आला श्रावण मनभावन भाग १ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आला श्रावण मनभावन भाग १

आला श्रावण मनभावन भाग १

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे.
या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.

श्रावणामध्ये पावसाच्या दोन जोरदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते.
दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो.
श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते.
श्रावणाच्या आगमाने अवघी सृष्टी हिरवीगार झालेली असते .
वेगवेगळी फुलेही उमललेली असतात .
त्यांवर भिरभिरणारी फुलपाखरे बघतांना मन सुखावते. त्याचे मनमोहक रंग जणू सर्वांवर मोहिनीच घालतात.

श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते.
श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैनधर्मीयांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.
श्रावण महिना सर्व व्रतांचा राजा समजला जातो.
संपूर्ण महीनाभर वेगवेगळे सण व व्रते असतात .

या महिन्यात प्रत्येक वाराला एक कहाणी असते

श्रावण महिन्यात कोणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो... काही जण खास करून सोमवार पाळतात... पण, हा उपवास का पाळतात?
तर सोमवार हा शंकराचा वार समजला जातो.
मग, शंकराला खूश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहीत मुली उपवास करतात. देवांचा देव म्हणजे महादेव.... श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात.
श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महीन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे.
श्रावण महीन्यात महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे श्रावण महीन्याला शंकराच्या उपासनेचा महीना असे सांगितले आहे.
श्रावणी सोमवार हा श्रावण महीन्यातला सोमवारचा दिवस आहे.
श्रावण महीन्याची कथा अशी सांगतात ..

देवी सतीने तिचे पिता दक्ष यांच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता.
त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा निश्चय केला होता.

देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रुपात जन्म घेतला.

पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व त्याच्याशी विवाह केला.

त्यानंतर महादेवाला श्रावण महीना विशेष प्रिय झाला. यामुळेच श्रावण महीन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात.

या दिवशी हे व्रत विवाहित महिला करतात .

महादेवाला धान्यांची मुठ वाहून पूजा केली जाते .त्याला शिवामूठ म्हणतात

दर सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवामूठ वाहिली जाते .

जसे की

पहिला सोमवार - तांदूळ

दुसरा सोमवार - तीळ

तिसरा सोमवार - मूग

चौथा सोमवार - जवस

पाचवा सोमवार आल्यास - सातू

श्रावणी सोमवार ची कथा अशी आहे

आटपाट नगर होतं.

तिथं एक ब्राह्मण होता.

त्याचा एक शिष्य होता.

तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी.

वाटेंत वेळूचं बेट होतं.

परत येताना “मी येऊं? मी येऊं?” असा आवाज येई .

हा मागं पाही, तों तिथं कोणी नाहीं.

त्या भीतीनं तो बारीक होऊ लागला.

गुरुजींनीं विचारलं, “खायला प्यायला काहीच कमी नाहीं.

मग बाबा, असा बारीक का होतो आहेस?

तेव्हा त्याने जे घडत होते ते सांगितले .

गुरुजी म्हणाले, “भिऊं नको, मागं कांहीं पाहूं नको. खुशाल त्याला ये म्हण, तुझ्यामागून येऊं दे.”

मग शिष्य रोजच्याप्रमाणं स्नानास गेला.

पूजा करून येऊं लागला. “मी येऊं?” असा आवाज आला.

“ये ये” असे म्हणाला.

मागं कांहीं पाहिलं नाहीं. चालत्या पावलीं घरीं आला.

गुरुजींनीं पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे.

त्या दोघांचं लग्न लावलं.

त्यांना एक घर दिलं.

त्यानंतर काय झालं. श्रावणी सोमवार आला. शिष्य बायकोला म्हणाला “माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको.” आपण उठला.
शंकराचे पूजेला गेला.

तिनं थोडी वाट पाहिली.

स्वयंपाक करून स्वतः जेवायला बसली.

एक घास तोंडात घातला.

इतक्यामधें पती आला. “अग अग, दार उघड.” म्हणाला .
आपण नवर्या आधी जेवायला बसलो याचा संकोच वाटून
तिने पुढचं ताट पलंगाखालीं ढकलून दिलं.

हात धुतला. दार उघडलं. पती घरांत आले. नित्य नेम करूं लागले.

पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशींही असंच झालं.

असं चारी सोमवारीं झालं. सरता सोमवार आला.

त्या दिवशी रात्रीं नवल घडल .

दोघंजणं पलंगावर गेलीं असता पतीला पलंगाखालीं उजेड दिसला.

“हा उजेड कशाचा?” बायको म्हणाली “ताटी भरल्या रत्नांचा.”

“हीं रत्नें कुठून आणली?” असे विचारता ती मनांत भिऊन गेली.

“माझ्या माहेरच्यांनीं दिलीं.” असे खोटेच सांगितले .

पतीने विचारले ” तुझं माहेर कुठं आहे?”

ती म्हणाली “वेळूच्या बेटीं आहे.”पती म्हणाला “मला तिथं घेऊन चल.”

ती पतीसह माहेरच्या वाटेने निघाली.

मनीं शंकराची प्रार्थना केली. “मला अर्धघटकेचं माहेर दे.”

तोंपर्यंत वेळूचं बेट आलं.

एक मोठा एक वाडा आला.

त्या दोघांना पाहून कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली.

दास दासी राबताहेत. शिपाई पाहारा करताहेत.

त्याला बसायला पाट दिला.

भोजनाचा थाट केला. जेवणं झालीं.

सासूसासर्‍यांचीं आज्ञा घेतली. दोघे घरीं परतलीं.

अर्ध्या वाटेत पतीला आठवण झाली,खुंटीवर हार राहिला आहे .

तेव्हां उभयतां परत गेलीं.

पहातो तो काय तेथे घर नाहीं, दार नाहीं. शिपाई नाहींत, प्यादे नाहींत, दासी नाहींत. बटकी नाहींत.

एक वेळूचं बेट आहे.

तिथं तो हार पडला होता .

हार उचलून गळ्यांत घातला व पतीने विचारलं, “इथलं घर काय झालं?”

ती म्हणाली “जसं आलं तसं गेलं.

रागावणार नसाल तर सांगतें. पतीने बर म्हणून सांगितले .

चारी सोमवारीं जेवायला बसल्यावर तुमची हांक ऐकली.

जेवणाची ताटं पलंगा खाली ढकलून दिलीं.

ती रत्नानीं भरलीं. सोन्याची झालीं.

तीं मल देवांने दिलीं. आपण विचारूं लागला तेव्हां भिऊन गेलें. माहेरची म्हणून सांगितलं.

शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं.

त्यांनीं तुमची खात्री केलीं. माझी इच्छा परिपूर्ण झाली.”
जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हां आम्हां पावो.
ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

क्रमशः