मंजिरी आज जरा वैतागलीच होती. बाळ रडत होतं. नवरा, सासू, नणंद कोणाचच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. स्वैंयपाकात कोणी मदत करत नव्हतं. गॅसवर एकीकडे दूधावर जेमतेम साय धरेली होती आणि कुकरची शिट्टी होण्याच्या बेतात होती. तिने विळीवर सपासप भाजी चिरणाऱ्या हाताचा वेग आवरला. गॅस बंद करुन बाळाला छातीशी कवटाळत तिथेच चार बाय चारच्या स्वैंयपांक घरात फतकल मारुन बसली.
"हे काय? अजून डब्बा झाला नाही?" नवर्याने ओला टॉवेल तिथेच दिवाणावर टाकत स्वैंयपाक घरात डोकावत विचारलं
"उशीरा उठलं तर हे असचं होणार ना." सासू टी.वी चा आवाज मोठा करत म्हणाली.
"काय कट कट आहे रोजची...." नवरा
"म्हणजे मला पण बाहेरच खावं लागणार वाटतं......" पस्तीशीतली नणंद वेणीचा शेपटा कुरवाळत म्हणाली
घरातल्यांच खोचक बोलणं सुरु होतं. मंजिरी मात्र ढिम्म होती. तिची कुठलीच प्रतिक्रिया येत नाही बघून तिघांच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला आणि माहेरच्यांचा उद्धार करत सगळे फुत्कारु लागले.
मंजिरीनी बाळाचं पोट भरलेलं बघून तिथेच दुपट्याच्या तुकड्यावर ठेवलं. भराभर उरलेला स्वैंयपाक उरकला. डब्बे भरुन समोरच्या सेंट्रल टेबलवर ठेवले. न बोलताच परत स्वैंयपाकघरात निघून गेली. तिला आता ऐकण्याची सवय झाली होती. आधी मंजिरी आपल्याशीच बडबड करत तिचा रोष व्यक्त करत होती. पण तिच्या बडबडीमुळे या तिघांच बोलण अजून तिरकस होत जाण्याचं लक्षात येताच ती गप्प बसू लागली. सुरवातीला ती बावरायची. तिचं काय चुकतय तिला कळतच नव्हतं. हळुहळु तिला लक्षात येत गेलं.....याला काही इलाज नाही. आधी सासर्यांचा थोडा तरी दरारा होता. त्यांच्या मृत्युपश्चात मात्र तिचे हाल होऊ लागले.
"वहिनी, तुमच्या भावाचा फोन आलाय. पाच मिनटात करणार हाय. या पटकन" शेजारची मैना धावत सांगायला आली
तिच्या चेहर्यावर आंनद स्पष्ट दिसत होता. या मुळे काही क्षण का होईना गॅस बंद केल्यावर कुकरची वाफ हळुहळु खाली बसते, अगदी तसच झालं होतं. डोक्यातला विचारांचा शिजवटा हळुहळु शमत गेला. बाळाला कमरेवर घेत तिनं शेजारचं घर गाठलं.
"दादा, कसा आहेस? आईची तब्येत कशी?" मंजिरीने फोनवर विचारलं
"बरी आहे आता. तुझ्या वाटेकडे डोळे आहे." भाऊ
"पुढच्या महिन्यात येते रे." घरातल्यांची चौकशी करत मंजिरीने फोन ठेवला
" हे घे. दोन घोट चहा आणि दोन बिस्किट खा. लेकरु अंगावर पीतय अजून." शेजारच्या उत्तराकाकू चहाचा कप पुढ करत म्हणाल्या
"हो.घेते ना" बाळाला मैनेचे हाती देत मंजिरी ने चहा घेतला
"जाऊन ये माहेरी." उत्तरा काकू
"कशी जाणार. घरचे धाडणार नाही. हट्टाने गेले तर परत घरात घेणार नाही. तिकडे भावाचंच जेमतेम निभतय. आजारी आई आहे. वहिनी गर्वार आहे. माझा भार कसा टाकू त्यांच्यावर. ते करतील ही माझं सगळं. पण मनाला पटत नाहीया काकू." मंजिरी बिस्किट चहात बुडवत म्हणाली
"नरक आहे पोरी तुझं जीवन. कस सोसतेस ग?" उत्तराकाकू अजून दोन बिस्कित तिच्या पुढ्यात ठेवत म्हणाले
"या बाळासाठी अजून कोणासाठी. त्याच्या साठी माया कशाला आटवू." मंजिरी डोळे टिपत म्हणाली
"हो.बाळाचा काय दोष म्हणा." उत्तराकाकू
"हे लोकं सुधरण्यासारखे नाही काकू. सगळे प्रयत्न करुन झालेत."
"या बाळाकडे बघून सहन करते सगळं. जाऊन जाऊन जाऊ तरी कुठे? जेमतेम शिक्षण त्यात नोकरी नाही." मंजिरी
"एक विचारु? दोन दिवसापासून तुला विचारीन म्हणत होते" उत्तरा
"बोला की. तुमच्याशिवाय या वेटाळात माझं जवळचं कोणी नाही हो. म्हणून तर भावाला तुमचा फोन नंबर देऊन ठेवला. घरच्यांसमोर बोलायची चोरी आहे. आता परत घरी गेल्यावर आहेच ऐकायंच मला यावरुन बोलणं" मंजिरी डोळे टिपत म्हणाली
"मैनेची आई जिथे काम करते. त्यांच्याकडे कोल्हापुरचे पाहुणे आलेत. शेतीवाडी,जमीन-जुमला रग्गड आहेत. खूपवर्षांनी त्यांची पोर गर्वार आहे. तिला नऊ महिन्याची विश्रांती सांगितली आहे. ते एखादी गरजु आणि प्रामाणिक चोवीस तास रहाणारी बाई शोधत आहेत. पण तुला सातारा सोडुन जावं लागेल त्यांच्यासोबत. जमतय का बघं. इथून सुटका होईल. विचारु की नको....या संभ्रमात होते मी." उत्तरा
"केव्हा जायचे ते परत कोल्हापूरला?" मंजिरी
"मैनेच्या आईला विचारते. तू आधी एकदा भेटून ये. असं कर आज दुपारच्याला बाळाला घेऊन दवाखन्याच्या निमिताने बाहेर पड." उत्तरा
"भेटते दुपारी." मंजिरी बाळाला घेत म्हणाली
ठरल्याप्रमाणे मंजिरी मैनेच्या आईसोबत गायकवाडांच्या घरी गेली. मैनेच्या आईच्या दुजोर्यामुळे काम मिळालं. चार दिवसांनी त्यांच्यासोबत गाडीत जायचं ठरलं. वेगळ्याच आनंदात मंजिरीने घर गाठलं. परत कामाला जुंपली. घर...धुणी..भांडी...फरशी....सोबत टोचरी बोलणी. या चार दिवसात शेजारच्या घरी तिने बाळाचे आणि तिचे दोन-चार कपडे आणि पिशवी नेऊन ठेवली.
चार-दिवसांनी तो क्षण आला. तिचं थोडंफार असलेलं सामान सकाळीच मैनेच्या आईने नेलं होतं. कोणाला कसलीच शंका आली नाही. देवाला नमस्कार करुन मुठीत बाळकृष्ण घेऊन बाळाला कमरेवर घेऊन तिनं उंबरठा ओलांडला. अंग शहारलं. ..घर सोडतांना आवरण्यासारखा मोह नव्हताच.... आता एकच जाणीव, पडेल ते कष्ट करुन बाळाला वाढावायचं.......आता पुढे जे सोसायचं ते फक्त बाळासाठी... आपली किम्मत नसलेल्या लोकांसाठी कष्ट करण्यापेक्षा आपल्या बाळासाठी कष्ट करु या. आपल्या बाळावर या लोकांची सावली देखिल नको पडायला. पुन्हा दुसरी मंजिरी नको......... मागे वळून बघण्याचा मोह आवरला. आपल्या बाळाकडे आशेने बघितले आणि ती सहनसिद्धा आयुष्याच्या नव्या वाटेवर निघाली.
विनीता देशपांडे