल...."
"पण महाराज, मी दोन हजार किलोमीटरवरून आलो आहे..."
"होय महाराज, मी पण फार दुरून आलो आहे.."
"बरोबर आहे. पण मी आज नाही सांगू शकत." असे म्हणत महाराज उठून दुसऱ्या दालनात गेले. जिथे ते पक्षाध्यक्ष त्यांची वाट पाहात होते. मोठ्या आशेने आलेले ते इतर भक्त अत्यंत निराशेने परत फिरले.
"बोला. अध्यक्षमहोदय, आमची आज कशी आठवण आली?"
"महाराज, समस्याच तशी फार मोठी आहे. लवकरच निवडणुका होणार आहेत."
"त्यात असे कोणते संकट आहे? निवडणुका जिंकणे हा तुमच्या आणि तुमच्या पक्षाच्या डाव्या हाताचा मळ आहे."
"बरोबर आहे, महाराज. पण गत् काही वर्षात परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. सर्वात मोठा पक्ष असून आमची साध्या ग्रामपंचायतमध्येही सत्ता नाही. म्हणून आलो आहे. काही तरी मार्ग काढा. आम्हाला पुन्हा जनता खुर्चीवर बसवेल असे काही तरी करा..." असे म्हणत त्या अध्यक्षांनी जवळ उभ्या असलेल्या एका माणसाकडे पाहिले. त्या माणसाने अत्यंत अदबीने हातातील भली मोठी सुटकेस उघडली आणि महाराजांसमोर धरली. महाराजांनी नोटांनी भरलेली ती सुटकेस पाहिली आणि लगेच सचिवास इशारा केला. त्याने ती सुटकेस पटकन हातात घेतली आणि तो आतल्या खोलीत गेला.
"उपाय तुमच्याजवळच आहे. पैसा खर्च करण्याची तयारी आहे?"
"होय. वाट्टेल तेवढा पैसा ओतण्याची तयारी आहे. काही महिन्यांपूर्वी एका राज्यात झालेल्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराच्या खात्यात पन्नास हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु मतदारांनी मुळीच विश्वास ठेवला नाही. एकही आमदार निवडून आला नाही."
"कृपा... मतदारांची कृपा तिथेच अडली आहे. तुमच्या पक्षाने, तुमच्या पूर्वजांनी गेल्या शंभर वर्षात अशीच भरपूर आश्वासने दिली आहेत पण एकही पूर्ण केले नाही म्हणून मतदारांचा तुमच्यावर, तुमच्या पक्षावर तीळमात्र विश्वास राहिलेला नाही."
"मग काय करावे महाराज? मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो आहे."
"मतदारांचा विश्वास, त्यांचे मत आणि सत्तासुंदरी पुन्हा मिळवायची असेल तर आता आश्वासन नको. थेट कार्यवाही करावी लागेल."
"सांगा. महाराज, सांगा. आपण सांगाल ते करायला तयार आहे."
"मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत एकूणएक मतदारांच्या खात्यात एक-एक लाख रुपये जमा करा. म्हणजे मतदारांचा विश्वास बसेल...."
"महाराज, ह्यात फार मोठी रिस्क आहे. समजा मतदारांनी एक लाख रुपये जमा झाल्यावरही मतदान केले नाही तर? तेलही गेले, तुपही गेले..."
"म्हणून एक करा. खात्यात जमा झालेली रक्कम मतदान झाल्यानंतर किंवा मत मोजणी झाल्यानंतर काढता येईल अशी अट घालायची... बँकेला हाताशी धरून! सरकार तुमचे आले तर प्रश्नच नाही. तुम्ही शंभरपटीने वसूल कराल पण समजा लाख रुपये खात्यात जमा करुनही तुमचे सरकार आलेच नाही तर जमा केलेली सारी रक्कम परत स्वतःच्या खाती वळती करून घ्यायची. नक्कीच फायदा होईल. जा. कामाला लागा." महाराज म्हणाले. महाराजांचा आदराने निरोप घेऊन तो लवाजमा परतला. कारमध्ये बसताच सोबत असलेल्या दोन अर्थतज्ज्ञांपैकी एक जण म्हणाला,
"सर, महाराजांची योजना मला पटत नाही कारण प्रत्येक मतदार गुणिले एक लाख रुपये या हिशोबाने होणारी रक्कम आपल्या देशाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा हजार पटीने जास्त आहे. आपण सरकारात आलो तरीही एवढी रक्कम कशी वसूल करणार आहोत?"
"बरोबर आहे. आपण ही रक्कम मतदारांच्या खात्यात जमा करू शकतो. तेवढे काळे धन आहे आपल्याकडे पण एवढी मोठी रक्कम जमा केली तर त्याचा हिशोबही द्यावा लागेल. हा आचारसंहितेचा भंगही ठरु शकतो. प्रसंगी कार्यवाही होऊ शकते."
"म्हणून मला वाटते, प्रत्यक्ष जमा करण्याऐवजी दरवर्षी प्रत्येक खात्यात एक लाख रुपये जमा करण्याची घोषणा करावी. मतदान प्रक्रिया पूर्ण होणे, आपले सरकार स्थापन होणे यासाठी अजून दोन-तीन महिने लागतील तोवर मतदार ही लाखाची घोषणा विसरुनही जातील. नाही विसरले तरी 'करु..करु..नियोजन, हिशोब चालू आहे' असे गाजर दाखवता येईल."
"मला वाटते हेच ठिक राहील. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर तोडून खाल्ली. आज सायंकाळी पत्रकार परिषदेत मी जाहीर करतो." अध्यक्ष म्हणाले.
