Maitrin.. - 5 - last part books and stories free download online pdf in Marathi

मैत्रीण भाग 5 - अंतिम भाग

मैत्रीण.....

शेवटाकडे...

आज स्नेहा कॉलेज ला येणार या विचाराने मी आनंदी झालो होतो. सकाळ पासून कॉलेज ला जाण्यासाठी माझी लगबग सुरू झाली होती. ती लगबग पाहून आमच्या मातोश्रींनी आम्हाला हटकलच,

" काय रे... एवढी काय घाई...? कॉलेजलाच जायचे ना...?"

" हो ग आई.... आणखीन कुठे जाणार आहे..?" मी कपाळावर आठ्या आणत विचारलं.

" मग घाई कशाला करतोस..?" आईचे प्रश्न संपत नव्हते. तिची बॉलिंग सुरू होती आणि मी कसाबसा खेळत होतो. तिच्या तावडीतून कसातरी सुटलो आणि मी कॉलेज घाटलं. नित्या माझ्या आधीच कॉलेज ला आला होता. आम्ही दोघेही स्नेहाची वाट पाहत होतो. स्नेहा येईल की नाही याची धाकधूक लागली होती. आम्ही कॅन्टीग मध्ये बसलो होतो. तेवढ्यात तिथे स्नेहा आली. तिला पाहताच मी उठून उभा राहिलो. नित्याही उभा राहिला. मी स्नेहकडे पाहत होतो . ती मात्र शांत होती. कोणीच काही बोलत नव्हतं. शांततेचा भंग करत नित्या म्हणाला, "अरे... बसा ना खाली.."

स्नेहाकडे पाहतच मी खाली बसलो. मला थोडा राग पण आला होता. मी बोलायला सुरुवात केली, " स्नेहा अशी कशी तू न सांगता सुट्टी घेतलीस..?"

स्नेहा अजूनही शांत होती. तिची शांतता माझ्या डोक्यात जात होती.

"तुला सांगायचं असेल तर सांग नाहीतर जातो मी.." मी रागात बोललो आणि तिथून जाऊ लागलो.
चहाच्या भरलेल्या कपाकडे पाहत स्नेहा म्हणाली, " सगळ्या गोष्टी सांगता येत नसतात, समीर.."

मी तिच्या समोर जात तिला मोठ्याने म्हंटल, "पण का...? असा काय डोंगर कोसळला आहे..? की तू आम्हाला पण नाही सांगू शकत..? "

स्नेहा उठून उभी राहत मला म्हणाली, " एवढं काहीही झालेलं नाहीये. मला कसलाही त्रास नाहीये. त्या मुळे तुम्ही टेंशन घेऊ नका.. आता मी ठीक आहे."

" आता ठीक आहे म्हणेज..? तुला काही झालं होतं का..?" मी जरा काळजीयुक्त स्वरात म्हणालो.

"नाही रे....तुम्ही सारख सारख त्याच विषयावर बोलू नका.. आता मी आलीये ना... मग बास.." स्नेहा जरा उंच आवाजात बोलली. मीही विषय जास्त तानायला नको म्हणून तिला जास्त विचारलं नाही. चहा संपवून आम्ही क्लास मध्ये गेलो. स्नेहा माझ्यापासून काही तरी लपवत आहे हे मला पक्क माहीत होतं. पण ते जाणून कस घ्यायचं हेच समजत नव्हतं.
क्लास मध्ये राऊत मॅडम स्नेहापासी जाऊन तिची चौकशी करू लागल्या. मला त्यात काही विशेष वाटलं नाही. पण नित्या मात्र डोकं चालवू लागला.

" सम्या, ती पहा राऊत बाई.." नित्या एक भुवई उडवत बोलला.

"राऊत बाई काय मॅडम म्हण.." मी त्याला तिथेही सभ्यतेचा ढोस दिला. तो मात्र त्याचा ह्याका सोडत नव्हता.
तो माझ्यावर रागवत मला म्हणाला, "सम्या... मेन विषय काय आहे.??? स्नेहा आपल्या पासून काहीतरी लपवत आहे. आणि माझी तल्लख बुद्धी मला हे सगतीये की, स्नेहाच कॉलेजला न येन आणि त्याच कारण हे या राऊत बाईला माहीत असणार."

"तुला अस का वाटतं.." मी नित्याला म्हणालो.

"अरे पहा ना किती आपुलकीने त्या स्नेहाची चौकशी करत आहे...त्यावरून मला असं वाटत की त्यांना नक्की माहीत असणार.." नित्या म्हणाला.

नित्याच्या बोलण्यात मलाही तथ्य जाणवू लागल. राऊत मॅडम अशा कधी कुणाशी बोलत नाही. त्यामुळे आम्ही राऊत मॅडम ना भेटायचं ठरवलं.

कॉलेज सुटल्यावर आम्ही थेट स्टाप रूम मध्ये गेलो. सुदैवाने तिथे राऊत मॅडम एकट्याच होत्या.

परवानगी घेऊन आम्ही आता गेलो. राऊत मॅडमना स्नेहा बद्दल विचारलं पण त्यांनी काहीही सांगितलं नाही. उलट आमच्यावर रागवत आम्हाला जायला सांगितलं.

तिथून आम्ही बाहेर आलो. काय करावं काही सुचत नव्हतं. स्नेहा एकदम नॉर्मल वागत होती. तीच तेच वागणं मला अनाकलनीय वाटत होतं. तिच्याच विचारात घरी आलो. दुसऱ्या दिवशी पण मी तिला त्याबद्दल विचारल तिनं मला तसच टोलवलं. पण मी आता चंग बांधला होता. स्नेहा च्या आयुष्यात असा काय प्रॉब्लेम झाला होता की तीनं कॉलेजला येणं एकदम बंद केलं होतं. नित्याला तस मी सांगितलं. आणि त्यावर नित्याने एक प्लॅन आखला.

"सम्या, कूच तो गडबड है.... ही स्नेहलता आपल्याला काही ताकास तूर लागून देत नाही. त्यामुळं आता आपण डायरेक्ट तिला विचारायचं नाही."
नित्या एकदम शिवाजी साटम स्टाईल मध्ये बोलला.

"मग कस विचारायचं." मी प्रश्न केला.

"माझ्या मैत्रिणी कधी कामाला येणार आहे. आपण पुनम ला विचारायला सांगू . ती स्नेहाला नक्की अस काय कारण होत ते विचारेल आणि आपल्याला सांगेन. स्नेहा तिला नक्की सांगेन."
नित्या बोलला.

"पण स्नेहा आपली इतकी चांगली मैत्रीण असून आपल्याला सांगितलं नाही आणि त्या पूनमला का म्हणून सांगेन..?" मी शंका उपस्थित केली.

"तुझं म्हणणं बरोबर आहे. पण ट्राय मारायला काय हरकत आहे." नित्या बोलला.

मी नित्याला संमती दिली. नित्याने पुनमला नीट समजावून सांगितलं. स्नेहा लायब्ररीत होती. पूनम ला घेऊन आम्ही तिथे गेलो. पुनमला पुढे करून आम्ही स्नेहाला दिसणार नाही अशा ठिकाणी उभे राहिलो.

पूनम स्नेहा पाशी गेली आणि बोलू लागली.
"हाय स्नेहा, कशी आहेस.."

"हाय.... मी मस्त आहे... तु..?" स्नेहा बोलली.

खुर्चीवर बसत पुनम पुढे म्हणाली, "स्नेहा, तू मागे अचानक कॉलेजला येणं का ग बंद केलं होतं..?"

"काही नाही ग नेहमीचंच.. पण तू का विचारतेस..?" स्नेहाने तिला प्रश्न केला.

"अग ते नितीन म्हणाले की विचार... म्हणून विचारलं.." पुनमने एका वाक्यात आमचं पितळ उघडं पडलं होतं. इकडे डोक्याला हात मारून घेत नित्या म्हणाला, " आयला ह्या पुनीच्या, ईचा बाजारच करायला पाहिजे. "

मी घाबरत त्याला म्हणलो, "कसला बाजार....?"

"चाकणाचा बैल बाजार. निव्वळ बैल ये डोक्यात.आपलं नाव घ्यायचं काय कारण होतं." नित्या पुनमच्या नावाने बोट मोडू लागला. तिकडे स्नेहा पुनमला म्हणाली, " हो का... कुठं आहेत तुमचे नितीन..?"

"बाहेर आहेत....."पुनम अस म्हणताच स्नेहाचा मोर्चा आमच्याकडे वळला.

स्नेहा काही म्हणणार इतक्यात तिला थांबवत नित्या बोलू लागला," स्नेहा थांब.... तू काहीही बोलण्या अगोदर मला या पुनमशी बोलु दे.."
स्नेहाने नित्याला हातानेच संमती दिली. नित्या पुनम कडे पाहत मोठ्या आदबीने बोलला, " बाळ पुनम तू जा बरे इथून आणि नीलम ला माझ्या नोट्स घेऊन पाठवून दे हं....."

"ती निली आली नाही..आणि पुढचे किमान तीन दिवस तरी येणार नाही" वाकड तोंड करत पुनम बोलली.

"का....??" डोळ्याची बुबुळ बाहेर काढत नित्या बोलला.

"मी नाय सांगणार...मला बाई लाज वाटते..." पुनम भलतीच लाडात आली होती.

"पुने... तू काय डोक्यावर पडली होतीस का....? ती नाही आली तर तू का लाजतेस... नक्की सांग नीलम का नाही आली..." नित्या भडाभडा बोलू लागला.

"बग बाई स्नेहा आता तूच सांग...मुलींच्या सगळ्या गोष्टी कशा सांगायच्या यांना...." स्नेहाला मध्ये ओढत पुनम बोलली आणि भलतीच लाजून पळून गेली.

"आयला हे येड आहे का.....? " लाजून पळत जाणाऱ्या पुनमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत नित्या बोलला.

स्नेहा अजूनही शांत होती. ती माझ्या जवळ येत मला म्हणाली, "पाहीलत समीर, नित्याची आणि तिची इतकी जुनी मैत्री तरीही तिने नीलम बद्दल नित्याला सांगितलं नाही. काही गोष्टी असतातच अशा, की ज्या सांगता येत नाही. "
इतकंच बोलून स्नेहा निघून गेली.

मी कुठे तरी चुकतोय अस मला वाटू लागलं. स्नेहाला एखादी गोष्ट सांगायची नसेल तर तो तिचा अधिकार नाही का..? तिची काही प्रायव्हसी असू शकत नाही का..? ती आपली मैत्रीण आहे म्हणून तिने आपल्याला सर्व सांगायलाच हवं हा अट्टहास कशासाठी...? मी माझी मैत्री तिच्यावर लादत तर नव्हतो ना...? मला असंख्य प्रश्न पडू लागले. पण त्याची उत्तर कुठंच मिळत नव्हती. म्हणून मी फक्त वाट पाहायचं ठरवलं होतं. स्नेहाला जेव्हा वाटेल तेव्हा ती सांगेन. या कारणाने मैत्री तुटायला नको म्हणून तो विषय मी सोडून दिला. स्नेहा कॉलेज मध्ये रेग्युलर येत होती माझ्यासाठी तोच आनंदाचा विषय होता.

दहा बारा दिवस असेच निघून गेले. एक रटाळवान आयुष्य आम्ही जगत होतो. पहिल्या सारखा खट्याळपणा आता कमी झाला होता. क्लास मध्ये असतानाच नित्याला आणि मला राऊत मॅडमने बोलवले आहे असा निरोप आला. राऊत मॅडमने कशाला बोलवलं असेल याचाच विचार करत आम्ही स्टाफ रूम मध्ये गेलो. नेहमी प्रमाणे राऊत मॅडम एकट्याच वाचत बसल्या होत्या. आम्हाला आलेलं पाहून त्यांनी पुस्तक बंद केलं , डोळ्यावरचा चष्मा काढून बाजूला ठेवला आणि आम्हाला बसायला सांगितलं.आम्ही बसलो आणि त्या बोलू लागल्या...,

"समीर आणि नितीन हुशार आहात तुम्ही..." राऊत मॅडमना मधेच तोडत नित्या बोलला , "मॅडम चुकताय तुम्ही...हुशार फक्त समीर आहे आम्ही काठावरचे मासे.." अस म्हणत नित्या मोठ्याने हसू लागला.

नित्याच्या जोकवर मॅडम किंचित हसल्या. आणि पुढे बोलू लागल्या," बर ठीक आहे...पण माझं तुमच्याकडे वेगळेच काम आहे.."

"काय काम आहे सांगा आम्ही करतो.." मी मॅडमना आश्वस्त केलं.

"मला तुमच्याशी स्नेहा बद्दल बोलायचं आहे." राऊत मॅडम ने अचानक स्नेहाचा विषय काढल्यावर आम्ही दचकलोच.
मॅडम पुढे बोलू लागल्या.

"स्नेहा मध्यंतरी कॉलेज ला येत नव्हती. ते माझ्याच सांगण्यावरून. तुमच्या वर्गातली नीलम सुद्धा सुट्टीवर होती तीही माझ्याच सांगण्यावरून. "

मॅडमना नक्की काय सांगायचंय हेच आम्हाला समजत नव्हतं म्हणून मी म्हणालो," मॅडम तुम्ही नक्की काय सांगायचा प्रयत्न करताय हेच आम्हला समजत नाहीये... स्पष्टपणे सांगितलं तर बरं होईल. म्हणजे स्नेहाची काळजी वैगेरे करण्यासारखं काही आहे का...? "

"फक्त स्नेहाचीच नाही, हा प्रश्न कॉलेज च्या सर्व मुलींचा आहे. मुलीच्या आयुष्यात अशा घटना येतच असतात. म्हणजे त्या याव्यात लागतात.त्या शिवाय स्त्री च्या जन्माला पूर्णत्व नाही. ती गोष्ट चांगलीच पण त्यामुळे अनेक मुलीना लवकर शिक्षण बंद करावं लागतं. काहींना परीक्षेला मुकाव लागतं. काहींना अस गैरहजर राहावं लागतं. "
मॅडम सांगत होत्या.

"तुम्ही कुठल्या घटनांबद्दल बोलता आहात, मॅडम.." मी मॅडमना थांबवत प्रश्न केला.

त्या नंतर राऊत मॅडम जे बोलल्या ते आमच्या साठी फारच नवीन होतं. त्या विषयाचा कसलाही गंध आम्हाला नव्हता. मॅडमचं बोलणं ऐकून आम्ही सुन्न झालो होतो. मुलींच्या बाबतीतील इतका पर्सनल आणि खाजगीतला विषय मॅडम आमच्या समोर का बोलल्या असतील हाच प्रश्न आता मला सतावू लागला होता. नित्याची मती गुंग झाली होती. त्याला त्याच्या कामगार वर्गाची अचानक काळजी वाटू लागली होती.

मुली किती ग्रेट असतात, त्यांना किती सोसावं लागतं आणि असं असलं तरी त्या किती आनंदी असतात. आणि मी त्यांच्याशी कस वागत होतो, देवा मला माफ कर.... अस काही न काही तो बोलत होता. हातास होऊन आम्ही कट्ट्यावर येऊन बसलो. आम्ही दोघे बराच वेळ शांत होतो. ती शांतता तोडत नित्या बोलला,

"सम्या, राऊत मॅडमने आपल्याला हे सगळं का सांगितलं असेल रे...?"

"काय माहिती... मला पण काही सुचत नाही.." मी एकदम हताश सुरात म्हणालो.

"जाऊदे चल घरी उद्या विचार करू..." नित्या.

मी नुसतं हम्म केलं आणि आम्ही घरी आलो.

मी घरी आलो पण माझ्या मनातून राऊत मॅडम चे बोल काही जात नव्हते. त्यांनी जे सांगितलं ते खरच चांगलं होत. पण तरी याची लपवा छपवी का ? याची अनेक उत्तर माझ्या पाशी होती. परंतु याची लपवा छपवी का करायची नाही..? याची मात्र माझ्याकडे उत्तर नव्हती. माझ्यात तरी कुठं धाडस होतं या विषयावर स्नेहाशी बोलायचं. तस या विषयाच मला जास्त ज्ञान पण नव्हतं त्यामुळे आता या विषयाकडे ज्या दृष्टीने पाहिलं जातं ती दृष्टी वाईट असा निष्कर्ष मी कसा काढणार होतो. त्यामुळे आधी हा विषय समजावून घेऊ आणि मग बोलू अस मी ठरवलं.

कदाचित मुलींना त्या दिवसात कॉलेजला येता यावं म्हणून आम्ही राऊत मॅडमना उपाय सुचवावा असा त्यांचा हेतू असावा म्हणून राऊत मॅडम या विषयावर आमच्याशी बोलल्या असाव्यात असा मी कयास बांधला. राऊत मॅडम चा नक्की काय हेतू होता मला माहित नाही परंतु माझ्या मैत्रिणीला त्या दिवसातही कॉलेजला यायला मिळायला हवं आणि म्हणून मी त्यावर मार्ग सुचवायचं ठरवलं होतं.

दुसऱ्या दिवशी मी लवकर कॉलेजला गेलो. नित्यालाही बोलावून घेतलं होतं. आम्ही या विषयावरील लायब्ररीतील पुस्तक वाचून काढली. गूगल वर सर्च केलं. खूप माहिती मिळाली. या गोष्टीकडे लोकांचा पाहण्याचा सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोन समजून घेतला. कुठे समाज फार पुढारलेला वाटला तर कुठे फारच बुरसटलेला.

गूगल वर सर्च करत असताना प्रवीण निकम यांचा लेख वाचनात आला. त्यांना महाराष्ट्राचा 'पिरियड मॅन' म्हणून ओळखलं जातं. त्यांचं या विषयावर खूप मोठं काम आहे हेही लक्षात आलं. हा माणूस जर इतक्या मोठ्या प्रमाणात हे कार्य करत असेल तर आपण आपल्या कॉलेज लेव्हल ला तरी या प्रश्नावर उत्तर शोधायला हवं. असा विचार आमच्या मनात आला.

तात्काळ आम्ही राऊत मॅडम ना भेटलो. राऊत मॅडम नेहमी प्रमाणे वाचतच बसल्या होत्या. त्यांना पाहून नित्या हळूच माझ्या कानात म्हणाला, "सम्या ही बाई शिकवायला जाते का शिकायला येते..नुसतीच वाचत असते..."

"नित्या गप बस...इथं विषय काय आणि तू बोलतो काय..." मी नित्यावर डाफरलो.

आम्हाला आलेलं पाहून राऊत मॅडमनीं आम्हाला बसायला सांगितलं. त्या बोलू लागल्या, "मग समीर, काय काम आहे का..?"

"हो...म्हणजे तुम्ही मागे आमच्याशी ज्या विषयावर बोलला होतात त्या संदर्भात बोलायचं होतं.." मी म्हणालो.

"अरे वा..मला खात्री होती... तुम्ही नक्की याल...मग काही मार्ग सुचला का...?" राऊत मॅडम हसून म्हणाल्या.

"हो म्हणजे एक मार्ग आहे..सॅनिटरी नॅपकिन कॉलेजनेच उपलब्ध करून दिले तर. म्हणेज मी बरच सर्च केलं. अशा पद्धतीची सुविधा अनेक शाळा, कॉलेज मध्ये आहे. त्यासाठी अनेक सामाजिक संघटना आणि काही शासन संस्थाही मदत करतात." मी म्हणालो.

"अरे वा...बरीच माहिती काढली आहे की तुम्ही...आणि मला ही हाच मार्ग योग्य वाटत आहे. मी सर्व स्टाफ च्या आणि प्रिन्सिपल सरांच्या कानावर ही गोष्ट घालते." राऊत मॅडम बोलत असताना मागून आमचं बोलणं ऐकणारे कामठे सर एकदम मोठ्याने म्हणाले, " राऊत मॅडम,तुम्ही जे ठरवता आहात ते मी इथे होऊन देणार नाही.."
कामठे सरांचं अस वागणं आमच्या साठी अनाकलनीय होतं.

"कामठे नक्की तुम्हाला काय म्हणायचे..?" राऊत मॅडम कामठे सरांना विरोध करत म्हणाल्या.

" हे विद्धेच मंदिर आहे इथे या अशा अपवित्र गोष्टी खपवून घेणार नाही.." कामठे सरांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवली होती. मला त्यांचा प्रचंड राग आला. राऊत मॅडम काही बोलणार इतक्यात मीच बोललो, "कामठे सर कुठल्या काळात जगत आहात आपण... ज्या गोष्टी मुळे तुमचा माझा जन्म झाला ती गोष्ट अपवित्र असूच कशी शकते..? ज्या गोष्टीत नवनिमिर्तीची ताकद आहे ती गोष्ट अपवित्र कशी असू शकते.?"

"आता तू मला शिकव काय पवित्र आणि काय अपवित्र... शिकायचं वय आहे तुमचं तेवढंच करा.. या असल्या गोष्टीत लक्ष घालू नका..?" कामठे सर बोलले..

"तेच तर करतोय सर..हे आता नाही शिकणार तर कधी शिकणार...म्हणेज एकीकडे आसामच्या कामाख्या देवीचा महिन्याचा उत्सव घालायचा आणि दुसरीकडे प्रत्येक महिलेच्या महिन्याला विटाळ मानायचा.. ही कुठली संस्कृती , हा कुठला धर्म....??? सतीची पद्धत बंद झालीच ना... सामाजिक भेद नष्ट झालाच ना... मग या गोष्टी विषयी असलेल्या अंधश्रद्धा का नाही नष्ट होणार... होणार.... आम्ही त्या अंधश्रद्धा नष्ट करणार.... तुमची साथ असू किंवा नसू.. " मी पोटतिडकीने बोललो.

माझ्या बोलण्याचा काय असर झाला माहीत नाही. काही दिवसाने कॉलेज मध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन बसवण्यात आलं. त्याचा मुलींना किती फायदा झाला मला माहिती नाही . माझ्या साठी प्रश्न फक्त स्नेहाचा होता. स्नेहाला याचा फायदा झाला की नाही हे मला जाऊन घ्यायचं होत पण माझी तशी कधी हिम्मतच झाली नाही. सगळ्या जगाला जे मी ओरडून सांगितलं होतं ते स्नेहाशी मी बोलू शकत नव्हतो.

दिवसामागून दिवस जात होते. बघता बघता दोन महिने होऊन गेले. मी नित्या स्नेहा कॉलेजला येत होतो, अभ्यास करत होतो, गमती जमती होत होत्या. सगळं नॉर्मल आणि पहिल्या सारख सुरू होतं. पण तरीही माझ्या मनात तोच विचार सारखा घोळत असे... स्नेहाला काही फायदा झाला असेल की नाही...?

त्या दिवशी पावसाची संततधार सुरू होती.मी तो पाऊस अंगावर घेत कॉलेज ला आलो. थोडा भिजलेलो असल्याने क्लास मध्ये न जाता लायब्ररीत जाऊन बसलो. काहीतरी वाचायचं म्हणून असच एक पुस्तक घेतलं आणि वाचू लागलो. वाचनाची तंद्री लागली होती. तेवढ्यात तिथे काही मुली आल्या. त्यातली एक मुलगी दुसरीला म्हणाली, "अग ऐक ना, दोन महिने झाले मी एक पण सुट्टी घेतली नाही..."

त्यावर दुसरी म्हणाली, " आणि तसही आता सुट्टीची काय गरज आहे." त्या दोघीही मनमुराद हसल्या. त्यांच्या बोलण्यातला तो विनोद मलाही समजल्याने मी ही किंचित हसलो. आणि अचानक......मला स्नेहाची आठवण झाली..

मी स्नेहाला शोधू लागलो . नित्याला फोन करून विचारलं तर ते दोघे कँन्टींग मध्ये असल्याचं समजलं. मी माझा मोर्चा कॅन्टीग कडे वळवला. धावत पळतच मी तिथे गेलो. स्नेहा तिथे एकटीच बसली होती. बाहेर पावसाची संततधार सुरू होती. कॅन्टीग मध्ये नेहमीप्रमाणे किशोर कुमारांचं 'एक लडकी भिगी भागी सी..' हे सदाबहार गाणं हलक्या आवाजात सुरू होत .मी धावत पळत आलेलो पाहून स्नेहा मला म्हणाली, "समीर काय झालं असं का पळत आलास..?"

मी धापा टाकत आणि चेहऱ्यावर स्माईल आणत स्नेहाला म्हणालो, " स्नेहा तू सुट्टी नाही घेतलीस....."

स्नेहाच्या ही चेहऱ्यावर स्माईल आलं, ती म्हणाली, " नाही घेतली सुट्टी, माझ्या मित्रा मुळ......"

मला त्या वेळी भरून आलं. डोळ्यात अचानक आसवांची जत्रा भरली. माझ्या मैत्रिणीसाठी मी काही तरी करू शकलो याचा मला प्रचंड आनंद झाला.
मी स्नेहा जवळ जात तिचा हात हातात घेतला आणि माझ्या डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून दिली. तिचेही डोळे पाणीदार झाले होते. आम्हाला पाहून नित्या म्हणाला, "मला पण घ्या ना तुमच्यात..."

आम्ही हसून नित्याकडे पाहिले.तो आम्हाला येऊन बिलगला.
एकीकडे पावसाला, एकीकडे किशोर कुमारांना आणि एकीकडे आमच्या मैत्रीला उधाण आलं होतं......

समाप्त..!!!

#सत्यशामबंधु


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED