चला धोंडे खाऊया! ॥  Nagesh S Shewalkar द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चला धोंडे खाऊया! ॥ 

॥ चला धोंडे खाऊया! ॥
'नमस्कार! मी चंद्रकांत, चंदू, चंद्रू,चँडी, चंद्या, चंद्र्या इत्यादी अनेक नावांनी गौरवान्वित झालेला. नावात काय असते? असे कुणी तरी म्हटले असले तरीही नावाच्या अपभ्रशांत बरेच काही दडलेले असते. अनेकदा आत्यंतिक लाडाने अपभ्रंश होत असला तरी काही वेळा मिळालेली नावे वैतागून, चिडून, रागाने दिलेली असतात. असो. हे झाले माझ्या पाळण्यातल्या, टोपणनावांचे! आता मी तुम्हाला माझ्या एका अत्यंत लाडक्या, आवडत्या, जीव की प्राण असलेल्या एका व्यक्तीच्या नावाचा इतिहास सांगणार आहे. अहो, असे बघताय का? आता आवडती व्यक्ती पत्नीशिवाय कोण असणार आहे? असली तरीही जाहीरपणे कबुली देण्याची हिंमत किती लोकांमध्ये आहे? प्रश्न तो नाही तर माझ्या बायकोच्या नावाचा आहे. आता विषय निघालाच आहे तर आधी बायकोचे नाव जाहीर करतो. माझ्या अर्धांगिनीचे नाव आहे, मधुमती! तुम्ही म्हणाल एकविसाव्या शतकात हे असले विसाव्या शतकातले नाव कसे? खरी गंमत तीच तर आहे. लग्न झाले तेव्हा आम्ही दोघे तिशीतले. प्रेमविवाह नसला तरी लग्न जमले, अक्षता पडायचा मुहूर्त सहा महिने दूर होता मग काय आम्ही लागलो भेटायला! त्यातून जुळले की प्रेम! पाच-सहा भेटीनंतर मी धिटाई दाखवत मधुमती या नावाचा महिमा विचारताच ती म्हणाली, "बरे झाले. तुम्ही विषय काढला ते. लग्न झाल्यानंतर माझे नाव बदलायचे नाही." मी विचारले, "तसे का? किती जुनाट नाव आहे......" त्यावर ती ताडकन म्हणाली, "हे नाव माझ्या आजोबांच्या पसंतीचे आहे. त्याचीही एक मजेशीर कथा आहे. माझ्या आजोबांना सिनेमाचा फार शौक होता. त्यांच्या लग्नाचा विषय निघाला की, आजी हसतहसत सांगायची की, त्यांच्या लग्नात सिमंत पूजनाची तयारी सुरू असताना नवरदेव म्हणजे माझे आजोबा चक्क सिनेमा पाहायला गेले होते. सिनेमा कोणता तर 'बॉबी!'. आजोबांना जुन्या काळातील मधुबाला ही नटी खूप खूप खूपच आवडायची. म्हणून तिच्या नावावरून माझे नाव मधुबाला ठेवायचे असा आजोबांचा हट्ट होता परंतु आजीने त्याला कडाडून विरोध केला. मग माझ्या आई-बाबांनी मध्यस्थी करून दोघांनाही मधुमती हे नाव ठेवायला राजी केले असो."
माझे लग्न होऊन एक महिना होत होता. नुकताच आम्ही मधुचंद्राचा आस्वाद घेऊन, मजा लुटून परतलो होतो. एका अविस्मरणीय आठवणीची शिदोरी साठवली होती. मधुचंद्राची गोडी जिभेवर रेंगाळत असताना, सर्वांगाला प्रफुल्लित, रोमांचित करत असताना त्यादिवशी सकाळीच मधुचा...बायकोचा फोन वाजला. त्यावर 'डॅड' हे नाव पाहताच माझ्या मिठीतून तात्काळ दूर होत तिने भ्रमणध्वनी उचलला. पाच-सहा मिनिटे बोलून परत शयनगृहात येत म्हणाली,
"अहो, डॅडींचा फोन आहे. तुमच्याशी बोलायचे म्हणतात...."
मी तिच्या हातातील फोन घेऊन म्हणालो, "डॅडी, नमस्कार. काय म्हणता?"
"काही नाही. धोंडे खायला कधी येताय?" त्यांनी विचारले. पण काहीच अर्थबोध झाला नाही. एक तर मी झोपेत होतो. शिवाय सकाळी सकाळी मधू दूर गेल्यामुळे काहीसा नाराजही होतो. त्यामुळे मी असमंजसपणे मधुकडे बघत विचारले,
"धोंडे? मी नाही समजलो." तसा तिकडून त्यांचा सात मजली हसण्याचा आवाज माझ्यासह मधुलाही ऐकू आला. तशी मधुही तोंड दाबून हसायला लागली. मी गोंधळून कधी तिच्याकडे, कधी हातातल्या फोनकडे पाहत असताना स्वतःच्या हसण्यावर नियंत्रण मिळवत सासरेबुवा म्हणाले,
"अहो, जावाईबापू, धोंडे म्हटलं की, घाबरलात काय? अहो, खायच्या धोंड्याचं म्हणजे सध्या धोंड्याचा.... अधिक मास चालू आहे. आपल्याकडे या महिन्यात जावयाला धोंडे खाऊ घालायची प्रथा आहे. म्हणून म्हणतो दोघेही या. येत्या शनिवारी कार्यक्रम आहे. तुम्हाला शनिवार-रविवारी सुट्टी असते म्हणून ठरवले आहे. नक्की या...."म्हणत सासरेबुवांनी फोन ठेवताच मी मधुमतीकडे पाहिले. ती मला अंगठा दाखवत बाहेर पळाली......
दोन-तीन दिवसांनी म्हणजे शुक्रवारी रात्री उशिरा आम्ही दोघे मधुचंद्र (मधुमती-चंद्रकांत या नावाचे उप-जोडनाव) तिच्या माहेरी अर्थातच माझ्या सासरी पोहोचलो. जेवणे झाली. मला वाटले, आमच्या लग्नाला महिनाच होतोय तेव्हा आम्हा मधुचंद्राला एका खोलीत.....पण कसचे काय? जेवणे होताच सासरे म्हणाले,
"जावाईबापू, थकला असाल. चला. बैठकीत झोपूया...." मी अनिच्छेने सासऱ्यांच्या पाठोपाठ निघालो. तसा पाठीमागे खळाळून हसण्याचा आवाज आला. एक सांगायचे राहिले, आमच्या धोंडे खायच्या कार्यक्रमाला मधुमतीच्या मावस बहिणी, आत्तेबहिणी, चुलत बहिणी अशा जवळपास माझ्या दहा मेहुण्या जमल्या होत्या. विशेष म्हणजे मधुपेक्षा लहान असलेली माझी सख्खी मेहुणी सोडली तर सगळ्या मेहुण्या विवाहित होत्या. एखादं-दुसऱ्या वर्षाचा फरक सोडला तर साऱ्या समवयस्क होत्या. दातओठ खात, तडफडत, चडफडत मी बैठकीत आलो. माझ्या आधीच सासरेबुवा अंथरुणावर पडले होते. मी काही क्षण माझ्या अंथरुणावर बसून राहिलो. लग्नाला एक महिना होत होता. ती पहिलीच रात्र अशी होती की, मी माझ्या मधूपासून दूर होतो. मधू आणि चंद्र वेगळे होते. तितक्यात कशाचा तरी आवाज ऐकू येत होता. मी अदमास घेतला तर माझ्या लक्षात आले की, शेजारी पडलेले माझे सासरबुवा चक्क घोरत होते. पडल्या पडल्या लोकांना झोप लागते आणि विशेष म्हणजे ते घोरायला सुरुवात करतात हे मला त्यारात्रीपासून पटायला लागले. मी माझ्या जागेवर अंग टाकले. शेजारी घोरणे उच्च पातळी गाठत असताना अजून वेगळेच आवाज कानात शिरत होते. मी दचकून इकडेतिकडे बघत असताना जाणवले की, मच्छरांची एक फार मोठी तुकडी माझ्या शरीरावर हल्ला करीत होती. जणू त्यांनाही अनेक दिवसांनी एका तरुणाच्या रक्ताची मेजवानी मिळत होती. तिकडे घरात आमच्या लग्नानंतर एका महिन्यातच भेटलेल्या सगळ्या बहिणींच्या गप्पांची जबरदस्त मैफल रंगात आली होती. त्या एका महिन्यात प्रत्येक बहिणीसोबत मधूचे भ्रमणध्वनीवर अनेकदा, प्रत्येक वेळी कमीतकमी अर्धा तास तरी बोलून झाले असणार. कित्येकदा तर रात्रीच्या वेळी मी शयनगृहात गेलो असताना आणि मधूने शयनगृहात प्रवेश केल्याबरोबर कुणाचा तरी फोन यायचा आणि मग मधू अर्धा-एक तास बोलत बसायची. तिचीही त्या वेळी फोनवर बोलण्याची इच्छा नसायची हे तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसायचे पण मला खिजवण्यासाठी ती फोनवर बोलताना मला अंगठा दाखवत असे. तो रोज होणारा प्रकार पाहून मी दररोज रात्री मधुच्या आधी शयनगृहात गेलो रे गेलो की मधुमतीचा भ्रमणध्वनी चक्क बंद करीत असे आणि मग अर्ध्या-एक तासाने पुन्हा सुरू करीत असे. अर्थात हे फोनचे बंद-चालू हे प्रकरण मधुमतीला माहिती नव्हते. एकदा तर भारी गंमत झाली. म्हणजे माझी कामगिरी मधुला समजली. त्याचे झाले असे, त्यादिवशीही मधू शयनगृहात येण्यापूर्वीच मी तिचा फोन बंद केला. का कुणास ठावूक माझा मुड अत्यंत चांगला असल्यामुळे मी माझाही फोन बंद केला. नंतर एक तासाने असा थकवा आला म्हणता मी दोन्ही फोन चालू करायला विसरलो. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आम्ही खूप उशीरा उठलो. उठल्याबरोबर सवयीप्रमाणे मी माझा भ्रमणध्वनी घेतला आणि दचकलो. माझा फोन बंद होता म्हणून नाही तर मधुमती उठल्याबरोबर तिचा भ्रमणध्वनी घेऊन बाहेर गेली होती. मी माझा फोन सुरू केला त्यावर पंचवीस मिसकॉल दिसत होते. तितक्यात मधुमती शयनगृहात आली. तिने विचारले ,"अहो, माझा फोन बंद झालाय हो......" मी काही बोललो नाही पण माझ्या चेहऱ्यावर आलेले खट्याळ हसू पाहून ती काय ते समजली. पटकन माझ्या मिठीत शिरत म्हणाली,
"अच्छा! असे आहे तर! तरीच काही दिवसांपासून नेमक्या त्याचवेळी फोन का येत नव्हते याचे उत्तर सापडले....." लगेच कानात पुटपुटली, "आवडला बरे का हा प्रकार...." ती बोलत असताना तिचा फोन वाजला. ती माझ्यापासून बाजूला होण्याची धडपड करीत असताना मी हसतहसत विचारले, "करु का फोन बंद....." तशी बाहेर जात ती म्हणाली, "नको. आधीच रात्रीपासून आईबाबांचे पन्नास मिसकॉल दिसत आहेत." असे म्हणत मला अंगठा दाखवून ती बाहेर पळाली............. तिकडे स्वयंपाक घरात कुणीतरी मेहुणी विचारत होती,
"अग, उद्या धोंड्याची मेजवानी आहे. आपण परवा बिचवर जाऊया का?"
"का ग मधू, तुझा चंद्र म्हणजे आमचे जिज्जू येतील ना?"
"विचारुन सांगते सकाळी..." मधुमती म्हणाली. परंतु माझ्या अंतर्मनाने हेरले की, मधुच्या आवाजात नाराजी होती, मरगळ होती, निरुत्साह होता. त्या मागचे कारणही दुसऱ्या मनाने हेरले, तिलाही माझा विरह जाणवत होता. माझ्यापासूनचा दुरावा तिलाही सहन होत नसावा. नेमकी हीच गोष्ट तिथे कुणी तरी मेहुणीने हेरली. ती म्हणाली,
"का ग मधू? काय झाले? तू अशी कंटाळून गेल्याप्रमाणे का बोलत आहेस?"
"तुझ्या लक्षात नाही आले, अग, मधू इकडे चंद्र तिकडे तळमळत असताना झोप कशी येईल?"
"मधे, माझे लग्न होऊन दोनच महिने झाले आहेत. पण बघ मी आले का नाही एकटीच?"
"अग, तुझे ते तिकडे दूर आहेत. तुला पर्याय नाही. पण मधुमतीचे कसे झाले, 'धरण उशाला, कोरड घशाला.' त्यामुळे ती तशी उदास आहे."
"ए थांबा ग. तिला तसे चिडवू नका. जायचे का मग रविवारी? आई, तू येशील ना?" कुणी तरी विचारले. बिचवर जाण्याच्या कल्पनेने मी अंतर्बाह्य सुखावत असताना सासूबाई यायला तयार झाल्या तर याविचारानेच मी धास्तावलो.
"रविवारी? नाही ग. यांची एक फार महत्त्वाची बैठक आहे....."
"मावशी, बैठकीला काका जाणार आहेत ना? मग तुला न यायला काय झाले?"
"नको. हे नसताना मी येऊन काय करु?" सासूबाई म्हणाल्या. तसा माझ्या मनात विचार आला, पन्नाशी गाठत असलेल्या सासुबाईंना नवऱ्याला सोडून बिचवर जावे वाटत नाही आणि दुसरीकडे नुकतेच लग्न झालेल्या मुलीला मात्र तिच्या नवऱ्यापासून......तितक्यात सासुबाईंचा आवाज आला,
"तसेही आम्ही दोघे नेहमीच जातो. करमले नाही की, जातो आपले बिचवर....." ते ऐकताच माझ्या अंगाचा तीळपापड झाला. मला वाटले, 'काय पण ही माणसे आहेत, या वयात दोघेच दोघे बिचवर जाऊन दंगामस्ती नव्हे पण मजा तर लुटत असतील पण नुकतेच लग्न झालेल्या मुलीला असे तळमळताना कसे काय बघू शकतात?'
रात्रभर मला झोप लागली नाही. एक तर शेजारी सासरेबुवांचे घोरणे आणि डासांच्या अनेक तुकड्या माझ्यावर करत असलेले आक्रमण. रात्री दोन नंतर मला कधीतरी झोप लागली. सकाळी मला कशाच्या तरी आवाजाने जाग आली. अर्धवट जाग येत असताना मला जाणवले की, कुणीतरी गाणी म्हणतय. मी अदमास घेतला आणि माझ्या लक्षात आले की, सासरेबुवा भक्तीगीते म्हणत आहेत. मी पूर्णपणे जागा झालो. तसे सासरेबुवा म्हणाले,
"व्वा! जावाईबापू उठलात? छान! तुम्हालाही माझ्यासारखी लवकर उठायची सवय आहे हे पाहून आनंद झाला. कितीही प्रयत्न केला तरी मला साडेचार नंतर झोप येतच नाही. मग भुपाळ्या, अभंग म्हणत बसतो. कित्ती छान वाटते म्हणून सांगू तुम्हाला? सकाळी लवकर उठून देवाला आळवले म्हणजे दिवस कसा आनंदात, समाधानात जातो बघा. लवकर उठले म्हणजे रात्री लवकर झोप लागते. अहो, पूर्वजांनी म्हणूनच ठेवलेय, 'लवकर निजे, लवकर उठे, तया आरोग्य लाभे.' नाही तर आजकालची पोरे बघा. रात्री बारा-एक पर्यंत जागी असतात अन मग सकाळी दहा-अकरापर्यंत ढाराढूर लोळतात. चला. मॉर्निंग वॉक करून येतो. तुम्ही जाता की नाही वॉकला. जायला पाहिजे. येताना देवपूजेसाठी फुलं पण आणतो. वाटल्यास थोडे पडा. मी येईपर्यंत सारी कंपनी उठेल मग घेऊया चहा...." म्हणत मला एका अक्षराने बोलायची संधी न देता सासरेबुवा निघून गेले. मी पुन्हा अंथरुणावर पाठ टेकवली आणि झोपेची आराधना करु लागलो पण झोप येत नव्हती. तितक्यात पुन्हा कानावर भक्तीगीतांचा आवाज आला. मी तिकडे कान लावले तेव्हा लक्षात आले की, आवाज घरातून येतोय. याचा अर्थ सासूबाईंनी भ्रमणध्वनीवर गीते लावली आहेत. कारण मधुमती किंवा दुसरी कोणती मेहुणी इतक्या लवकर उठून गाणे तेही धार्मिक गाणी शक्यच नव्हते. तितक्यात सासूबाई हातात झाडू घेऊन तिथे आल्या. मी जागा असल्याचे पाहून म्हणाल्या,
"अगबाई, तुम्ही जागे आहात काय? आले लक्षात यांचा टेप सुरू झाला असेल? रात्री झोप झाली का व्यवस्थित? नाही. हे जवळ असल्यावर शांत झोप लागणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच आहे..."
"नाही. तसे काही नाही...."
"नाही कसे? मी वर्षानुवर्षे अनुभवते की, ह्यांचे घोरणे..." सासूबाई म्हणाल्या खऱ्या पण आपण काय बोलून गेलो हे लक्षात येताच चेहऱ्यासमोर झाडू धरून पटकन निघून गेल्या.......
त्यादिवशीचा अधिक मासाचा धोंडे जेवणाचा थाट काय वर्णावा? सकाळी अगदी औक्षण करुन आम्हा मधुचंद्राला जोडीने स्नान घातले. सगळ्या मेहुण्यांनी तेल, साबण लावून आंघोळ घातली. जेवायचा थाटमाट काय वर्णावा? रांगोळ्या, उदबत्त्यांचा घमघमाट, पाच पदार्थ जेवायला आणि महत्त्वाचा म्हणजे मेहुणीबायांचा आग्रह! असे जेवण झाले म्हणता. जेवणानंतर दुपारी एक वाजता जे झोपलो ते थेट सायंकाळी पाच वाजता उठलो. चहा देताना मधुमती म्हणाली,
"काय गाढ झोपला होता हो? आमची एवढी बडबड, जोरात हसणे कशाचाही परिणाम झाला नाही. उलट तुमचे घोरणे आम्हाला तितक्या गोंधळात ऐकू येत होते. अशी कशी झोप लागली हो?"
"तू जवळ नव्हतीस म्हणून झोप लागली." मी हलकेच म्हणालो. तशी मधुमती लाजत म्हणाली,
"इश्श! काहीही हं...." म्हणत घरात पळाली. ती रात्रही मधू इकडे, चंद्र तिकडे, सोबत सासरेबुवांचे घोरणे, डासांचा संगीतीय हल्ला अशा अवस्थेत गेली.....
सकाळी सकाळी सासरेबुवांच्या संगीताने जाग आली परंतु आज कालच्याप्रमाणे घरात शांतता नव्हती तर सारे घर जागे झाले होते. तितक्यात सासरेबुवा म्हणाले,
"उठले का जावाईबापू? बरे झाले. आज तुम्हाला बिचवर जायचे आहे. अतिशय रम्य ठिकाण आहे बघा. थोडासा ताण आला की, मी तुमच्या सासूबाईला मोटारसायकलवर बसवून सरळ बिचवर जातो आणि चार -पाच घंटे मस्ती करून फ्रेश होऊन परत येतो. बरे. उठा. तुमच्यासाठी टीटीची.... टेम्पो ट्रवलरची व्यवस्था केली आहे..."
"दोघांसाठी एवढे मोठे...."
"दोघे कुठे हो? सोबत तुमच्या एकूणएक मेहुण्या आहेत की." सासरे म्हणाले.
झाले. नकळत माझा हात माझ्याच कपाळाकडे गेला.
बरोबर नऊ वाजता आमची जत्रा त्या वाहनातून निघाली. तिथेही माझा डिसमुड झाला. टीटी उभा राहताच लेडीज फर्स्ट याप्रमाणे साऱ्या मेहुण्या टीटीमध्ये जाऊन बसल्या. मला वाटत होते किमान या साल्या....मेहुण्या तरी मधुचंद्राचा विचार करून त्यांना शेजारच्या आसनावर बसू देतील पण कसचे काय? साऱ्या जणी मिळून आसने अडवून बसल्या होत्या. मधुमती माझ्याकडे उदास बघत एका बहिणीशेजारी असलेल्या रिकाम्या आसनावर टेकली. मला नाइलाजाने चालकाजवळ असलेल्या आसनावर बसावे लागले. तो म्हणाला,
"साहेब, सांभाळून हं. त्यातली स्प्रिंग तुटलेय. धक्के बसतील. कदाचित स्प्रिंग लागूही शकते."
"जे नशिबात असेल ते होईल...." असे म्हणत मी त्या मोडक्या आसनावर जीव मुठीत धरून बसलो.
तितक्यात सासरे म्हणाले,"जावईबापू, काल रात्री पैसे काढून आणायला विसरलो. गाडीचा पूर्ण हिशोब करून पैसे देऊन टाका. मी सकाळी देतो. एटीएम आहे ना तुमचे?"
"आहे की..." मी म्हणालो. एकदाचा आमचा प्रवास सुरु झाला. जाईपर्यंत सहा टोल मलाच भरावे लागले. शिवाय घरी नाश्ता झाला नव्हता. सासूबाई म्हणाल्या,
"अग, पोरींनो, उपमा नाही तर कांदाभजी, पोहे करुया....."
"अग काकू, आम्ही पिकनिकला जातोय. नाश्ता जेवण घरचे म्हणल्यावर पिकनिकची काय मजा?"
"आणि मावशी, सोबत जिज्जू आहेत. हीच तर संधी आहे त्यांना लुबाडण्याची. होऊ दे की, खिसा खाली. काय ग, मधुमती?"
"हो. हो." ही कशीतरी म्हणाली. शहराबाहेर आमचा टीटी पडला न पडला की, एक हॉटेल दिसताच कुणीतरी ओरडले,"भैय्या, वो बाजूवाले होटल के सामने रुकाव. नाष्टा करेंगे। जिजू चालेल ना?"
"चालतय की...." मी म्हणालो. आमचा टीटी त्या हॉटेलसमोर थांबताच आमच्या मेहुण्यांचा जत्था खाली उतरला. मी बिचारा सर्वांच्या शेवटी उतरलो. तेव्हा माझी वाट पाहणाऱ्या, माझ्यासाठी रेंगाळत असलेल्या मधुला तिच्या एका बहिणीने ओढत ओढत हॉटेलमध्ये नेले. मी बापुडवाणा सर्वांच्या शेवटी हॉटेलमध्ये शिरलो. सगळ्या मेहुण्या एका मोठ्या टेबलाभोवती गोल करून बसल्या होत्या. मधुमती बिचारी एका कोपऱ्यात बसली होती का मुद्दाम बसवले होते ते त्या मेहुण्याच जाणो. मी त्या ड्रायव्हरला घेऊन एका कोपऱ्यात बसलो. तितक्यात वेटर आमच्याजवळ आला. मला तो क्लिनर समजला की काय पण त्याने ड्रायव्हरलाच विचारले,
"साहेब, काय आणू हो?" ते ऐकून ड्रायव्हरने माझ्याकडे पाहिले. मी त्याला ऑर्डर दिली. आणि त्याला त्या बायकांचीही ऑर्डर घे असे सांगितले.
बरोबर एक तासाने सगळ्या जणी मोठमोठाले ढेकर देत बाहेर पडल्या. वेटरने माझ्या हातात बिल दिले. पाहतो तर बिलाची रक्कम चक्क तेहतीसशे रुपयांची होती. मी बिल भागवून बाहेर आलो. सगळ्या जणी अगदी मधुमतीही आतमध्ये बसली होती. दहा मिनिटे झाली पण ड्रायव्हर आला नाही म्हणून मी त्याला शोधायला आत गेलो तर तिथे चक्क ड्रायव्हर आणि हॉटेलचा व्यवस्थापक यांच्यामध्ये वाद चालू होता. चालकाची पाठ माझ्याकडे होती त्यामुळे तो मला पाहू शकत नव्हता. मी जवळ जाताच चालकाचे वाक्य माझ्या कानावर पडले. तो म्हणत होता,
"हे बरोबर नाही. नेहमीचे दहा टक्के वेगळे आहे. आज तेहतीसशे रुपयाचे बिल झाले आहे.आज पंधरा टक्के कमिशन हवे आहे....." तितक्यात व्यवस्थापकाचे लक्ष माझ्याकडे गेले. तो म्हणाला,
"काय झाले साहेब?" ते ऐकून चालक मागे वळला. मला पाहताच तो दचकून म्हणाला,
"साहेब, इकडे कशाला? तुम्ही चला ना. एक खाजगी काम आहे. एकच मिनिटात आलो."
मी काही न बोलता बाहेर पडलो. दहा मिनिटात चालक परतला.
अकरा वाजता आम्ही आमच्या इच्छित स्थळी म्हणजे त्या बिचवर पोहोचलो. मला वाटले मेहुण्यांचे सोडा पण मधुमतीसोबत मला थोडी दंगामस्ती करता येईल. पण कसचे काय? चालत चालत थोडे पुढे जाताच एक मेहुणी म्हणाली,
"अग, आपण पर्स, चपला सगळेच सोबत घेऊन आलो की. आता गाडीही खूप दूर आहे. आता ग कसे? हे सारे घेऊन कसे जावे बिचवर?"
"ए आयडिया. टेंशन कशाला घेता? जिजू आहेत की. नाही तरी जिजूला आपल्यासोबत समुद्रात यायला आवडणार नाही आणि आपण सोबत असल्यामुळे त्यांना मधुचंद्र करता ....म्हणजे मधुमतीसोबत दंगामस्ती करता येणार नाही. त्यापेक्षा जिजू इथेच थांबतील. हो क्की नाही जिज्जू?" ओठांचा चंबू करुन, मानेला झटका देत म्हणाली. शेवटी सर्वांनी माझ्यासमोर चपलांची रांग लावली. मधुमतीने पुढे केलेली तिची पर्स माझ्या हातात दिली. मी ती पर्स खांद्याकडे नेली ते पाहून इतर सर्वांनी आपापल्या पर्सही लडिवाळ हसत माझ्या खांद्याला लटकवल्या. आणि सर्व जणी नाचत गात समुद्रावर आक्रमण करण्याच्या थाटात निघाल्या. तितक्यात एकेक पर्स खालच्या बाजूला सरकत असल्याचे जाणवले आणि मी पर्स खाली पडू नयेत म्हणून हात समोरच्या बाजूला फैलावले. पाच मिनिटे झाली असतील. खांद्याला कळ लागली म्हणून मी हळूच एकेक पर्स खाली व्यवस्थित ठेवली. नंतर पायाच्या सहाय्याने सर्व चपलाही व्यवस्थित ठेवल्या. शेजारी बसून राहिलो. मनाशीच म्हणालो, 'काय वेळ आली रे बाबा. मेहुण्यांची खेटरं सांभाळावी लागतात.' मी समोर पाहिले. आमचे मेहुणी मंडळ पार दूर समुद्रात खोलवर जाऊन धिंगामस्ती करत होते. मी इतरत्र नजर फिरवून किमान नेत्रसुख घेत असताना एक मदमस्त आवाज आला,
"तुम्ही इथेच आहात ना? आम्ही आत्ता आलो हं. ठेवा ग ठेवा..."
"अग पण, पैशाचे विचारले...."
"त्यात काय विचारायचे? धंदाच आहे त्यांचा. घेतील फार तर दहा रुपये प्रत्येकीचे. बघ ना माणूस तसा लुबाडणारा, लुच्चा दिसत नाही. ठेवा पटकन. चला...." मला काहीही न बोले देता त्या पाच जणी स्वतःची वहाणे माझ्या स्वाधीन करून निघत असताना मी काही बोलण्यापूर्वीच पाच-सात बायका माझ्याजवळ येत असताना एक जण म्हणाली,
"बघा. मी म्हणाले होते ना, आजकाल पैसे दिले की, सारी व्यवस्था असते म्हणून. बघा चार पावले चाललो नाही तर भेटला, चपला सांभाळणारा. ठेवा ग ठेवा. मामा, सहा जोड आहेत. पैसे आत्ता द्यायचे की, आल्यावर देऊ?"
"अग, इकडे ये. पैसे आल्यावरच देऊ. पळून गेला तर फक्त चपला जातील. पैसे तर वाचतील. "
मी काहीही बोलत नाही हे पाहून एक जण म्हणाली,
"अग, काहीच बोलत नाही ग. बहुतेक मुका आहे वाटते . चला. " म्हणत त्या बायकाही निघून गेल्या.
त्यानंतर तो सिलसिला चालू झाला. बायकांचा समूह येत होता. चपला माझ्या हवाली करून जात होत्या. आमचा गट सोडला तर कोणत्याही बाईने माझ्या हवाली पर्स केली नव्हती. अवघ्या अर्ध्या तासात एखाद्या दुकानात नसतील एवढ्या चपला माझ्यासमोर पडल्या. मी दिनवाणा त्या चपलांकडे पाहात असताना अचानक कुणीतरी दरडावून विचारले,
"कोण आहेस रे तू? इथे काय खेटरांचे दुकान उघडलेस काय?" मी वर बघितले. हवालदार माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहात होता.
"हे...हे...माझ्या बायकोच्या चपला आहेत...."
"तुला एवढ्या बायका आहेत? कमाल आहे बुवा. अरे, इथे एक सांभाळताना नाकीनऊ येतात आणि तुझ्या घरवालींची मोजणी करण्यातच रात्र निघून जाईल. कशा सांभाळतोस रे बाबा एवढ्या बायका. तुझी नोंद तर कोणते ते बुक... त्या जगाच्या बुकात व्हायला हवी...."
"अहो, तसे नाही. मला एकच बायको आहे. हे...." म्हणत मी हवालदारास सारे समाजावून सांगितले. तसा तो हवालदार डोक्यावर हात मारत निघून गेला......
काही क्षणातच बायकांचा एक जत्था परतला. स्वतःच्या चपला सुरक्षित असल्याचे पाहून साऱ्या आनंदल्या. त्याक्षणी मला आठवले, 'देह समुद्रात चित्त पायताणात.'
"काय द्यायचे हो भाऊ....." एकीने विचारले.
"अग, जातानाच समजले होते ना, मुका आहे म्हणून. द्या प्रत्येकीने पन्नास-पन्नास रुपये...." एक स्त्री म्हणाली आणि प्रत्येकीने खरेच पन्नास रुपये माझ्यासमोर ठेवले. तितक्यात महिलांचा दुसरा बंच आला. पहिल्या गटाचे पाहून त्यांनीही प्रत्येकी पन्नास रुपये ठेवले. अवघ्या पाच मिनिटात साऱ्या बायका ज्याच्या त्याच्या चपला घेऊन गेल्या आणि अजूनही आमचा मेहुणी समूह आला नव्हता. मी सहज 'आज की कमाई' मोजली तर चक्क चार हजार रुपये जमले होते. मनाशी म्हणालो,
'बाप रे! इतक्या कमी वेळात एवढी कमाई? दिवसभर बसलो तर किती होईल? द्यावी का नोकरी सोडून? बसावे का ललनांच्या ज्युती सांभाळत?' मी अशा विचारात गटांगळ्या खात असताना दूरवर थांबलेल्या एका ट्रॅव्हल्समधून उतरलेल्या चाळीस-पंचेचाळीस तरुणींचा एक समूह हसत-खिदळत माझ्या दिशेने येत होता. माझ्याजवळ येताच प्रत्येकीने पायातल्या चपला माझ्यासमोर ठेवून समुद्राकडे प्रयाण केले. मी इकडे तिकडे पाहिले पण माझी मधू मला कुठे दिसत नव्हती. सासुरवाडीला पोहोचल्यापासून स्पर्शसुख, नयनसुख तर सोडा पण मधुचे दर्शनही दुरापास्त झाले होते. वाटले होते, बिचवर जातच आहोत तर मधुमतीसोबत खूप मस्ती करुया पण कसचे काय? साल्यांनी.....मेहुण्यांनी सारा विचका केला होता आणि रमणींच्या रेशमी पायातील वहाणा सांभाळायची वेळ आली होती. तितक्यात माझे लक्ष माझ्यापासून काही अंतरावर थांबलेल्या एका
मोटारसायकलकडे गेले. त्यावरून पन्नाशीच्या मागेपुढे असणारे एक जोडपे उतरत होते. पुरुषाच्या अंगावर बरमुडा आणि एक बंडी होती तर बाईच्या शरीरावर गाऊन होता.दोघांच्याही डोळ्यावर मोठेमोठे उन्हापासून संरक्षण करणारे गॉगल्स होते. महिलेचा चेहरा रंगीबेरंगी कपड्याने गुंडाळलेला होता.मला त्या पुरुषाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते. पण कुठे? तिकडे त्या इसमाने गाडीची
डिक्की उघडली. दोघांनीही त्यात गॉगल्स, रुमाल ठेवले. 'अरे, बापरे! सासरेबुवा? सासूबाई? इकडे?.....'
"अहो, चपला कुठे ठेवायच्या?" सासूबाईंनी विचारले. त्या इकडे तिकडे बघत असताना ते दोघे आपल्याकडे येतील या विचाराने मी खिशातून रुमाल काढला आणि माझ्या चेहऱ्यावर बांधला. फक्त डोळे तेवढे उघडे ठेवले. खरोखरीच ते दोघे माझ्याकडे आले. सासूबाई चपला माझ्यासमोर ठेवत असताना सासरबुवा सारखे माझ्याकडेच पाहात होते. दोघे चपला ठेवून वळताच सासूबाई म्हणाल्या,"अहो, त्याला पैशाचेही विचारले नाही."
"त्यात काय विचारायचे? घेईल रुपया नाही तर दोन रुपया. पण तुझ्या लक्षात आले का ग तो माणूस आपल्या जावाईबापू सारखा दिसतोय..." सासरेबुवांचे ते बोल एकत असताना मला दरदर घाम फुटला. वाटले या दोघांनी ओळखले तर काय वाटेल, आपला जावाई चपला सांभाळतो. तिकडे सासूबाई नवऱ्याचा हात हातात घेऊन मोठ्या प्रेमाने म्हणाल्या,
"इश्श! तुमचे आपले काहीतरीच. जावाईबापू कशाला असे धंदे करतील? ते आता बायकोसोबत आणि चुलबुल मेहुण्यांसोबत रंग उधळत असतील. चला. कशाला उगाच काहीही विचार मनात आणून आपले मजेचे क्षण व्यर्थ घालवायचे? चला..." असे म्हणत सासूबाईंनी अक्षरशः सासरेबुवांना
ओढतच नेले आणि चक्क समुद्रात ढकलून दिले. त्या दोघांची चाललेली पाण्यातील दंगामस्ती बघत माझा हात चक्क माझ्या कपाळावर मारल्या गेला......
नागेश सू. शेवाळकर
११०, वर्धमान वाटिका, फेज ०१,
क्रांतिवीरनगर लेन ०२, जयमल्हार हॉटेलजवळ,
थेरगाव पुणे ४११०३३ संपर्क ९४२३१३९०७१.