Paaytan books and stories free download online pdf in Marathi

पायताण

पायताण

"अनुबंध" आमच्या कॉलनीतील लायब्ररी. आमच्या इतकी जुनी....पस्तीस वर्षांपुर्वी आम्ही या सहकार नगरात रहायला आलो पाठोपाठ दामलेकाकांची घरघुती लायब्ररी सुरु झाली. भवतालच्या वाचकवर्गामुळे रुजली, वाढली आणि मग स्थिरावली. दामले काकांना गेल्या वर्षी देवाज्ञा झाली. मुलगा-सुन यांनी एक लायब्रेरीयन नेमली आणि दामलेंच्या राज्यात सहजपणे वावरणारा मी आता बिचकत वावरु लागलो. जाड भिंगाचा चश्मा लावलेली जाडसर लायब्रेरियन, तिचा आवाज तिच्या शरीरयष्टीला साजेसा होता....जाडाभरडा. मनातल्या मनात मी तिला मी "जाडे" म्हणायचो....

पुष्कळ वर्षे झाली असतील. माझ्या म्हणण्यावरुन या लायब्ररीच्या बाहेर दामलेंनी बाहेर एक सुचना फलक लावला होता...."पायताण आणि ताण बाहेर ठेवून आत यावे." आज पायताण काढतांना लक्षात आलं की फलकावरील अक्षरं पुसट होत चालली आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी अक्षरांवर चढलेल्या त्या शाईने तरी किती तग धरायची नाही का?

"दिवाळी अंकाचे पैसे भरले नसतील तर येत्या आठवड्यात भरा. नाही तर अंक मिळणार नाही." लायब्रेरीयन करड्या आवाजात म्हणाली

"उद्या भरतो न." मी अर्थात रणजीत अभ्यंकर म्हणालो

"अमृत मासिक परत आणले का हो?" एका प्रौढ वाचकाने विचारले

"कोणी?" लायब्रेरीयन

"देशमुखांनी....अहो, पंधरा दिवसांपासून मागतेय मी अमृत मासिक.... आम्ही फी वेळेत भरतो." तो वाचक खोचकपणे म्हणाला

"ह्म्म. सांगितलं आहे. बघते." लायब्रेरीयन

"बघते काय? रोज हेच उत्तर देता तुम्ही." प्रौढ वाचक

"’ह्म्म. हा घ्या त्यांचा फोन नंबर. तुम्हीच विचारा." लायब्रेरियन कंप्युटरवरुन नंबर देत म्हणाली

हे ऐकून प्रौढ वाचकाचा चेहरा पडला होता. तुम्ही पुस्तक वाचता की नाही....बोध घेता की नाही....याच्याशी तिचा काही संबध नसतो. ती फक्त माध्यम असते तुमच्यापर्यंत पुस्तक पोहचवण्याचं. सतत पुस्तकांमध्ये रहाणारी ही लायब्रेरियन किती पुस्तकं वाचत असेल माझ्या मनात प्रश्न डोकावला.

"अहो, साधना आमटेंच "समिधा" घेतेय आणि तुमच्यासाठी "इंडिया टुडे" अजून? सौ.अभ्यंकर माझ्याकडे बघत म्हणाल्या

"सुनबाईंना कुठली तरी कादंबरी हवी होती?" मी सौं ना आठवण करुन दिली

"अग्ग बाई! हो ना." म्हणत आमच्या सौ कादंबरीच्या कपाटाकडे वळल्या आणि मी सकाळची सप्तरंग पुरवणी घेऊन जवळच्या खुर्चीत बसलो.

भवताली इतर वाचक बसले होते. त्यांची मंद स्वरात कुजबुज सुरु होती.

