रोशनी जोसेफला बेडमध्ये एका वेगळ्याच विश्वात घेउन गेली होती. इतक्यावर्ष मनामध्ये, शरीरामध्ये साठुन राहीलेली प्रेम करण्याची भावना, इच्छा ज्वालामुखीसारखी उफाळुन बाहेर पडली होती आणि ह्या प्रेमरसात जोसेफ पुर्णपणे भिजुन गेला होता. आजपर्यंत अनेक तरूणींना त्याने बिछान्यामध्ये ओढले होते, पण रोशनीबरोबरचा हा अनुभव त्याच्यासाठी त्या सर्वांपेक्षा सरस होता
रोशनीचे नविन रुप पाहुन सारेच जण हरखुन गेले. बेढब, जाड-जुड, एकलकोंडी, खडुस चेहर्याच्या रोशनीच्या जागी एक मध्यम बांध्याची, हसतमुख, सर्वांशी मिसळणारी हीच का ती रोशनी असाच प्रश्न सर्वांच्या चेहर्यावर होता. आणि जोसेफ? त्याला तर स्वर्ग दोन बोटं उरला होता. सत्ता, अमाप संपत्तीच्या जोडीने त्याला एक स्वरुप पत्नी मिळाली होती.
“काय गरज आहे मला आता रोशनीला मारण्याची?”, जोसेफच्या मनामध्ये एक विचार तरळुन गेला..”ही सत्ता संपत्ती माझीच आहे आणि नंतरही माझीच होणार आहे. जे रोशनीच्या मृत्युनंतर मला मिळणार होते ते आत्ता सुध्दा माझ्याकडेच आहे. मग अश्या ह्या हॉट झालेल्या आपल्या सोन्याची अंडी देणार्या कोंबडीला का बरं मारायचे?”.. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु होते.. “नैना माझे असं काय वाकडं करु शकणार आहे?.. आणि केलेच काही तर तिला आयुष्यातुन उठवायला असा कितीसा वेळ लागणार आहे!!
…किंवा.. तिने काही करायच्या आधीच जर तिला आपण उडवले तर..???????”
रोशनीला येऊन महीना उलटुन गेला होता. जोसेफ आणि रोशनी ’डिस्कव्हरींग लव्ह इन देअर लाईफ’ प्रमाणे आनंदात बुडुन गेले होते. जोसेफला सुध्दा हळुहळु रोशनी आवडु लागली होती. तिच्यात अचानकपणे झालेला हा बदल इतरांप्रमाणेच जोसेफसाठी सुध्दा सुखःद होता. नैनाला तर जोसेफ विसरुनच गेला होता.
सोशलायझींग, एकत्र बाहेर फिरणे, जेवणं, सिनेमा ह्या सर्वांमध्ये तो पुर्णपणे हरवुन गेला होता
एके दिवशी तो आपल्या केबीनमध्ये काम करत बसला होता तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला. मोबाइलवर नैनाचा नंबर बघुन काही क्षण तो दचकलाच. शेवटी इकडे तिकडे बघुन त्याने फोन घेतला..
“बोल नैना, काय काम आहे. आपले ठरले होते ना मोबाईलवर फोन करायचा नाही..”, जोसेफ
“जोसेफ, आत्ताच्या आत्ता माझ्या घरी ये.. महत्वाचे काम आहे..”, नैना
“नैना मुर्खपणा करु नकोस, मी नाही येउ शकत आत्ता.. काय काम आहे बोल.. नाही तर मी नंतर फोन करतो..”, जोसेफ
“नाही जोसेफ.. अतीशय महत्वाचे काम आहे, आत्ताच्या आत्ता निघुन ये मी वाट बघतेय..”, असे म्हणुन नैनाने फोन ठेवुन दिला.
जोसेफने मनोमन नैनाला शिव्या दिल्या आणि तो नैनाच्या घरी पोहोचला..
नैनाच्या घराचे दार उघडेच होते. जोसेफ आतमध्ये आला तेंव्हा नैना हॉलच्या एका कोपर्यात गुडघे पोटाशी घेउन बसली होती. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता.
“काय झालं नैना, एनी प्रॉब्लेम?”, जोसेफ
जोसेफला बघताच नैना जागेवरुन उठली आणि धावत धावत येऊन जोसेफला बिलगली.
“आय एम सॉरी जोसेफ.. आय एम रिअली सॉरी ..!!”, डोळे पुसत पुसत नैना म्हणाली.
“काय झालय नैना?”, नैनाला सोफ्यावर बसवत जोसेफ म्हणाला..
“एक मोठ्ठा प्रॉब्लेम झालाय जोसेफ..मला खरंच माफ करं..”, नैना..
“काय झालं काय आहे? जरा निट सांगशील का?”, जोसेफ वैतागुन म्हणाला.
“काल रात्री ’फॉर्च्युन कॅसीनो’ मध्ये मी गेले होते. तेथे माझी ओळख जे.के. नामक एका तरूणाशी झाली. त्याने मला ड्रिंक्स ऑफर केली. गप्पांच्या नादात मला कधी जास्त झाली लक्षातच नाही आले. त्याच्याबरोबर तो मला रुम मध्ये घेउन गेला.
ही वॉज सो गुड जोसेफ..मी कधी वाहवत गेले कळलेच नाही. कधीतरी बोलताना नशेमध्ये मी बोलुन बसले की मी आता खुप श्रीमंत होणार आहे आणि तेंव्हा मी त्याला खुप सार्या ड्रींक्स ऑफर करेन. तसेच त्याला आपला प्लॅनपण सांगुन टाकला..
आज सकाळी मला त्याचा फोन आला होता. तो.. तो ब्लॅकमेल करतोय जोसेफ.. तो म्हणाला दोन दिवसांत त्याला २५ करोड रुपये हवे आहेत नाहीतर तो आपला प्लॅन रोशनी आणि पोलिसांना सांगेल…. आय एम सॉरी जोसेफ.. खरंच मला कळलच नाही माझ्या हातुन हे असे कसे झाले..”
जोसेफला काहीच कळेना काय बोलावे. आत्ता कुठे त्याच्या आयुष्याची सुरुवात झाली होती.
“मुर्ख आहेस तु नैना.. बेवडे.. हजार वेळा सांगीतले आहे तुला स्वतःवर ताबा ठेव म्हणुन..”, जोसेफ
नैनाच्या डोळ्यातुन अजुनही पाणी वाहत होते..
“..आणि कुठुन देणार आपण एवढे पैसे..”, डोक्यावर हात ठेवत जोसेफ म्हणाला..
“तु काढु नाही शकणार का.. तुझ्याकडे कंट्रोल आहे ना सध्या..” नैना
“आहे.. पण इतके पैसे नाही काढता येणार.. खास करुन रोशनी इथे असताना. काय सांगु तिला कश्याला हवे आहेत?”, जोसेफ
“प्लिज काही तरी कर जोसेफ.. आपण सगळे नाही तर तुरुंगात जाऊ.. प्लिज काही तरी कर..”
“काय करु? तु असा मुर्खपणा करुन बसलीस..”, जोसेफ
“नाहीच का तुला पैसे काढता येणार जोसेफ”, चिंतीत चेहर्याने नैना म्हणाली..
“..कोण आहे हा जे.के? मी फोन करु का त्याला? काही मुदत नाही का वाढवुन मिळणार?”, जोसेफ
“नाही जोसेफ, तो ऐकण्याच्या मनस्थीतीत नाहीये.. इतका जमुन आलेला आपला प्लॅन असा तुटुन नको जायला जोसेफ.. प्लिज कर काही तरी”, नैना
“तुझा तो ख्रिस कुठे गेला? त्याला सांग ना.. त्याला म्हणाव त्या जे.के ला जरा दम भर आणि नाहीच ऐकले तर पत्ता कट करुन टाक त्याचा..”, जोसेफ
“तो इथे नाहीये ना.. तो बॅंकॉकला गेलाय. कमीत कमी चार दिवस लागतील. जे काही करायचे ते आपल्यालाच करावे लागेल..”, नैना
“ठिक आहे बघतो मी काय करायचे ते. त्या जे.के. ला माझ्या भाषेत समजावुन सांगतो.. ऐकेल तो. सांग मला, कुठे भेटेल तो?”, जोसेफ..
“आज रात्री फॉर्च्युन कॅसीनो.. रुम नं १०३, १०.३० वाजता…”, नैना.
कोण आहे हा जे.के.? सुरळीत चाललेल्या प्लॅनमध्ये मधुनच कुठुन उगवला? काय होणार रात्री १०.३० वाजता फॉर्च्युन कॅसीनो मध्ये? जोसेफच्या मनात काय आहे? आपल्या प्लॅननुसार तो रोशनीचा खुन करणार? का रोशनीच्या प्रेमात पडत चाललेला जोसेफ आपली एकेकाळची प्रेमीका नैनाला मारुन टाकणार? वाचत रहा ’लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह’…………
********
“जे काही करायचे आहे ते १०-१५ मिनीटांमध्ये उरकायला हवे. जास्त वेळ कुठे जाता येणार नाही. रोशनीने विचारले तर काय उत्तर देणार..” फॉर्च्युन कॅसीनोमध्ये जाताना जोसेफ विचार करत होता.
चेहर्यावर तिरपी टोपी ओढुन आणि गळ्याभोवती एक जाडसा मफलर गुंडाळुन जोसेफने आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी काहीही झालं तरी तो रोशनीचा नवरा होता.. त्याची लायकी असो वा नसो, तो रोशनी एन्टरप्रायझेसचा एक हिस्सा होता आणि असे असताना एका चिल्लर कॅसीनोमध्ये त्याचे असणे मिडीयाच्या किंवा इतर कुणाच्या नजरेसमोर येणे धोक्याचे होते. जोसेफने धोका पत्करला होता, पण त्याचा नाईलाज होता.
इतरत्र न घुटमळता जोसेफ सरळ वरच्या मजल्यावरील रुम नं १०३ मध्ये आला. जोसेफच्या दृष्टीने जे.के. म्हणजे कोणीतरी एक पोरगेल असा प्ले-बॉय किंवा अगदीच झालं तर ३०-३२शीतला तरूण असावा जो तरूणींना फसवुन, आपल्या पौरुषत्वाच्या अमलाखाली त्यांचे सिक्रेट्स काढुन घेउन त्यांना ब्लॅकमेल करत असावा. दोन चार झापडा दिल्या आणि जरा दम भरला तर सुतासारखा सरळ होईल ह्या विचाराने जोसेफ खोलीपाशी आला.
खोलीचे दार उघडेच होते. जोसेफ सावध पावलं टाकत आतमध्ये आला. आत संपुर्ण अंधारच होता. खोलीत कुणाचीच चाहुल लागत नव्हती. आपल्याकडे एखादे छोटे पिस्तुल असते किंवा निदान एखादे हत्यार, तर बरं झालं असतं असा एक विचार जोसेफच्या मनामध्ये तरळुन गेला.
त्याने अंधारातच चाचपडत काही वस्तु हाताला लागते आहे का ह्याचा तपास करायला सुरुवात केली. सुदैवाने जवळच त्याला एक लोखंडी रॉड सदृष्य काहीतरी हाताला लागले.
“अगदी काहीच नसण्यापेक्षा हे ठिक!!”, असे म्हणुन जोसेफने ती वस्तु उचलली आणि तो अंधारात पुढे सरकु लागला.
खोलीचे पडदे लावलेले होते. खिडकी बाहेरुन येणार्या चंद्राचा प्रकाशात ते पडदे उजळुन निघाले होते. त्या पार्श्वभुमीवर खोलीत कोणी उभे असलेच तर त्याची काळी आकृती दिसुन आली असती. परंतु गोल नजर फिरवुनसुध्दा त्याला कोणीच दिसेना.
म्हणजे एक तर खोलीत कोणीच नव्हते किंवा जे कोणी होते ते खाली खुर्चीत अथवा सोफ्यावर बसुन जोसेफच्या हालचालीची वाट पहात होते.
“आपण जे.के.च्या बाबतीत ओव्हर-कॉन्फिडंट तर झालो नाही ना?” असा एक दुबळा विचार जोसेफच्या मनात चमकुन गेला. इथे अंधारात घुटमळत फिरण्यात अर्थ नाही, असा विचार करुन तो हळुवार भिंतीकडे सरकला. चाचपडतच त्याने दिव्यांच्या बटनांचा स्विचबोर्ड शोधला आणि बटन दाबले.
लाईटच्या प्रकाशाने खोली उजळुन निघाली आणि समोरचे दृष्य बघुन जोसेफ जागच्या जागी थिजुन गेला.
[क्रमशः]