त्याच सायंकाळी अध्यक्ष पत्रकार परिषदेस सामोरे गेले. अत्यंत आत्मविश्वास, ठामपणे, शर्टाच्या दोन्ही बाजू वर करत, असंख्य माइक ठेवलेला टेबल स्वतःच जोरजोरात वाजवत त्यांनी घोषणा केली, "एक अत्यंत महत्त्वाची घोषणा मी करत आहे. अशी घोषणा यापूर्वी कुणी केली नाही, भविष्यात त्यातल्या त्यात आमचे विरोधक कधीच करू शकणार नाहीत, मी केलेली घोषणा ऐकून विरोधकांचे धाबे दणाणेल, त्यांचे हातपाय गळून जातील, कदाचित कुणाला चक्कर येईल, तोंडाला फेस येईल, बोबडी वळेल, घामाघूम होतील, कदाचित कुणाला हार्टअटॅकही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही निवडून आलो तर जनतेसाठी काय करु याचा जाहीरनामा आम्ही येथे जाहीर करत आहोत. सर्व डिटेल्स सांगत बसण्यापेक्षा एक अत्यंत महत्त्वाची, जनतेच्या फायद्याची आणि या योजनेमुळे आमचा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा करणारी एक घोषणा मी करत आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही प्रत्येक वर्षाला एक-एक लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार आहोत. यात कसलीही अडचण नाही. भरपूर पैसा आहे, योजना तयार आहे. गेली दोन वर्षे आमचे अर्थतज्ज्ञ याच योजनेवर काम करत होते. बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास, विचार करून हा निर्णय घेतला आहे. काय मग पत्रकार बंधूनो, बसला का शॉक? फुटला का बाँब? लवकरच या देशातून आम्ही गरिबीचे कायम उच्चाटन करणार आहोत. भेटूया पुन्हा...." म्हणत कुणाला काहीही विचारण्याची संधी न देता अध्यक्षांनी पत्रकार परिषद संपवली...
दुसऱ्या दिवशी सकाळी अजय दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत बसला असताना त्या ठळक बातमीने त्याचे लक्ष वेधले. तो आत मान वळवून आवाज देणार तितक्यात वर्षा तणतणत तिथे पोहोचली. एकंदरीत तिचे काही तरी बिघडले हे अजयने ओळखले पण तिच्याकडे दुर्लक्ष करून तो म्हणाला,
"वर्षा, तुझ्यासाठी एक गुडन्यूज आहे..."
"गुडन्यूज? माझ्यासाठी? ज्याच्या पाचवीलाच बॅडन्यूज पुजलेली असते त्याच्या जीवनात गुडन्यूज येईलच कशी?"
"अग, खरे सांगतोय. हे बघ, वर्तमानपत्रात ठळकपणे छापून आलय की, 'वर्षाला एक लाख रुपये मिळणार? वाच...."
"वर्षाला म्हणजे मला? अहो, वर्षाला म्हणजे ईयरली.... दरसाली..."
"असे आहे काय? अग पण, एक लाख म्हणजे?"
"तोच तर घोळ झालाय? रात्री त्या नेत्याने घोषणा केली आणि आजपासूनच कामवाल्याबाईने काम सोडले. घर बसल्या लाख रुपये मिळणार म्हटल्यानंतर ती कशाला दररोजची मरमर करेल ना?"
"म्हणजे?"
"अहो, आमचा बी.सी.चा एक ग्रुप आहे. त्या समुहात आपल्या इमारतीत काम करणाऱ्या चार बायका आहेत. त्यांनी रात्रीच उशिरा संदेश टाकला आहे की, आम्ही काम करणे बंद केले आहे." असे म्हणत वर्षा न्हाणीघरात गेली आणि दुसऱ्याच क्षणी दाणदाण पावले टाकत येऊन कडाडली,
"त्या वॉचमनला फोन करा. पाणी संपलय मोटार लाव म्हणा. काय झोपा काढतात देव जाणे..." वर्षा बोलत असताना माझ्या भ्रमणध्वनीवर आलेला संदेश मी पाहिला आणि जोराने ओरडल्यागत म्हणालो,
"अरे, बाप रे! वॉचमनही आजपासून येणार नाहीत. तेही लखोपती होणार आहेत म्हणे. रात्रपाळीचा वॉचमन रात्रीच निघून गेला आणि सकाळचा आलाच नाही. त्यांच्या कंपनीत फोन केला तर रात्रीच एकूण एक वॉचमन काम सोडून गेले आहेत म्हणे."
"आई ग! आता हो कसे?" वर्षा चिंतातूर अवस्थेत विचारत असताना दारावरची घंटी वाजली. तशी वर्षा म्हणाली,
"आली की काय महामाया? देव पावला रे बाप्पा..." अजयने उठून दार उघडले. दारात दुधवाला उभा असल्याचे पाहून मी विचारले,
"मामा, आज तुम्ही? रोजचा छोकरा कुठे गेला..."
"ते पोट्टं गेलं सोडून. त्याला म्हणे घर बसल्या लाख रुपये मिळणार आहेत."
"पण पाटील, हे कसे शक्य आहे? एवढी मोठी रक्कम आणणार कुठून?"
"साहेब, हे तुम्हाला-आम्हाला समजतेय हो. पण या येड्यांना कसं समजणार? कुणी हाडूक दाखवलं की, हे लोक लाळ गाळत पळतात त्यांच्या माघमाघ. बर, साहेब या तुमच्या बिल्डिंगमध्ये अजून कुणाकडे आमचा वरवा आहे हो? मला आपले जुने दोनचार घरं माहिती आहेत."
मी मला माहिती असलेले दोन घरांचे क्रमांक सांगितले आणि मामा तिकडे निघून गेले...
"आता हा मामा किती दिवस दूध घालणार आहे कुणास ठाऊक? ताप... संताप होतोय नुसता या लाख रुपये योजनेचा."
"मी जरा खाली जाऊन पाणी कुणी सोडतय का ते पाहून येतो..." असे म्हणत अजय खाली पोहोचला...
तिथे सारेच लोक चिंतातूर अवस्थेत जमले होते. पाणी कसे सोडायचे हे कुणालाही माहिती नव्हते. तशी कधी गरजच पडली नव्हती. वॉचमन सारी व्यवस्था पाहत असल्यामुळे कुणी तिकडे लक्षच दिले नाही. अजय पोहोचताच कुणीतरी म्हणाले,
"मायगॉड, अहो, पिण्याच्या पाण्याच्या कॅनही येणार नाहीत. हा बघा संदेश आलाय की, पाणी पुरवठा करणारे, गाडीचे चालक, सारे कर्मचारी काम सोडून निघून गेले आहेत."
"च्यायला! काय ताप झाला आहे या घोषणेचा?..."
"अहो, हे बघा. माझ्या कंपनीतून संदेश आलाय की, मला न्यायला आज वाहन येणार नाही कारण सारे चालक आजपासून येणार नाहीत."
"पण मला एक सांगा, ही अवस्था म्हणजे कशात काय नि फाटक्यात अशी. आता नुसती घोषणा झाली आहे. निवडणुका व्हायच्या आहेत, मतमोजणी होईल. मग कोणाचे सरकार येईल हे बघावे लागेल. समजा घोषणा करणारे 'लखोपती' सरकार आले तरीही ते सरकार एक लाख रुपये खरेच देईल का? दिले तरी केंव्हा देईल? महत्त्वाचे म्हणजे लाख रुपये हातात आल्यावर त्यातून वर्षभराचा खर्च भागेल काय?"
"अहो, पण ह्या माणसांच्या हातात आलेले लाख रुपये का वर्षभर टिकणार आहेत?"
"चार दिवसात उडवतील नि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या."
"पण हा माणूस अशी घोषणा कशी काय करु शकतो?"
"ते जाऊ द्या. सकाळीच गावाकडून माझ्या बाबांचा फोन आला होता की, म्हणे लाख रुपयाच्या आमिषाला बळी पडून आमच्या गड्याने शेतात काम करणे सोडून दिले आहे. बाबा म्हणाले की, ती तुझी दीड दमडीची नोकरी सोडून बायकोसह गावी परत ये. शेतात काम कराल तर नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल..." ती व्यक्ती पोटतिडकीने सांगत असताना एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले,
"बोंबलली आमची यात्रा. कधी नव्हे ते यात्रा कंपनीच्या माध्यमातून यात्रेला जाणार होतो. आज रात्री निघणार होतो पण यात्रा कंपनीच्या वाहकासह सारे कर्मचारी लखोपती होण्यासाठी म्हणून निघून गेले. भरलेली रक्कम परत मिळाली तरी खूप झाले."
"अहो, पण लाख रुपये मिळवण्यासाठी बेकार असावे किंवा आहे ती नोकरी सोडावी असे कुठे आहे का? माझ्या तरी तसे ऐकिवात नाही."
"मला सांगा, योजनेचा फायदा घेण्यासाठी जी मंडळी हातचे सोडून पायथ्याच्या मागे लागलीय ही सारी पाच - सहा हजार रुपये दरमहा मिळवणारे आहेत. काम न करता जास्त पगार मिळणार असेल तर का सोडतील हो?"
"ते झाले हो. पण हे काम सोडता तोही लाभ पदरी पाडून घेऊ शकतात ना?"
"काय माहिती? अजून कशातच काही नाही..."
"ते नाही का, आभाळ पडले, पळा. पळा. अशी अवस्था आहे झाले...."
"हे राजकारणी केव्हा काय करतील काही सांगता येत नाही बाबा."
"आपण मुर्ख आहोत झाले. चला. कंपनीत तर जावे लागेल."
"मी काय म्हणतो, समजा हा घोषणेबाज पक्ष निवडून आला तर आपणही एक मागणी करुया..."
"टॅक्समध्ये सवलत मागणार? धत्तुरा मिळेल नोकरदारांना. अहो, ही घोषणाबाजी कुणाच्या जीवावर चालली आहे. आपण जो इमानदारीने टॅक्स भरतोय ना त्यावरच ह्या उड्या मारताहेत."
"बरोबर आहे. सवलतीचे सोडा पण उद्या ही घोषणा अंमलात आणायची ठरली ना तर नोकरदारांना अजून लुटतील. ते म्हणतात ना, पुणे लुटून साताऱ्याला दान तसे करु नये म्हणजे मिळवले."
"मला टॅक्समध्ये सवलत द्या असे म्हणायचे नव्हते तर प्रत्येक नोकरदाराला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येकाचे वार्षिक पगारात एक लाख रुपयाची वाढ करावी अशी मागणी आपण रेटली पाहिजे, तसा आग्रह धरला पाहिजे, काम पडलेच तर संप पुकारले पाहिजेत."
"म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की समजा एखाद्याला वार्षिक पॅकेज एक कोटी असेल तर या योजनेत त्याला एक कोटी एक लाख असा पगार व्हावा?" "बातो मे दम है। पण असे होणे केवळ अशक्य आहे. ही योजना केवळ गरिबांसाठी आहे."
"चला. 'जे जे होईल, ते ते पाहावे चित्ती असू द्यावे समाधान' हेच खरे." असे म्हणत ती व्यक्ती निघाली. पाठोपाठ एक-एक करीत सारेच निघाले. अजयही घरी पोहोचला त्यावेळी वर्षा वर्तमानपत्र वाचत बसली असल्याचे पाहून अजयने विचारले,
"हे काय? कामे झाली तुझी? वॉव! व्हेरी गुड! आता काय गरज त्या बाईची?"
"म्हणे काय गरज बाईची? तुमचीच वाट पाहात होते. कामे तशीच पडलेली आहेत..." वर्षा बोलत असताना अजयने मध्येच विचारले,
"म्हणजे? तुला म्हणायचे आहे की..."
"होय! जोपर्यंत बाई पुन्हा कामावर येत नाही तोपर्यंत तुम्ही मला कामात मदत करायची. खरकटी भांडी बाहेर नेऊन टाकायची. तुमच्या वेळेनुसार ती घासून आत आणून ठेवायची. वाटल्यास ती भांडी मी आवरून ठेवीन. दररोज कपड्याची मशीन लावायची. त्यात कपडे तुम्ही नेऊन टाकायचे. तुम्हाला जमत नसेल तर मी मशीन लावत जाईन. नंतर मशीनमधले सारे कपडे वाळत घालायचे आणि वाळलेले कपडे आत आणायचे काम तुमचे. फारच झाले तर वाळलेले कपडे घड्या घालण्याचे काम मी करेन..."
"अग, अग, बायको माझी..."
"होय. तुमचीच बायको आहे..." वर्षा बोलत असताना माझा भ्रमणध्वनी वाजला. त्यावर माझ्या भावाचे नाव दिसताच मी फोन उचलून म्हणालो,
"बोल दादा. काय झाले?"
"अजय, फार मोठा घोटाळा झाला आहे. आपल्या अनिलचे लग्न मोडले? "
"काय? पण का ? आधी सारी माहिती दिली होती ना?"
"होय. मुलगा इंजिनिअर आहे हे सांगितले होते. त्याचा गलेलठ्ठ पगारही सांगितला होता."
"मग कुठे माशी शिंकली?"
"माशी नाही तर आपला अनिल शिंकला. आपल्या साहेबांनी जोशमध्ये येऊन, मित्रांच्या बोलण्याला फशी पडून स्वतःच्या नावापुढे 'चौकीदार' हे बिरूद लावले आहे."
"मग काय झाले? सध्या हा ट्रेंड जोरात सुरू आहे."
"अरे, बाबा, ट्रेंड-फ्रेंड गेला खड्ड्यात! पोरीकडील मंडळींना वाटतय की, आपण खोटे बोललोय. मुलगा इंजिनिअर नाही तर चक्क चौकीदार आहे. त्यामुळे त्यांनी आत्ता फोनवर लग्न मोडत असल्याचा निरोप दिला. त्यांनी फोन ठेवला आणि मी तुला फोन लावला अजून अनिलला,त्याच्या आईलाही माहिती नाही."
"बरे झाले सांगितले नाही ते. आपण उद्या त्यांच्याकडे अनिलची सारी कागदपत्रे घेऊन जाऊ. ठिक आहे? ठेवतो..." असे म्हणत अजयने फोन ठेवला. अजय काही बोलण्यापूर्वीच वर्षा म्हणाली,
"मोडले ना लग्न? फिटली ना हौस चौकीदार होण्याची? कशाला कुणाच्या नादी लागून आपल्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा? मी किती हुशार आहे, मी कसा प्रत्येक बाबतीत पुढे राहतो, अप टू डेट राहतो असे मिरवण्याचे अनिलला भारी वेड आहे. आता आली ना वेड लागायची पाळी?"
"अग, तसे काही नाही. थोडा गैरसमज झालाय..."
"थोडा? अहो, लग्न मोडलय आणि तुम्ही थोडा म्हणताय? थोडा तर थोडा. मला काय? चला. मला थोडी मदत करा. तो भांड्याचा राडा घासा."
"मी काय म्हणतो. काही तरी मार्ग निघेल ग. थोडी वाट पाहू या ना." अजय म्हणाला.
"थोडी वाट? आत्ता तुमच्या पोटात डुकरं... कावळे ओरडतील आणि मग सारे घर डोक्यावर घ्याल."
"आपण एक काम करुया. मी की नाही, आत्ता फराळ ऑनलाईन बोलावतो. दुपारचे जेवणही ऑनलाईन बोलावू या.... डिजिटल इंडिया योजनेत आपलाही सहभाग नोंदवू या."
"डिजिटल इंडिया... व्वाह! काय हो, जेवण तर डिजिटल येणार नाही ना? बोलवा. माझे काय चालले? कसेही भांडी तुम्हालाच घासावी लागणार आहेत. आत्ता घासा, दुपारी घासा की उद्या घासा. भांडी घासल्याशिवाय स्वयंपाक होणार नाही कारण राखीव भांडी नाहीत." वर्षा बोलत असताना अजय वर्तमानपत्र उघडत म्हणाला,
"आश्चर्य आहे, पेपर आला? ही पोरे कशी काय नोकरी सोडून लखोपती व्हायला गेली नाहीत?.."
असे म्हणत असताना एका बातमीने त्याचे लक्ष वेधले.तो म्हणाला,
"वर्षे, अजून एक घोषणा झालीय. एका पक्षाच्या नेत्याने जाहीर केले आहे की, त्याच्या पक्षाचे सरकार आले तर तो एक अशी मशीन प्रत्येक घरी देईल की, ज्या मशिनीच्या एका बाजूने दगडं आत टाकली तर दुसऱ्या बाजूने मोती बाहेर पडतील..."
"जमा करून ठेवा दगडं... अहो, पाहताय का? अशी मशीन नाही दिली तर त्या नेत्याच्या डोंबल्यावर घालता येतील." वर्षा म्हणाली आणि दोघे हसत असताना अजय वैतागून म्हणाला,
"घ्या बोंब! हॉटेलवाला ऑर्डर घ्यायला तयार नाही..."
"कसा असणार? आज सगळ्या कामवाल्या बायका काम सोडून गेल्या असणार. हॉटेलमधून सारेच मागवत असणार. त्याच्याजवळ तेवढा माल तर पाहिजेत ना?"
"अग, तसे नाही. सारे डिलिव्हरी बॉय कामावर आलेच नाहीत."
"बाप रे! मग असे करा ना, तुम्ही जाऊन नाष्टा नि जेवण एकदाच घेऊन या."
"कसा आणणार? आज हॉटेलमध्ये फराळ, जेवण काहीही तयार झाले नाही. एकूणएक आचारी घरीच बसले आहेत."
"मग डब्बेवाले शोधा. त्यांची सेवा प्रॉम्ट असती."
"अग, तेही लखोपती होण्यासाठी कामावर आले नसतील तर?"
"आत्ता दादांचा फोन आला होता ना? अनिलचे लग्न मोडल्याचे निमित्त साधून आपण जाऊ त्यांच्याकडेच. वहिनीला कामवालीबाई ठेवल्याचे आवडत नाही. त्यामुळे त्यांचेकडे काही अडचण नसणार. फराळ, जेवण करून वाटल्यास सायंकाळचा डबा घेऊन येऊ या."
"अग, तसे बरोबर दिसणार नाही."
"का दिसणार नाही? ते चार चार दिवस येऊन राहत नाहीत? आपल्यावर वेळ आलीय म्हणून.." वर्षा तावातावाने बोलत असताना अजयच्या भ्रमणध्वनीवर त्याच्या मित्राचा सुनीलचा फोन आला होता.
"हां बोल सुनील, काय म्हणतोस?"
"अरे, काही नाही. मला जरा पन्नास हजार रुपयांची गरज होती रे. देशील का? अरे, निवडणुका झाल्या की देतो."
"पन्नास हजार? पण निवडणुकीचा आणि पैसे परतीचा संबंध काय?"
"अरे, निवडणुका झाल्या की, आपल्याला नोकरीत असणारांना तर जमणार नाही पण माझ्या बायकोचे नाव नोंदवतो आणि नवीन योजनेत ती लखोपती झाली की, तुझी रक्कम लगेच वापस करतो..." म्हणत सुनीलने सात मजली हास्य करु लागला. तसा अजयही हसत सुटला.
"अरे, या कालच्या घोषणेमुळे किती संकटे समोर उभी आहेत याची तुला कल्पना आहे का? तरीही तू विनोद करतोस?"
"अजय,मुळात ही घोषणाच एक विनोद आहे..."
"विनोद? सुनील, आज तुझ्याकडे कामवाली, दुधवाला, वॉचमन इत्यादी सारे कामावर आहेत का रे? काल झालेल्या घोषणेमुळे..."
"आहेत. तुझ्या घरी ज्या संकटांनी घर केलेले आहे ती सारी संकटे माझ्या घरातही ठाण मांडून बसली आहेत. मुलांना घेऊन जाणारी शाळांची वाहनेही आली नाहीत. टॅक्सीने, ऑटोने नेऊन सोडावे म्हटले तर सारे काही जाम आहे. एकही टॅक्सी किंवा ऑटो रस्त्यावर नाही आहे. सारे जण आपण लखपती कधी होऊ याचा विचार करत घरात दडी मारून बसले आहेत."
"तरीही तुला कोणतेही टेंशन नाही?"
"टेंशन घेऊन का प्रश्न सुटणार आहे? समोर आलेल्या परिस्थितीचा मस्तपैकी आनंद लुटूया. कधी नव्हे ते मुलांसह घरी राहण्याची संधी मिळाली आहे. मौज करुया. भांडी घासण्यातही एक मज्जा असते, भांडी घासताना बायकांना काय त्रास होतो याचा पुसटसा तरी अनुभव येईल. वातावरण कसे मजेशीर आहे बघ. तू कधी रेल्वेचे चाक पंक्चर झाले असल्याचे ऐकले आहे का?"
"काय? रेल्वेचे चाक आणि पंक्चर? काहीही हं सुनील..."
"हेच ते. अजय, आजच्या वर्तमानपत्रात एक बातमी आलीय की, एका पक्षाने जाहीर केले आहे की, वेगाने धावणारी रेल्वे पंक्चर होणे ही आपल्याकडे नित्याचीच बाब झाली आहे. आम्ही असे सोल्युशन तयार केले आहे की, धावती रेल्वे पंक्चर झाली तर आपोआप ते पंक्चर जोडले जाईल. रेल्वे थांबवण्याचीही आवश्यकता पडणार नाही..."
"बाप रे बाप! एवढी मोठी प्रगती?"
"होय. त्याच पक्षाचा प्रवक्ता पुढे म्हणतो की, शंभर टक्के मतदान होण्यासाठी आम्ही एका योजनेवर गेली काही वर्षे काम करत होतो, अत्यंत परिश्रमाने आमच्या तज्ज्ञांनी शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी एक योजना तयार केली आहे त्यानुसार आम्ही सत्तेत आल्यानंतर मतदान प्रक्रियेतून बोटाला लावली जाणारी 'शाई' पूर्णपणे बंद करण्यात येईल. एखादा मतदार मतदानाला येऊ शकणार नसेल किंवा गावात असूनही त्याची मतदानाचा हक्क बजावण्याची इच्छा नसेल तर त्याच्या नावावर कुणीही मतदान करु शकेल. तो गुन्हा ठरणार नाही... शिवाय एकापेक्षा अधिक मतदार संघात नाव नोंदवून प्रत्येक ठिकाणी मतदान करता येईल. अगदी एकाच दिवशी दोन मतदान केंद्रावर मतदान असले तरीही मतदान करता येईल."
"अफलातून योजना आहे की..."
"हे तर काहीच नाही. एका नेत्याने तर असे जाहीर केले आहे की, प्रत्येकाला कुठेही, कोणालाही डोळा मारण्याचा अधिकार देण्यात येईल. डोळा मारणाऱ्या व्यक्तीने आपला सेल्फी सरकारकडे पाठवावा. ज्या व्यक्तीने सर्वाधिक डोळे मारल्याचे सिद्ध होईल त्या व्यक्तीचा जाहीर सन्मान करून 'नयनतीर सम्राट' अशा पदवीने गौरविण्यात येईल. अशा व्यक्तींच्या माध्यमातून 'डोळे मारण्याचे खास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. यात ज्यांना डोळे मारणे जमत नाही अशा लोकांना खास प्रशिक्षण देण्यात येईल...."
"काहीतरी हं."
"अजय, जरा आजचे वर्तमानपत्र उघडून, डोळे मारून... डोळे उघडे ठेवून नीट वाच. दुसरी एक घोषणा ऐक... ज्यांना स्वतःच्या पक्षाचे सरकार केंद्रात आरुढ व्हावे असे वाटतेय त्यापैकी एका पक्षाच्या नेत्याने असे वचन दिले आहे की, त्यांचे सरकार आले तर प्रत्येक कुटुंबाला चंद्रावर प्लॉट देईन..."
"दिवास्वप्न आहे. मृगजळ आहे...."
"मान्य आहे, अजय. पण या मृगजळामागे धावणारी जनता आहे म्हणून हे लोक दिवास्वप्न दाखवतात. मला सांग म्हणजे दिवास्वप्नाचे अजून एक उदाहरण तुझ्याकडेही शेती आहे. पाण्याखालची आहे, सुपिक आहे तर पाच एक्करमध्ये दोन महिन्यात तू कोणत्या पिकातून एकशे वीस कोटी रुपयांचे उत्पन्न काढशील?"
"दोन महिने... एकशे वीस कोटी रुपयांचे उत्पन्न? कसे शक्य आहे?"
"नाही ना. पण हे भावी पंतप्रधानांना कोण सांगणार? त्यांनी अशी घोषणा केली आहे की, असे उत्पन्न काढण्यासाठी जनतेला प्रशिक्षण देण्यात येईल."
"कमाल आहे या लोकांची जनतेला मुर्ख बनवण्याची...."
"अरे, यहाँ उल्लू की कमी नही, बस बनानेवाले चाहिये।"
"खरे आहे. बरे जाऊ दे. नाश्त्याची वेळ झालीय. मला बाहेरून नाश्ता आणायचा आहे. ठेवतो." असे म्हणत अजयने फोन बंद केला. दीर्घ श्वास घेऊन तो बाहेर जाण्यासाठी उठणार तितक्यात आतून वर्षा हातात फराळाच्या बशा घेऊन आलेली पाहून अजयने विचारले,
"नाश्ता केलास?"
"मग काय करणार? जीवश्च कंठश्च मित्राशी चर्चा सुरू होती. कधी संपणार ते कळत नव्हतं. दोन चार भांडी घेतली घासून आणि बनवले तुमचे आवडते मुरमुरे..."
"मुरमुरे? वॉव! क्या बात है। आण. आण. लवकर आण..." असे म्हणत अजयने तिच्या हातातील बशी ओढून घेतली आणि तो त्या मुरमुऱ्यावर तुटून पडला. फराळ होईपर्यंत दोघेही केवळ नजरेने बघत होते. फराळ झाला. चहा झाला. वर्षा आत काही तरी कामासाठी गेली आणि अजयने टीव्ही सुरू केला. त्यावरील विविध वाहिन्यांवर आदल्या दिवशी जाहीर झालेल्या घोषणांवर चर्चा सुरू होती. एका वाहिनीवर चर्चेत सहभागी झालेला तज्ज्ञ (?) म्हणाला,
"काय काय घोषणा करत आहेत, ऐकून-वाचून डोके फिरतय बघा. एका पक्षाने जाहीरनाम्यात काय सांगितलय तर आपल्या देशात गावोगावी चांगले स्मशान नाहीत. तिथली दुरावस्था पाहून कुणालाही मरण येऊच नये असेच वाटते त्यामुळे आम्ही गावोगावी असे सुंदर, मनमोहक स्मशानभूमींचे निर्माण करु की, त्यामुळे कुणालाही लवकर मरावे वाटेल. स्मशानभूमीत एरवी कुणी फिरकत नाही त्यामुळे गावातील प्रेमी जोडप्यांना त्या स्मशानभूमीत काही काळ प्रेमाच्या गुजगोष्टी करण्यासाठी निवांत, एकांत मिळेल..."
"या योजनेला 'स्मशानात रोमांस' असे नाव द्या म्हणावे."
"त्यापेक्षा ही राजकीय मंडळी 'स्मशानात मधुचंद्र' असे नाव देतील आणि तिथे मधुचंद्रासाठी जाणाऱ्या जोडप्यांसाठी विशेष सवलत जाहीर करतील."
"आता हेच बघा. हा पक्ष तसा प्रादेशिक असला तरीही राष्ट्रीय पातळीवर स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करुन आहे. आगामी निकालानंतर कदाचित किंगमेकरची भूमिका बजावू शकतो पण त्या पक्षाने काय आश्वासन दिले आहे ते तर ऐका. हा पक्ष म्हणे ऐनकेनप्रकारे सत्तेत आला तर त्या पक्षाला ज्या गावातून जास्तीत जास्त मतदान होईल त्या गावात लॉटरी काढून पाच कुटुंबीयांना पक्षाच्या खर्चाने परदेशात पाठवणार आहे."
"पक्षाच्या खर्चाने कशाचे आलेय? सरकारी खर्चाने पाठवतील..."
"पण विश्वास कसा ठेवायचा हो? 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी."
"ते आवतन खरे ठरेल की नाही सांगता येणार नाही पण ही घोषणा मात्र हिट ठरण्याची आणि प्रत्यक्षात उतरण्याची दाट शक्यता आहे." एक चर्चा तज्ज्ञ आत्मविश्वासाने म्हणाले.
"अशी कोणती योजना आहे बाबा?"
"अहो, दारुची योजना. एक नेता जाहीरपणे असे सांगतोय की, त्याच्या हातात देशाची सत्ता दिली तर म्हणे देशातील प्रत्येक कुटुंबाला दररोज दहा लिटर दारु फुकटात देण्यात येईल..."
"आणि ज्या कुटुंबात कुणीही दारु पित नसेल त्या कुटुंबाने काय करावे?"
"दारु प्यायला सुरुवात करावी..." तो तज्ज्ञ म्हणाला आणि सारी तज्ज्ञ मंडळी सात मजली हास्यात बुडालेली असताना दुसरा तज्ज्ञ म्हणाला,
"या निवडणुकीत पुन्हा नोटबंदी गाजणार असे दिसतय. एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रवक्त्याने असे जाहीर केले आहे की, ज्या कुणाजवळ हजार-पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा असतील तर त्या नोटा आमचे सरकार बदलून देईल..."
"एक-एक मिनिट हं. हे जे कुणी म्हणतेय ते तेच तर नव्हेत ज्यांनी काही वर्षांपूर्वी असे विधान केले होते की, जुन्या बायकोपेक्षा नवीन बायको जास्त मजा..."
"बरोबर ओळखलेत. तेच हे महाशय आहेत."
"मला वाटते, त्यांनी अशी घोषणा करण्यापेक्षा जुनी बायको बदलून मिळेल अशी घोषणा केली असती तर ती त्यांना अधिक शोभली असती."
"किती गमतीदार घोषणा होत आहेत नाही का? वास्तवाकडे कुणी वळत नाही. आता हेच बघा ना, कालच्या 'लाख रुपये' या घोषणेला ताबडतोब दुसऱ्या पक्षाने जबरदस्त उत्तर दिले आहे बघा. आपल्याला डॉलरची प्रचंड उत्सुकता असते. प्रत्येकाची आपल्याजवळ एक तरी डॉलर असावा अशी इच्छा असते ती जाणून हा पक्ष म्हणतोय की, आम्ही निवडून आलो तर प्रत्येक कुटुंबाला पाच डॉलर देईन..."
"पाच डॉलर कशाचे देतोय... डॉलर कंपनीची अंतर्वस्त्रे देईन. तीही जुनी वापरलेली..."
"कोण काय करेल काही सांगता येत नाही...."
"ह्या पक्षाच्या जाहीरनाम्यातील मला सर्वात जास्त ही घोषणा जास्त आवडते. काय म्हणतेय बघा.. म्हणे यांचा पक्ष सत्तेत आलाच तर आपल्या देशात चहा पिकवू देणार नाही, चहा विकू देणार नाही आणि चहा पिऊ देणार नाही का तर म्हणे यानंतर कुणी चहावाला पंतप्रधान होऊ नये..."
"काही तरी आपलं. कोंबडा झाकल्याने का सूर्य उगवणार नाही असे थोडीच होणार आहे. शिवाय चहाचे कट्टर समर्थक, चहा मळेवाले, कामगार अशा घोषणेमुळे विरोधात जाणार नाहीत का?"
"तेवढा खोलवर विचार कोण करणार आहे?"
"मला वाटते आतापर्यंतच्या जाहीरनाम्यात सर्वात क्रांतिकारी जाहीरनामा माझ्या हातात आहे. हा पक्ष असे जाहीरपणे सांगतोय की, आम्ही सत्तेत आलो तर आतंकवाद हा गुन्हा समजल्या जाणार नाही तर आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल. भरमसाठ वाढलेली लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आतंकवादी हे एकमेव उत्तर आहे. त्यामुळे जे आतंकवादी जास्तीत जास्त नागरिक मारतील त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येईल. दुर्दैवाने अशा मोहिमेत ज्या आतंकवाद्यांचा मृत्यू होईल त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण, नोकरी, प्रचंड आर्थिक मदत करण्यात येईल..." ते चर्चासत्र रंगात आले असताना अजयच्या भ्रमणध्वनीवर एक संदेश प्राप्त झाला. अजयच्या इमारतीत राहणाऱ्या सभासदांच्या व्हाट्सएप समूहावर आलेल्या संदेशात लिहिले होते,
'आजपासून कचऱ्याची गाडी येणार नाही कारण सर्वांना लखोपतीची भुरळ पडली असून तशी आस लागली आहे. सर्वांनी दहा मिनिटात खाली यावे. कचरा दहनाचा सामुहिक कार्यक्रम करावयाचा आहे. जे कुणी घरी नसतील, जे या दहन कार्यक्रमास अनुपस्थित राहतील त्यांनी मेंटेनन्स देताना पंचवीस रुपये अधिक द्यावेत...' अजय भ्रमणध्वनी बंद करत मनाशीच म्हणाला, 'पंचवीस रुपयेच द्यावे लागतील ना? देता येतील... अरे, पण हा काय आजच्या पुरता प्रश्न नाही. भविष्यात किती वेळा कचरा जाळावा लागेल ते सांगता येणार नाही. चला जाऊया...' असे म्हणत अजय वर्षाला सांगून दहनस्थळी पोहोचला. इमारतीत जवळपास शंभर कुटुंबं राहात होती पण त्यावेळी तिथे दहा-बारा लोक जमले होते. ते सारे मिळून कचऱ्याच्या टाक्याजवळ गेले.
"अहो, वाळलेला कचरा जाळता येईल पण ओला कचरा कसा जाळणार?"
"खरेच की. उद्यापासून कुणीही इथे कचरा टाकायचा नाही. ज्याने त्याने आपल्या घरातील कचऱ्याची स्वतःच विल्हेवाट लावावी. सोसायटी जबाबदार राहणार नाही..."
"अहो, पण या ओल्या कचऱ्याचे काय करावे?"
"टाकीचे तोंड गच्च बांधून टाकू आणि रात्रीच्या अंधारात मागच्या मोकळ्या जागेत नेऊन कचरा फेकून देऊ." असे म्हणत एक जाड जुनी सतरंजी घेऊन तिने टाकीचे तोंड बांधून टाकले आणि सारे घरोघरी परतले.
'काय करावे बाप्पा! अशीच अवस्था राहिली आणि तो 'लखोपती' योजनेवाला पंतप्रधान झाला आणि कर्मधर्मसंयोगाने त्याने स्वतःचे लाख रुपये देण्याचे वचन पूर्ण केले तर सारी व्यवस्था कोलमडून पडेल हे निश्चित! लोकांजवळ पैसा असेल, कामाचीही कमतरता नसेल पण त्यांच्याकडे
काम करायला कुणी तयार नसेल...' असे पुटपुटत अजय घरात शिरला. पाहतो तर काय वर्षा चक्क आनंदाने गात होती, मध्येच शरीराभोवती गर्रकन फिरकी घेत होती. अजयला पाहताच ती धावत आली आणि त्याच्या गळ्यात पडली.
"हे..हे..ह काय झाले? तू एवढी आनंदी कशी?" अजयने विचारले.
"आ..आ..आपली कामवाली कामावर येत आहे..."
"क..क..काय? खरे सांगतेस तू? बाई कामावर येतेय..." अजयने विचारले.
"होय. वाचा हा तिचा संदेश..." असे म्हणत वर्षाने भ्रमणध्वनी अजयकडे दिला. बाईने लिहिले होते,
'बाईसाहेब, मी तुमच्याकडे बरीच वर्षापासून काम करते आहे. खरेतर मी कुठेही कामाला जाणार नाही. पण तुमचे वेगळे आहे. दोन वर्षांपूर्वी माझ्या पोरीचे लग्न ठरले त्यावेळी मी न मागता तुम्ही एक वर्षाची आगाऊ पगार दिली होती. अजूनही दोन हप्ते बाकी आहेत. वाईट वाटून घेऊ नका पण मला माहिती आहे, तुम्हाला कामाची सवय नाही. मी काम सोडले तर तुम्हाला कुणी बाई तर मिळायची नाही पण तुम्हाला त्रास मात्र होईल म्हणून मी फक्त तुमच्या घरी काम करणार आहे. संध्याकाळी चार वाजता येते. तोवर भागून घ्या..'
"अरे, वा! खरेच वर्षा तुझ्या दातृत्वाची, स्वभावाची हिच खरी ओळख आहे..."
"आलेच..." म्हणत वर्षा आत असताना अजयने टीव्ही लावला. त्यावर तोच लखोपती योजनेचा करता करविता काही तरी बोलणार होता. तशी तयारी सुरु असल्याचे पाहून अजय म्हणाला,
"वर्षा, थांब. बघ तो लाख रुपयेवाला काही तरी नवीन घोषणा करतोय..."
"आता काय घोषणा करणार? ..." वर्षा विचारत असताना तो नेता गंभीरपणे म्हणाला,
"काल जी लाख रुपये देण्याची घोषणा केली होती तो एक 'चुनावी जुमला' होता. असे समजा एक विनोद होता, एप्रिलफुल होते असे समजा. जोशमध्ये होश गमावून काही तरी बोलून बसलो. पण माझ्याच पक्षाला भरभरून मते द्या. घोषणा करणार नाही पण मी ही तुम्हाला खूप काही देईल... ज्याची कल्पना कुणी करु शकणार नाही..."
"निर्लज्जम् सदा सुखी..." असे हसत म्हणत वर्षा आत गेली आणि एक मोठे संकट टळले अशा अर्थाने दीर्घ श्वास घेत अजयने सोफ्यावर मान टेकवली...

नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर, लेन०२,
हॉटेल जय मल्हारच्या जवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१