chandani ratra - 18 books and stories free download online pdf in Marathi

चांदणी रात्र - १८

जगदीश यादव हॉटेलमधून बाहेर पडले. सकाळची वेळ होती. जंगलाची पाहणी करण्यासाठी ते निघाले. बोटीत त्यांच्याबरोबर आणखी चार माणसं होती. त्यांनी गावातील लोकांनाही खूप आग्रह केला पण कोणीही यायला तयार झालं नाही. बोटीने ते पलीकडच्या बाजूला गेले. समोर दाट जंगल एखाद्या राक्षसासारखं दिसत होतं. जगदीश बोटीतून उतरले व जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. त्यांची पूर्ण देहबोलीच एखाद्या माजलेल्या रेड्यासारखी होती. चालण्यात तोरा होता. चेहेऱ्यावर मग्रुरी होती. बोटीतील दोन माणसं त्यांच्याबरोबर चालू लागली. दोन जण बोटीतच थांबले. बरच पुढं गेल्यावर त्यांना एका बाजूला ओळीने बांधलेल्या झोपड्या दिसल्या. रिवा त्याच्या झोपडीच्या दारातच बसला होता. त्याने जगदीश यादवला समोरून जाताना पाहिले. तो एकटा असता तर त्याला पकडतापण आलं असतं. पण मागून दोन धिप्पाड माणसांना येताना पाहून रिवाचा विचार बदलला. आत्ताच घाई करण्यात काहीच अर्थ नव्हता. थोड्यावेळाने जगदीश परत फीरला व बोटीत बसून हॉटेलपाशी पोहोचला. त्याला ही जागा फार आवडली होती. तिथे एक भव्य रिसॉर्ट तो बनवणार होता.

रात्रीचं जेवण झाल्यावर जगदीश एक फेरफटका मारावा या विचाराने हॉटेलमधून बाहेर आला. त्याने सिगारेट शिलगावली व सिगारेट ओढतच तो येरझाऱ्या मारू लागला. रिवा त्याच्या तीन सहकाऱ्यांसह हॉटेलच्या मागच्या बाजूला झाडीत लपून बसला होता. राजेशही त्याच्या बरोबर होता. खरंतर रिवा राजेशला बरोबर न्ह्यायला आधी तयार नव्हता पण राजेश हट्टाला पेटला तेव्हा रिवाचा नाईलाज झाला. समोर येरझाऱ्या घालणाऱ्या जगदिशला पाहताच रिवा त्याच्या साथीदारांना काहीतरी बोलला. जगदीश एकटाच होता व जवळपास कोणीच दिसत नव्हतं. त्यामुळे रिवासाठी ही चांगली संधी होती. थोड्या वेळाने जगदीशने अर्धी जळालेली सिगारेट पायाखाली चिरडली व तो हॉटेलच्या दिशेने चालू लागला. इतक्यात रिवा हलक्या पावलांनी अतिशय चपळाईने त्याच्या मागे गेला व त्याने जगदीशच्या मानेत एक तार खुपसली. एका क्षणात जगदीश बेशुद्ध झाला. रिवाने त्याच्या सहकार्यांना हाताच्या खुणेने बोलावले. सर्वांनी जगदीशला उचलले व होडीत टाकले. होडी पलीकडच्या किनाऱ्याला लागली. सर्वांनी मिळून जगदीशला उचलले व ते त्याला त्यांच्या प्रमुखाच्या झोपडीत घेऊन आले.

जगदीश जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला एका झाडाला बांधलं होतं. त्याच्यासमोर अनेक सावळ्या रंगाची, बुटकी, तोकड्या कपड्यातील माणसं उभी होती. त्यांच्यातील एक वयस्कर व थोड्या स्थूल बांध्याचा माणूस पुढे आला व म्हणाला, “तुम्हाला आम्ही का बांधलंय हे माहितिये का तुम्हाला?” जगदीश संतापला होता. तो म्हणाला, “तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? तुमची लायकी तरी आहे का माझ्याशी बोलायची.” अजूनही जगदीशचा माज उतरला नव्हता. “आमच्या दिसण्यावरून आणि कपड्यांवरून जाऊ नकोस. हे जंगल हा निसर्ग आम्हाला मातेसमान आहे. या जंगलातल्या एका जरी झाडाला तू हात जरी लावलास तर तुझी चामडी उचकटून टाकीन.” प्रमुख आता चांगलाच तापला होता. “अरे झाड काय आता अक्ख जंगलच संपवणार आहे मी. आता इथे माझं रिसॉर्ट उभं राहिलं.” जगदीश कुत्सितपणे म्हणाला. अजूनही त्याला आपण किती खोलात फसलोय याची जाणीव झाली नव्हती. आता मात्र प्रमुखाचा संयम सुटला. त्याने आदेश देताच दोन जण पुढे आले व त्यांनी दोरी सोडली व जगदीशला पकडला. जगदीश स्वतः ला त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी पूर्ण जोर लावत होता पण त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. ते दोघे दिसायला जरी छोटे असले तरी त्यांच्यात प्रचंड ताकद होती. त्यांनी जगदीशला प्रमुखासमोर उभा केला. जगदीश प्रमुखाकडे रागाने पाहत होता. प्रमुखाने त्यादोघांना त्यांच्या भाषेत काहीतरी सांगितलं. ते दोघे जगदीशला घेऊन प्रमुखाच्या मागे चालू लागले. त्यांच्या मागे अक्खी जमातच चालत होती. राजेशही त्यांच्यामागून चालत होता. पुढे काय होणार हे जाणून घ्यायची त्याला उत्सुकता होती.
थोड्यावेळाने ते एका झाडासमोर थांबले. समोरचं दृश्य पाहून जगदीशचा सगळा माज उतरला. त्याचं पूर्ण शरीर भीतीने थरथर कापू लागलं. समोर एक मोठं झाड होतं. त्या झाडाखाली वाघ बसला होता. वाघाला पाहताच जगदीशची भीतीने गाळण उडाली. तो आता गयावया करू लागला. “सोडा, मला जाऊद्या” असं ओरडू लागला. वाघ समोर येताच त्याचं मांजर झालं होतं. वाघ शांतपणे झोपला होता. प्रमुखाने हातातल्या काठीने वाघाला हळूच टोचलं. तसा वाघ जागा झाला व गुरगुरु लागला. प्रमुखाने एक वेगळाच आवाज काढला व वाघ गुरुगुरायचा थांबला. वाघ समोर उभ्या असलेल्या जगदीशकडे रोखून पाहत होता. आता तर भीतीने जगदीशच्या तोंडून शब्दच निघत नव्हते. प्रमुखाने पुन्हा एक विचित्र आवाज केला. आता वाघ जागचा उठला व जगदीशच्या दिशेने जाऊ लागला. त्याची भेदक नजर अजूनही जगदीशवरच स्थिरावली होती. त्या दोघांनी आता जगदीशचे हात सोडले. जगदीशचं हृदय वाऱ्याच्या वेगाने धडधडत होतं. तो वाघ आता जगदीशच्या पायापाशी गेला व जगदीशला चाटु लागला. जगदीश आता फक्त वेडा व्हायचा बाकी होता. “बघितलस किती प्रेमळ जनावर आहे ते, पण तुला त्याचं खरं रूप पाहायचं असेल तर सांग. माझं सगळं ऐकतो तो.” प्रमुख म्हणाला. जगदीशच्या तोंडून शब्दच निघेनात, त्याने फक्त मान हलवली. प्रमुखाने परत एक वेगळा आवाज काढताच वाघ मागे फिरला व परत झाडाखाली जाऊन बसला. “आता पळ इथून.” प्रमुख जगदीशला म्हणाला. एक क्षणाचाही विलंब न करता जगदीश किनाऱ्याच्या दिशेने पळाला. त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. तो कसाबसा किनाऱ्यापर्यंत पोहोचला व तिथेच कोसळला.
प्रमुख किनाऱ्यावर आला. जगदीशच्या डोक्यावर हात ठेवून त्याने जगदीशला शुद्धीवर आणलं. त्याच्याकडे पाहण्याचंही जगदीशला धाडस होत नव्हतं. प्रमुखाने जगदीशच्या डोळ्यांसमोर हात धरला व तो त्याची बोटं एका विशिष्ट पद्धतीने हलवू लागला. जगदीशच्या मनात आवाज घुमू लागला- “आज तुला मिळालेला धडा पुरेसा आहे अशी मी अपेक्षा करतो. परत इथे दिसलास तर काय करीन हे सांगायची गरज नाही. आज जे काही घडलं ते तू विसरशील आणि परत जंगलाचा विचारसुद्धा करणार नाहीस.” प्रमुखामागून आलेल्या चार जणांनी जगदीशला उचललं व होडीत टाकलं. होडी हॉटेलसमोर येऊन थांबली. मध्यरात्र झाली होती त्यामुळे किनारा सुनसान दिसत होता. चौघांनी जगदीशला उचललं व हॉटेलसमोर टाकलं व ते होडीने पुन्हा पलीकडे पोहोचले.

X X X X X X

राजेशने जे काही पाहिलं होतं ते खरच अद्भुत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याने पुन्हा भविष्याचा विषय रिवासमोर काढला. पण रिवा त्याला म्हणाला, “मी कुणाचंही भविष्य पाहू शकतो पण कोणाला त्याचं भविष्य सांगत नाही. जे भविष्यात घडणार आहे त्याचा विचार करण्यापेक्षा आजचा क्षण आनंदाने जगावा असं मी मानतो. त्यामुळे एखाद्याचं भविष्य सांगून त्याला चिंतेत टाकणं किंवा खुश करणं, दोनीही मला योग्य वाटत नाही.” काहीकेल्या रिवा आपलं भविष्य सांगत नाही हे पाहून राजेश थोडा नाराज झाला. तेव्हा रिवा त्याला म्हणाला, “मी काही झालं तरी तुला तुझं भविष्य सांगणार नाही. पण जर तुलाच तुझं भविष्य पाहता आलं तर?” “म्हणजे?” राजेशने काही न समजून विचारलं. “म्हणजे असं की आमच्या ग्रंथात एक विधी सांगितलाय, तो जर केला तर माणसाला स्वतःचं भविष्य दिसतं. भविष्य म्हणजे पूर्ण भविष्य नाही तर भविष्यात घडणाऱ्या काही घटना त्याला आधीच दिसतात. तुझी इच्छा असेल तर मी तुझ्यासाठी तो विधी करेन. पण त्यासाठी तुला पौर्णिमेपर्यंत इथे थांबावं लागेल.” रिवा राजेशला म्हणाला. “चालेल. माझी तयारी आहे थांबायची.” राजेश खुश होऊन म्हणाला.

चारच दिवसांनी पौर्णिमा होती. त्यामुळे राजेशला अजून चार दिवस तिथेच थांबावं लागणार होतं. त्या रात्री राजेश झोपला असताना लोकांच्या ओरडण्याच्या आवाजाने त्याला जाग आली. रिवालाही जाग आली. एक माणूस झोपडीत आला व त्याने रिवाला काहीतरी सांगितलं. राजेशने रिवाला विचारलं तेव्हा तो सांगू लागला, “चिदुचा आठ वर्षांचा मुलगा अचानक तापाने मेला. त्याचा अंत्यविधी करणार आहेत. त्यासाठी मला बोलावलंय.” राजेशने झोपडीच्या बाहेर पाहिलं. बाहेर तिरडीवर एका लहान मुलाचं प्रेत ठेवलं होतं. चार जणांनी तिरडी खांद्यावर घेतली होती व त्यांच्यासमोर माणसं चक्क आनंदाने नाचत होती. एवढंच नाही तर त्या मुलाचा बापदेखील नाचत होता. “हा काय विचित्र प्रकार आहे?” राजेशने रिवाला विचारलं. रिवा म्हणाला, “मरण हा शेवट नसून एक नवी सुरुवात आहे असं आम्ही मानतो. त्यामुळे कोणाच्याही मरणाचं दुःख न मानता उलट आम्ही ते एखाद्या सणाप्रमाणे साजरं करतो.” हे मात्र राजेशला फारच विचित्र वाटत होतं. आता रिवाही बाहेर जाऊन त्या लोकांबरोबर नाचू लागला. त्याने राजेशलाही बोलावलं पण राजेशची इच्छा होईना त्यामुळे राजेश झोपडीतच थांबला.

दिवस पटापटा पळत होते. पाहतापाहता पौर्णिमेची रात्र आली. वर आकाशात चंद्र झाडाच्या फांदीतून लटकणाऱ्या एखाद्या टपोऱ्या फळासारखा दिसत होता. विधीची वेळ झाली होती. रिवा आणि राजेश झोपडीतून बाहेर आले. राजेश रिवाच्या मागून चालत होता. बराच वेळ चालल्यावर ते एका मोठ्या झाडापाशी आले. रिवाने एका वाडग्यात पाणी घेतलं व त्या झाडाची दोन लाल रंगाची पानं खुडली. ती पानं त्याने वाडग्यातल्या पाण्यात कुस्करली. ते वाडगं हातात घेऊन रिवा व राजेश पुढे चालू लागले. बराच वेळ चालल्यावर जंगल संपलं व ते एका छोट्या टेकडीवर पोहोचले. रिवाने ते वाडगं राजेशच्या हातात दिलं व राजेशला ते चंद्राच्या दिशेने धरायला सांगितलं जेणेकरून चंद्राचा प्रकाश त्या वाडग्यातल्या पाण्यावर पडला पाहिजे. आता रिवाने मन्त्र म्हणायला सुरुवात केली व ते मन्त्र राजेशला म्हणायला सांगितले. रिवा एक ओळ म्हणत होता व त्याच्यानंतर तीच ओळ पुन्हा राजेश म्हणत होता. थोड्याच वेळात सगळे मन्त्र म्हणून झाले. रिवाने ते पाणी राजेशला प्यायला सांगितलं. तो राजेशला म्हणाला, “या पाण्याची चव चांगली नाही. कदाचित तुला उलटी करावीशी वाटेल पण हे पाणी पूर्णपणे तुझ्या पोटात गेल्याशिवाय हा विधी पूर्ण होणार नाही.” त्या पाण्याला अतिशय कुबट वास येत होता. राजेशने नाक दाबून एका घोटात सगळं पाणी घशाखाली उतरवलं. विधी पूर्ण झाला होता. दोघेही परत झोपडीत येऊन झोपले. सकाळी उठताच रिवा राजेशला म्हणाला, “आता तुला परत जायला हवं. तू कुठल्या गावावरून आला होतास?” राजेशला काहीच आठवत नव्हतं. खूप विचार करून देखील त्याला आठवेना. शेवटी तो म्हणाला, “मला काहीच आठवत नाही.” “काळजी करू नकोस. या जागेचीच ती जादू आहे. तुला इथून दूर गेल्यावर आपोआप सर्व आठवेल.” रिवा राजेशला म्हणाला. “खरंतर इथून पाय निघत नाही पण मला जायलाच हवं.” राजेश म्हणाला. “हो मला माहितीये. गरू तुझ्याबरोबर येईल. इथून पुण्यात जाण्यासाठी रात्री एक बस निघते. गरू तुला पुण्याच्या बसमध्ये बसवेल. मग तिथून तुला पाहिजे तिथे तू जा.” रिवा राजेशला म्हणाला. “पण बसच्या तिकिटासाठी पैसे लागतील. माझ्याकडे तर एक रुपयादेखील नाही. हे अंगावरचे कपडे पण गरूने दिलेत.” राजेशने मनातील शंका बोलून दाखवली. “पैशांची काळजी तू करू नकोस. ते गरू बघेल.” रिवा म्हणाला.

राजेशने रिवाचा व जमातीतील इतर लोकांचा निरोप घेतला व तो तिथून निघाला. तो आणि गरू होडीत बसले. रिवा किनाऱ्यावरच उभा होता. पंधरा दिवसात राजेश आणि रिवाची चांगली मैत्री जमली होती. त्यामुळे निघताना राजेशला फार उदास वाटत होतं. होडी पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचली. राजेश आणि गरू होडीतून उतरले. “मला माहितीये, तू खूप चांगला मुलगा आहेस. पण इथे तू खूप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या आहेस. त्या जर बाहेर पसरल्या तर ते जमातीसाठी चांगलं होणार नाही. त्यामुळे मला तुझ्या मनातून इथल्या आठवणी पुसाव्या लागतील. काळजी करू नकोस, तुला काही सुद्धा त्रास होणार नाही. फक्त माझ्या बोटांकडे पाहा.” असे म्हणून गरू राजेशच्या डोळ्यांसमोर एका विशिष्ट पद्धतीने बोटं फिरवू लागला. थोड्याच वेळात राजेशच्या मनात गरूचा आवाज घुमू लागला – “थोड्याच वेळात तू पुण्याच्या बसमध्ये बसशील. पुण्यात बसस्टँडला पोहोचल्यावर तिथेच झोपशील. सकाळी उठल्यावर तुझ्या मनातील मागच्या पंधरा दिवसातल्या आठवणी नाहीश्या झालेल्या असतील व त्यापूर्वीच्या सर्व आठवणी परत येतील. तू अलिबागला आला होतास हेही तू विसरशील. आता माझ्याबरोबर चल.” आवाज बंद झाला. राजेश गरुच्या मागे चालू लागला. थोड्याच वेळात ते बसस्टँडपाशी पोहोचले. रात्रीचे सात वाजले होते. गरुने राजेशच्या खिशात पैश्याचा नोटा ठेवल्या. पुण्याची बस येताच राजेशने गरुचा निरोप घेतला व तो बसमध्ये बसला.

मध्यरात्री राजेश स्वारगेटला पोहोचला. त्याच्या मनातले बाकीचे विचार पूर्ण थांबले होते. गरुचा आवाज पुन्हा राजेशच्या मनात घुमला – पुण्यात बसस्टँडला पोहोचल्यावर तिथेच झोपशील. राजेश एका बाकावर पहुडला. काही क्षणातच त्याला गाढ झोप लागली. सकाळी जेव्हा राजेशला जाग आली तेव्हा अलिबाग, जंगल, रिवा, गरू यातलं काहीसुद्धा त्याला आठवत नव्हतं. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता – आपण इथे का झोपलो होतो?

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED