एक होता राजा…. (भाग ४) Vinit Rajaram Dhanawade द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक होता राजा…. (भाग ४)

मंगेश दचकला. " अरे… हे काय… ",
"माझ्या engagement चे invitation… " मंगेशला धक्का बसला. निलमकडे बघत राहिला.
"अरे, असा काय बघतोस…जसं काही तुला माहीतच नाही.",
"मला कसं कळणार ? ",
" राजा बोलला नाही तुला… " मंगेशने नकारार्थी मान हलवली.
"त्याला तर पहिलच सांगितलं… आणि त्यालाच पहिलं invitation देयाचे होते म्हणून तर call करत आहे सकाळपासून." मंगेश अजून त्या धक्यातून सावरला नव्हता. "पण तुझं नशीब चांगलं आहे हा… तुला पहिलं invitation… " मंगेश खोटं खोटं हसला.
" अभिनंदन… " ,
" Thanks… नक्की यायचे हा… " ,
"हो नक्की… " मंगेश निमंत्रण पत्रिका पाहू लागला. स्वप्नील दामले…. म्हणजे ब्राम्हण… " दामले म्हणजे ब्राम्हण ना… " मंगेशने विचारलं.
" हो… का रे ? ",
" नाही,सहज विचारलं… तू बोलायचीस ना, आमच्याच जातीचा पाहिजे घरच्यांना… ९६ कूळी मराठा… मग आता ब्राम्हण… म्हणून विचारलं… " त्यावर निलम काही बोलली नाही.…. शांतता… थोडयावेळाने निलम बोलली,
" पपांच्या ओळखीचा आहे तो… चांगलं स्थळ आहे म्हणून आवडला पप्पांना तो. engineer आहे ….दुबईला असतो, कधी कधी मुंबईला येतो… मोठे मोठे प्रोजेक्ट केले आहेत त्याने. मग घरी आवडला तो.",
"आणि तुला… ",
"हा… चांगला आहे. मला सुद्धा बाहेर जायचे होते, इंडियाबाहेर… मग बरं झालं ना… " निलम हसली.
" ok… ok, ठीक आहे, छान. ",
"राजेशला निमंत्रण पत्रिका कधी देऊ… तुझ्याकडे दिली असती पण मला स्वतः त्याला देयाची होती.",
"उद्या दे ना मग…",
"नाही ना… उद्या पासून सुट्टीवर आहे मी. आपली भेट नाही होणार संध्याकाळी… चार-पाच दिवसतरी… ",
"मग… आईंना दे…",
"हा… आताच जाऊ देयाला ना… " निलम आनंदात सांगत होती. मंगेश मात्र राजेशचा विचार करत होता. हेच कारण होतं त्याच्या शांत असण्याचे.


निलम, मंगेशसोबतच राजेशच्या घरी आली." आई… !!! " म्हणत म्हणत निलमने राजेशच्या आईला मिठी मारली. किती दिवसांनी भेटत होत्या दोघी. राजेशच्या आईला किती आनंद झाला. मंगेश दारातच थांबला.
" ये… ये राणी, कित्ती दिवसांनी आलीस घरी. कोणी ओरडलं का इकडे येतेस म्हणून… " राजेशची आई मस्करीत बोलली.
" काय आई… तुम्हीपण ना… मला कोण ओरडणार… कोणी ओरडलं तरी मी काय थांबणार आहे का इकडे यायची… " दोघीही हसायला लागल्या.
"बरं… कधी आलीस केरळ वरून…",
"झाले चार-पाच दिवस… राजा बोलला नाही का… " ,
"नाही… ",
"काय झालं ते कळत नाही त्याला… हम्म… ते असू दे, आई… हि घ्या , निमंत्रण पत्रिका… ",
"कसली गं… ",
"माझं लग्न ठरलं आहे आणि पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे. त्याचं आमंत्रण देयाला आले मी. पाया पडते हा आई… " निलम राजेशच्या आईच्या पाया पडली. धक्कादायक एकदम… मंगेश दारातच होता. आईने त्याच्याकडे पाहिलं.
" आई… नक्की यायचं हा… ",
"हं… हो, अजून मोठी हो… " असा आशीर्वाद दिला निलमला.
"चला आई, निघते मी. या निमंत्रण पत्रिका वाटायच्या आहेत ना… आणि राजाला सुद्धा सांगा हा… येते मी… चल मंगेश, Bye… " म्हणत निलम निघून गेली.


मंगेश बाहेरच उभा होता. आईने त्याला विचारलं," राजेश नाही आला का रे… ? ","नाही… पण येईल तो जरा उशिराने… काळजी घ्या त्याची." मंगेश त्याच्या घरात आला. तसाच जाऊन झोपला. राजेशची आई, खूप वेळ त्याची वाट बघत होती. जरा उशिरानेच आला राजेश. रात्रीचे ११.३० वाजले होते. हात-पाय धुतले, फ्रेश झाला. त्या खिडकीजवळ जाऊन बसला. पुन्हा उठला. आणि टेपरेकोर्डेर लावला. आवडतं गाणं लावलं. " याद पिया कि आये… " ध्यानस्त झाला. खिडकीबाहेर कूठे तरी दूर पाहू लागला. संपूर्ण चाळ झोपली होती. नीरव शांतता पसरली होती. त्यात त्या गाण्याचा आवाज अधिक वाटत होता. शेजारीच मंगेश राहायचा. त्यालाही ते ऐकू येत होतं. पडल्या पडल्याच तोही ते गाणं ऐकत होता. त्या शांततेत ते गाणं मनात कूठेतरी लागत होतं.


राजेशची आई, कधीपासून त्याला बघत होती. किती स्वप्न पाहिली होती तिने. निलम-राजेशची जोडी… आता ते शक्य नव्हतं. पण राजेशला कसं समजावायचे… शेवटी राजेश जवळ आली ती.
"राजा जेवतोस का ? " तिला माहित होतं, तो जेवणार नाही ते, तरी विचारलं.
" नाही… नको मला, आज खूप उशीर झाला आहे ना… " राजेश बाहेरच बघत म्हणाला.गाणं तसच चालू होतं. आईच्या काळजात कालवाकालव सुरु होती. खूप धीर करून बोलली,
" राणीचं लग्न ठरलं ना… " राजेशने एक नजर टाकली आईकडे.
"तुला कसं कळलं ते… ",
"ती स्वतः आलेली, साखरपुड्याचे आमंत्रण घेऊन… ",
"हम्म… " राजेश पुन्हा बाहेर बघू लागला. "चांगलं झालं ना आई, निलमचं…. ",
"अरे पण तुझं प्रेम…. ",
"नाही गं आई… असं नको वाटून घेऊस… नाहीतरी, ती कूठे …. मी कूठे…. मैत्री केली तिचं खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. " राजेश उगाचच हसला. आईच्या डोळ्यात पाणी आलं. राजेशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
" राजा… नको रे असा राहत जाऊस… इतका साधा नको राहूस रे…आजकालच्या दुनियेत नाही राहत रे असा कोणी. ",
"आई, स्वभाव आहे ना तो … कसा बदलणार… थोडे दिवस वाटेल निलम बद्दल… मग… ",
"मग काय… " ,
" नंतर सवय होईल ना… म्हणून आता पासून सवय करतो आहे , तिच्यापासून दूर रहायची… " ,
"किती दिवस असा राहणार… ",आई रडत म्हणाली.
" माहित नाही… कोणीतरी दूर जाते… ते दुःख कसं असते ते माहित आहे मला. पहिलं बाबा गेले सोडून आणि आता निलम… " राजेश बोलता बोलता थांबला, आईला खूप वाईट वाटलं. "याद पिया कि आये…. " गाणं तसंच सुरु होतं.आणि आई… राजेशला पोटाशी घेऊन रडत होती.

पुढचा दिवस… राजेश नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला. पुन्हा निलम त्याला सकाळपासून call करत होती. राजेशने एकदाही उचलला नाही. मंगेशला कळत होते कि राजेशला काय वाटतं असेल मनातून. तरीसुद्धा राजेश जवळ आला तो.
"चल… " मंगेशने राजेशला सांगितलं.
"कूठे ? ",
"चल जरा… बाहेर, बोलायचे आहे.",
"आता नको, काम आहे. रात्री घरी गेलो कि बोलू.",
"प्लीज राजा… तुला तुझ्या आईची शप्पथ आहे." राजेश नाईलाजाने उठला. आणि बाहेर आला.
" राजेश… मला कळते आहे, तुझ्या मनात काय चालू आहे ते… पण एकदा बोल तरी तिच्याशी.… ",
"काय बोलू… ",
"अरे तुझ्या मनातलं सांग ना तिला… ",
"काय बोलतो आहेस तू… आता तीन दिवसांनी साखरपुडा आहे तिचा… आणि मनातलं सांगू… ",
" अरे पण, बोल ना तिला… इतके call करते ती… एकदा बोल ना… " राजेश तयार नव्हता बोलायला. शेवटी मंगेशने call केला निलमला.
" Hi… अरे राजा कूठे आहे… कधीपासून call करते आहे त्याला… भेटली का निमंत्रण पत्रिका त्याला …." निलम बोलली.
" हा… भेटली. पण तुला भेटायचे होते जरा… कधी भेटशील… ",
"आता तर मी निमंत्रण पत्रिका वाटत आहे friends कडे… रात्री भेटू… चालेल ना. " ,
"हो… चालेल, रात्री भेटू… ८ वाजता, तिथेच… चहाच्या टपरीवर",
"ok, चालेल… " मंगेश - निलमचं संभाषण संपलं.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: