Mehendichya Panaver - 2 books and stories free download online pdf in Marathi

मेहंदीच्या पानावर (भाग-२)

३१ डिसेंबर
कसलं नविन वर्षाचं स्वागत आणि कसलं काय. ग्रहाणलेल्या चंद्राची कोणी कोजागीरी पोर्णीमा करते काय? आई-बाबांच्या चेहऱ्यावर माझ्या वागण्यातील अचानक बदलाचे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तर माझ्याकडे सुध्दा नाहीत. त्यांची नजर टाळण्याचा खुप प्रयत्न करते आहे.. पण कुठवर?

मन दुःखी असले की कसं सगळं जगच दुःखात बुडालेले वाटते. मागच्या अंगणात सुगंधाचा सडा घालणारा प्राजक्त सुध्दा सध्या मला दुःखीच वाटायला लागला आहे..

“प्राजक्तासारखी माझी सुध्दा स्वप्न पहाटेला गळतात,
म्हणूनच प्राजक्ताची दुःखं कदाचित, मला कळतात..”

आशुचे दोन मिस्ड कॉल्स दिसले नंतर मात्र परत तिने फोन केला नाही. कदाचीत माझं एकटं रहाणं तिनेसुध्दा स्विकारलेले दिसते आहे.


८ जानेवारी
जुलै मध्ये ज्या चित्रपटासाठी गाणी गायली होती त्याचे म्युझीक लॉच होते. आशुच्या आग्रहाखातर गेले होते. त्या झगमगाटात, आनंदाच्या वातावरणात माझं मन काही केल्या रमेना. खुप प्रयत्न केला झालं गेले विसरुन जाण्याचा. कदाचीत चुक माझी होती. एक तर मी अशक्याची अपेक्षा केली होती आणी केलीच होती तर त्यासाठी काहितरी करायला हवे होते. सर्व गोष्टी बसल्या जागी थोडे ना मिळतात?

आजच्या म्युझीक लॉंचला मिडीया कव्हरेज खुप मिळाले, अल्बम हिट होणार यात शंका नाही. सगळेच जणं खुप खुश होते.. माझ्याशिवाय..
“रातराणीच्या सुगंधात चाफ्याचा गंध होता, चांदण्यांच्या चमचमाटात आज चंद्र मात्र मंद होता”

मनाची खुप घालमेल चालु होती. काय करावं. कसं लोकांच्या नजरेला तोंड द्यावं? माझी काहीच चुक नव्हती मग लोकांनी माझ्या वैयक्तीक आयुष्याची अशी थट्टा का मांडावी? एकदा वाटत होतं सरळ बोलुन मन मोकळं करुन टाकावं, तर दुसऱ्याच क्षणी हे चर्चेला अधीक खतपाणी घालण्यासारखे होईल असे वाटुन गप्प बसत होते. स्वतःच घेत असलेला निर्णय कधी आपला तर कधी दुसऱ्याचा वाटत होता. मनाच्या ह्या खेचाखेचीमध्ये माझी मात्र दमछाक होतं होती.


२३ जानेवारी
सिमल्याच्या गोपाळ काकांच पत्र आले. त्यांची तब्बते सध्या खराबच आहे. त्यांचे सिमल्याचे रिसॉर्ट चालवायला मदतीसाठी येतेस का विचारत होते. रेकॉर्डींगचे आणि माझे तसेही जरा बिनसलेच होते. मग मात्र पक्का निर्णय घेतला. इथुन मागे फिरुन पहाणे नाही. हा घेतलेला निर्णयाचा फेरविचार नाही. बाहेर पडले तर मन रमेल कदाचीत म्हणुन लग्गेच होकार कळवुन टाकला.

स्वतःपासुन दुर पळण्याचा एक व्यर्थ प्रयत्न करुन बघायचा, अजुन काय!!


४ फेब्रुवारी
गोपाळकाकांना होकार कळवला आणि आज सकाळी सिमल्यामध्ये मी आले सुध्दा. घेतलेला निर्णय योग्य ठरतो आहे की काय असे वाटावे इतपत इथे आल्यावर छान वाटते आहे. हवे मध्ये एक छान गारवा आहे. दुर डोंगरांवर चमकणारे बर्फाचे कडे आणि हिमालयाचे दर्शन सुखावते आहे. सर्वांपासुन दुर, महाकाय हिमालयाच्या कुशीमध्ये स्वतःला हरवुन घेण्यात खुप मज्जा आहे. असं वाटतं आहे इथुन बाहेर पडुच नये, इथेच लपुन रहावं. पर्वतांच्या या बलाढ्य बाहुपाशात अस्संच स्वतःला झोकुन द्यावं.

काकांचा रिसॉर्ट खुप्पच छान आहे. छोट्टीशी टुमदार ८ बंगल्यांची रांग, कडेला रंगेबीरंगी फुलांचे असंख्य ताटवे, एका बाजुला खोल-खोल दऱ्या तर दुसऱ्या बाजुला अंगावर येणारे उंचच उंच पर्वत. काकांनी सगळी सिस्टीम मला समजावुन सांगीतली.

खुप दिवसांनी खुप फ्रेश वाटले आज. इथले चेहरे आपले नसुनही जवळचे वाटत होते. कुणाच्याच चेहऱ्यावर काही प्रश्न नव्हते? माझ्याबद्दल, माझ्या असण्याबद्दल कुणालाच काही घेणे-देणे नव्हते. मी असुनही नसलेलीच होते. माझ्या मनाचे दरवाजेही सर्वांसाठी बंदच होते. आपण बरे, आपले काम बरे म्हणुन दिवस ढकलत होते.. ढकलायचे होते.


१४ फेब्रुवारी
आज १४ फेब्रुवारी, ‘व्हॅलेंटाईन्स डे’. हिमालयाच्या ह्या पांढऱ्या शुभ्र पार्श्वभुमीवर आज अनेक प्रेमीकांचे रंग फुलले होते.

“विश्वव्यापी पवन मित्रा, मी मदत मागते आहे,
सांग जाऊनी माझ्या सख्याला, मी वाट पाहात आहे.”

श्शी, हे काय भलतंच लिहीले गेले माझ्या हातुन म्हणुन मी त्या दोन रेघा खोडुन टाकल्या खऱ्या परंतु माझं मन नकळतंच राजच्या आठवणीत अजुनही बुडाले आहे हे तितकेच अधोरेखीत झाले हे मात्र खरं.

“सहवास तुझा जरासा, वेड लावुनी गेला,
दूर होताच तुझ्यापासून, हुंदका भरून आला.”

वाईट्ट आहेस तु राज, खुप वाईट्ट आहेस, आज समोर नसुनही, इतक्या दुर असुनही रडवलंस तु मला.. खुप वाईट्ट आहेस तु राज… आय लव्ह यु राज.. आय स्टील लव्ह यु..

“उर भरून आले की, डोळे अश्रु गाळतात,
अश्रु गाळणारे डोळे जरी माझे असले,
तरी अश्रु मात्र तुझेच नाव सांगतात..”


[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED