Chandrayan-21 books and stories free download online pdf in Marathi

चांद्रयान-२१

* चांद्रयान -२१! *
चांद्रयान २० पाठोपाठ चांद्रयान २१ मोठ्या आत्मविश्वासाने, दिमाखाने, अभिमानाने, तेजाने चंद्राकडे झेपावले. भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. वैज्ञानिकांना खूप खूप आनंद झाला. चंद्राच्या त्या भूभागावर यापूर्वी दहावेळा फक्त भारतीयांनी पाय रोवत तिरंगा फडकावला होता. इतर कुण्याही देशाच्या अगोदर भारतीय वैज्ञानिक चांद्रयानाच्या आधीच चंद्रावर पाय ठेवते झाले त्यामुळे त्यांना होणारा आनंद हा साहजिक, नैसर्गिक होता. एखाद्या गोष्टीवर जो कुणी रात्रंदिवस, तहानभूक विसरून यश मिळवितो त्यावेळी मिळणाऱ्या फळाची चव तो सर्वांआधी चाखण्याची इच्छा, आकांक्षा बाळगून असतो, तो त्याचा अधिकार, हक्क असतो. आपल्या लोकशाहीत एक प्रथा आहे, लोकशाहीने प्रदान केलेला हक्क आहे तो म्हणजे टीका करणे. अनेक जण तोंडदेखले कौतुक करतील पण ते करताना ही टीकेची, चुका दाखवून देण्याची संधी सोडत नाहीत...
चांद्रयान २१ च्या बाबतीतही तसेच झाले. चांद्रयान २१ अगोदर ठरलेल्या दिवशी चंद्राच्या दिशेने, अवकाशात झेपावले नाही तर त्याने तब्बल आठ दिवस उशिराने अवकाशात झेप घेतली. वास्तविक हा विलंबही वैज्ञानिकांच्या हुशारीचे, त्यांच्या सतर्कतेचे कौतुक करण्यासारखाच होता. एक छोटी, अनवधानाने घडत असलेली चूक लक्षात आली आणि पुढील अनर्थ टळला. कोट्यावधी रुपयांचे नुकसान तर झालेच असते परंतु आपल्या वाईटावर टपून बसलेल्या, आपले यश खुपणाऱ्या देशांच्या हातात आयते कोलीत मिळाले असते. ही नाचक्की टाळण्यातही आपल्या शास्त्रज्ञांना यश आले ही बाबही गौरवास्पदच आहे कारण इतर देशांनी विशेषतः आपल्या शत्रुराष्ट्रांनी टीका टिप्पणी करण्याच्या आधीच आपल्या वैज्ञानिकांनी पुढील उड्डाणाची तारीख जाहीर करून टाकली. पण मुळात नकारात्मक दृष्टी असलेल्या, देशाचे भले न बघवणाऱ्या काही लोकांना यात अपयश दिसले तेही शास्त्रज्ञांचे आणि त्याहीपलीकडे आपल्या सरकारचे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळालेली माहिती तर म्हणे सुत्रांनी दिलेली माहिती भयंकर, विचार करायला लावणारी होती. हे सूत्रही नको तिथे, नको त्यावेळी, नको त्या व्यक्तीच्या हातात अत्यंत महत्त्वाची माहिती देतात... जणू कोलीत दिल्याप्रमाणे! आता हेच बघा ना, दोन नेत्यांमधील हा संवाद...
"अहो, हो. हो. नमस्कार. काय पण आपल्या शास्त्रज्ञांची कमाल आहे ना. सरळ चंद्रावर झेप घेतली राव. तीही अशा ठिकाणी की, चंद्राच्या त्या भागावर अजून इतर कोणत्याही देशाला जाणे जमले नाही. पण आपण तिथे दहा वेळा पोहोचत आहोत."
"कसची कमाल नि काय? फुकटात करतात का सारे? त्यासाठीच त्यांना पगार दिला जातो. बरे, ही उड्डाण आज भरलीय हो पण ही सुरुवात केव्हा झाली. या मोहिमेचा श्रीगणेशा आम्ही सरकारमध्ये असतानाच झाला होता, तसा आदेश आमच्या तत्कालीन सरकारने दिला होता हे का हे सरकार सांगत नाही? कामगिरी शून्य पण आव कसा आणते ते पहा. जसे काय हे यान वैज्ञानिकांनी नव्हे तर पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्र्यांनी उडवले आहे."
"कुणी का उडवेना पण जगभर गौरव आपल्या देशाचा झालाय, मान तर आपल्या देशाची ताठ झालीय ना? कसे आहे, श्रेय लुटण्याची सवय आपल्या देशातील पक्षांना आणि नेत्यांना का आज लागलीय का? ती जुनीच आहे. "
"पण आधीचा बार फुसका ठरला त्याचे काय? पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आठ दिवस आधीची तारीख पुढे का ढकलली? ही जबाबदारी कुणाची? जर सरकार आजच्या यशाचे श्रेय घेत असेल, स्वतःची पाठ थोपटून घेत असेल तर मग अपयशाचे धनीही दुसरे कुणी नाही तर सरकारनेच व्हायला हवे."
"अगदी बरोबर आहे. असे यापूर्वी अनेकदा झाले आहे. तुम्ही सरकारात असतानाही यानाचे उड्डाण लांबलेच होते की. तुम्हाला सांगू का, चांद्रयानाचे उड्डाण का आठ दिवसांनी लांबले याबाबतची माझ्या सुत्रांनी दिलेली माहिती निराळीच आहे..."
"काय म्हणता? वेगळी माहिती मिळाली आहे? अहो, मग ती सार्वजनिक का करत नाहीत? दोषींना शिक्षा होईल ना?"
"कशी होणार? विरोधकांचा त्यामागे हात असता तर नक्कीच शिक्षा झाली असती. आतापर्यंत ती व्यक्ती गजाआड झाली असती..."
"पण मग अशी व्यक्ती आहे तर कोण की जिला सरकार हात लावू शकत नाही?"
"सरकार पक्षाचा एक महत्त्वाचा आणि मोठा मंत्री?"
"काय म्हणता? एका मंत्र्याने चांद्रयान २१ चे उड्डाण लांबवले? आतापर्यंत लग्नसमारंभ, रेल्वे, मयत, विमान या बाबींना मंत्र्यांमुळे उशीर झाला हे आपण अनुभवले होते नव्हे आपल्यामुळेही या गोष्टी लांबल्या आहेत पण यान अवकाशात सोडायला एका मंत्र्यामुळे उशीर झाला हे पहिल्यांदा ऐकतोय..."
"हे खरे आहे. पण त्या एक मंत्रीणबाई आहेत."
"महिला मंत्री? पण असे काय घडले? त्यांचा असा कोणता स्वार्थ होता त्यांचा?"
"त्याचे काय झाले, आपल्या या मंत्रीणबाई आहेत अत्यंत धार्मिक. उपासतापास, पूजाअर्चा, नवससायास यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. दररोज कार्यालयात येताना वाटेतल्या प्रत्येक देवळात त्या दर्शनासाठी थांबतात. ट्रॅफिक जाम होते पण या बाईसाहेब स्वतःचा हट्ट सोडत नाहीत. त्यातल्या त्यात गणपतीबाप्पा हा त्यांचा अत्यंत आवडता आणि तितकाच आस्थेचा देव! देशातील सोडा परंतु परदेशात गेल्यावरही त्या तिथल्या एकूणएक गणपतीचे दर्शन घेऊन येतात. दर महिन्याच्या चतुर्थीला त्या निर्जली उपवास करतात..."
"त्यांची ही कीर्ती मी पण ऐकून आहे पण मला हे समजत नाही त्यांच्या धार्मिक वृत्तीचा, उपवासाचा चांद्रयान सोडण्यासाठी उशीर होण्याचा संबंध काय?"
"तेच तर सांगतोय की, चांद्रयान २१ अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज झाले असताना या बाईंना कुणीतरी सांगितले की, चांद्रयानासोबत चंद्रासाठी जर तुम्ही नैवेद्य पाठवला तर तुमच्या साऱ्या आशा, आकांक्षा, इच्छा पूर्ण होतील..."
"मंत्री आहेत. आता कोणत्या इच्छा बाकी आहेत?"
"हे तुम्ही विचारताय? तुम्ही स्वतः मंत्रीपदी असताना किमान पंचवीस वेळा तरी पंतप्रधान होण्यासाठी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला की नाही?"
"अच्छा! अच्छा! आले लक्षात. पंतप्रधान होण्यासाठी चंद्राला नैवेद्य पाठवावा म्हणून चांद्रयानाचे उड्डाण लांबवले तर? अहो, मग त्यादिवशीही नैवेद्य पाठवता आला असता ना?"
"आला असता. पण नैवेद्य पाठवणार कोण तर एक मंत्री? नैवेद्य जाणार कुणासाठी तर चंद्रासाठी? पाठविण्यात येणाऱ्या यानाचे नाव काय तर चांद्रयान २१! योगायोग असा की, गणपतीला प्रिय असणाऱ्या अनेक बाबी या एकवीसच्या संख्येत अर्पण कराव्या लागतात. चांद्रयानही बरोबर एकविसाव्या दिवशी चंद्रावर पोहोचणार. ह्या साऱ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी त्याचा विधीही तसाच असणार ना? बाईंनी एकशे एक ब्राह्मणांकरवी मोठा यज्ञ करविला. तो सोहळा चार दिवस चालला. का तर तो नैवेद्य चांद्रयान चंद्रावर पोहोचल्यावर म्हणजे साधारण एक महिन्यांनंतर चंद्राला मिळणार होता. त्यामुळे तो नैवेद्य खराब होऊ नये म्हणून त्या मोदकावर धार्मिक, रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी चार पाच दिवसांचा कालावधी लागणार होता म्हणून चांद्रयानाची उड्डाण प्रक्रिया एका आठवड्याने लांबवण्यात आली..."
"मायगॉड! केवढी ही धर्मांधता! त्यासाठी त्या वैज्ञानिकांना वेठीस धरण्यात आले."
"कसे आहे, आपण एकमेकांवर टीका करण्यात, दोष - चुका शोधण्यात धन्यता मानतो पण आपण कसे वागतो याकडे कुणी लक्ष देतो का? तुम्ही पंतप्रधान होण्याच्या लालसेपोटी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करताना होमहवन, यज्ञ या गोष्टी करताच की नाही? बरे, या 'नैवेद्ययानाचा' पार्ट टू माहिती आहे का तुम्हाला?"
"म्हणजे? अजून काही शिल्लक आहे का?"
"तर मग? लागो बाई लागो साता घरी लागो याप्रमाणे किंवा एखाद्या संसर्गजन्य रोगाप्रमाणे ती बातमी सरकार पक्षाच्या इतर मंत्रीणी, मंत्र्यांच्या बायका यांच्यापर्यंत पोहोचली. मग सर्वांनीच स्वतःच्या घरचा प्रसाद यानामार्फत चंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी चंग बांधला. ज्या दिवशी हे चांद्रयान अवकाशात झेपावणार होते त्यादिवशी तिथे जवळपास ट्रकभर प्रसाद जमा झाला. शेवटी प्रमुख अधिकाऱ्यांनी कुणाचाही प्रसाद पाठवायचा नाही असा निर्णय घेतला..."
"मग त्यांना विरोध झाला नाही?"
"आपल्या लोकशाहीत कोणतीही गोष्ट बिनविरोध होईल का? प्रचंड विरोध झाला. यान बिनाप्रसाद जाऊ द्यायचे नाही असा चंग बांधण्यात आला. शेवटी अधिकाऱ्यांनी एक शक्कल लढवली. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या प्रसादाचे गाठोडे सोडून एक एक कण प्रसाद काढून तो यानामार्फत पाठविण्याचा निर्णय झाला."
"ते झाले हो. पण आपले विरोधकांचे, देशाचे सोडा पण यान पाठवायला उशीर झाला म्हणून परदेशात केवढी नाचक्की झाली त्याचे काय?"
"कसे आहे, जी आपली देशी विरोधकांची नीती तीच नीती परदेशी विरोधकांची! आपल्या सरकारने कितीही चांगले कार्य करु देत सरकारवर देश-विदेशातील विरोधक तुटून पडतात."
"काय झाले माहिती आहे का, तुम्हाला सांगतो, माझ्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेजारी देशाने म्हणे अब्जावधी रुपये खर्च करून एक 'अडथळा यान' निर्माण केले होते..."
"अडथळा यान? अब्जावधी रुपये खर्चून? एवढा पैसा आणला कुठून त्यांनी? कंगाल झालाय.शंभर रुपयाला मोहताज झालेला असताना त्याने एवढी मोठी रक्कम आणली कुठून? भीक मागितली असणार... नक्कीच."
"अहो, नाटक असते त्या देशाच्या सरकारचे. कंगाल नाही की भंगार नाही. लाचार मात्र जरूर आहे. इतर देशांकडे भीक मागू मागू प्रचंड माया जमवून तो आपल्या देशावर आक्रमण करतो..."
"पण हे अडथळा यान आहे तरी काय?"
"आपला देश ठरलेल्या दिवशी यान पाठवणार होता. शेजारी देशाने असे एक यान दोन दिवस आधी अवकाशात पाठवले की, दोन दिवसांनी आपले यान ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गावर असे एक व्हायरस म्हणा किंवा रासायनिक द्रव्य पसरावयाचे की, त्यामुळे आपल्या यानाच्या प्रवासात अडथळे तर निर्माण करावयाचे पण आपल्या यानात असलेली महत्त्वाची यंत्रणा नेस्तनाबूत करायची, जमलेच तर आपल्या चांद्रयान२१ ची दिशा भरकटून टाकायची म्हणजे एक तर आपले यान चंद्रावर पोहोचणार नाही. भलतीच कुणीकडे जाऊन नष्ट होईल. त्यामुळे आपल्या सरकारच्या, वैज्ञानिकांच्या मनसुब्यावर, आशा-आकांक्षावर पाणी फेरल्या जाईल. आपली स्वप्ने धुळीला मिळतील..."
"बाप रे! असा क्रुर विचार होता काय? पण का हो, ते अडथळा यान आपण आठ दिवसांनंतर अवकाशात पाठवलेल्या चांद्रयान २१ ला अडथळा करू शकत नव्हते का?"
"नाही ना. तिथेच तर आपल्या दुश्मन देशाचा जबरदस्त पराभव झाला कारण त्या अडथळा यानाचे जीवनच मुळात बहात्तर तासांचे म्हणजे ईनमीन तीन दिवसांचे होते. त्यानंतर ते अडथळा यान आपोआप मृत झाले आणि त्यानंतर चार दिवसांनी आपले चांद्रयान २१ यशस्वीपणे, विनाअडथळा मोठ्या दिमाखाने अवकाशात झेपावले."
"म्हणजे बघा,मंत्रीणबाईंच्या नैवेद्य पाठविण्याच्या हट्टापायी यानाचे उड्डाण लांबले ते आपल्या देशाच्या पथ्यावर पडले म्हणायचे. दुसऱ्या शब्दात गणपतीबाप्पा पावला म्हणायचा. पण का हो ही अडथळायानाची माहिती त्या मंत्रीणबाईंना किंवा पंतप्रधानांना दिली की नाही? म्हणजे काय होईल ते त्या देशावर उचित कार्यवाही करतील..."
"नको रे बाप्पा! हे पंतप्रधान असेही म्हणतील की, दुश्मन देशाच्या अडथळा यानाची कुणकुण आम्हाला वेळीच लागली होती. शेजारी राष्ट्राचा डाव उधळून लावण्यासाठीच आम्ही मुद्दामहून आपल्या यानाचे प्रस्थान आठ दिवसांनी लांबवले. तोपर्यंत अडथळा यानाचा आम्ही अवकाशात परस्पर अडथळा दूर करण्याची महत्त्वाची कामगिरी बजावली. कसे आहे, निवडणुका तोंडावर आहेत. सरकारपक्ष त्या दुश्मन यानाचा निवडणूक प्रचारात फायदा उचलतील आणि पुन्हा आपल्या बोकांडी येऊन बसतील."
"बरोबर आहे. पंतप्रधानांना अडथळा यानाची माहिती नाही हे आपल्यासाठी चांगलेच आहे. आपण आक्रमकतेने चांद्रयान २१ आठ दिवस उशिरा का सोडले या मुद्द्यावर प्रचारात रणधुमाळी माजवू या. पावली तर पावली सत्तासुंदरी नाही तर आपले विरोधीपक्षाचे बाक बरे..."
ते नेते बोलत असताना सभागृहात सुरू असलेली एका महत्त्वाच्या विधेयकावरील चर्चा संपली असून त्यावर मतदान घेण्यात येणार होते त्यामुळे सदस्यांनी सभागृहात हजर राहावे यासाठी इशारा देणारी घंटी वाजत असल्याचे पाहून तो नेता पुढे म्हणाला,
"चला. मतदानाचा हक्क बजावावा लागणार..."
"काय फरक पडणार आहे? आपले मत वाया जाणार. आपण पडलो विरोधी पक्षातले. सरकारकडे प्रचंड मतदान आहे फक्त विरोधक जिवंत आहेत हे दर्शविण्यासाठी मतदान करावयाचे झाले. चला. जाऊया." असे म्हणत ते दोघेही सभागृहाकडे निघाले...


नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर, लेन०२,
हॉटेल जय मल्हारच्या जवळ,
थेरगाव, पुणे ४११०३३
९४२३१३९०७१


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED