The Author Nagesh S Shewalkar फॉलो करा Current Read मी आणि माझी तब्येत By Nagesh S Shewalkar मराठी हास्य कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books अनुबंध बंधनाचे. - भाग 19 अनुबंध बंधनाचे.....( भाग १९ )गावी जायचा दिवस आलेला असतो. ठरल... नियती - भाग 31 भाग 31मोहित....."मला नको ती.... तुला आणि मला राबवून घेईल दोघ... रहस्य - 5 (अंतिम भाग) हरी, सोनू आणि गायत्री विचार करत होते की तिथून कसं निघायचं कस... बियाण्याचा कोंबडा बियाण्याचा कोंबडा तीन कच्चीब... आर्या... ( भाग २ ) श्वेता ची आई म्हणजे एक अत्यंत हुशार , समजूतदार आणि आलेल... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Nagesh S Shewalkar द्वारा मराठी हास्य कथा एकूण भाग : 10 शेयर करा मी आणि माझी तब्येत (4) 4.6k 11.7k * मी आणि माझी तब्येत!* 'नमस्कार! मी अमूक तमूक खमके! वय वर्षे पन्नास! मी आजपासून दररोज सायंकाळी सहा वाजता 'सरमिसळ' या लोकप्रिय वाहिनीवरुन स्वतःचेच 'मेडिकल बुलेटीन' अर्थात माझे प्रकृतीपत्र, माझा आरोग्य अहवाल सादर करणार आहे. तुम्ही म्हणाल, तुम्ही असे कोण टिकोजीराव की, तुमचे मेडिकल बुलेटीन दररोज प्रसारित व्हावे आणि काही काम नसल्याप्रमाणे आम्ही ते ऐकावे. बरोबर आहे. वैद्यकीय अहवाल केवळ नेते, थोर समाजसेवक, सिलेब्रेटी, कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजप्रिय अशा लोकांचे असते. तसे पाहिले तर मी एक साधा कारकून ! माझ्या लेखणीशी प्रामाणिक असणारा, ना कधी लेखणी वा स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवलेला. पण मग म्हणून काय मला माझ्या प्रकृतीचा अहवाल सादर करता येऊ नये? असा काही कायदा तर नाही ना की, सामान्य माणसाने त्याच्या तब्येतीबाबत समाजाला कळवूच नये. ते काही नाही. कुणी ऐको वा कुणी वाहिनी बदलो मी नियमितपणे माझा अहवाल सादर करणार म्हणजे करणार. असो. आजचे पहिलेवहिले बुलेटीन सादर करण्यापूर्वी मी पन्नाशीत पोहोचेपर्यंत माझ्या देहाची काय अवस्था झाली ते सांगणार आहे. एवढ्या लहानवयातच माझी शारीरिक अवस्था अशी का झाली याचे समाधानकारक उत्तर ना माझ्याजवळ आहे, ना मी आत्तापर्यंत औषधी घेतलेल्या नानाविध पॅथीच्या किमान पन्नास डॉक्टरांकडे आहे. डॉक्टर बदलला की, पुन्हा नव्याने तपासण्या करून सारे वैद्यकीय अहवाल नव्याने गोळा करावे लागतात. आधीच्या डॉक्टरांनी केलेल्या तपासणींचे अहवाल आठ दिवसात डॉक्टर बदलला तरी तो ग्राह्य धरत नाही. मी अनेक डॉक्टरांना याविषयी विचारले पण प्रत्येकाने काही तरी सांगून वेळ मारुन नेली. असो. तर पन्नाशी गाठता गाठता अक्कलदाढीसह इतर सर्व दाढांनी माझ्या तोंडातून पलायन केले आहे. तेंव्हापासून माझे काही चुकले तर बायको टोमणा मारते की, तुम्हाला व्यवस्थित काम कसे काय जमणार? त्यासाठी थोबाडात अक्कलदाढ असावी लागते. असे म्हणत ती गालातल्या गालात आणि मी बिच्चारा तोंडाचे बोळके करुन हसतो. मी जन्मतःच टकला जन्मलो की काय अशी शंका घेता यावी याप्रमाणे डोक्यावर एकसुद्धा केस नाही. कधी काळी ही इमारत डौलाने उभी होती, असे म्हणण्याइतपत तिचे अवशेष, सांगाडा शिल्लक असतो पण माझ्या डोक्यावरील तसे नाही. अगदी 'डोक्यावरून पाणी गेले' असे मी शब्दशः म्हणू शकतो कारण डोक्यावर केस असलेल्या माणसाच्या डोक्यावर पडलेले पाणी केसांमध्ये अडकून राहते. माझ्या डोक्यावर पाण्याचा थेंब तर सोडा अणुचा एक कणही शिल्लक राहात नाही. डोके! मानवी शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव पण या ना त्या कारणाने माझे डोके त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. कधी जड पडते, कधी ठणकते तर कधी भयंकर दुखते. सर्दी झाली दुख डोके. अपचन झाले जड पडले डोके, डोळ्यावर ताण आला सुरू झाली डोकेदुखी, ताण (टेंशन) आला तोही डोकेदुखी घेऊन, तापीच्या संगतीने डोकेदुखीचे आगमन, वात-कफ-पित्त या त्रयींचे हक्काचे गिऱ्हाईक म्हणजे डोके! त्यामुळे माझे डोके कायम ठणाणा करतच असते. दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली आहे. डोळ्यातून जन्मलेले दोन्ही मोती हीच आयुष्यातील कमाई म्हणून जतन करून ठेवावी असा विचार करत असताना डॉक्टरांनी त्या दोन्ही मोत्यांवर स्वतःचा मालकी हक्क दाखवला. तरुणपणीही फार मोठ्या प्रमाणात डोळ्याचा उपयोग केला नाही, डोळ्यांवर ताण पडेल असे काहीही केले नाही तरीही डोळे बिघडलेच. कानाचे सांगायचे झाले तर एक वर्षापासून मी नाही पण माझा कान लखोपती झाला आहे. कारण कानात चांगले लाख रुपयाचे मळणीयंत्र......श्रवणयंत्र बसवले आहे. लहानपणी काय पण मोठेपणीही कधी कानातला मळ काढलाय असे मला आठवत नाही कदाचित त्या मळानेच डाव साधला असावा. नाकाला कधी भरती येईल आणि कधी ओहोटी लागेल सांगता येत नाही. अहो, म्हणजे बारा महिने अठरा काळ सर्दीचा त्रास होतो. नाक मधूनच असे वाहते म्हणा की, जणू जूनमध्ये भरून वाहणारी नदी आणि मध्येच भर वैशाख मासी ज्याप्रमाणे नदी-नाले कोरडे पडतात त्याप्रमाणे नाक कोरडेफाक पडते पण हा कोरडेपणाही जीवघेणा असतो हो. आता थोडे मानेकडे वळूया. मान ताठ ठेवून चालण्याची, बोलण्याची, वागण्याची सवय असल्यामुळे म्हणा की काय पण मानेतले एक हाड झिजले म्हणे त्यामुळे गळ्यात पट्टा वस्तीला आलाय. मानेला पट्टा घालून शेजारी जायचीही सोय नाही. त्यांच्याकडे बांधलेला कुत्रा मला पाहिले की, असा अगतिक होतो ना जणू त्याला भेटायला त्याची मैत्रीण आलीय असे त्याला वाटत असावे. ही किमया आहे, दोघांच्याही गळ्यात असणाऱ्या पट्ट्यांची ! मानेच्या शेजारीच खांदा असल्याने 'लागो बाई लागो, साता अवयवा लागो' याप्रमाणे खांदाही सतत पडलेला असतो, सारखा कुरबुर करुन मी जिवंत असल्याची जाणीव करून देतो. खांद्यावरून खाली उतरले की, हाती हात लागतो. दंड बैठका न काढताही दंड एवढा दुखतोय ना की बस्स! कधी कधी असे वाटते की, अशी कोणती चूक झाली की, देव मला असा दंड करतोय. दंड, कोपरा ते पार हाताच्या बोटांपर्यंत वेदनेचा वास असतो. त्यावर लावलेला मलमाचा वास घरभर पसरतो पण वेदनेची तीव्रता कमी होत नाही. काही मलमांचा वास तर एवढा उग्र असतो ना वाटते, 'वेदना चालतील पण मल्लम नको!' कोपरा तर असा ठणक्याचा आहे ना की बस्स बायकोला तर चक्क सचिन तेंडुलकरची आठवण येते. माझ्या दुखऱ्या भागावर मल्लम लावायचा सोडून, बर्फाने, गरम पाण्याच्या पिशवीने किंवा विजेच्या पिशवीने शेकायचे सोडून ती सचिनला झालेल्या टेनिस एल्बोचीच चर्चा सुरू करते. सचिन त्या आजारातून बाहेर कसा पडला, त्याने काय काय कष्ट केले. कोणती पथ्यं पाळली, आहारावर कसे नियंत्रण होते अशा एक ना अनेक गोष्टी मला सुनवत राहते. बरे, सचिनबद्दल विशेष लळा आहे असेही नाही त्याचे फटके, त्याचे नानाविध पराक्रम-विक्रम याबद्दल काहीही माहिती तिला नसते. तिने असे सचिनचे वारंवार उदाहरण दिल्यानंतर मी गांभीर्याने परंतु विनोदाने विचारले,"कोण ग हा सचिन?" माझा प्रश्न ऐकून खो-खो हसत बायको म्हणाली,"काय पण ध्यान गळ्यात पडलय? तुम्हाला सचिन माहिती नाही? अहो, भारताचा सर्वात पराक्रमी, विश्वविजेता खेळाडू आहे ना तो. सचिनने टेनिस खेळातली सगळी रेकॉर्ड्स मोडून ती स्वतःच्या नावावर केली आहेत ना. तो तीस वर्षांपेक्षा जास्त टेनिस खेळला म्हणून त्याला टेनिस एल्बो झाला. तुम्ही तर कधी टेनिसचा चेंडू उचलला नाही तरीही तुम्हाला कसा काय टेनिसएल्बो झाला हो? आश्चर्य म्हणतात ते हे असे, तुमची कोपरदुखी!" मला सांगा मी काय उत्तर देणार? बसलो गप् मुकाट्याने! गळा! काय सांगू याची तऱ्हा? सर्दीमुळे सारखा खवखव करीत असतो जशी पंधरा दिवसांच्या उपोषणातून उठलेल्या माणसाची खावखाव! गळा रुसला की आवाजही रुसतो. अशावेळी बायको कधी बॉम्ब चोळून देईल, आल्याचा चहा करुन देईल तर शपथ! उलट तिचे शब्दरुपी बॉम्ब झेलावे लागतात. मी दही कसे खाल्ले, आइस्क्रीम कसे मिटक्या मारत खाल्ले, लस्सी कशी आवडीने प्यालो त्यामुळे सर्दी होणारच असे नेहमीच ऐकावे लागते. यातली गोम अशी आहे की, दही, आइस्क्रीम, ताक, लस्सी, आंबट पदार्थ आमच्या सौभाग्यवतीचे जीव की प्राण! आठवड्यातून एकदा तरी आइस्क्रीम आणावे लागते म्हणजे आणावेच लागते. बरे, आणून दिले तर आपले आपण आवडीने खावे ना, पण नाही. मला वाटीभर आइस्क्रीम आणून 'खा हो. काही होत नाही. मला काही होते का असे' असे म्हणते. मला तिचे मन, आग्रह मोडवत नाही. मग काय विचारता, हाण हाणतो आइस्क्रीम. मग होते सर्दी. तेव्हा बायको म्हणते, 'कशाला खाल्ले आइस्क्रीम? मी म्हणाले म्हणून काय झाले, आपली प्रकृती आपण जपू नये का?' गळ्याच्या खाली उतरले की, छाती! इथे तर अनेक आजारांनी ठाण मांडले आहे. छातीत कोणत्याही आजाराने म्हणजे जास्त बैठक झाली, पित्त खवळले, सर्दीमुळे कफ झाला किंवा अशा कोणत्याही बारीक सारीक कारणांनी दुखणे सुरू झाले की, मनात चर्रर होते, पहिला मानसिक वैद्यकीय अहवाल येतो, छाती दुखतेय म्हणजे काही तरी गंभीर आहे. हार्ट किंवा ह्रदय नामक अतिशय नाजूक अवयवाचे निवासस्थान म्हणजे छाती! तिथेच दुखू लागलय म्हणजे अटॅक येण्याची दाट शक्यता! मग जीवाची घालमेल, तगमग, अस्वस्थता काही विचारु नका. कधी कधी तर वाटते, छाती निराळ्याच कारणाने दुखत असेल पण आपल्या 'मन चिंती ते वैरी न चिंती' या अवस्थेने न येणारा ह्रदयविकाराचा झटका यायचा. छातीचा भाऊ म्हणजे पोट! नानाविकारांचे माहेरघर! सर्व आजारांना सामावून घेणारे पोट! अजीर्ण झाले, दुखले पोट! आवडता पदार्थ थोडा जास्त खाल्ला की, झाली पोटदुखी सुरू! पित्त वाढले त्रास पोटाला! उष्णता वाढली की, माझ्या पोटात अशा गरमागरम लाटा धडका मारतात ना की मला काही सुचतच नाही. आवडते म्हणून शिळंपाकं खाल्ल तरी ते पोटाला आवडत नाही. पोट आणि जीभ एकाच शरीराचे दोन अवयव पण दोघांमध्ये जणू खानदानी दुश्मनी! जीभेला आवडते म्हणून तिचे चोचले पुरवावेत तर ते पोटाला आवडत नाही. लगेच पोट टंब फुगते! अशा पोटाचा होणारा संताप महाभयंकर असतो जणू एखाद्या अतिरेक्याने केलेला हल्ला! पोटाचा राग कधी उलट्यांवाटे तर कधी शौचाच्या माध्यमातून, तर कधी आव पडण्यातून व्यक्त होतो. पोटदुखी म्हणजे मला तर वाटते पोटाने संतापाने केलेले घणाघाती प्रहार असतात. खवळलेले पित्त हे सुद्धा पोटाचा तीव्र संतापाचा प्रकार असतो. मुतखडा ह्या आजाराने माझी शस्त्रक्रियेशी भेट घालून दिली, शस्त्रक्रिया काय असते याचा एक कायम लक्षात राहणारा अनुभव या मुतखडा या आजाराने दिला. मांड्या असतील, गुडघे असतील, पिंढऱ्या असोत की, पायाची बोटे असोत सर्वांनी मिळून जणू असहकार आंदोलन पुकारले आहे अशी स्थिती आहे. दिवस तर सोडा झोपेची अवस्था सोडली तर जागेपणाचा असा एकही क्षण नसतो की, कोणता अवयव दुखला नाही. पण तरीही इतके सारे अवयव विरोधात असले, कुणी ना कुणी सातत्याने वेदना पुरवत असले तरीही मी हार मानलेली नाही. वेदनाशामक औषधरुपी क्षेपणास्त्रांचा मारा करून मान दुखत असली तरीही ताठ मानेने उभा आहे. पाठीचा कणा! वाकला की, संपलं सारं. मी हा कणा ताठ ठेवायचा लाख प्रयत्न करतो पण कणा कणभरही, क्षणभरही साथ देत नाही. मणक्यांची माळ कायम घालून वावरणारा हा कणा माळेतला एखादा मणका इकडून तिकडे सरकला, जरासा घासला की, मग कण्याची तगमग सुरू होते मग त्यातून कधी पाठ दुखते, कधी कंबर दुखते, कधीकधी भयंकर पायदुखी होते. 'कंबर लचकणे' तसा हा प्रकार वेगळ्या अर्थाने आवडता प्रकार! एखाद्या लावणीतून 'बाई, माझी कंबर लचकली' ही ताण कानावर पडली की, शरीरभर एक वेगळीच संवेदना पसरते. कानशीलं गरम होतात पण ज्यावेळी स्वतःची कंबर लचकते त्यावेळी पसरणारी संवेदना असह्य असते. डोळ्यात पाणी आणते. आता माझ्या आजच्या शारीरिक अवस्थेबद्दल! सकाळपासून डोके ठणकत आहे. रात्री थोडे जास्त जेवण झाले, झोप व्यवस्थित लागली नाही. झोप-जाग-झोप हा पाठशिवणीचा खेळ रात्रभर चालू होता त्यामुळे शौचाला साफ झाले नाही. अंग जड पडलेय. डोळ्यांची आग होतेय. पित्त कमालीचे खवळले आहे. छातीत जळजळ करतेय. भरपूर सुस्ती येते. हातपाय दुखत आहेत. बहुतेक रक्तदाब वाढलाय पण मी तपासून घेणार नाही कारण मला रक्तदाब वाढलेला आहे हे समजते तर कशाला दवाखान्याची वारी करु? बरे, दवाखान्यात गेले की, तपासणींचे भूत मानगुटीवर बसते. शिवाय खाणपानाचे अवडंबर करतात आणि हे आमच्या बायकोला समजले तर मग खाण्यापिण्याचे होणारे हाल विचारु नका. सतत माझ्या ताटावर म्हणण्यापेक्षा घासावर लक्ष ठेवून असते. तिच्या करड्या नजरेमुळे खाण्याचे हालहाल होतात. रक्तदाब वाढलाय तेल, मीठ कमी खा असे सांगितले तरी जणू डॉक्टरांनी तेलमीठ पूर्ण बंद करायला सांगितल्या प्रमाणे माझ्या जेवणातून तेलमीठ पूर्णपणे बंद होते. त्यामुळे 'आलीया रोगाशी, जावे सामोरे!' झोप व्यवस्थित न झाल्याने रात्री अर्धवट झोपेत हात अंगाखाली गेला की, पाय अवघडला गेला काही कळले नाही पण सकाळपासून हातपाय ठणकत आहेत. मान अवटाळली की अजून एखादी चकती घासल्या गेली हे समजत नाही पण मान इकडून तिकडे, खाली वर करता येत नाही. डोके आहे ही जाणीव डोके दुखत असल्यामुळे होत आहे. मानेचा आणि पित्ताचा त्रास होत असल्याने चकरा येत आहेत. कडक उन्हाळा असल्यामुळे शरीर घामेघूम होत आहे आणि घाम नको त्या ठिकाणी उतल्यामुळे तिथे बारीक बारीक असंख्य फोड आले आहेत. त्या भागाची नुसती आग आग होत आहे पण कुणाला सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही... घरी माझ्याजवळ प्रत्येक आजारात लागणारी प्राथमिक औषधी आहे. मी काय करतो, समजा डोके दुखत असल्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आणून मी त्या गोळ्यांची नोंद माझ्या डायरीत करून ठेवतो. उदाहरणार्थ डोकेदुखी.... अमुक गोळी! पित्त... तमुक गोळी. पुन्हा केव्हा एखादा आजार जोर काढेल (तसा काढतोच म्हणा) त्यावेळी अगोदरच्या वेळी डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या आणून घेत असतो. त्यामुळे मला वारंवार डॉक्टरांकडे जावे लागत नाही. डॉक्टरांची फिस द्यायची गरज नाही. रांगेत बसून वेळ घालवायची गरज नाही. 'हं...हं...आलो. आलो. बहुतेक चहा झालाय म्हणून बायको पुकारते आहे. पित्त कितीही खवळलेले असो घरी असताना मला चार-पाच वेळेस चहा लागतो म्हणजे लागतो. चहाच्या बाबतीत बायकोने कितीही थयथयाट केला तरी मी निर्लज्जपणे तिला चहा करायला सांगतो किंवा तिचा रागाचा पारा फारच वरच्या अंकाला शिवलेला असेल तर मात्र मग स्वतःच चहा करुन घेतो आणि देवासमोर नैवेद्य ठेवावा त्याप्रमाणे बायकोच्या पुढे चहाचा कप ठेवतो त्यावेळी तिला झालेला आनंद, माझ्या बद्दल तिच्या डोळ्यात असणारे कौतुक पाहून आपल्या चहा पिण्याच्या सवयीचा मला अभिमान वाटतो. तसेच मी कार्यालयात असलो की, चहाचे दहा कप होतील की पंधरा कप, गणतीच नाही. त्यामुळे पित्त कायम वसतीला असते. आता बघा तिने चहा केला असणार बिन साखरेचा! विसरली असेल म्हणून नाही तर मुद्दाम! मला साखरेचा आजार नाही पण गोड चहा पिण्याने होऊ नये म्हणून ती घेत असलेली काळजी! तुम्हाला गंमत सांगू का, माझा बिनसाखरेच चहा काढून तिने स्वतःच्या चहात थोडीथोडकी नाही तर चांगली चार चमचे साखर टाकून घेत असेल. घेऊ देत. मला त्याबद्दल वाईट वाटत नाही उलट आनंदच होतो. पण मग माझ्या बाबतीतच कशाला आरोग्याचे नियम हद्दीच्या बाहेर जाऊन पाळायचे. बरे येतो. नाही गेलो तर माझ्या बिन साखरेच्या कपात पुन्हा चार चमचे साखर टाकून पिऊन टाकायची. अच्छा! उद्या नक्की भेटू. याच ठिकाणी, याच वेळी, तुमच्या लाडक्या सरमिसळ वाहिनीवर आणि हो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात... मेडिकल बुलेटीन!' नागेश सू. शेवाळकर ११०, वर्धमान वाटिका, फेज ०१, क्रांतिवीरनगर, लेन०२, हॉटेल जय मल्हारच्या समोर, थेरगाव, पुणे ४११०३३ ९४२३१३९०७१ › पुढील प्रकरण अशीही प्रवेश परीक्षा Download Our App