Ti Ek Shaapita - 13 books and stories free download online pdf in Marathi

ती एक शापिता! - 13

ती एक शापिता!

(१३)

त्या रात्री सुहासिनीला कशाच्या तरी आवाजाने जाग आली. त्या आवाजाचा तिने अंदाज घेतला. तिच्या शेजारी झोपलेली आशा झोपेत बरळत होती,

'अमर, आय लव यू.. आय ..आय.. लव यू...ओ.. अमर..अमर...' तिच्या तशा शब्दांनी सुहासिनी पूर्ण जागी झाली. तिने आशाला हलवले. गाढ झोपेत असलेली आशा जागी झाली नाही तरी तिची असंबंध बडबड मात्र थांबली.

सुहासिनीने घड्याळात बघितले. रात्रीचे तीन वाजत होते. सकाळ होईपर्यंत सुहासिनीला झोप लागली. तिच्या डोक्यात सारखे आशाचेच विचार येत होते. तिला वाटले, 'ही पोरगी अशी का वागते? हिच्या मनात काय आहे?घरकामाचे सोडा परंतु अमरसोबतचे हिचे संबंध कोणत्या स्तरापर्यंत गेले असतील? आत्ताची हिची बडबड झोपेत असेल पण त्यातून काय समजावे? आशाने 'त्या' मर्यादा तर ओलांडल्या नसतील? त्या संबंधातून काही वाईट पुढे आले म्हणजे? जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. काही तरी उपाय करावाच लागेल. तिचे अमरशी असलेले संबंध तोडावेच लागतील.'

त्यादिवशी दुपारी सुबोधला काही तरी सांगून अर्ध्या दिवसाची रजा घेऊन आशा घरी परतली. दूरूनच घराचा दरवाजा ढकललेला दिसला. ते पाहून तिच्या मनातली शंका बळावली. घरात काय दिसेल या विचाराने धडधडत्या अंतःकरणाने हलकेच दार ढकलून ती घरात शिरली. आतल्या खोलीकडे जाताना तिच्या शरीराला कंप सुटला. तिने खोलीत डोकावले. खोलीतील पलंगावर अमर-आशा होते. विवस्त्र नसले तरीही प्रणयलीलेत दंग होते. शंका खरी ठरली असली तरी ती वास्तवात दिसताच तिच्या तळपायाची आग मस्तकात शिरली. प्रचंड धक्का बसलेल्या अवस्थेत, संतापाने थरथरत तिने दारावर जोराची लाथ मारली. तो आवाज ऐकून दोघेही दचकून उठले. समोर सुहासिनीला पाहताच अमर गडबडून कपडे सावरत पळत सुटला. आशा सावरत असताना बसलेल्या धक्क्याने सुहासिनीचा संताप अनावर झाला. तिने आशाला बडवायला सुरुवात केली.

"बेशरम कार्टे, लाज नाही वाटली तुला? भरदुपारी असे रंग उधळायला? घरी कुणी नाही याचा फायदा घेऊन हे असे प्रकार सुरू केलेस काय?"

रागाच्या भरात आपण काय बोलतोय याचे भान सुहासिनीला राहिले नाही. तोंडात येतील ते शब्द आणि हातात येईल त्या वस्तुचा ती मनसोक्त वापर करु लागली. मारून मारून ती स्वतःच थकली ते तिने पलंगावर झोकून दिले. उशीत तोंड खुपसून ती रडू लागली. अश्रूंना मोकळी वाट मिळाली. त्यात किती वेळ गेला ते समजले नाही. अशोक घरी परतला तेव्हा त्याला काय झाले ते समजले नाही. त्याने विचारले,

"आई, काय झाले गं?" खूप वेळापासून मनात खदखदणारे तिने सांगितले,

"विचार तुझ्या बहिणीला. तोंड काळे केले तिने आपले. करू नये ती गोष्ट केलीय तिने..."

"अग पण झाले तरी काय?"

"काय झाले ते कसे सांगू अशोक? ही..ही.. कार्टी त्या अमरसोबत याच पलंगावर..."

"तू.. तू.. आज पाहिलंस आई. मी अनेकदा पाहिलंय..."

"का..य? मग तू मला का नाही सांगितले? त्या कुत्र्याचा गळा का नाही घोटलास?"

"त्याचा जीव घेऊन काय फायदा? आपलाच वाण खोटा. तेव्हा त्याला बोलून फायदा?"

"खरे आहे म्हणा तुझे? हिच त्याला .. जाऊ देत." सुहासिनी म्हणाली आणि अशोक हातपाय धुवायला निघून गेला. तितक्यात सुबोधही आला. त्याला घरातले वातावरण कसे निराळेच भासले. खोलीत डोकावताच वातावरणातील गांभीर्य लक्षात यायला वेळ लागला नाही. पलंगाच्या खाली आशा बसली होती. रडून रडून तिचे डोळे, चेहरा सुजला होता. हातावर माराचे वळ दिसत होते. पलंगावर सुहासिनी बसली होती. तिचीही परिस्थिती वेगळी नव्हती. रडल्यामुळे तिचेही डोळे सुजले होते. सुबोधला पाहताच तिला गलबलून आले. डोळे पुन्हा पाझरू लागले. त्या दोघींची तशी अवस्था पाहून सुबोधने विचारले,

"काय झाले, सुहासिनी? तू ऑफिसातून लवकर आलीस."

"लवकर आले म्हणून लेकीचा पराक्रम दिसला. नाही तर आपले तोंड काळे झाल्यावर, लाजेची लक्तरे वेशीवर टांगल्यावर..."

एकंदरीत सारा प्रकार सुबोधच्या पटकन लक्षात आला आणि तोही कमालीचा संतापला. परंतु अजून प्रकरण वाढवणे नको म्हणून तो शांत बसून राहिला...

अशोक आणि पीयूषची मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट होत होती. दोघे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये असले तरीही सायंकाळी बराच वेळ दोघे एकत्र येऊन गप्पा मारत. दिवसभर घडलेल्या घटना एकमेकांना ऐकवत. कॉलेजमधील गप्पांसोबत राजकारण, क्रिकेट अशा विषयांवर त्यांच्या चर्चा रंगत. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वाचून ते त्यावर भरभरून बोलत असत. विशेषतः पीयूष अशा गप्पांमध्ये जास्त रंगत असे.

त्यादिवशी सायंकाळी फिरायला गेलेले अशोक-पीयूष घरी परतले. सुबोध-सुहासिनी कार्यालयातून परतले होते. त्यांना पाहताच सुबोध म्हणाला,

"अरे, या. झाले का फिरून? पीयूष काय म्हणते तुझी पत्रकारिता?"

"काही महिने शिल्लक आहेत काका."

"बाबा, दैनिक जनता या वर्तमानपत्रात त्याचे 'गवाक्ष' नावाचे सदर सुरु होत आहे." अशोक म्हणाला.

"एखाद्या बँकेकडून कर्ज मिळाले तर 'काकदृष्टी' नावाचे स्वतःचे वर्तमानपत्र काढण्याचा विचार करीत आहे."

"व्वा! नावही ठरवले आहे तर. नाव मात्र छान आहे हं. आवडले मला."

"काका, तुमचा आशीर्वाद असू द्या.." असे म्हणत पीयूष निघून गेला.

"फार धाडसी आहे पोरगं. नक्कीच नाव कमावणार."

"बाबा, गवाक्ष या लेखमालेत तो पुढारी, ढोंगी, अंधश्रध्दा याविरोधात एक अभियानच सुरू करतोय. बाबा, त्याचा आणखी एक विचार आहे."

"तो कोणता?"

"दीन गरिबांना अपघात झाला तर ते त्यांना ताबडतोब, विनासायास रक्त मिळावे म्हणून रक्तपेढी काढण्याचा विचार करतोय तो."

"खुपच छान उपक्रम आहे. या पोराचे भविष्य काही वेगळेच दिसत आहे." सुबोध म्हणाला आणि तो विषय तिथेच संपला...

दुसऱ्या दिवशी सुबोधला जाग आली तीच मुळी सुहासिनीच्या घाबरलेल्या आवाजाने. सुहासिनी म्हणत होती, 'अहो, ऊठा. ऊठा ना. असे काय झोपलात? आशा घरात नाही."

"काय? अग, असेल कुठे तरी. अमरकडे बघितलस काय?"

"आता मलाच सांगा. जरा उठून पहा तर खरं." सुहासिनीच्या आवाजातला कंप ऐकून सुबोध उठला. घरात इकडेतिकडे बघून तो अमरच्या घरी गेला. अमर घरी नव्हता. त्याची आई ,

"सकाळीच उठून म्हणाला की, कॉलेजची सहल जाणार आहे. लवकर जायचं आहे."

घरी परतल्यावर सुबोध म्हणाला,

"अग, आशा काही म्हणाली होती का? अमर कॉलेजच्या सहलीसाठी गेलाय. आशा त्याच्यासोबत तर गेली नाही ना?"

"नाही. काहीच म्हणाली नाही हो. कुठे गेली असेल हो?"

तितक्यात खोलीत आलेला अशोक म्हणाला, "बाबा.. बाबा ही आशाची चिठ्ठी."

अशोककडून ती चिठ्ठी घेऊन सुबोधने ती वाचली. आशाने लिहिले होते, 'आई-बाबा, मी अमरसोबत जात आहे. माझ्या जाण्याला तुम्ही आणि तुमचा समाज 'पळून गेली' हेच बिरूद लावणार. कुणी काहीही म्हणाले तरी माझी पावलं माघारी फिरणार नाहीत. मला शोधूही नका. मी आणि अमर लग्न करीत आहोत.'

तुमचीच, आशा.

"मला वाटलेच होते, ही सटवी असेच काही तरी करणार आहे. माझं तोंड काळे केले. आता गल्लीत, ऑफिसात तोंड वर करता येणार नाही. हे असे दिवे लावणार हे माहीत असते तर जन्माला घातलीच नसती. पोटातच मारून टाकली असती."

"सुहासिनी, शांत हो. उगीच वाईट वाटून घेऊ नकोस. झाले ते झाले. आता काय करणार?"

"हो आई. तू अगोदर स्वतःला सांभाळ. शांत हो. आता काही फायदा आहे का?" अशोक म्हणाला.

"अरे, हिला प्रेमविवाहच करायचा होता तर आपल्या जातीत काय पोरांची वाण होती काय? दुष्काळ तर नव्हता ना पोरांचा? कुणीच हिला नकार दिला नसता. त्या मेल्याने नादी लावलं. कधी बरं होणार नाही त्याचं. अहो, पोलिसांना कळवा..."

"कळवून काय फायदा?"

"अहो, ती वयाने लहान आहे. तेव्हा तिला त्या माकडाने पळवून..."

"त्यामुळे का गेलेली इज्जत परत येणार आहे? उद्या त्याला तुरूंगवास झाला तरीही आपलीच बदनामी होणार ना? पुन्हा कोण आशाशी लग्न करेल? आजन्म घरात बसून राहण्यापेक्षा तिच्या मनासारखे झाले ना, ती आनंदात राहील ना? मग झाले तर." सुबोध म्हणाला...

तीन-चार दिवसांनी आशा-अमर परत आले. गल्लीत त्यांचे थंड असे स्वागत झाले. कुणी त्यांची विशेष दखल घेतली नाही. आशा सौभाग्याचे लेणे लावून परतली होती. तिने स्वतः स्वतःचा संसार थाटला होता परंतु त्यापायी तिला तिचे माहेर गमवावे लागले होते. रक्ताच्या नातेवाईकांसोबत वैर पत्करावे लागले होते. नात्याचे एक बंधन स्वीकारताना अनेक बंधनांना तोडावे लागत होते.

एकाच चाळीत राहणे म्हणजे झालेल्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे होते. सुबोध, सुहासिनी, अशोक तिघेही आशाला बोलत नव्हते. त्यांनी मौन, अबोला जरी स्वीकारला होता तरी एकमेकांना पाहताच भावना उचंबळून यायच्या, ओल्या होत असत. आशा दिसली की, सुहासिनीच्या डोळ्यात पाणी यायचे, सोबत संतापाचे अंगारे फुलायचे. त्यामुळे सुहासिनीनेच सुबोधजवळ ते घर बदलायचा हट्ट धरला. सुबोधनेही शहरातील नवीन वसाहतीतील एक बंगला विकत घेतला. काही दिवसातच आशाचे माहेर स्वतःच्या बंगल्यात राहायला गेले. दररोजची दृष्टभेटही अशाप्रकारे बंद झाली...

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED