मरण तुमचे, सरण आमुचे Nagesh S Shewalkar द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मरण तुमचे, सरण आमुचे

** मरण तुमचे, सरण आमचे !**
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सर्व सुख सोयींनी युक्त असलेल्या त्या भव्य अशा इस्पितळातील अतिदक्षता विभागात नानासाहेब अत्यंत चिंताजनक अवस्थेत बसले होते. मधूनच इकडून तिकडे फेऱ्या मारताना कधी भिंतीवरील घड्याळाकडे, कधी भ्रमणध्वनीवर वेळ पाहत तर कधी खोलीतल्या पलंगावर आत्यंतिक वेदनांनी तळमळणाऱ्या पत्नीकडे... कमलाबाईंकडे बघत होते. नानांनी नुकतीच वयाची साठी पार केली होती. तर कमलाबाई साठी गाठत होत्या. दोन दिवसांपूर्वी पत्नीचे पोट अचानक फुगले म्हणून नानांनी त्यांना दवाखान्यात शरीक केले होते. डॉक्टरांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून औषधोपचारही सुरू केले असले तरीही कमलाबाईंच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. होणाऱ्या वेदनांनी त्या कण्हत होत्या, मधूनच ओरडत होत्या. त्यांची ती दशा, अवस्था नानांना पाहवत नव्हती. नानांची बेचैनी, अस्वस्थता, तळमळ वाढत होती. घड्याळात सहा वाजल्याचे ठोके पडले. 'काय करावे नि काय नको' अशा अवस्थेत नाना खोलीच्या खिडकीबाहेर पाहात असताना कमलाबाई अचानक जोराने ओरडल्या आणि नाना त्वरेने कमलाबाईंच्या जवळ गेले. कमलाबाई पाय रगडत होत्या. मान जोरजोराने इकडून तिकडे हलवत होत्या. डोळे स्थिर झाले होते. नानांना वेगळीच शंका आली. त्यांनी घाईघाईने शेजारच्या यंत्राकडे पाहिले. त्यावरील सारे अंक शून्यातून बाहेर पडायला तयार नव्हते. ते पाहून घाबरलेल्या नानांनी घंटी दाबली. तो कर्णकर्कश्श आवाज सर्वत्र घुमला. नानांनी पुन्हा पत्नीकडे पाहिले. त्यांची हालचाल थांबली होती. त्या निश्चल पडून होत्या. नानांनी त्यांचा हात हातात घेतला. त्या स्पर्शाने नाना दचकले. भीतीची एक थंडगार संवेदना त्या स्पर्शाने नानांच्या शरीरात पसरली. नेहमी हवहवासा वाटणारा तो स्पर्श त्या क्षणी तसा का भासत होता हा प्रश्न स्वतःला विचारत नानांनी विचारले, "कमला, ये कमो, बोल ना ग. बरे वाटतेय का? काही त्रास होतोय का?..." नाना पत्नीशी तसा एकतर्फी संवाद साधत असताना डॉक्टरांनी खोलीत प्रवेश केला. शरीरातील विविध स्पंदनं दर्शविणाऱ्या त्या यंत्रावर नजर टाकून 'ओ गॉड..' असे पुटपुटत त्यांनी कमलाबाईंचा हात हातात घेतला. दोन बोटे नाडीवर ठेवली. दुसऱ्या हाताने त्यांनी कमलाबाईंच्या डोळ्यांच्या पापण्या एक-एक करून पाहिल्या. पुन्हा त्या पापण्या मिटविल्या. कमलाबाईंच्या नाकासमोर हात धरला. मान खाली घालून त्यांनी कमलाबाईंच्या पोटावर असलेली चादर त्यांच्या चेहऱ्यावर टाकली. नानासाहेबांजवळ येत त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हणाले,
"संपलय सारे. काकू आपल्याला सोडून गेल्या...."
डॉक्टर बाहेर जाताच नर्स यंत्रवतपणे, सराइतपणे कमलाबाईंना लावलेले सलाइन, इतर साहित्य त्यांच्या शरीरापासून वेगळे करु लागली. नानांना काय करावे ते समजत नव्हते. धड ओरडताही येत नव्हते. जोरात रडावे असे वाटत असूनही रडता येत नव्हते. कारण त्यांचा आवाज ऐकून धावून येणारी, त्यांचे अश्रू पुसणारी, त्यांची अर्धांगिनी, त्यांचे सर्वस्व, त्यांच्या साता जन्माची सोबतीण त्यांना या जन्मी एकटेच टाकून निघून गेली होती. खोलीत आलेल्या कर्मचाऱ्याने नानांच्या हाताला
धरून बाहेर आणले. दाराजवळ असलेल्या खुर्चीत नानांना बसवले. शेजारच्या खुर्चीत बसत त्याने नानांना विचारले,
"काका, कुणाला कळवायचे आहे का? मुलगा वगैरे..."
"त..त..तो ऑस्ट्रेलियात आहे."
"दुसरा मुलगा...मुलगी...."
"नाही. तो एकटाच आहे..." जड आवाजात नाना म्हणाले.
"त्याला कळवायचे का?"
"नाही. तो नाही येऊ शकणार."
"मग नातेवाईक कुणी?"
"एक मिनिट....." असे म्हणत नानांनी खिशातून भ्रमणध्वनी काढला. तो चालू करून त्याच्याकडे देत म्हणाले,'यामध्ये जेवढे व्हाट्सअप समूह आहेत त्या सर्वांवर 'सौ कमलाबाई नानासाहेब यांचे दुःखद निधन. उद्या सकाळी दहा वाजता अंत्यविधी!' असा संदेश टाका."
त्या प्रमाणे त्या कर्मचाऱ्याने तसा संदेश सर्व संदेशवहन स्थळांवर टाकला. तितक्यात नानासाहेबांनी खिशातून एक कार्ड बाहेर काढले. ते त्या माणसाजवळ देऊन म्हणाले, "या ईमेलद्वारे हा पाच अक्षरी क्रमांक टाकून 'कमलाबाई नानासाहेब यांचे निधन' असा संदेश पाठवा."
"इथून कधी सुट्टी मिळेल? तशी तिला कायमस्वरूपी सुट्टी मिळाली आहे म्हणा."
"दोन तास तरी लागतील. तुम्ही इथेच बसा. सर्व कामे त्या-त्या विभागाचा कर्मचारी येथे येऊन पूर्ण करून घेईन...." असे सांगून तो कर्मचारी निघून जाताच नानांनी एक क्रमांक जुळवला. नेहमीप्रमाणे पलीकडून ताबडतोब फोन कट झाला. दुसऱ्याच क्षणी तोच ठरलेला संदेश आला. तो संदेश नानांना मुखपाठ झाला होता. परंतु तरीही तो संदेश पुन्हा वाचला....वेगळ्या आशेने! मुलाने लिहिले होते,
'बाबा, मी एका महत्त्वाच्या बैठकीत आहे. बैठक बराच वेळ चालणार आहे. कधी संपेल ते सांगता येणार नाही. मी मोकळा झालो की बोलतो.'
'अरे, इथे तुझी आई कायमची मोकळी झाली आहे.....' असे पुटपुटत नानांनी पुन्हा तोच क्रमांक जुळवला. परंतु तोही लगोलग कट होऊन दुसराच संदेश आला, 'बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की, पुन्हा पुन्हा फोन करत जाऊ नका. वेळ मिळाला की, मी बोलतो.'
गत् सहा महिन्यांपासून असेच चालू होते. नाना किंवा कमलाबाईंनी फोन केला की, मुलगा वरीलप्रमाणे असाच गुळगुळीत संदेश पाठवत असे परंतु सहा महिने झाले तरी त्याचा फोन आला नाही. मुलाच्या आठवणीने कमलाबाईंचे डोळे नेहमीच पाझरायचे. दोन दिवसांपूर्वी कमलाबाईंना दवाखान्यात शरीक केल्यानंतर आणि डॉक्टरांनी 'चिंताजनक' असे सांगितल्यानंतर नानांनी मुलाला पंचवीस फोन केले असत परंतु मुलाने एकदाही फोन उचलला नाही की परतून फोन केला नाही...
'शेवटचा प्रयत्न करुन पाहूया. उचलला तर ठीक, नाही तर आयुष्यात पुन्हा त्याला फोन करायचा नाही.' असा मनोमन निश्चय करून नानांनी पुन्हा भ्रमणध्वनी लावला. देव पावावा त्याप्रमाणे मुलगा पावला. फोन उचलून तो म्हणाला,
"काही मॅनर्स आहेत की नाही हो तुम्हाला? मी काही तुमच्याप्रमाणे रिकामटेकडा नाही. मोठ्या कंपनीत फार मोठ्या पदावर आहे. उठसूठ कुणाशीही बोलायला मला वेळ नाही. बोला..."
"तुझी आई मेली हे सांगण्यासाठी फोन करत होतो....."
"बरे, मी काय करु? पैसे हवे असतील तर आधीच सांगतो, मी नुकताच एक मोठ्ठा बंगला घेतला...."
"पैसे नकोत रे. आईचे अंत्यदर्शनासाठी येणार आहेस...."
"भारतात येणे का सोपे वाटले का तुम्हाला? मला नाही यायला जमणार? तुम्ही आटोपून घ्या. मला वेळ मिळाला की, मी येईल तुम्हाला भेटायला..." असे म्हणत मुलाने फोन बंद केला. नाना साश्रू नयनांनी फोनकडे बघत राहिले. फोनवर अनेकांनी सांत्वनपर संदेश पाठवले होते.काही जणांचे फोनही येऊन गेले होते. तशाही अवस्थेत नानांना दहा वर्षांपूर्वीचा तो प्रसंग जशास तसा आठवला...
"नाना, मला दहा लाख रुपये हवे आहेत." त्यादिवशी मुलगा अचानक म्हणाला.
"दहा लाख? कशासाठी? एवढी रक्कम कुठून आणू?"
"नोकरीसाठी परदेशात जायचे आहे. पासपोर्ट, विसा, खरेदी, विमानाचे तिकीट आणि नोकरी मिळेपर्यंत तिथे होणारा खर्च यासाठी खरेतर पंधरा लाख हवे होते पण मी दहावर भागवीन."
"अरे, ही सध्याची नोकरी चांगली आहे की."
"डोंबल्याची चांगली. माझ्या हुशारीच्या मानाने बंडल आहे. मला ऑस्ट्रेलियाला जाऊन माझ्या हुशारीची किंमत वसूल करायची आहे."
"अरे, पण मी एवढी मोठी रक्कम कुठून आणू?"
"बाबा, आपले हे घर मला हवी तेवढी रक्कम देईल की."
"का ss य? हे घर विकायचे म्हणतोस?"
"होय! घर विकून मला दहा लाख द्या. नाही तरी एवढे मोठे घर तुम्हाला दोघांना हवेच कशाला? एक छोटासा टुमदार फ्लॅट घ्या. उरलेली रक्कम गुंतवून त्याचे व्याज आणि तुमची पेंशन यावर तुमचा संसार अगदी उत्तम चालेल. मोठी गरज पडली तर मी आहेच की. तिथे गेल्यावर मी माझ्या अक्कल हुशारीने खोऱ्याने पैसा ओढणार आहे....."
शेवटी मुलाच्या मनाप्रमाणे झाले. ते प्रशस्त घर विकून मुलगा ऑस्ट्रेलियाला गेला. नानांनी एक फ्लॅट घेतला. उर्वरित रक्कम एका योजनेत गुंतवली. बघता-बघता दहा वर्षे झाली. मुलगा परत आलाच नाही. सुरुवातीला दोन-तीन दिवसांनी फोन येत असत. नंतर आठ दिवसाला, पुढे पंधरा.... महिन्यात एक....सहा महिन्यांनी...असे करता करता त्याचे फोन येणेही बंद झाले. कमलाबाईंनी मुलाचे वागणे, त्याचा दुरावा मनाला लावून घेतला होता. नानाही मनातून खूप दुःखी होते. परंतु ते तसे दाखवत नव्हते. सारे काही आतल्या आत गिळत, दाबून टाकत ते बायकोला सांभाळत, सावरत होते......
नाना विचारात दंग असताना त्यांचा भ्रभणध्वनी वाजला. खिशातून फोन काढून तो कुणाचा आहे हे बघेपर्यंत नानांच्या मनात विचार आला की, कदाचित ऑस्ट्रेलियातून मुलाचा फोन आला असेल. 'मी खास विमानाने निघत आहे. आईचे अंत्यदर्शनासाठी आणि अंतिमसंस्कारासाठी येत आहे.' असा निरोप देण्यासाठी केला असावा. अशा विचारात नानांनी नाव पाहिले. त्यावर दुसरेच कुणाचे नाव पाहून ते प्रचंड निराश झाले....
दवाखान्याचा एक-एक कर्मचारी येत होता. त्या-त्या विभागाच्या कामाची पूर्तता करून जात होता. त्यात दोन तास गेले. आलेल्या दूरध्वनीपैकी काही ठराविक लोकांनाच ते बोलत होते. त्यांच्या इमारतीत राहणारे काही लोक दवाखान्यात पोहोचले. नानासाहेबांनी पुढाकार घेऊन पंचवीस-तीस ज्येष्ठ व्यक्तींचा 'म्हातारे नव्हे आम्ही महातारे' हा व्हाट्सअप समूह तयार केला होता. त्यांच्यापैकी ज्यांना शक्य होते असे सात-आठ लोक आले होते. चार-पाच तरुण मुलांनी तिथे येऊन सुत्रे हातात घेतली होती. त्यामुळे नानांना थोडा आराम आणि दिलासा मिळाला होता. एकटेपणा दूर होण्यास आणि कामात मदत होत होती. भरून आलेले मन काही प्रमाणात मोकळे होत होते....
रात्री दहा वाजता नानांच्या इमारतीसमोर कमलाबाईंचे शव घेऊन आलेली रुग्णवाहिका पोहोचली आणि सर्वांना ती दुःखद बातमी कळली. एक-एक करीत बरीच माणसं, बायका भेटून गेल्या. रात्रभर नानांना सोबत म्हणून आठ-दहा ज्येष्ठ आणि दोन-तीन तरुण थांबले. परंतु रात्र जाता जात नव्हती. एरव्हीच्या प्रसंगी गोष्ट निराळी असते. वेगवेगळे विषय, आठवणी काढताना मधूनच विनोदाची पेरणी होते. परंतु मृत व्यक्तीच्या सान्निध्यात रात्र सरत नाही. वेगळे विषय, विनोद तिथे काढता येत नाहीत. फार फार तर मृतासंबंधी चर्चा होते, आठवणींना उजाळा मिळतो. तरुण मुले आणि एक-दोन ज्येष्ठ भ्रमणध्वनीवर गुंतले होते. नाना न्हाणीघरात गेल्याचे पाहून कमलाबाईंच्या प्रेताकडे बघत एक ज्येष्ठ म्हणाला,
"काय वेळ साधली हो? जाऊन जायचे तर दुपारपर्यंत जावे ना, म्हणजे सायंकाळपर्यंत सारेच मोकळे झाले असते ना?"
"ते कुणाच्या हातात आहे? वेळ जात नाही हे खरे आहे पण नाइलाज आहे."
"एक करता येईल अर्थात तुमची सर्वांची परवानगी असेल तर माझी 'मरणावरी अन् सरणावरी' ही कविता वाचू का? वही सोबत आहे. मी माझी कवितेची वही नेहमीच सोबत ठेवतो. कसे आहे, कुठे काय काम पडेल सांगता येत नाही. अहो, परवा काय झाले, आपल्या शेजारच्या इमारतीच्या बाजूला राहणारा एक नेता मृत झाला. त्याला स्मशानभूमीत नेऊन चितेवर ठेवले न ठेवले की, एका नेत्याचा फोन आला. तो येतोय अर्ध्या तासात तोवर अग्नी देऊ नका. अर्धा तास म्हणता-म्हणता दोन तास उलटले. त्या नेत्याला फोन लावला की, बस्स आलोच असे सांगायचा. कुणाला तरी माहिती होते की, तिथे अंत्यसंस्कारासाठी माझ्यासारखा एक नामवंत कवी तिथे हजर आहे. त्यांनी मला विनंती केली. मग काय सुरू झाला माझ्या कवितांचा कार्यक्रम. एवढा रंगला म्हणता तो कार्यक्रम. लोक आपण स्मशानभूमीत आहोत हे विसरून भरभरून दाद देत होते. तीन तास माझे कविता वाचन चालू होते. तसे केले तर?"
"अहो, कवी महाशय, प्रसंगाचे भान ठेवा. उठसूठ कविता.. कविता करु नका."
"खरे सांगतो, राग मानू नका हं. आजकाल तुमच्याजवळ यायचीही भीती वाटते हो..."
"तो तुमच्या मनाचा कोतेपणा झाला हो. पूर्वी असे प्रेतासमोर रात्रभर जागे राहायची वेळ आली तर भजनी मंडळाला बोलवत असत. आजकाल आपल्या फ्लॅट संस्कृतीत भजनी मंडळ जन्मालाच येत नाही पण आम्ही कवी मात्र कुठेही तयार असतो. कसलाही विधिनिषेध न बाळगता. नसू देत कवी संमेलन पण माझ्यासारख्या प्रख्यात कविचे वाचन ठेवायला काय हरकत आहे? बघा रात्र एका झटक्यात कशी संपते ते...."
"रात्र सरेल का नाही ते नाही सांगता येणार पण कदाचित तुमच्या कवितांमुळे गेलेला जीव मात्र पुन्हा परत येईल....." कुणीतरी म्हणाले. तितक्यात नाना परतल्याचे पाहून त्यांनी हसणे दाबले. तिथे येत नानांनी तरुणांकडे बघत विचारले,
"आपल्या नाक्यावरील हॉटेल चालू असेल तर सर्वांसाठी चहा घेऊन येता का?"
"नाना, अहो, अशावेळी...."
"बरोबर आहे. या प्रसंगी चहापाणी घेऊ नये. पण रात्र तर सरली पाहिजेत ना? झोप येते, कंटाळा येतो. म्हणून म्हटलं घेऊया."
"नाना, अगदी माझ्या मनातले बोललात हो. मलाही खूप तीव्र इच्छा होती हो."
एक-दोन तरुण मुलांनी जाऊन लगोलग चहा आणला. सर्वांनी चहा घेतला. नानांच्या पुढाकाराने वातावरण बरेच मोकळे झाले. काही क्षणातच गप्पांची दिशा बदलली. गंभीर वातावरणात नकळत विनोदाचा शिरकाव झाला. कुणीतरी विचारले,
"नाना, सकाळची व्यवस्था...."
"होईल सारे. निश्चिंत रहा...."असे सांगत असताना नानांना चार महिन्यांपूर्वींची ती घटना आठवली...
त्यादिवशी सायंकाळी नेहमीप्रमाणे नाना आणि त्यांचे 'म्हातारे नव्हे महातारे' समुहातील सदस्य इमारतीच्या परिसरात असलेल्या बागेत जमले होते. गप्पागोष्टी, विनोद, आठवणी अशा विषयांवर नेहमीच चर्चा होत असत. वाहिन्यांना चर्चेसाठी दररोज जसे निरनिराळे विषय मिळतात तसेच या महातारे या मंडळाचे होते. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नसे. तास-दीड तास एका वेगळ्या वातावरणात घालवून, ताजेतवाने होऊन ती मंडळी आपापल्या घरी परतत असे. त्यादिवशीही त्या ज्येष्ठांची चर्चा रंगात आलेली असताना एक युवक त्यांच्याजवळ आला. वेशभूषेवरुन तो एखाद्या कंपनीचा विक्रेता वाटत होता. काही जणांनी त्याला पाहून न पाहिल्यासारखे केले, कुणी नाक मुरडले, अनेकांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिले. नानांचे लक्ष त्याच्याकडे जाताच त्यांनी विचारले,
"कोण हवय तुम्हाला? कोण आहात तुम्ही?"
"विक्रेता असणार. आज दिवसभरात दहाजणांनी घरी येऊन तर पंधरा-सतरा जणांनी फोन करून डोकं नुसते किर्रर केलय. जरा निवांत बसावे म्हटलं तर इथेही पोहोचलात?"
"म....म... मी सेल्समनच आहे.... पण तसा सेल्समन नाही हो."
"असा आणि तसा हा काय प्रकार आहे? सेल्समन म्हणजे सेल्समनच!"
"विमा कंपनीप्रमाणेच आमचीही ...."
"सरळ सांगा ना, विमा कंपनीचा प्रतिनिधी आहे म्हणून..."
"काय नाव आहे तुमच्या कंपनीचे?"
"अहो, नाना कशाला त्याच्या नादी लागताय?"
"मी तसा एजंट नाही हो....नेहमीप्रमाणे येणाऱ्या...."
"म्हणजे? मग काय निरोधचा प्रतिनिधी आहेस? बाबा, आता गवऱ्या-लाकडं पुढे गेली आणि निरोधचा काय उपयोग?"
"अगदी बरोबर! मीही तुमची तीच व्यवस्था....."
"काय? ती व्यवस्था करणार? दलाल आहे की काय?"
"नाही हो. आत्ता हे काका ते लाकडाचे म्हणाले ना .... ती...तीच व्यवस्था ..."
"मसणात पोहोचवणार? आम्हाला? जिवंतपणी?"
"थांबा. थांबा. आपण त्याचे म्हणणे तर ऐकून घेऊया ." नाना म्हणाले. ते वयाने ज्येष्ठ असल्यामुळे सारे त्यांचा आदर करीत असत.
"कसे आहे, या संसारात, प्रत्येकाच्या जीवनात एक अंतिम, शाश्वत सत्य आहे ते म्हणजे मृत्यू! सध्याचे युग हे धावपळीचे, विकृत स्पर्धेचे आहे. जो तो हातचे सोडून पायत्याच्या मागे लागतो आहे. खेड्यात राहणाऱ्या मायबापांची मुले शहरात आणि शहरात राहायला आलेल्या मायबापांची मुले नंतर परदेशात..."
"बरोबर आहे हं. गावातील शेतीबाडी, घरदार सारे विकून आम्ही मुलाजवळ राहायला आलो. आम्हाला शहरातील फ्लॅट नामक खुराड्यात सोडून मुलगा आणि सून गेली परदेशात. चार वर्षांपासून फोनवर त्यांचा आवाज ऐकून समाधान मानतोय झालं." एक जण म्हणाला.
"असेच प्रकार अनेक घरात आहेत. देव करो असे होऊ नये..... जरा स्पष्ट बोलतो पण समजा या आजोबांचे किंवा आजीचे काही बरेवाईट झाले तर यांच्याजवळ कोण आहे?"
"कुणीच नाही रे बाबा, कुणीही नाही. या फ्लॅटमध्ये अडचण आहे, गैरसोय होते म्हणून गावाकडील लोक आणि नातेवाईक सारेच दुरावलेत. कुणीही जवळ नाही अशा परिस्थितीत आमच्यापैकी कुणी गचकलं तर काय होईल? कोण धावून येईल हा विचार मनात आला की रात्र-रात्र झोप येत नाही."
ती व्यक्ती भावनाविवश होऊन बोलत असताना तो तरुण म्हणाला,
"आम्ही...म्हणजे आमची कंपनी येईल. तुमची सारी व्यवस्था करेल."
"मेल्यानंतर काय व्यवस्था करशील बाबा?"
"तिरडीपासून ते तेरवीपर्यंत सारी!"
"काय सांगतोस काय? ये बस. आता सविस्तर सांग." दुसरे एक ज्येष्ठ म्हणाले.
"आत्ताच म्हणालो त्याप्रमाणे ज्या व्यक्तीला जवळचं कुणी नाही किंवा ज्यांची मुलं दूर असल्यामुळे येऊ शकत नाहीत अशावेळी प्रश्न पडतो की, पुढील व्यवस्था करावी कुणी आणि कशी? एक असते का हो? त्यासाठी आपण आमच्या संस्थेचे सभासद झालात आणि अंत्यसंस्काराचे पॅकेज ठरवून टाकले तर अगदी त्याप्रमाणे सारी व्यवस्था होईल."
"खरे सांगतोस का रे?नाही तर या महाताऱ्यांना स्वप्न दाखवशील...पाच-दहा रुपये घेऊन रफूचक्कर
होशील. असले फसवणुकीचे अनेक प्रकार आणि संस्था आम्ही बघत असतो."
"तशा कोणत्या जाळ्यात आम्हाला ओढू नको म्हणजे झाले."
"आधी त्याची योजना तर समजावून घ्या. बोल."
"आमच्याकडे अ, ब, क, ड असे चार दर्जाचे पॅकेजेस आहेत."
"मग प्रत्येकाची फिसही वेगळी असणार. मरणोत्तरही आर्थिक विषमता आहेच का?"
"वेगळी आहे. जशी सेवा तसा मेवा! तुम्हाला कोणत्या दर्जाची सेवा हवी आहे त्यानुसार शुल्क भरावे लागेल. प्रथम 'ड' गट योजनेची माहिती सांगतो.." असे म्हणत तो तरुण पोटतिडकीने समजावून सांगू लागला......
"नानासाहेब......" कुणी तरी आवाज दिला आणि नाना वास्तवात परतले. त्यांनी विचारले,
"काय झाले?"
"काही नाही. बहुतेक तुमचा डोळा लागला होता. उजाडलं आहे. माणसं भेटायला येऊ लागतील. त्या संस्थेला कळवलं का?"
"रात्रीच बोलून झाले आहे. सातपर्यंत त्यांची माणसं येतील."
"म्हणजे आपल्याला काही करायची गरज नाही."
"नाही. तरीही ती माणसं आल्यावर बघू...." नाना बोलत असताना त्यांचा भ्रमणध्वनी वाजला.
"बोला. नानासाहेब बोलतोय."
"मी मरण तुमचे, सरण आमचे या संस्थेतून बोलतोय. प्रसंग वाईट आहे. पण सारे तुम्हालाच विचारुन करावे लागणार आहे. दुसरे कुणी निर्णय घेणारे आहे का?"
"नाही. तुम्ही काय ते स्पष्ट विचारा."
"पॅकेज घेताना जो पत्ता दिलाय तोच आहे ना?"
"हो. तोच आहे."
"ओ.के. दुसरे म्हणजे हे शहर आहे. तुमचे जवळचे कुणीही नाही. बाकी काही नाही पण रडायचे वांधे होतात हो. म्हणून म्हटलं रडण्यासाठी बायका पाठवू की रडणाऱ्या बायकांची टेप पाठवू? टेपचा असा फायदा होतो की, टेपजवळ आमचा एक माणूस बसून राहील. कुणी भेटायला आल्याबरोबर तो टेपचा आवाज वाढवतो आणि काही क्षणात कमीही करतो. बायकांचे तसे नसते. त्या एकदा सुरु झाल्या की मग त्या थांबतच नाहीत."
"ठीक आहे. टेपच पाठवा. बरे, माझी बायको सधवा..."
"नानासाहेब, तुम्ही 'अ' दर्जाची सेवा घेतली आहे. तुमच्या फ्लॅटच्या उंबरठ्यापासून ते स्मशानभूमीत
अगदी चितेपर्यंत हळदी-कुंकवाचा सडा टाकण्यात येईल. नानाजी तुमचे पितृत्व आमच्या संस्थेने स्वीकारले आहे. काहीही काळजी करू. तुम्हाला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. ठेवतो. उशीर होईल." असे म्हणत त्याने फोन बंद केला. नानासाहेबांनी मुलांच्या मदतीने पुन्हा एकदा सर्वांसाठी चहाची व्यवस्था केली. एक-एक करीत इमारतीमधील आणि परिसरातील स्त्री-पुरुष कमलाबाईंच्या अंत्यदर्शनासाठी येत होते. भिंतीला टेकून दुःखावस्थेत बसलेल्या नानांना पुन्हा तो प्रसंग आठवला......
'मरण तुमचे, सरण आमचे' या संस्थेकडून आलेल्या व्यक्तीने संस्थेकडून मृत्यूनंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या चार प्रकारच्या व्यवस्था समजावून सांगितल्या आणि तो म्हणाला,
"ही झाली मिळणारी व्यवस्था आणि त्यानुसार भरावे लागणारे शुल्क..."
"योजना अत्यंत उत्तम आहे पण खर्चिक आहे हो."
"का हो, बसभाड्यामध्ये मिळते तशी ज्येष्ठांसाठी काही सवलत नाही का?" एकाने विचारले.
"आहे ना. पण त्यासाठी कमीतकमी तीस व्यक्तीच्या समुहाने एकाचवेळी सदस्य व्हावे लागेल. अशा प्रत्येक सदस्याला त्याने घेतलेल्या योजनेच्या शुल्कात तीस टक्के सवलत मिळते."
"ठीक आहे. तुमचे कार्ड देऊन जा.आम्ही सारे मिळून चर्चा करतो आणि कळवतो."नाना म्हणाले....
अचानक बायकांच्या रडण्याचा आवाज आला आणि नानासाहेब वास्तवात परतले. पाहतात तर त्या संस्थेचा एक माणूस आला होता. त्याने 'सामुदायिक रुंदन' ही टेप लावली होती. त्यामुळे आधीच्या दुःखी आणि सुतकी वातावरणात भर पडली. अंत्यदर्शनासाठी आलेल्या बायकांचे अगोदरच पाणावलेले डोळे धरणाचा बांध फुटल्याप्रमाणे अश्रू पाझरू लागले. काही क्षण जाताच नानांनी त्या माणसाला इशारा केला आणि त्याने आवाज कमी केला. त्यानंतर त्या माणसाने एक गोष्ट कटाक्षाने पाळली की, कुणी भेटायला आले की, तो टेपचा आवाज मोठा करत असे. काही क्षणातच पुन्हा कमी करत असे.
थोड्या वेळाने संस्थेकडून तीन-चार महिला आल्या. पांढऱ्या शुभ्र कपडे परिधान केलेल्या त्या महिलांच्या गळ्यात संस्थेकडून दिलेले ओळखपत्र होते. त्यांनी शवाच्या बाजूला सुवासिक फुलांची एक गादी तयार केली. कमलाबाईंना हलकेच उचलून त्या गादीवर ठेवले. आजूबाजूला गुलाबाची फुले अंथरली. ते पाहून पत्नीकडे बघत नानासाहेब मनात म्हणाले,
'बघ. तुला फुलांची हौस,आवड होती ना बघ आता. इमारतीच्या अंगणात तू हट्टाने किती तरी फुलझाडे लावलीस. मी पूजेसाठी बसलो की, खाली जाऊन फुले तोडून आणायचीस. झाडांना स्वतः पाणी घालायचीस. मला फुले देऊन म्हणायची की, अहो, या फुलांची चांगली आरास करा बरे. देवाला की नाही फुले खूप खूप आवडतात. आता बघ, त्या तुझ्या देवानेच तुला आवडतात म्हणून तुझ्यासाठी कशी मस्त फुलांची आरास केली आहे. मज्जा आहे बुवा......" तितक्यात पुन्हा टेपचा आवाज वाढला. कुणी तरी भेटायला आले होते. फुलांची सजावट होताच त्या महिलांनी कमलाबाईंच्या शवाभोवती शुद्ध तेलाच्या दिव्यांची आरास करून सुवासिक उदबत्त्याही लावल्या.
नऊ वाजत असताना त्या कंपनीचा एक माणूस आला. त्याच्याजवळ भला मोठ्ठा गठ्ठा होता. तो नानांजवळ बसला. गठ्ठा सोडताना म्हणाला, "नानाजी, आपल्या पॅकेजप्रमाणे काकूंना अंतिम महावस्त्र म्हणून पैठणी नेसविण्यात येईल. त्यांची आवड तुम्हाला चांगलीच माहिती असणार. यापैकी कोणतीही एक पैठणी तुम्ही निवडा. तीच पैठणी नेसवून काकूंचा अंतिम प्रवास सुरु होईल."
नानासाहेबांनी पैठणी बघायला सुरुवात केली. तशी बायकांमध्ये हळू आवाजात चर्चा सुरू झाली.
"काय बाई, काकूंचे भाग्य? शेवटची पैठणी?"
"पैशाची नुसती उधळपट्टी. फुलांची गादी काय? चांगल्या शुद्ध तेलाचे दिवे काय? उदबत्त्यांचा घमघमाट तर बघा साऱ्या इमारतीत पसरलाय."
"अहो, नाना खिशातून थोडेच पैसे खर्च करणार आहेत? विमा आहे म्हणे."
"असेल हो. विम्याची रक्कम का कमी असणार आहे? कंपनी का मुर्ख आहे, आवळा घेऊन कोहळा द्यायला? दहापट रक्कम आधीच वसूल केली असणार. एवढी सारी डोळे दिपवणारी व्यवस्था मृताला काय समजणार? तिची तर मातीच होणार. जिवंतपणा काकांनी काकूंची कोणतीही हौसमौज केली नाही आणि आता दुनियेला स्वतःची श्रीमंती, बडेजाव दाखविण्यासाठी ही दिमाखदारी! दुसरे काय?"
"असू द्या हो. मेल्यानंतर चितेवर आत्मा जाईपर्यंत शरीराभोवती घुटमळतो म्हणे. त्या अर्थाने काकूंचा आत्मा हा सारा थाटामाट बघून तृप्त होत असेल. तुम्हाला माझी एक इच्छा सांगू का, मरण यावे तर हे असे. मी आत्तापासूनच देवाजवळ प्रार्थना करतेय की मला यांच्या आधी उचल रे बाबा. यांनी की नाही, लाखभर रुपये भरून हीच योजना घेतली आहे. अशीच व्यवस्था झाली ना तर भरून पावेल हो. माझ्या दहाव्या दिवशी कावळ्यांच्या झुंडीच्या झुंडी येऊन एका क्षणात माझ्या पिंडाला शिवण्यासाठी त्यांच्यामध्ये चढाओढ लागेल बघा. मोठ्या समाधानाने मी मरण पत्करेन...." तो संवाद चालू असताना तिकडे नानांनी पैठणी निवडली. कंपनीकडून आलेली एक स्त्री म्हणाली,
"नानाजी, कंपनीच्या करारानुसार एकशे एक सवाष्ण बायका घेऊन आलो आहोत. काकूंना शेवटचे स्नान त्याच बायका घालतील. पैठणी नेसवतील. याच बायका स्मशानभूमीपर्यंत हळद-कुंकवाचा सडा घालतील. घरापासून चितेपर्यंत हिरवे गालिचे अंथरतील."
"आलेल्या बायका संख्येने एकशे एक असोत किंवा नसोत पण दिसायला मात्र 'एक से एक' आहेत. हे नक्की...." गॅलरीत उभा असलेला एक युवक म्हणाला. इतरांनी त्याला टाळी दिली आणि सारे हसत सुटले.....
इमारतीच्या पटांगणात कंपनीचा एक युवक आणि एक युवती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सांगत होते, "आपण मृताचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आला असाल, अंत्ययात्रेत सहभागी होणार असाल आणि आपली इच्छा असेल तर आमची 'मरण तुमचे, सरण आमचे!' ही कंपनी आपल्या मापाचे पांढरे शुभ्र कपडे विनामूल्य पुरवण्यासाठी तयार आहे..." ते ऐकून काही व्यक्ती ते कपडे घेत होते. काही जण न बोलता पुढे निघून जात होते. अनेक लोक नाक मुरडत, उपहासाने बोलत निघून जात. काही माणसं मात्र त्या योजनेचे कौतुक करताना सारी योजना समजावून घेण्यासाठी कंपनीचे कार्ड
घेत होते. कमलाबाईंच्या अंत्यदर्शनासाठी आलेली एक तरुणी सोबतच्या तरुणास हळूच म्हणाली,
"ही योजना तुझ्या आई-बाबांसाठी घे. कोणतीच कटकट नको. बाबांची फार बारकाई असते. आई आधी गेल्या ना तर बाबा अशी काही व्यवस्था करतील ना विचारु नको. त्यापेक्षा या कंपनीला कंत्राट दिले की आपण मोकळे होऊ. ती कंपनी आणि बाबा काय घालायचा तो गोंधळ घालतील. आपण दोघे निवांतपणे दुःख उपभोगू. माझ्या आयुष्यात एकदम जवळची अशी एकही व्यक्ती मेली नाही रे त्यामुळे हे सारे वातावरण, अंत्यविधी मला इन्जॉयच.... आय मिन पाहता आले नाही रे. भविष्यात जेव्हा केव्हा मी पीएचडी करेन ना तेव्हा याच विषयावर करेल..."
कमलाबाई सवाष्ण गेल्यामुळे आणि वयस्कर असल्याने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नानांच्या इमारतीत राहणाऱ्या बायकांसोबत आसपासच्या इमारतीत राहणाऱ्या बायका गर्दी करत होत्या. तिकडे स्मशानभूमीत सारी व्यवस्था झाली असल्याचा संदेश आला आणि कमलाबाईंच्या अंतिम स्नानाची तयारी सुरू झाली. विशेष म्हणजे कंपनीने चित्रीकरणाला सुरुवात केली होती. कंपनीच्या धट्ट्याकट्ट्या बायकांनी कमलाबाईंना उचलले. फुलांनी सजविलेल्या स्ट्रेचरवर ठेवले. तितक्यात 'राम नाम सत्य है।' ची टेप सुरू झाली. चार स्त्रिया, स्ट्रेचर आणि नानासाहेबांना लिफ्टमधून खाली आणण्यात आले. पटांगणात कंपनीने आणलेल्या एका गॅस शेगडीवर पाणी गरम होत होते. तर दुसऱ्या शेगडीवर तूप गरम होत होते. तुपाचा घमघमाट सर्वत्र दरवळत होता. कंपनीने जाडजूड कापडाचे एक न्हाणीघर तयार केले होते. कमलाबाईंना त्या न्हाणीघरात नेऊन एक तांब्या गरम पाण्याचा तर दुसरा तांब्या तुपाचा या पद्धतीने आंघोळ घालणे सुरु करण्यात आले. खास परदेशातून आणलेल्या साबणीने कमलाबाईंना यथोचित स्नान घालून झाल्यावर कमलाबाईंना पैठणी नेसवण्यात आली. कंपनीने पाठविलेल्या ब्युटीपार्लरमधील मुलीने कमलाबाईंना सजवले. कपाळावर हळदीकुंकवाचा लेप देण्यात आला. बाजूला कंपनीची माणसं चंदनाच्या लाकडापासून तिरडी तयार करीत होते. तिरडीवर टपोऱ्या, सुवासिक फुलांची गादी तयार करण्यात आली. त्यावर कमलाबाईंना अलगद ठेवण्यात आले. खास तयार करण्यात आलेला मोठ्ठा हार कमलाबाईंना घालण्यात आला. नानासाहेबांच्या हाताने एक छोटे मंगळसूत्र घालण्यात आले. पाठोपाठ नानांनी अत्यंत दुःखाने कमलाबाईंच्या कपाळावर कुंकू लावले. बाजूला उभ्या असलेल्या एकशे एक महिलांनी मुलांनी शाळेत कसरतीचे हात करावेत त्याप्रमाणे कमलाबाईंच्या शरीरावर हळद, कुंकू, फुलं अर्पण केली.दुसरीकडे नानांचे मुंडण करून कंपनीच्या लोकांनी नानासाहेबांना सुगंधी पाण्याने स्नान घातले. नानांच्या हातात एक मडके देण्यात आले. कंपनीच्या महिला तिरडीच्या समोर हळद कुंकवाचे सडे घालत जात असताना पाठोपाठ काही महिला हिरवे गालिचे अंथरत होत्या. तितक्यात कंपनीच्या माणसाने सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात नानांना विचारले,
"काकूंच्या अंत्यसंस्काराचे विधी ठरावाप्रमाणे होत आहेत. एक सांगा, अंत्ययात्रा शववाहिनीतून काढायची की पायी जायचे? कंपनी दोन्ही प्रकारच्या सेवा द्यायला तयार आहे...."
"पायी जाण्यासाठी का स्मशानभूमी जवळ आहे? शिवाय कंपनीत, कार्यालयात जायची वेळ होत आहे. शववाहिनीच काढा...." कुणी तरी म्हणाले आणि त्यास सर्वांनी संमती दिली. त्याप्रमाणे इमारतीच्या समोर दोनशे-तीनशे मीटर अंतरावर उभ्या असलेल्या शववाहिनीपर्यंत शवयात्रा काढण्यात आली. तिरडीसमोर हळदीकुंकवाचा सडा आणि त्यावर गालिचे अंथरत अंत्ययात्रा शववाहिनीजवळ पोहोचली. तिथे अलगदपणे तिरडी आत ठेवण्यात आली.'राम नाम सत्य है...' ही धून सुरू झाली. शववाहिनीत नानांसह अन्य दोन-चार व्यक्ती बसल्या. हळूहळू शवयात्रा परिसराच्या बाहेर पडली आणि वाहिनीचा वेग वाढला. पाठोपाठ इतर अनेक वाहने निघाली...
ती अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचताच तिथे असलेल्या कंपनीच्या महिलांनी शंभर मीटर अंतरापासून हळदकुंकवाचा सडा आणि गालिचे अंथरत तिरडी आत नेण्यात आली. तिथे चंदनाच्या लाकडाची चिता अर्धवट तयार होती. काही चिकित्सक लोकांनी त्या लाकडाचा वास घेऊन ती लाकडे चंदनाची आहेत की नाहीत याची शहनिशा केली. अंतिम टप्पा सुरू होत असताना मरण तुमचे, सरण आमचे या कंपनीच्या व्यवस्थापकाने सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात विचारले,
"नानाजी, आपण दुःखात आहात परंतु कंपनीच्या नियमानुसार काही गोष्टींची चर्चा करणे गरजेचे आहे. काकूंच्या दहाव्याचा विधी तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आपल्या देशातील कोणत्याही घाटावर करण्यात येईल."
"नको. नको. मला प्रवास सोसवणार नाही. इथेच करुया."
"ठीक आहे. आजपासून चौदा दिवस आपल्या दिवाणखान्यात शुद्ध तेलाचे एकशे एक दिवे लावण्यात येतील. एकवीस दिवस रोज एकशे अकरा लोकांसाठी अन्नदान करण्यात येईल. तसेच अकरा वर्षे दरवर्षी कंपनीच्यावतीने श्राद्ध करण्यात येईल."
बाजूच्या चितेवर कमलाबाईंना ठेवण्यात आले. त्यांच्या शरीरावर चंदनाची लाकडे ठेवण्यात आली. नानांच्या हातामध्ये पेटलेले एक लाकूड देण्यात आले. चितेला अग्नी देताना नानांचे डोळे भरून आले. तशाच अवस्थेत त्यांनी चितेला अग्नी दिला. पाठोपाठ ओलेत्या अवस्थेत मडके खांद्यावर घेऊन चितेला फेऱ्या मारण्याची क्रिया सुरू झाली. वयोमान आणि मानसिक अवस्था यामुळे नानांना पाण्याने भरलेल्या मडक्याचा भार सहन होत नव्हता. पहिल्या फेरीनंतर कुणी तरी मडक्याला छिद्र पाडण्यासाठी घाव घातला. अपेक्षेपेक्षा छिद्र बरेच मोठे पडल्यामुळे मडक्यातील थंडगार पाणी नानांच्या शरीरावर पसरले. त्यामुळे नानांच्या शरीरात थंडी शिरली. ते पाहून काही अंतरावर कंपनीच्या व्यवस्थापकाजवळ उभे असलेले एक ज्येष्ठ गृहस्थ व्यवस्थापकाला हलकेच म्हणाले,
"का हो, नानांनी तुमच्या कंपनीशी जो करार केला आहे त्यात 'चितेला अग्नी देण्यासाठी मुलाची व्यवस्था कंपनी करेल' असे कलम नाही का हो?" असे विचारताना जिथे त्या ज्येष्ठाचा गळा भरून आला, डोळे पाणावले तिथे त्या व्यवस्थापकाचेही डोळे पाणावले..........
नागेश सू. शेवाळकर
११० वर्धमान वाटिका फेज ०१
क्रांतिवीरनगर लेन ०२
संचेती शाळेजवळ, थेरगाव
पुणे ४११०३३
९४२३१३९०७१.