Maitrin.. - 4 books and stories free download online pdf in Marathi

मैत्रीण भाग 4

मैत्रीण...भाग 4

स्नेहाचं कॉलेज ला येणं अचानक बंद झाल्यामुळे माझ्या मनात भीतीनं काहूर माजवलं होतं. नित्याही कधी नव्हे तो स्वतःचा उत्साह हरवून बसला होता. कॉलेजला येणं मला नकोस झालं होतं. सारखा मनात स्नेहाचा विचार येत होता. तिला अनेक कॉल करून पाहिले परंतु एकाही कॉल ला उत्तर मिळत नव्हतं.
मनाशी पक्क ठरवून आम्ही स्नेहाच्या घरी जायचं ठरवलं. रविवारी निवांत वेळ असतो म्हणून आम्ही रविवारची निवड केली.
रविवारी सकाळी लवकर जायचं आम्ही ठरवलं. ठरल्या प्रमाणे आम्ही निघालो. नित्या त्याची गाडी घेऊन आला होता. आम्ही निघालो आणि नित्याने प्रश्न विचारला,

" आयला, सम्या अस कस डायरेक्ट तिच्या घरी जायचं. आपण कोण... काय काम आहे... काय सांगणार आहोत आपण..? "

नित्याला पडलेला प्रश्न मलाही पडला होता. मी त्याला म्हणालो, " हो रे, आपण चाललो आहोत खरे पण जाणार कसे. आपल्याला तिच्या घरचे ओळखत पण नाहीत. "

" फिकीर नॉट बडी... ते बग.." नित्या एकदम मोठ्याने ओरडला.

बाजुलाच एक तरुण कसलं तरी प्रोडक्ट विकत होता. नित्याने त्याला हाक मारली.
आणि त्याला म्हणाला,

" काय भाऊ कसे दिले पेन."

" 5 रुपयाला एक, तीन घेतले तर दोन फ्री.." त्याने त्याची ऑफर सांगितली.

नित्या पेन कशाला घेतोय हा प्रश्न मला पडला होता. मी त्याला विचारणार इतक्यात तो त्या तरुणाला म्हणाला,
" भाऊ आपल्याला 100 पेन घ्यायचे आहेत. कसे देणार..?"

नित्याने त्याच्याकडून 100 पेन घेऊन त्याला खुश केलं पण माझा खिसा हलका केला. सेल्समन म्हणून आम्ही स्नेहाच्या घरी जाणार होतो हे एव्हाना मला समजलं होत. काहीही करून मला स्नेहाच्या घरी जायचं होतं म्हणून मी नित्याच्या प्लॅन मध्ये सामील झालो. पण मी जरा साशंकच होतो.

थोड्याच वेळात आम्ही स्नेहाच्या घरा जवळ पोहचलो. थोडीशी तयारी करून आम्ही तिच्या घराजवळ गेलो आणि नित्याने घराची बेल वाजवली. एका काकांनी दरवाजा उघडला. आणि जरा खेकसतंच विचारलं,
" कोण पाहिजे..?"

नित्याने हसून बोलायला सुरुवात केली. "आम्ही सेल्समन आहोत, पेन विकायला आलो आहे."

"नकोय आम्हाला पेन..व्हा पुढं" अस म्हणत काका दरवाजा बंद करू लागले.

नित्या ऐकायला तयार नव्हता. दरवाजा पकडत तो काकांना म्हणाला, " अहो काका, पेन घेऊन तर पहा. निराश नाही होणार तुम्ही. अहो या पेन मुळे तुमच्या घरात नवचैतन्य येईल, आनंद येईल, समृद्धी येईल... तुम्ही प्रसिद्धी च्या शिखरावर पोहोचाल. "

नित्या पेन विकत होता का एखाद्या बाबा चा तावीज हेच मला समजत नव्हतं. याही गोंधळात माझं लक्ष घरात होत. नजर सारखी स्नेहाला शोधत होती. नित्याचा आणि काकांचा सवाल जवाब वाढत होता . त्यांचा गोंधळ ऐकून आतून एक आवाज आला,

" कोण आलाय बाहेर..?"

आवाज स्नेहाचाच होता. आवाज ऐकताच मला जरा हायसं वाटलं.
आतून आलेल्या आवाजाला उत्तर देत काका म्हणाले,
" कोणी नाही ग स्नेहा... सेल्समन आलेत, पेन नकोय तरी बळेबळे विकताहेत. "

स्नेहा बाहेर आली आम्हाला पाहताच जरा चाचपली.
मला तिच्याशी बोलायचं होत पण काका असल्यामुळे बोलता येत नव्हतं. मी नित्याला तसा इशारा केला. नित्या भारी हुशार, त्याला लगेच तहान लागली आणि तो काकांना म्हणाला,

" ऊन फारच वाढलंय हो ना काका..?"

" हो... आता माझ्याकडे सुदर्शनचक्र ही नाही, नाही तर झाकला असता सूर्याला.." काकांनी जरा अजबच उत्तर दिलं.

नित्या त्यावर कढी करत म्हणाला, " जाऊद्या हो काका नसत एखाद्याकडे, त्यात काय एवढं पण पाणी मात्र सर्वांकडे असतं..."

" चेष्टा करतो का माझी, चला निघा इथून..." काका जरा रागावून बोलले.

" नाही हो काका, पाणी मागतोय.... देताय ना..? नित्या सावरून घेत म्हणाला.

"देतो ना..... पाण्याला आमच्या इथे नाही म्हणत नाही?" काकांनी मोठ्या तोऱ्यात म्हंटल.
पाणी आणण्यासाठी काका आत गेले तसा नित्या त्यांच्या माघारी हसत म्हणाला,

"वेडच आहे हे...."

"माझे बाबा आहेत ते...." स्नेहा एक भुवई उडवत नित्याला म्हणाली.

" काय सांगतेस काय.... चांगले आहेत बिचारे... " नित्या चाचरत बोलला.

मी मधेच विषय थांबवत मूळ विषयाला हात घातला,

" स्नेहा मला सांग, तु कॉलेज ला का नाही येत.

काही प्रॉब्लेम आहे का..? आम्हाला सांग आम्ही मदत करतो. "

"नाही रे काही प्रॉब्लेम नाही.. मी उद्या कॉलेजला येणार आहे तेव्हा आपण बोलू. " स्नेहा एकदम शांतपणे उत्तरली आणि तिने हसण्याचा बारीकसा प्रयत्न केला.

का कुणास ठाऊक पण तिची ती शांतता मला भयानक वाटली. उसण अवसान आणून तिने बळेच हसण्याचा प्रयत्न केला होता. सतत पॉसिटीव्ह अप्रोच ठेवणारी हि मुलगी आज मला वाचताच येत नव्हती. आणखीन काही बोलावं तर तिथे तिचे बाबा आले. त्यांच्या कडून आम्ही पाणी घेतलं आणि मार्गस्थ झालो.

उद्या स्नेहा कॉलेजला आल्याशिवाय मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नव्हती. उद्याच्या आधी एक रात्र होती. ती मात्र सरता सरत नव्हती. ती मला आणखीन विचारात टाकत होती आणि स्वतःही विचारमग्न होत होती.

क्रमश.........

सत्यशामबंधू


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED