मास्टरमाईंड (भाग- ७) Aniket Samudra द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मास्टरमाईंड (भाग- ७)

दुसरा पुर्ण दिवस जॉन आणि डॉलीने एकत्रच घालवला ... तिन महीन्यांची कसर दोघांनी एका दिवसातच भरुन काढली. जॉन डॉलीला घेउन गावाबाहेरच्या निसर्गरम्य परीसरात फिरुन आला.

हिरव्या रंगाचा पुल-ओव्हर आणि काळ्या रंगाची स्लॅक घातलेली डॉली पाहुन गावकर्‍यांचे डोळे विस्फारले होते. अर्थात डॉलीला अश्या " सेकंडलुक " ची सवय होतीच. शहरातील तरूण सुध्दा डॉलीला पाहुन वळुन बघत तिथे हे तर बिच्चारे गावकरी होते. डॉली स्वतःशीच हसली आणि जॉनला घट्ट पकडुन चालु लागली.

संध्याकाळी जॉन आणि डॉली दोघंही पोलिस चौकीवर गेले. जॉनने डॉलीने सुर्‍याबद्दल काढुन आणलेल्या माहीतीचा कागद पवारांना दाखवला.

“ह्या कोण?”, हातातल्या कागदाकडे बघतच इ. पवार म्हणाले

“ही डॉली!, माझी असिस्टंट. हिनेच ह्या सुर्‍याबद्दलची अधिक माहीती काढुन आणली आहे.” जॉन म्हणाला

“१८३६? ह्या काळातला हा सुरा आहे असं म्हणणं आहे का तुमचं? ” इ. पवार अजुनही तो कागदावरचा मजकुर वाचत होते.

“होय पवार साहेब. त्या सुर्‍यावरील चित्रं, खाचा, त्याच्या मुठीची ठेवण, लांबी रुंदी सर्वच्या सर्व काही अगदी तंतोतंत जुळते आहे. १८३६ साली जयपुरचे महाराज जसवंतसिंग ह्यांनी त्यांचा विश्वासु नोकर नाईक ह्यांना एक असल्या सुर्‍यांचा सेट भेट दिल्याची नोंद आहे. परंतु त्यानंतर तो कुणाकडुन कुठुन कसा फिरत ह्या गावात आला ह्याबद्दलचे तपशिल मिळवणे थोडे कठीण आहे.” जॉन

“हम्म.. परंतु तुम्ही जसे सांगताय, त्यावरुन हा सुरा खानदानी लोकांच्याकडेच असण्याची शक्यता जास्ती. त्याला ऐतीहासिक महत्व असल्याने सर्वसामान्यांकडे तो सापडणं शक्य वाटत नाही. आणि हे जर खरं असेल तर तरवडे गावातील एकमेव खानदानी कुटुंब म्हणजे..”

“भैय्यासाहेब!!??” इ.पवार आणि जॉन एकदमच म्हणाले.

“म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे खुन जे कोण भैय्यासाहेब आहेत त्यांनी केले?” डॉलीने विचारले

“नाही!.. निदान तसे आत्ताच काही म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण भैय्यासाहेब ह्या गावातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत. कदाचीत असेही असु शकेल की त्यांच्या नोकरांपैकीच कुणी हे कृत्य केलेले असेल! , कदाचीत त्यांना ह्या सुर्‍याबद्दल अधीक माहीती असेल. कदाचीत अधीक धागेदोरे तेथे मिळु शकतील..” इ. पवार खुर्चीवरुन उठत म्हणाले.., “सावंत, गाडी काढा, आपल्याला आत्ताच भैय्यासाहेबांकडे जायला हवे”

“पण साहेब, आत्ता? अंधार पडुन गेला आहे. निदान एक फोन करुन त्यांची परवानगी तरी..” सावंत

“सावंत, काम महत्वाचे आहे, चला तुम्ही”, आपली टोपी उचलुन पवार बाहेर पडले सुध्दा. मागोमाग जॉन आणि डॉली सुध्दा गाडीत जाऊन बसले.

*******

भैय्यासाहेबांची दगडी हवेली सि.एफ.एल आणि ट्युबलाईटच्या पांढर्‍या प्रकाशात बुडालेली होती. गेटपाशी २-४ गाड्या, रखवालदारांचा राबता, आजुबाजुला बागा भैय्यासाहेबांचे ऐश्वर्य दर्शवत होता.

“भैय्यासाहेबांना भेटायचं आहे, आहेत घरात?” पवारांनी दरवाज्यावरच रखवालदाराला विचारले.
“जी .. ते आत्ताच बाहेर गेल्येत, शेतामंदी, फेरफटका माराया!”, रखवालदार उत्तरला

“सावंत, तुम्ही इथेच थांबा, मी बघुन येतो” असं म्हणुन इ.पवार शेताकडे गेले, मागोमाग जॉन आणि डॉली सुध्दा गेले.

भैय्यासाहेबांची कित्तेक एकरांची शेती हवेलीला लागुन कित्तेक मैल दुर पसरली होती. नुकत्याच झालेल्या पावसाळ्याने पिकं जोमानं वाढली होती. आकाशात काळे ढग पुन्हा डोकावु लागले होते.

जोराचा वारा सुटला होता आणि त्यामुळे पिकांची होणारी सळसळ आणि तो भयाण आवाज अंगावर काटे आणत होता. चंद्राच्या अंधुक प्रकाशात जवळपास तरी कुठे मानवी आकृती नजरेस पडत नव्हती.

“भैय्यासाहेब sss”, इ.पवारांनी एक हाक मारली

बराच काळ शांततेत गेला. कुणाचाच आवाज नाही.

“भैय्यासाहेबsss”, इ.पवारांनी पुन्हा एक हाक मारली.. परंतु काहीच प्रत्युत्तर आले नाही.

“जॉन.. आपण तिघंही वेग वेगळ्या दिशेने जाऊ आणि भैय्यासाहेबांचा शोध घेऊ. दहा मिनीटांनी पुन्हा इथेच भेटु”, असं म्हणुन इ.पवार शेतात शिरले

“डॉली, तु इथेच थांब, तु नको शेतात शिरुस. मी बघुन येतो. काही वाटलंच तर सरळ हवेलीकडे परत जा ”, असं म्हणुन जॉन सुध्दा शेतात घुसला.

त्या काळ्याकुट्ट अंधारात डॉली एकटीच उभी होती. तिचे डोळे काळोखाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होते. तिचे कान कसलाही नाजुकसा आवाज टिपण्यास उद्दीप्पीत झाले होते. पाच मिनीटं होऊन गेली परंतु कसलीच हालचाल नव्हती. आणि त्याच वेळी जवळपास कोणीतरी असल्याची भयाण जाणीव डॉलीला झाली. तिच्या खांद्याचे आणि पाठीचे स्नायु कडक झाले. मानेवरचे केस ताठ उभे राहीले.

डॉली कसलीही हालचाल करायला घाबरत होती. न जाणो आपण हालचाल करावी आणि ते जे कोणी आहे त्याला आपण दृष्टीस पडु, म्हणुन डॉली स्तब्ध उभी होती.

तिच्या पाठीमागुन कोणाच्यातरी खुरडत चालण्याचा आवाज येऊ लागला होता. आवाज जवळ जवळ येत चालला होता आणि अगदी जवळ, डॉलीच्या पाठीमागे येउन थांबला.

डॉलीचा श्वासोच्छ्वास जोराने चालु होता. घश्याला कोरड पडली होती. तो आवाज थांबला होता .... ... कोणी आलेच असेल तर ते डॉलीच्या अगदी मागे उभे होते. डॉली सावकाश मागे वळली.

*****

तिच्या मागे एक सहा फुट उंच धिप्पाड, पिळदार मिश्या असलेली व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीचा चेहरा घामाने डबडबला होता. डोळे तारवटले होते, जणु काही खोबणीतुन बाहेर पडतील. डॉलीची नजर त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरुन खाली सरकली आणि तिला धक्काच बसला. त्या व्यक्तीचे शरीर रक्तबंबाळ झाले होते. कोणीतरी किमान आठ ते दहा वेळा एखादा सुरा भोसकला होता. डॉलीच्या तोंडुन एक जोरदार किंकाळी बाहेर पडली.

ति व्यक्ती कुठल्याही क्षणी कोसळेल अशी उभी होती. त्या व्यक्तीने आपला हात हळु हळु वर उचलला. थरथरत्या तळहाताचे एक बोट पहिल्यांदा डॉलीच्या चेहर्‍यासमोर स्थिरावले आणि मग उजवीकडे सरकले. ती व्यक्ती डॉलीच्या मागे कुणाकडे तरी बोट दाखवत होती. डॉलीने आपली नजर हळुवार मागे फिरवली. मागे जॉन उभा होता.

“डॉली काय झालं? भैय्यासाहेब!!, काय झालं भैय्यासाहेब?”, जॉन धावतच पुढे झाला, परंतु तो पर्यंत भैय्यासाहेबांचा देह खाली कोसळला होता.

डॉलीची किंकाळी ऐकुन इ.पवारही धावत आले.

डॉली मात्र अजुनही आळीपाळीने भैय्यासाहेबांचा चेहरा आणि जॉन ह्यांच्याकडे बघत होती ....

*****************************

भैय्यासाहेबांच्या खुनाने अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. निराशेच्या, संतापाच्या, आश्चर्याच्या. छोट्याश्या गावात तिसरा खुन होतो आणि खुन्याचा साधा पुरावा सुध्दा मिळत नाही ह्या विचाराने पोलीस सुध्दा वैतागले होते.

“भैय्यासाहेबांचा खुन झाला तेंव्हा इ.पवार, जॉन आणि डॉली तेथेच होते. परंतु भैय्यासाहेबांचा बारीकसा सुध्दा आवाज ऐकु आला नाही. भैय्यासाहेबांसारख्या आडदांड माणसाला एका पकडीत तोंड दाबुन धरुन भोसकणे अशक्य. ह्याचा अर्थ .. असा धरायचा का, की ज्याने खुन केला तो भैय्यासाहेबांच्या ओळखीतला होता?”, पवारांच्या डोक्यात विचारचक्र चालु होते.

पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार पुन्हा एकदा त्याच प्रकारचा, त्याच आकाराचा सुरा खुनासाठी वापरण्यात आला होता.

“चव्हाण, डोकंच चालेनंसं झालंय बघा!. काहीच संदर्भ लागत नाहीये. सर्व लोकं वेगवेगळ्या क्षेत्रातील. तसा कुणाचा एकमेकांशी संबंध नाही. त्यामुळे खुनामागील मोटीव्ह, पॅटर्न काहीच स्पष्ट होत नाही. मग हे खुन का होतं आहेत? का खरंच तो खुनी माथेफिरु आहे???” इ.पवार आगतीक होऊन बोलत होते,

“आता हेच बघा, भैय्यासाहेबांचा खुन करुन कुणाला काय फायदा? म्हणजे असं बघा, तसे भैय्यासाहेब मोठं माणुस होतं. कुणाची ना कुणाची तरी दुश्मनी असणारच, पण खुन करण्याइतपत मजल जाईल असं कोण असेल?”

“नानासाहेब??” चव्हाण सहजच बोलुन गेले.

*****************************

[क्रमशः]