Aala Shravan manbhavna - 2 books and stories free download online pdf in Marathi

आला श्रावण मनभावन भाग २

आला श्रावण मनभावन भाग २

यानंतर येतो मंगळवार या दिवशी मंगळागौर पूजन करतात .

हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे.

ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात.

सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते.त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती (बहुधा, अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची) मांडण्यात येते.

शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात.मंगळागौरीची षोडषोपचार पूजा करतात.

याला सर्व प्रकारची फुले व मिळतील तितक्या झाडांची पत्री अर्पण केली जाते .

पत्री पूजा म्हणजे वेगवेगळ्या झाडांच्या पत्री (पाने) व फुले या पूजेत वापरली जातात.
ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती वगैरे झाडांची पाने या कामाला येतात..
पूजा करतांना १६ प्रकारच्या पत्री वहाव्यात असा समज आहे.

पूर्वी भारतात आयुर्वेदाचा प्रसार होता.

या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची नव्या विवाहितेस ओळख व्हावी व पुढील आयुष्यात गरज पडल्यास ते झाड पटकन ओळखता यावे अशी पत्रीपूजेमागची भावना असावी .

मग आरती करून प्रसाद वाटला जातो.

त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. यात प्रामुख्याने गोड म्हणजे पुरणपोळी असते .

श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते.

या पूजाप्रसंगी शक्तीतत्वाची आराधना करतात .

माता,विद्या,बुध्दी, धृती, शक्तीरूपात राहणा-या देवीची उपासना करतात व तिचे दैवी गुण स्वत:मध्ये यावेत अशी प्रार्थना करतात .

नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करतात. 'गौरी गौरी सौभाग्य दे ' अशी प्रार्थना करतात .सामूहिकरीत्या ही पूजा करण्यात विशेष आनंद मिळतो .

कारण या निमित्ताने मैत्रिणी बहिणी सगळ्या एकत्र येतात्त .पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती झाल्यावर. मंगळागौरीची कहाणी एकत्र बसून वाचतात.
मंगळागौरीच्या कहाणी नंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते.

ही पूजा केल्यावर मौनाने भोजन करायचे असते .
हा संयमाचा पाठ खूप महत्वाचा आहे.

जेवणानंतर तुळशीचे पान खातात. आलेल्या सवाष्णींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं.

हे पंचवार्षिक व्रत उद्यापनाने पूर्ण होते.

मुलींनी उद्यापनाचे वेळी आई-वडिलांना वाण द्यायचे असते.

माहेरील ज्येष्ठ नात्यांचा आदर करणे तसेच मंगळागौरीच्या निमित्ताने फक्त परस्परांना भेटवस्तू देण हे ही घडते .

त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे.

वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा - इत्यादी. असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात.यात सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.

या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो हा हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणा-या महिलांना या खेळातून आनंदही मिळे.

खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात

ज्यामध्ये माहेर सासर इथले नातेवाईक प्राणी पक्षी व धार्मिक उल्लेख येतात.

नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून सर्व बायका सजलेल्या असतात .
मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य देणारे, चैतन्य देणारे व सामुहिक जीवनाचा आनंद देणारे आहे.
सध्याच्या काळात मात्र जमेल तेवढेच खेळ खेळून गप्पा गोष्टी गाण्यात जमेत तितके जागरण करतात .

मंगळागौरीची पूजा असेल त्या घरी संध्याकाळी बायकांना हळदीकुंकवासाठी बोलावतात. हळद-कुंकू, विडयाची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाने ओटी भरतात.
संध्याकाळी सर्वासाठी भाजका फराळ म्हणजे चकली लाडू करंज्या उसळ असा असतो .

सकाळी उठल्यावर स्नान करून दहीभाताचा नैवेद्य दाखवितात व पुन्हा मंगळागौरीची आरती म्हणतात. नंतर मंगळागौरीवर अक्षता टाकून तिचे विसर्जन करतात.

मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी केले जाते.

असे शक्य नसल्यास इतर कोणी मंगळागौर व्रताचा थाट मांडला असल्यास त्यासोबत व्रताचे उद्यापन करता येतं.

पुण्याहवाचन ठेवण्याकरिता होमहवनासाठी भटजींना बोलावतात.

त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात.

आई वडिलांना वाण दिले जाते. मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे. तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू किंवा वड्या घालून देण्याची पद्धत आहे.

यामागे मंगळागौरीची पारंपरिक कथा आहे.

या कहाणीतला नवरदेव अल्पायुषी असतो. त्याला दंश करण्यास साप येतो. पण त्या नववधूच्या मातेने मंगळागौरीचे व्रत केल्याने हा नवरदेव वाचतो. त्यावेळी त्या सापाचे रूपांतर हारात होते. म्हणून याच्या उद्यापनाला आईला वाण म्हणून यामध्ये एकसर (काळेमणी आणि सोन्याचा मणी) जोडवी, कूंकू, कंगवा आरसा असे दिले जाते. वडिलांना उपरणे, शर्ट, धोतर, टोपी देतात.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED