ती एक शापिता! - 4 Nagesh S Shewalkar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती एक शापिता! - 4

ती एक शापिता!

(४)

सुहासिनीला साहेबांच्या दालनात जाऊन अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. त्यामुळे बाहेर सुबोधचे कामात लक्ष लागत नव्हते. 'साहेबांची स्वाक्षरी घ्यायला इतका वेळ? सही घ्यायला स्वतःच का जायला पाहिजे होते? शिपाई कशासाठी आहे? त्याच्यासोबत पंजिका पाठवता आली असती. सुहासिनी नेहमीच साहेबांकडे का जाते? एकदा तिला समजावून सांगितले पाहिजे. हिच्याकडे बघताना साहेबांची नजर काही वेगळीच असते. गल्लीतल्या टारगटांच्या नजरा ओळखणाऱ्या सुहासिनीला साहेबांची नजर ओळखता येत नाही? साहेबांचा स्वभाव लक्षात आल्यानंतरही हिने वारंवार त्यांच्या दालनात का जावे? ' सुबोध तशा विचारात असताना शिपाई किसनने विचारले,

"का हो साहेब, काय विचार करता?"

"काही नाही रे सहजच. डोकं जड पडलंय." सुबोध हलकेच म्हणाला.

"विचार करीत नाही म्हणता आणि डोकं तर जड पडलंय म्हणता. काही समजत नाही बाबा. साहेब, तुमच्या लग्नाला किती महिने झाले हो?"

"झाला की महिना. का रे?" सुबोध कंटाळवाणे होत विचारले.

"नाही. सहजच. एक विचारू का?" लवकर पिच्छा सोडेल तो किसन कसला.

"विचार की..."

"तुमचं सुहासिनीबाई संगे जमना झालंय का?"

"क..क..का? असे का विचारतो?"

"लग्नाच्या आधी तुम्ही दोघं खुर्चीला खुर्ची लावून दिवस-दिवस पोपटावानी गुलुगुलु गप्पा मारायचे पण या पंधरा मी पाहतो..." बोलणाऱ्या किसनला मध्येच थांबवून सुबोधने विचारले,

"काय पाहतोस?"

"तुम्ही नवरा-बायको असूनही चकार शब्दाने एकमेकांशी बोलत नाहीत."

"तसे काही नाही रे."

"साहेब, लग्न झाल्यावर बाई कशी फुलझाडावाणी डवरून, बहरून आली पाहिजे. तिच्या बोलण्यात, चालण्यात, पाहण्यात कशी एक नशा असली पाहिजेत पण आपल्या बाई तर दिवसेंदिवस कशा सुकत चालल्यात. कायम आळसावलेल्या दिसतात. मध्येच कुठेतरी टक लावून बघत बसतात. आता माझ्या नजरेला जे दिसले ते सांगितले. पुढे तुम्ही आणि बाईसाहेब..." किसन बोलत असताना सुहासिनी हसतच बाहेर पडली. चेहऱ्यावर एकप्रकारची लाली होती. ते पाहताच सुबोधच्या मनात विचार आला,

'आतमध्ये असं काय घडलं असेल की, ज्यामुळे सुहासिनी हसतच बाहेर आली? आतमध्ये जे घडायला नको ते तर घडलं नसेल? मी जे सुहासिनीला देऊ शकत नाही ते..ते.. तर सुहासिनीला साहेबांकडून मिळाले नसेल?...' तितक्यात सुहासिनी नेहमीप्रमाणे त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसली त्यावेळी दोघांची नजरानजर झाली. सुबोधला तिच्या नजरतेले भाव वेगळेच वाटले, एक निराळीच चमक, वेगळेच तेज तिच्या डोळ्यांमध्ये होते. महत्त्वाचे म्हणजे नजरानजर होताच सुबोधकडे पाहताना तिच्या नजरेत अनोळखीपणा त्याला जाणवला.

"सुबोध, चल. चहा घेऊया.." त्याच्याजवळ आलेला निलेश म्हणाला आणि ते दोघे बाहेर पडले. हॉटेलमध्ये पोहोचताच निलेशने विचारले,

"सुबोध, तू खोली बदललीस का?"

"होय."

"पण का?"

"अरे, विशेष काही नाही. ती खोली रस्त्याला लागून होती. गल्लीतले पोट्टे उगीच जाता-येता त्रास देत. रात्री-बेरात्री खोलीसमोर शिट्टी वाजवत. आम्ही एकत्र आलो न आलो की, दाराला धक्का मारायचे आणि मग..."

"मग काय?" सुबोधने विचारले.

"तसा काही प्रकार घडला की, माझ्यातील उत्साह, जोश मावळायचा. मला एक प्रकारचा शिथीलपणा यायचा आणि मी सुहासिनीपासून पटकन दूर होत असे. म्हणून..."

"अच्छा! खोली बदलण्याचा काही फायदा झाला? गैरसमज नको. एक मित्र, एक हितचिंतक म्हणून विचारतोय. लग्नानंतर तुम्ही दोघे कसे एकमेकांपासून दूरावल्याप्रमाणे वाटत आहेत. काय झाले ते सांगशील? काही मार्ग काढता येईल."

"नाही. निलेश, नाही. तुझ्यापासून काही लपविणार नाही. अरे, मला कुणी नातेवाईक नाही की दुसरा कुणी मित्र नाही. जे काही आहे ते तुच आहेस. त्या जुन्या खोलीत त्या टारगटांमुळे आम्हाला एकांत मिळत नव्हता. मी सुहाजवळ जायला उशीर ते काही तरी खोडी काढायचे आणि मला आटोपते घ्यावे लागे. या नवीन घरात भरपूर एकांत आहे. ही खोली आत वाड्यात आहे. सारे स्वतंत्र आहे पण .. पण.." बोलता बोलता सुबोध थांबला.

"काय होते?"

"अरे, आताही मी तिच्याजवळ जायला उशीर, माझ्यातले नैराश्य डोके वर काढते आणि दुसऱ्या क्षणीच मी थंडावतो आणि सुहासारख्या लावण्यवतीला मी खुश करु शकणार नाही, तृप्त करु शकणार नाही. माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे ही भावना बळावते आणि मी तत्क्षणी बाजूला होतो. रात्री कधी जाग आली आणि पुन्हा तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला की, मोक्याच्या वेळी परत तीच भावना बळावते आणि पुन्हा ये रे, माझ्या मागल्या..."

"सुहासिनी..."

"तिचे काय सांगू? तळमळ असते रात्र..रात्र! कधी जागीच असते... शून्यात नजर लावून पडलेली तर कधी झोपेत."

"आणि म्हणून तुम्हा दोघांमधले अंतर वाढतंय तर..."

"होय. तसेच म्हणायला हवे. ती दिसली की, मला अपराधाचीपणाची भावना खायला उठते."

"नाही, सुबोध नाही. तसे व्हायला नको. हे बघ. सारे व्यवस्थित होईल. दोष तुझ्यामध्ये मुळीच नाही. उलट एक गैरसमज..."

"गैरसमज? तो कोणता?" सुबोधने विचारले.

"हाच की, अत्यंत सुंदर असणाऱ्या स्त्रीची शारीरिक भूक, आसक्ती प्रचंड असते. अशा स्त्रियांना सुखी करण्यासाठी तिचा सोबतीही तसाच ताकदवान पाहिजे..."

"हे का खोटे आहे?"

"हे खरे आहे, हे तुला कुणी सांगितले ते आधी सांग."

"मी.. मी .. पुस्तकात तसे वाचलंय."

"कुठे वाचलंय? आले लक्षात. त्या घाण, निकृष्ट पुस्तकात वाचलंय ना? ते सारे खोटे असते रे. काही तरी लिहितात झालं. अरे, माणसाची लैंगिक शक्ती त्याच्या शरीरयष्टीवर अवलंबून नसते..."

"मग.. मग ..कशावर अवलंबून असते?"

"तो समज पूर्ण खोटा आहे. लैंगिक शक्ती शरीरयष्टीवर, गरीब-श्रीमंतीवर अवलंबून नसते. ते जाऊ देत. हा वैद्यकीय म्हणा, मानसशास्त्रीय म्हणा असा विषय आहे. अगोदर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझ्या मनातील न्यूनगंडाची भावना काढून टाक. सुहासिनीला विश्वासात घे. कारण तू जो विचार, गैरसमज मनात घेऊन बसला आहे तसाच गैरसमज सुहासिनीचा होऊ नये. दोघे मिळून शांतपणे विचार करा. एकदा का सुरळीत झाले की, मग तुमच्या आनंदाला पारावर उरणार नाही. परंतु त्यासाठी दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे गरजेचे आहे. जास्त वेळ गमावू नका. चल. आता." असे समजावून निलेश सुबोधला घेऊन निघाला. त्याच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे सुबोधला बरेच हलके वाटत होते...

"कसे वाटते गं सुहा तुला?" त्याच रात्री सुहासिनीला मिठीत घेत सुबोधने विचारले.

"कशाबद्दल?" अंग आकसून घेत सुहासिनीने त्रासिकपणे विचारले.

"अग, आपल्या वैवाहिक जीवनाविषयी विचारतोय. तू सुखी आहेस ना? तुला काही कमी पडत नाही ना?" सुबोधने विचारले.

"तुला माझ्याकडून कसल्या उत्तराची अपेक्षा आहे?" सुहासिनीने उलट प्रश्न केला.

"मला माहिती आहे सुहा, तू सुखी नाहीस. मी तुला हवं ते सुख देऊ शकत नाही. परंतु मी तरी काय करु सुहासिनी? तुझ्याजवळ येताच मी तुला 'ते' सुख देऊ शकत नाही. माझ्यामध्ये काही तरी कमी आहे हा विचार मला कमजोर बनवतो, तुझ्यापासून दूर व्हायला प्रवृत्त करतो. मी तरी काय करू? मला तुझी मनस्थिती समजते..."

"हे असे का होते हा विचार केलास कधी?" सुहासिनीने हलकेच सहानुभूतीने विचारले.

"केला. पण नक्की समजत नाही. कधी वाटते, त्या जुन्या खोलीत त्या टारगटांच्या त्रासामुळे हिरमोड व्हायचा आणि या खोलीतही कुणीतरी लक्ष ठेवतेय, डिस्टर्ब करतंय ही भावना बळावते. कधी.. कधी असे वाटते की, कदाचित त्या दृश्यांमुळे तर माझ्या..."

"दृश्यं? कोणती?" सुहासिनीने असमंजसपणे विचारले.

"मी आत्याकडे राहत होतो तेव्हा आत्या शांत झोपायची पण मला मात्र झोप येत नसे."

"का येत नसे?"

"शेजारच्या खोलीतील आवाजांमुळे..."

"आवाज? कुणाचे?"

"शेजारच्या खोलीत एक जोडपं राहायचं. त्यांचे नवीनच लग्न झाले होते. रात्र होताच त्यांचा उन्मक्त श्रुंगार सुरू झाला की, त्यांच्या आवाजाने मला झोप लागायची नाही आणि.. आणि दोन्ही खोलीमध्ये असलेल्या फटीतून मी ते दृश्य रोजच पाहायचो. त्यावेळी माझ्या भावना अनावर व्हायच्या आणि.. आणि मी.. मी.... कसे सांगू तुला?"

"आला. सारा प्रकार माझ्या लक्षात आला..."

"तो प्रकार सातत्याने चार-पाच वर्षे चालू होता. नंतर त्यांना मुलं झाली. त्यांच्यावर बंधने आली पण मी मात्र रात्र-रात्र तळमळायचो. कॉलेजचे शिक्षण चालू असताना माझ्या तळमणाऱ्या मनाला आणि शरीराला पुस्तकांची साथ मिळाली..."

"पुस्तके? कोणती?"

गादीखाली असलेले पुस्तक काढून सुहासिनीला दाखवत सुबोध म्हणाला, "लग्नाच्याआधी अशी अश्लील पुस्तके खूप वाचली. दोघे मिळून ते पुस्तक वाचू लागले. सुबोधने एक कथा सुहासिनीला मुद्दाम वाचायला लावली. ती कथा वाचताना दोघांनाही भावना आवरता आल्या नाहीत आणि कथेतील नायिकेप्रमाणे सुहासिनीने स्वतःच पुढाकार घेतला... नेहमीपेक्षा यश येतेय हे दोघांच्याही लक्षात येताच सुबोध गलितगात्र झाला. त्या संबंधातही सुहासिनीचे समाधान झाले नाही...

रविवारची सुट्टी होती. सुबोधने घरी आलेले वर्तमानपत्र उचलले. ते वाचत असताना एका जाहिरातीने त्याचे लक्ष वेधले. त्याने ती जाहिरात अनेकदा वाचली. मनोमन एक निर्णय घेतला. पटकन तयार झाला. 'आत्ता आलो' असे सुहासिनीला सांगून तो त्या लॉजवर पोहोचला. इकडेतिकडे पाहत त्याने चौकशी केली आणि तो त्या खोलीत पोहोचला. त्याच्याआधी पोहचलेल्या चार व्यक्ती होत्या. सुबोधने तिथे लावलेली जाहिरात वाचली, 'तुमचे कामजीवन अतृप्त, दुःखी आहे? तुम्हाला स्वतःला तुम्ही असमर्थ आहात असे वाटतंय? तर मग त्वरा करा. आम्हाला भेटा.'

एक तास प्रतिक्षा केल्यानंतर सुबोध डॉक्टरांच्या समोर पोहोचला. तो खुर्चीवर बसताच डॉक्टरांनी विचारले, "बोला. काय झाले?"

"अं...अं..." सुबोध अडखळल्याचे पाहून डॉक्टर म्हणाले,

"हे बघा. घाबरु नका. डॉक्टरांपासून काहीही लपवू नका. तुम्ही जेवढं खरं सांगाल तितकं अधिक चांगलं..."

"मी.. मी.. माझ्या पत्नीला खुश करु शकत नाही. ती तयार होत असतानाच मला माघार घ्यावी लागते आणि ती तळमळत राहते."

"बस. व्हेरी सिंपल. एक सांगा, तुमचे लग्न कधी झालंय?"

"चार महिने झाले..."

"बरे या चार महिन्यात तुम्ही जास्त वेळ म्हणजे साधारण.."

"फार तर मिनिटभर..." सुबोध मान खाली घालत म्हणाला.

"काही वाईट नाही. तेवढा वेळही पुरेसा आहे."

"पण मी तर ऐकलंय की, वीस मिनिटे, अर्धा तास..."

"छे! छे! तसे काही नसते. बरे, लग्नापूर्वी दुसऱ्या एखाद्या स्त्रीकडे... त्यातही धंदेवाली..."

"नाही. कधीच नाही. माझ्या आयुष्यात येणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी पत्नी."

"खूप ! बरे, लग्नापूर्वी कधी स्वप्नदोष..."

"म्हणजे?" सुबोधने विचारले.

"म्हणजे एखादी स्त्री स्वप्नात येणे..."

"हो. कधी कधी."

"बरे तुम्हाला काही सवयी... हस्तमैथून.."

"नाही. परंतु पुस्तके वाचत असे."

"कोणती? आले लक्षात. तुमचा आजार ओळखला. पुस्तकातील वर्णनं, कथा वाचून तुमच्या मनात काही विचार पक्के बसले आहेत, दृढ झाले आहेत. घाबरू नका. शंभर टक्के, खात्रीशीर उपाय आहे. एक महिन्याच्या गोळ्या देतो. ही गोळी दररोज रात्री एक घ्यायची. पुढील महिन्यात या तेव्हा पुष्कळ फरक पडलेला असेल. औषधीपेक्षा मनात बसलेली नकारात्मकता दूर सारा. सारे काही विसरून आत्मविश्वासाने सामोरे जा. पत्नीला सारे काही सांगा. त्यांची साथ असेल तर काही अवघड जाणार नाही. या." डॉक्टरांनी व्यवस्थित समजावून सांगितले. पाचशे रुपये फीस देऊन सुबोध निघाला.

तो घरी पोहोचला तेव्हा सायंकाळ होत आली होती. त्याला पाहताच त्याची वाट पाहून थकलेली सुहासिनी संतापाने कडाडली,"काय हो कुठे होतात? वेळ लागेल असे सांगून जाऊ नये?"

"अगं सांगून..."

"आत्ता येतो म्हणालात ते हेच का आत्ता येणे?"

"अग, काम होते म्हणून वेळ लागला."

"कशाचे काम नि कशाचे काय? तुम्हाला घरी राहावेच वाटत नाही."

"तसे नाही गं. उगाच काही तरी बोलू नकोस."

"वरती मीच उगाच काही तरी बोलते का? मनाला वाटेल तसे वागायचे आणि वर मलाच चूप बसवायचे?" सुहासिनीचा राग अनावर झाला होता.

"आता चूप बसणार आहेस का? माझं डोकं दुखतंय."

"घरी आलं की, डोकं दुखणारच. घरी बोलणं होत नाही, ऑफिसात आणि निलेशशी बोलताना..."

"सुहा... चूप बस हं. नाही तर देईल एक..."

"तेवढंच बाकी राहिलंय. काय म्हणून थोबाडीत देणार? तुम्हाला काय वाटलं? माराची भीती दाखवली की, मी चूप बसेल?"

"मग काय करशील? तू हात उचलशील?" सुबोधनेही रागाने विचारले. लग्नानंतर प्रथमच दोघांचाही आवाज वाढला होता.

"ती तुमची कामं. आमची नसली तरीही तुमचा हात उठू देणार नाही... "असे म्हणत ती तणतणत कामाला लागली आणि तसा सुबोधही भांडं घेऊन नळावर गेला. सुबोधला घरातील कामाचे काही वाटायचे नाही. आत्याच्या मृत्यूनंतर आणि सुहासिनीसोबत लग्न होईपर्यंत तो सारीच कामे करीत असे. त्यामुळे त्याला कामाची सवय होती. सुहासिनीच्या 'त्या चार' दिवसात तो स्वयंपाकही करीत असे.

सुबोधचे पाणी भरून होईपर्यंत सुहासिनीने स्वयंपाक केला. तिची आदळआपट सुरूच होती. ती वाढून घेत असल्याचे पाहून सुबोधने पाणी घेतले. दोघेही जेवायला बसले परंतु दोघेही निःशब्द होते. लग्नापूर्वी तासनतास गप्पा मारणारे ते जोडपे जणू शब्द हरवल्यागत् झाले होते. नवीन माणसाला त्या दोघांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालाय असे सांगितले तर खरे वाटणार नाही अशी परिस्थिती होती. दोघे एका खोलीत शरीराने राहत असत परंतु मनाने मात्र चांगलेच दुरावले होते. काही काम पडलेच तर तितक्या पुरते तितके चार शब्द बोलत आणि पुन्हा अबोला! दोघांनी जणू एकमेकांसाठी मौनव्रत धरले होते...

तशाच अवस्थेत दोघांनी जेवणे आटोपली. झोपायला जाताना सुबोधने डॉक्टरांनी दिलेली गोळी घेतली. तसे सुहासिनीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितले परंतु तिने काही विचारले नाही आणि सुबोधनेही तिला गोळीबाबत काही सांगितले. गोळी घेऊन काही क्षण झाले न झाले की त्याच्या शरीरात वेगळाच जोम, उत्साह, जोश संचारला. शरीरात वेगळीच संवेदना संचारली आणि त्याने वेगळ्याच त्वेषाने सुहासिनीला मिठीत घेतले. त्याच्या स्पर्शाने सुहासिनीही त्याला साथ देऊ लागली. शेवटी तीही स्त्री होती. तिची सकारात्मकता, देत असलेली साथ पाहून सुबोधचा आत्मविश्वास वाढला. तो नव्या जोमाने आक्रमण करीत असताना अचानक तो पलंगाच्या काठावर आला आणि खाली ओणवे होत भडभडून ओकला. काय झाले ते दोघांनाही समजले नाही. क्षण दोन क्षणात सर्वस्व गमावल्याप्रमाणे तो पुन्हा तिच्याशेजारी कलंडला. त्याने दोन्ही हाताने डोके गच्च धरले. सर्वांग घामाने डबडबले. श्वास लागल्यागत् झाला. त्याची अवस्था पाहून सुहासिनीने स्वतःला सावरले. उठून त्याच्याशेजारी बसली. त्याचा घाम साडीच्या पदराने पुसत तिने विचारले,

"काय झाले? बरे वाटत नाही का? बाहेर काही खाल्ले का?"

"न..न..नाही. अचानक मळमळल्यासारखे वाटतंय. अशक्तपणा, ताप वाटतोय, डोके दुखतंय, गरगरल्याप्रमाणे होत आहे..." असे सांगत असताना त्याला पुन्हा जोराची उबळ आली. त्याला पुन्हा भलीमोठी उलटी झाली. सुहासिनीने त्याचे डोके गच्च दाबून धरले. काही क्षणात तिने विचारले,

"कमी झाली का मळमळ? बरे वाटतेय का? चहा-कॉफी काही करु का?" सुहासिनीने विचारले परंतु ती खूप घाबरली होती. सुबोधला व्यवस्थित झोपवून तिने फरशीवर पडलेला सारी घाण साफ केली. ती घाण बाहेर टाकत असताना शेजारच्या बाईंनी विचारले,

"काय झाले हो?"

"काही नाही हो. ह्यांना एकदम उलट्या होताहेत. दोन मोठ्या उलट्या झाल्या. भाऊ डॉक्टरांना घेऊन येतील का?" सुहासिनी म्हणाली आणि त्यांचा संवाद ऐकणारा तिचा नवरा पटकन पुढे येत म्हणाला,

"का नाही? मी डॉक्टरांना सोबत घेऊनच येतो." असे म्हणत ते पटकन निघाले. सुहासिनी आत आली. सुबोध तळमळत होता. घाम सारखा येत होता. सुहासिनी त्याच्याजवळ बसली. पाच-सात मिनिटात तो गृहस्थ डॉक्टरांना सोबत घेऊनच आला. तपासताना डॉक्टरांनी विचारले,

"खाण्यात काही शिळे, तेलकट वगैरे आले का?"

"नाही. नेहमीचेच साधे जेवण घेतले. जेवण झाल्यानंतर पंधरा-वीस मिनिटात ह्यांना..."

"उलट्या नेहमी होतात काय?" डॉक्टरांनी विचारले आणि एक इंजेक्शन टोचले

"नाही. कधीच नाही. आज प्रथमच झाले."

"काही गोळी वगैरे घेतली होती का?" डॉक्टरांच्या प्रश्नाला सुहासिनीच उत्तर देत होती. कारण सुबोधला प्रचंड थकवा आला होता. डॉक्टरांचा प्रश्न ऐकून सुहासिनी म्हणाली,

"गोळी? हां. एक गोळी घेतली होती."

"कोणती गोळी? दिवसभर काही दुखत होते का?"

"तसे काही म्हणाले नाही परंतु बाहेरून आल्यावर जेवण झाल्यावर गोळी घेतली."

"कुठे आहे ती गोळी?" डॉक्टरांनी विचारताच सुहासिनीने सुबोधचे खिसे चाचपले. तेव्हा तिला गोळ्यांचे पाकीट सापडले. ते पाकीट पाहून भुवया उंचावलेल्या अवस्थेत डॉक्टरांनी विचारले,

"ह्यांना या गोळ्यांची सवय आहे का?"

"नाही. मला नाही माहिती. म्हणजे घेताना कधी बघितले नाही. डॉक्टर, काय झाले? कशाच्या गोळ्या आहेत." सुहासिनी विचार असताना शेजारचा माणूस बाहेर गेल्याचे पाहून डॉक्टरांनी विचारले,

"तुमचे वैवाहिक जीवन सुखी नाही का?" डॉक्टरांनी अचानक विचारल्यामुळे गोंधळलेली सुहासिनी मान खाली घालत म्हणाली,

"त.. त.."

"हे बघा. संकोच करण्याचे कारण नाही. तुमच्या उत्तरावर बरेच काही अवलंबून आहे. मला सांगा, सुबोध तुम्हाला शेवटपर्यंत साथ देत नाहीत का? अर्ध्यावरच.."

"हं... हं... होय."

"हे असे कधीपासून होतंय?"

"लग्न झाल्यापासूनच..."

"कधी झालंय लग्न?"

"पाच महिने झाले आहेत. प्रेमविवाह आहे..."

"लग्नापूर्वी कधी शारीरिक संबंध?"

"नाही. कधीच नाही."

"ह्या गोळ्या पुन्हा घेऊ देऊ नका. या गोळ्या यांना सहन झाल्या नाहीत."

"डॉक्टर, कशाच्या आहेत ह्या गोळ्या?"

"ह्या गोळ्या म्हणजे फसवून पैसे उकळण्याचा धंदा आहे. काही तरी जाहिरातबाजी करून सुबोधसारख्या युवकांना आकर्षित करायचं आणि पैसा कमवायचा. ही गोळी घेतली म्हणजे तरुणांच्या शरीरात नवा जोश, उत्साह येतो, आक्रमकता येते आणि संबंधाचा कालावधी बराच वाढतो अशा फसव्या जाहिराती देऊन स्वतःला दोषी समजणाऱ्या तरुणांच्या खिशावर डल्ला मारायचा हा नवीन उद्योग फोफावतोय."

"परंतु या गोळ्यांचा काही फायदा..."

"मुळीच नाही. मात्र हे असे दुष्परिणाम होतात. ही गोळी घेतली म्हणजे जोर येतो, जोम येतो अशी एक ठाम समजूत अशा तरुणांची होते. काही प्रमाणात तो यशस्वी होतो. सर्वांना सुबोधला झाला तसा त्रास होतो असे नाही. अनेकांना या गोळ्या लागू पडतात. परंतु काही कालावधीनंतर पुन्हा ये रे मागल्या याप्रमाणे स्थिती निर्माण होते. उलट या गोळ्या घेण्यापूर्वीच स्थिती अधिक चांगली होती अशी परिस्थिती उद्भवते परंतु त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. असलेले पुरुषत्वही तो गमावून बसतो. काही फायदा तर होत नाही उलट या गोळ्यांचे व्यसन लागते..."

"पण डॉक्टर, या गोळ्यांच्या व्यतिरिक्त..."

"आले लक्षात. गोळ्यांपेक्षा त्यांच्या आणि तुमच्या दोघांच्या परस्परांवरील प्रेमावर, विश्वासावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मुख्यतः सुबोधमध्ये काही कमी आहे हा गैरसमज दोघांनीही विशेषतः तुम्ही काढून टाकणे आवश्यक आहे. ह्यांना सांभाळून, हळूवार प्रेमाने गोंजारत त्यांच्यातील पुरुषत्वाला फुलवत स्वतःसोबत यांनाही ते सुख मिळवून देण्याचे काम तुम्हाला करावे लागेल. काही दिवसातच तुम्हाला हवा असलेला सुखाचा झरा निश्चितपणे सापडेल. घाबरू नका. तुम्हाला यश मिळेल. सकाळपर्यंत यांना छान झोप लागेल. दोन दिवस आराम करु द्या. नंतर माझ्याकडे पाठवा. मी त्यांना समजावतो. त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो..." असे म्हणत डॉक्टर निघून गेले. सुन्न मनाने सुहासिनी पलंगाच्या कडेला टेकून बसली. काही वेळ जाताच तिने टीव्ही लावला. एका वाहिनीवर एक सिनेमा चालू होता. काही क्षणातच तिला त्याचा विषय समजला. 'लग्नापूर्वीचा संसार किंवा चाचपणी विवाह!' असा एक आगळावेगळा विषय होता. ज्या जोडप्याचे लग्न ठरलंय अशा जोडप्याने काही महिन्यांच्या कराराने लग्नापूर्वी एकत्र राहायचं. त्या काळात एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी लक्षात घ्यायच्या. दरम्यान त्यांचे लैंगिक संबंधही साहजिकच प्रस्थापित करायचे. शारीरिक संबंधातील एकमेकांच्या गरजा, आवडीनिवडी लक्षात घ्यायच्या आणि अशा प्रकारे काही काळ एकत्र संसार केल्यानंतर ठरवायचे की, ते दोघे एकमेकांना अनुरूप आहेत का? परस्परांना सुखी, समाधानी ठेवू शकतील का? दोघांचा होकार असेल, दोघे एकमेकांविषयी सकारात्मक असतील तर मग दोघांनी लग्न करायचे. दोघांची विचारसरणी भिन्न असूनही एकमेकांना पुरक नसेल तर मग मात्र दोघांचे मार्ग निराळे. असा काहीसा वेगळा असला, क्रांतिकारी असला तरीही तो पुढील यशस्वी संसारासाठी आवश्यक होता. सुहासिनीला वाटले,

'हा प्रकार म्हणजे आजच्या लग्नसंस्थेला आव्हान असेल, संस्कृतीच्या विरोधात असेल, घाणेरडा असेल समाजाच्या दृष्टीने बहिष्कृत असेल पण माझ्यासारख्या तरुणींसाठी हा प्रयोग वरदान ठरेल. कारण तशा संबंधातून तरुणांचा कमकुवतपणा त्या तरुणीच्या लक्षात येईल आणि ते विवाह होणार नाहीत. परंतु या संबंधामुळे किंवा अशा समांतर लग्नसंस्थेमुळे तरूणांची कमकुवत बाजू समोर आल्यानंतर त्या तरुणाचे काय? तारुण्याचा फुगा फुटल्यानंतर त्यांच्या जीवनावर एक कायमस्वरूपी प्रश्नचिन्ह लागेल त्याचे काय? अशा तरुणांचे भविष्यात लग्न झाले नाही तर त्यांच्या शरीरधर्माचे काय? त्यांच्या समोर आलेल्या पुरुषत्वाला कमी लेखून विवाह नाकारला तर ते तरुण शांत बसतील? कारण अर्धवट असली तरीही त्यांना वासना आहे, भावना आहेत. जखमी झालेल्या सापाप्रमाणे किंवा श्वापदाप्रमाणे ते अधिक हिंसक झाले तर?' विचारांच्या वावटळीत गरगरणाऱ्या सुहासिनीला सुबोधचे कार्यालयातील वागणेही आठवले... ती नवीन हजर झाली आणि तिने हेरले की, कार्यालयातील एकमेव प्रामाणिक माणूस म्हणजे सुबोध! भ्रष्टाचाराच्या सागरात मनसोक्त डुबकी मारणारे साहेब आणि इतर भ्रष्टाचारी कारकुनांच्या सहवासात असूनही सुबोध मात्र त्या किडेपासून दूर होता. असा माणूस सापडण्याची सुतराम शक्यता नसतानाही सुबोध तिला भेटला होता. त्याच्या श्यामळू वागण्याने, खाली मान घालून बोलण्याच्या लकबेने आणि त्याच्या प्रामाणिकपणाने तिला भुरळ घातली. इतर सारेच सुहासिनीला स्वतःकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असताना सुहासिनीला भावला, आवडला तो सुबोध!

त्यांचं प्रेम जसे फुलत गेले तसे साहेबांनी सुबोधला हळूवारपणे, अलगद भ्रष्टाचाराच्या दलदलीत ओढले. त्यावेळी होणारी सुबोधची धडपडही तिने जवळून अनुभवली होती. नंतर मात्र एकदा सवय झाली की सुबोध सराईतपणे भ्रष्टाचार करू लागला, पचवू लागला. चोरट्या मार्गाने मिळविलेला पैसा घरात साठवू लागला. त्याला त्या काळ्या पैशांची एवढी सवय झाली की, एक- दोन दिवस जर त्याला तो अनधिकृत कमाईचा पैसा नाही मिळाला तर तो अस्वस्थ, कासावीस होत असे, तळमळत असे. भ्रष्टाचार ही त्याची सवय नाही तर विकृती बनून गेली...

*****