"अग! काय बाई त्या चार्ल्स शोभराजचं आत्मवृत्त आहे." सुंदर गोरी वाचक उत्साहाने शेजारच्या निमगोर्‍या वाचकाला म्हणाली

"अय्या! पूर्ण वाचलं का तू?" निमगोर्‍या वाचकाने उत्साहात विचारलं

"छे ग! पूर्ण काय वाचतेय. महत्वाचं ते वाचलं न." तोंडातलं हसू परत तोंडात कोंबत ते सुंदर ध्यान तिला म्हणालं

"महत्वाचं म्हणजे?" निमगोर्‍या वाचकाला तो महत्वाचा अर्थ लक्षात आला नसावा

"काय गं तू? महत्वाचं म्हणजे....त्याची लफडी....अग! कित्ती बायका.....काय काय लिहलय...त्यांच्याबद्दल" त्या सुंदर गोर्‍या वाचकानं कानात कुजाबुजत ते वाक्य संपवलं

"अग्ग बाई! म्हणजे वाचायलाच हवं. परत नको करु. मी तुझ्याकडूनच नेते." हसू आवरत निमगोरी वाचक म्हणाली

"कशाला? मी परवा परत करणार आहे तेव्हा तू घे" सुंदर गोरी वाचक

"अग! कादंबरीचं डिपॉझिट नाही भरलं ना. मासिकं तेवढे वाचते. अग तू जे म्हणतेस तेवढंच वाचून परत करेन." निमगोरी वाचक कुजबुजत म्हणाली

"एवढ्या बायका त्याच्या आयुष्यात आल्या म्हणजे.. .?" सुंदर गोरी वाचक खी खी करत म्हणालं

"क्षणिक सुखापुरत्या ग." निमगोर्‍या वाचकाच्या सुरात मत्सर दाटून आला होता

"ते वाच तू पुस्तकात. अगं! तुला पानगेच्या सुनेबद्दल माहिती न?" सुंदर गोरी वाचक विषयांतर करत म्हणाली

"काय ग?" निमगोरी वाचक

"रोज तिला घरी बॉस सोडायला येतो म्हणे." सुंदर गोरी वाचक

"अग्ग बाई, तिची सासू तर अख्या गावात शहाणपणाचे धडे देत फिरते." निमगोरी वाचक

"हम्म, चला." माझं लक्ष त्या दोघींकडे बघून बॅगमध्ये पुस्तक कोंबत आमच्या सौ. करड्या आवाजात म्हणाल्या

"सुनबाईंची कादंबरी मिळाली ना?" मी सौं च्या रागाची फ्रिक्वेंसी मॅच करायची म्हणून सहज विचारले

"हो." सौ. अभ्यंकर

याचा अर्थ रागाची फ्रिक्वेंसी मिडीयम होती. आधी मंदिर नंतर भाजी घेत घरी जाईपर्यन्त निवळेल हा विचार करत मी सौं कडे कटाक्ष टाकत लायब्ररीच्या बाहेर आलो. स्टॅंडवरुन पायताण काढल्या. आमच्या मागून त्या दोघी आल्यात.

"अय्या! नवीन चपला? कुठून घेतल्या? कितीच्या घेतल्या? मला असल्याच घ्यायच्या होत्या ग. तो वनपीस घेतला ना गेल्या आठवड्यात त्याला मॅचींग पण घ्यायच्या आहे." सुंदर वाचक आपल्या वनपीसचे सांगायच्या निमित्ताने म्हणाली असावी. कारण दुसर्‍या वाचकाच्या चपला सुमार होत्या.

"बाटामध्ये सेल सुरु आहे. यांनी पेमेंट केलं....माहित नाही ग कितीच्या." दुसर्‍या वाचकाच्या डोक्यात चार्ल्स शोभराज घुटमळत असावा. असा मी तिच्या बोलण्यावरुन अंदाज केला. चपला घालता घालता तिने चपलेवर लिहलेली किंमत वाचायचा निष्फळ प्रयत्न केला.

मी त्या अतृप्त निमगोर्‍या वाचकाकडे बघत होतो. चार्ल्स शोभराजचं "ते" ऐकून ती अस्वस्थ झाली होती. आमच्या सो कॉल्ड सुखात असल्याच्या सार्‍या खुणा तिच्या देहावर दिसत होत्या. तिच्या मनातलं मात्र ठाऊक नाही. नेमकं तेच मी तिच्या डोळ्यात शोधायचा प्रयत्न करत होतो. शब्द आणि देहबोली कितीही खोटी असली तरी डोळे...ते कधीच खोटं बोलत नाही. अर्थात हा माझा अनुभव.

"अग! आज शनिवार तुला देवळात जायचं नं." मी सौं कडे बघत म्हणालो

"हो, चला न." सौ. माझ्या दोन पावलं पुढे होत म्हणाली

"इथेच काढ चपला." मी बाकावर बसत म्हणालो

"आलेच." सौं बाकाखाली चपला सरकवत म्हणाली

नेमाने दर शनिवारी मारोती मंदिरात येणार्‍या आमच्या सौं ना मी पाठमोरी बघत होतो. नातवाचं अपंगत्व स्वीकारण्यासाठी तिला मारोतीरायाच्या शक्तीची आवश्यकता भासत होती. आणि मला? मी हे सत्य सहज स्वीकारलं होतं का? नाही. शक्य नव्हतं. नातवाचा अपघात होऊन दोन्ही पाय गेले होते. जेमतेम आठ वर्षाचं पोर ते. साधं भोळं लेकरु ते कोणत्या चुकीची शिक्षा भोगत होतं? त्या दिवसापासून मी देवळात प्रवेश केला नव्हता....करणार ही नव्ह्तो. सौं ची श्रद्धा तिळमात्र ढळली नव्हती. शनिवार ते शनिवार ती शक्तीचा प्रसाद घेऊन अपंग नातवाचं प्रगतीपुस्तक लिहित होती.

सौं च्या अकरा प्रदक्षिणा होईपर्यंत मी त्या बाकावर बसून मंदिरात ये-जा करणार्‍या भाविकांना बघत होतो. हसरे-फसवे, खरे-खोटे चेहरे देवापुढे नतमस्तक होत होते. कन्फेशन.....कळत नकळत सारे कन्फेशन करत होते का? की मागणं मागत होते.....मी त्या बाकावर बसून उगाच भाविक नजरांमध्ये काहीतरी शोधत होतो.....बहुधा मी सोसत असलेल्या वेदना अजून कोणकोण सोसतय..... मी नक्की काय शोधत होतो? मला कळत नसलं तरी एक मात्र खरं की मंदिराच्या पायर्‍या उतरतांना त्या भाविक चेहर्‍यावर ते प्रश्न त्या विवंचना नव्हत्या. तरी माझा मंदिरात न जाण्याचा निश्चय पक्का होता. या शोधात मंदिराबाहेर काढलेल्या पायताणांवर माझी नजर गेली. प्रत्येक पायताणाला घालणार्‍याचा ताण माहित असतो....तेवढा ताण सहन करत ती त्या घालणार्‍याच्या विवंचनेनेसकट त्याचं वजन पेलत असते......ताण असह्य होईपर्यंत.....मग कालांतराने तोच ताण.....नवीन पायताण.....पायताण अडकवल्या की परत तीच भुमिका....तेच प्रश्न.....त्याच विवंचना......मग त्या ईश्वरनामक शक्तीपुढे नतमस्तक झाल्यावर कशातून सुटका होते? खरच सहनसिद्धी दुणावते?

तेवढ्यात सहनसिद्ध होऊन आमच्या सौ. मला पायर्‍या उतरतांना दिसल्या. मी तिच्या पायताण घेऊन तिच्यापर्यंत गेलो.

"तुम्ही पण ना?....मी येतच होते ना....बाकाजवळ. लोक काय म्हणतील?" सौ.अभ्यंकर

"मी सांगेन त्यांना...मी बायकोच्या पायताण सांभाळायला तर देवळात येतो." मी तिथूनच गाभार्‍यात डोकावत म्हणालो

"हसतील ना ते. चला आता. भाजी घ्यायची आहे." बायको पिशवी खांद्यावर घेत म्हणाली

निघतांना मागेवळून बघितलं. मारोतीराया गदा खांद्यावर घेऊन माझ्याकडे रोखून बघत होता........सांगत होता....तुला जन्मत: इतरांपेक्षा अधिक सहनसिद्धी दिली आहे.....ती संपली की ये....मी इथेच उभा आहे.

विनीता श्रीकांत देशपांडेइतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED