Maitrin.. - 3 books and stories free download online pdf in Marathi

मैत्रीण भाग 3

मैत्रीण भाग 3

पाऊस आजही सुरू होता. रिमझिम बरसणारा पाऊस हा सर्वांनाच हवा हवासा वाटणारा असतो. आणि मीही त्याला अपवाद नाही. त्यामुळे ' अरे... छत्री घेऊन जा..' असे घरातून मतोश्रींचे सांगणे आले तरी त्याकडे दुर्लक्ष करून मी तसाच सरीवर सरी अंगावर घेत कॉलेज ला निघालो. कालच्या प्रश्नांनी डोक्याचा पार भुगा झाला होता. त्यामुळे लेक्चर करण्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून थेट लायब्ररीत जाऊन वाचत बसलो.

वाचनात गुंग असतानाच मागून पाठीवर जोराचा धपाटा पडला. तो नित्या होता. माझं लक्ष त्याच्याकडे गेलं मी त्याला काही बोलणार इतक्यात त्यानेच बोलायला सुरुवात केली,
"Hi Buddy कसा आहेस आणि कुठे होतास, लेक्चर का नाही आलास. फोन केला तर लागत नाही. काही परेशानी आहे का ? मला सांग.., हर परेशानी की दवा हमारे पास है।"

नित्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.
मी म्हंटल, "अरे काही नाही. पावसा मुळे मोबाईल स्वीच ऑफ केलाय, आता उघडतो आणि परेशानी वैगेरे काही नाही. मी मस्त आहे."

" हो का.. बर ते जाऊदे आज तू असायला हवं होतं क्लास मध्ये. अरे ट्रिप ची अनॉन्समेन्ट झालीये." नित्या विषय बदलत म्हणाला.

मी पुस्तक बंद केलं आणि म्हणालो, " कुठं जाणार आहे ट्रिप."

नित्या उठून उभा राहिला आपले दोन्हीं बाहु विस्तारत बाहुबलीच्या आवेगात दमदार आरोळी ठोकली,
"महाबळेश्वरssssss.... "

माझ्यासह सगळी लायब्ररी ताडकन उठून उभी राहिली. नित्याचा तो आवाज आणि तो आवेग पाहून आपण ट्रीपला चाललोय की लढायला हेच मला समजत नव्हतं. त्याला शांत करत मी म्हणालो,
" नित्या खाली बस आपण महाबळेश्वर ला चाललोय माहेशमतील नाही आणि एवढ्या मोठ्याने काय ओरडतोस हेच हळू आवाजात सांगू शकतोस."

नित्याने स्वतःच्या दोन्ही मुठ्या आवळत आणि गळ्याच्या शिरा ताणत मला उत्तर दिलं,
" अरे आपण महाबळेश्वर ला चाललोय महाबळेश्वर ला... जरा आदर बाळग... आदर... ! निम्मा महाराष्ट्र महाबळेश्वर ला जन्माला आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा."

नित्याच्या युक्तिवादावर मला हसू आलं. मी विषय पुढे नेला,
"नित्या... स्नेहा येणार आहे का? "

"हो येणार आहे. तिला म्हंटल तुला दुसरा ऑप्शनच नाही, यावेच लागेल." नित्या.

" बर झालं.. आणि तुझे कामगार वर्ग ?"

"ते तर तयारच असतात, जिथे मी तिथे त्या..."
आम्ही दोघेही मोठ्याने हसलो.

मीही ट्रीपला जायचं पक्क केलं.स्नेहा ही येणार होती. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला त्या दरम्यान शोधायची होती . दोन दिवसांची आमची ही ट्रिप असणार होती . यामध्ये आम्ही पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर , मंकी पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, वेण्णा लेक, एलिफंट पॉईंट, विल्सन पॉईंट आणि जवळचाच प्रतापगड ही पाहणार होतो.

बरसणारा पाऊस, हवी हवीशी वाटणारी थंडी आणि खायला मधुर स्ट्रॉबेरी या मुळे आम्ही सर्वच ट्रिप साठी एक्साईट होतो.
ट्रीपला दिवस उजाडला. स्नेहा नेहमी पेक्षा सुंदर दिसत होती. नित्या आपल्या चित्र विचित्र स्टाईल चा अविष्कार करून आला होता. त्याचे पाच कामगार वर्गही खुप सुंदर दिसत होते. सरांनी सर्वांना सूचना दिल्या आणि आम्ही महाबळेश्वर च्या दिशेने प्रस्थान ठेवले.
महाबळेश्वरला उतरल्या नंतर त्याला 'मिनी काश्मीर' का म्हणतात याचे प्रत्यंतर आले. गुलाबी थंडी , हळुवार बरसणारा पाऊस आणि आजुबाजुला प्रेमाला आलेलं उधाण... हेच चित्र फार बोलकं होतं. मीही महाबळेश्वर च्या प्रेमात पडलो.

आम्ही एक एक पॉईंट पाहत चाललो होतो. नित्या त्याच्या कामगारांन बरोबर व्यस्त होता. मी आणि स्नेहा त्यांच्याच मागोमाग चाललो होतो. आमचा सगळा ग्रुप मंकी पॉईंट पाशी येऊन थांबला.
मंकी पॉईंट मधील त्या तीन गांधीजींच्या माकडांची आठवण करून देणाऱ्या दगडाकडे पाहून मी स्नेहाला म्हणालो,
" स्नेहा, ते पहा... किती मस्त दिसताहेत ना गांधीजींची तीन माकड ?"

" हो... पण मला ती गांधीजींची तीन माकड वाटत नाही..." स्नेहा म्हणाली.

मी तिला प्रश्नार्थक नजरेने विचारलं, " का.... मग तुला काय वाटत आहे ? "

स्नेहाने उत्तर दिलं, " मला ते आपण वाटत आहोत. तु मी आणि नित्या...
पहा ना किती घनिष्ठ मैत्री आहे त्यांची. ऊन, वारा , पाऊस काहीही असो.. ते तिघे वर्षानुवर्षे तसेच त्याच भावनेने एकमेकांबरोबर बसलेले आहेत. कितीही आघात होवोत तरीही ते अतूट आहेत. आपलीही मैत्री तशीच हवी.... अतूट...! कधीही न तुटणारी..

समीर... तुला माहीत आहे का? निसर्ग हाच मैत्रीचा सर्वात मोठा निर्माता आहे. जमीन आणि आकाश कधीही एकमेकांना भेटत नाही पण ते एकमेकांशिवाय राहुही शकत नाही. ही सर्वात मोठी मैत्री आहे. जर निसर्ग मैत्रीची इतकी उधळण करत असेल तर आपण माणसे आहोत, आपण का नाही करू शकत इतकी निखळ, निरपेक्ष आणि निरंतर टिकणारी मैत्री.…!!"

ती बोलत होती आणि मी तीच बोलणं माझ्या मनात साठवत होतो. मी माणसांत मैत्री शोधत होतो आणि ती निर्जीव घटकांकडून मैत्री शिकत होती . ती माझ्या कैक पटीने पुढे होती. मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्नेहाने नकळत दिली होती. मीही माझ्या मनातील सर्व प्रश्न बाजूला सारून निखळ मैत्री करायचं ठरवलं होतं. ' एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते' हे मला खोट करून दाखवायचं होतं. म्हणून मीही मैत्रीत एक पाऊल पुढं टाकायचं ठरवलं.
स्नेहा त्या तीन दगडांकडे एकटक पाहत होती. मी तिचा हात हातात घेत म्हंटल, " स्नेहा... आपली ही मैत्री अशीच असेल. त्या तीन दगडांसारखी निखळ, निरपेक्ष आणि निरंतर टिकणारी."
तिनेही माझ्या हातावर हात ठेवत मला दुजोरा दिला. नित्याही जवळ येत मीही तुमच्या बरोबर कायम असेल असं म्हणत आमचे हात हातात घेतले.
आम्ही तिघे त्या तीन दगडांकडे एकटक पाहत राहिलो. आणि मनोमन एक एक दगड स्वतःचा करून बसलो.

महाबळेश्वरच्या त्या ट्रिप मुळे आमच्यात उत्साह वाढला होता. मित्र म्हणून आम्ही तिघेही आता एकमेकांचे झालो होतो.
एकदा असेच नित्या आणि मी कॅन्टीग मध्ये बसलो होतो. समोरून एक मुलगी जाताना दिसली. मुलगी तशी सुंदरच होती. पण तिला पाहताच नित्या मात्र हरवून गेला. त्याला मी म्हंटल, " नित्या.... काय होतंय..? "

नित्या म्हणाला, " अरे तु ती मुलगी पाहिली नाही का ? काय मस्त दिसत होती राव... आणि kind your information अशा सुंदर मुलींशी ओळख करून घेणे हे मी माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे त्या बाजारात दुसरा विक्रेता बसण्या अगोदर आपल्याला आपलं पाल आधी टाकावं लागेल तिथे... कळलं..!! "
नित्याच्या त्या उदाहरणामुळे मला कोरेगाव चा गुरुवारचा आठवडे बाजार आठवला. कुठून कुठून अशी उदाहरणे शोधतो कोण जाणे. मी त्याला म्हंटल,
" बरोबर आहे... आपली त्या मुलीशी ओळख ही असायलाच हवी. तु लढ मी आहे तुझ्या पाठीशी. "

" सम्या... पाठीशी वैगेरे काही नाही, या वेळी तू मैदानात असणार आहेस. जा त्या मुलीचा मोबाइल नंबर घेऊन ये.."

" काय... मोबाईल नंबर डायरेक्ट... आधी ओळख कर मग मोबाईल नंबर घे... आणि तसही मी नाही जाणार तु तुझं बघ बाबा.."

" एवढं ही नाही करणार का मित्रा साठी ? हीच का आपली दोस्ती ? " नित्या मला इमोशनल ब्लॅकमेल करू लागला. मी त्याला कोपराच्या ढोपरापासून हात जोडून नमस्कार करत म्हंटल,

" देवा... आपल्याला हे जमणार नाही . आता हे काम तुम्हीच करावं.."
तेवढ्यात तेथे स्नेहा आली. आमचा गोंधळ पाहून म्हणाली, " गाईज शांत बसा, काय करताय....?"

नित्या सांगू लागला, " आपल्या कॉलेज मध्ये एक सुंदर मुलगी मी पहिली. याला म्हंटल तिचा मोबाइल नंबर घेऊन ये तर हा जात नाही.... पळकुटा... डरपोक साला..😤

स्नेहा शांत पणे म्हणाली, " नित्या हे काम समीरला नाही जमणार... हे तुलाच करावं लागेल.

स्नेहाने माझी खेचली अस मला वाटत पण त्याकडे दुर्लक्ष करत मी नित्याला म्हणालो, " हो.. हो .. हे काम तूच कर नित्या, मला नाही जमणार.."

नित्या म्हणाला, " अस म्हणताय... तर चला मग... आता ती लायब्ररीत असेल तिकडे शोधू तिला... Follow me..."

आम्ही लायब्ररीत गेलो. ती तिथेच होती. कुठल्याशा पुस्तकाची पाने चाळत ती एकटीच बसली होती. मी आणि स्नेहा थोडं बाजूला उभे राहिलो. आणि नित्याला पुढं पाठवलं. नित्याच्या चेहऱ्यावर मला प्रथमच भीती दिसत होती.
ती बसली होती त्या टेबला पाशी नित्या गेला. त्याच्या शरीराचा वरचा भाग स्थिर होता पण त्याचे पाय लटपट कपात असतानाचे आम्ही पाहिले. नित्याचा तो एकंदर अवतार पाहून ती मुलगी त्याला नंबर देईल का..? या बाबत मी जरा शासंक होतो.

नित्या आपलं सर्व बळ एकवटून तिला म्हणाला, "हाय.... मी नितीन.."

ती म्हणाली, " हाय... मी नलिनी.. काही काम होत का..?"

नित्या- " नाही काम नाही..."

ती- " मग....?"

नित्या- " मग.... मग काय नाय... असंच..."😁

ती- " असंच बोलायला तु आलाय का...?"

नित्या- " हो.... आपण मित्र होऊ शकतो का ?"

मी स्नेहा ला म्हणालो ' खातय मार आता..' पण माझ्या म्हणण्याच्या एकदम उलट घडलं. तिने नित्याच प्रपोझल चक्क स्वीकारलं होत. त्यावर नित्या तिला म्हणाला,
" मग तुझा मोबाईल नंबर दे मला.."😎

नित्याने थेट मुद्यालाच हात घातल्याने इकडे मी हातभर उडालो. त्याही मुलीने नित्याला तिचा मोबाईल नंबर दिला. माझ्या साठी हे सर्वच अनाकलनीय होत.😮 पहिल्याच भेटीत नित्याने तिचा मोबाईल नंबर मिळवला होता. नित्या तिला बाय करून तेथून निघून आला. त्याचा तोरा वाढला होता. आम्ही तिघेही बाहेर आलो. अत्यंत उत्सुकतेने मी त्याला म्हणालो, " काय झालं.."😀

त्यावर मोठ्या तोऱ्यात तो म्हणाला, " मोहीम फत्ते... मोबाईल नंबर मिळाला.." 🤗

नित्या अस म्हणताच आम्ही तिघे ही जोरजोरात नाचू लागलो. 💃🕺🕺
स्नेहा थांबा... थांबा... म्हणत म्हणाली, " पण मोबाईल नंबर कुठाय..."

नित्या म्हणाला, " हे काय हातावर लिहून आणलाय.."

स्नेहा म्हणाली, " दे मला आपण लगेच कॉल करून पाहू.." 📱🔊

नित्याने तिला नंबर दिला. स्नेहाने कॉल केला पण कॉल लागला नाही. तिने पुन्हा नित्याकडून नंबर घेतला. पण फोन लागत नव्हता.😢 म्हणून तिने नंबर चेक करून पाहिला आणि जोरजोरात हसू लागली..🤣🤣 स्नेहाला नक्की काय झालं हे आम्हाला काही कळेना..मी तिला म्हंटल, " स्नेहा काय झालं... तु हसतेस का..?"

माझ्याकडं मोबाईल देत ती म्हणाली,
" नितीनरावांनी, एवढ्या कष्टाने त्या मुलीच्या अकरा आकडी मोबाईल नंबर आणलाय.." 😂🤣

मी नंबर चेक केला आणि मलाही हसू आवरेना. पण नित्या मात्र दुःखी झाला. मी त्याला धीर देत म्हणालो, " जाऊदे नितीन.... होत असे कधी कधी.."

त्यानंरत नित्याने त्या नंबर मधील एक कोणताही आकडा कमी करून बराच वेळ फोन करून पाहिला. पण तो कधी बंगाल्याला, कधी मद्राशाला, तर कधी मारवाड्याला लागत होता. आणि नित्या तासंतास त्या मुलीची चौकशी करत त्या माणसांशी बोलत होता. संपूर्ण दिवस नित्याने त्यातच घालवला पण त्या मुलीचा फोन काही लागला नाही.

अशा गमती जमती करत आमची मैत्री फुलत चालली हाती. दिवस मागून दिवस निघून जात होते आणि आम्ही त्या प्रत्येक दिवसाचा आनंद घेऊन जगत होतो.
परंतु हे चांगले दिवस जास्त काळ टिकले नाहीत. स्नेहाच कॉलेज ला येणं अचानक बंद झालं. नक्की झालाय काय हेच समजत नव्हतं.स्नेहा कुठल्यातरी संकटात तर नसेल ना..? या प्रश्नाने डोकं भांबावून सोडलं होत. मन कुठेच लागत नव्हता... शेवटी शेवटी ते स्नेहा पाशीच येऊन थांबत होत... मंकी पॉईंट वरच्या त्या तीन दगडांमधला एक दगड अचानक मला दिसेनासा झाला होता......

क्रमश..

--------------------------------- सत्यशामबंधु


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED