मेहंदीच्या पानावर (भाग-५) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मेहंदीच्या पानावर (भाग-५)

२१ फेब्रुवारी

इतक्या दुरवर बाईक वरचा असुनही प्रवासाचा शीण असा जाणवलाच नाही. खाचखळग्याच्या रस्त्यातुन, ओढ्यानाल्यातुन प्रवास करताना शरीराला होणारा राजचा निसटता स्पर्श शरीरावर प्राजक्ताच्या फुलांची उधळण करत होता. क्षणभर जाणवलं, तुम्हाला हवा तो जोडीदार बरोबर असेल तर आयुष्यातले या ही पेक्षा मोठे खाच-खळगे कसे अनेक लोकं सहजतेने पारं करत असतील!

‘निधी मेहता’, पुर्णपणे मी तिच्याबद्दल विसरुनच गेले आहे. जणु काही ती अस्तीत्वातच नाही. जणु काही तिच आणि राजचं काही नातं आहे हेच मला ठाउक नाही. मी त्यांच्या नात्याबद्दल पुर्णपणे अनभिज्ञ झाले होते. तिच्याबद्दल मी राजकडे एक शब्दही विचारला नव्हता आणि राजनेही तिच्याबद्दल कधी माझ्याकडे विषय काढला नव्हता. माझ्या मनामध्ये सध्या फक्त एकच गोष्ट होती.. ‘राज’

राज माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, तो मला कित्ती आवडतो, खरं तर शब्दात सांगणे अवघडच, पण शक्य असते तरीही कदाचीत ते मी इथे नक्कीच उतरवणार नाही. माझ्या मनाशिवाय ही गोष्ट कुणालाही कळु द्यायची इच्छा नाही आणि खरं तर एक भिती सुध्दा वाटते म्हणुन. सर्वांमध्ये वावरताना चेहऱ्यावर मी एक शांत, ‘कुल ऍन्ड काल्म’ असल्याचा मुखवटा घालुन वावरत असते, पण आत मधुन… प्रत्येक क्षण परीस्थीती बिघडतच चालली आहे.

२२ फेब्रुवारी
ग्रुप मधील सर्व जणं मस्तच आहेत, पण सगळ्यात इंप्रेसिव्ह, ‘करण मित्तल’, ‘मित्तल मिल्स’ चे सर्वे-सर्वा ‘कुमार मित्तल’ यांचा एकुलता एक वारस. परंतु करोडपती बाप असल्याचा किंचीतसाही अहंकार त्याच्या चेहऱ्यावर नाही. इन्ट्रोडक्शन परेड मध्ये म्हणतो कसा, ‘कुठल्याही मुलीला मी सहज पटवु शकतो..’, मला तर हसुच आलं, काय असतात ना एक एक पात्र

आज दिवसभर आरामच होता, उद्यापासुन पुन्हा पुढचा प्रवास सुरु. हवा सुरेखच आहे.

२३ फेब्रुवारी
दिवस-भर राज आज ‘निधी’ बद्दलच बोलत होता. त्यांची ओळख कशी झाली, मैत्रीचे प्रेमात रुपांतर कसे झाले हे आणि ते.. इतका वैताग आला होता मला. त्याला एवढे पणं कळत नाही का एका मुलीला दुसऱ्या मुलीची स्तुती, ते पण एखाद्या हॅंन्ड्सम कडुन.. सहसा सहन होतं नाही? मला कंटाळा आला होता त्याच्या ‘निधी’पुराणाचा.. कंटाळा? की राग? की जेलसी?? कुणास ठाऊक!

२४ फेब्रुवारी
काल रात्री हवा फारच खराब होती. आकाशातला निळसरपणा कुठेतरी निघुन गेला होता. पुर्ण आकाश करड्या रंगाने भरुन गेले होते. हवेतला बोचरेपणा अंगावर काटा आणत होता. कुठल्याही क्षणी आभाळ कोसळेल असं वाटत होतं. टेंटचा पडदा जरासा सरकवुन पाहीला तेंव्हा आकाश्यात विजा चमकत होत्या, परंतु पाऊस काही कोसळला नाही.

करडा रंग, नैराश्याचे, निरसतेचे प्रतिक. निसर्गाचे रंग आपल्या मनावर किती परीणाम करु शकतात नाही?

आज राज खुपच शांत, एकटा वाटत होता. त्याच्या मनामध्ये कसली तरी खळबळ माजली होती. कसली असावी?? निधी पासुन दुर असल्याची?, निधी ला न सांगता माझ्याबरोबर इथे आल्याची? का अजुन काही?? ठरवणं कठीण आहे.

सर्व ग्रुप मध्ये राज खुपच लोकप्रिय झाला आहे.. आणि का नाही होणार? प्रत्येक जण त्याच्या तोंडुन गाणं ऐकण्यासाठी, आपल्या मोबाईलमध्ये साठवण्यासाठी धडपडत असतो. वाटतं जावं आणि राजचा हात हातामध्ये घेऊन ‘राज फक्त माझा आहे’ असं ओरडुन सांगावं. पण दुसऱ्या क्षणाला वाटतं, खरंच राज आहे माझा? जितक्या त्वेषाने माझे मन राजसाठी आक्रंदत आहे त्याच्या एक टक्का तरी माझा राजवर हक्क आहे?

मनामध्ये राज बरोबरचा हा सहवास क्षणभंगुर आहे आणि काही दिवसांनी राज परत आपल्यापासुन दुर (?) जाणार आहे ह्याची खंत/टोचणी लागुन आहे आणि त्यामुळे त्याच्याबरोबर मिळणारा प्रत्येक क्षण मला जगायचा आहे.

२५ फेब्रुवारी
सुरेख वातावरणाने मनावर आलेली मरगळं कुठल्या कुठे निघुन गेली होती. आज माहीतेय मी पहिल्यांदा बाईक चालवली. रस्ता चांगला होता आणि राज मागेच लागला ‘चालव, चालव’ म्हणुन. शंभरवेळा गेअर बदलताना बाईक बंद पडली पण शेवटी जमवली कशी तरी. खुप मज्जा आली. इतकी हसले आहे मी आज.

संध्याकाळी सर्व जण उबदार शेकोटी भोवती गप्पा मारत बसलेले असताना मला राहुन राहुन असं वाटत होतं की राज माझ्याकडे बघतो आहे, परंतु माझी त्याच्याकडे बघायची हिम्मतच नाही झाली. आणि हे एकदा नाही तर दोन-तिनदा मला जाणवलं, एकदा तर माझी आणि त्याची नजरानजर सुध्दा झाली होती. मला खात्री आहे की राज अधुन-मधुन माझ्याकडे बघत असतो.. नक्कीच.. “आय नो, इट्स नॉट माय इमाजीनेशन”

मला असं का वाट

२६ फेब्रुवारी
काल डायरी लिहीताना मी इतकी गुंग होऊन गेले होते आणि अचानक माझ्यामागे कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली म्हणुन मागे वळुन पाहीलं तेंव्हा राज उभा होता. तिच नेहमीची स्टाईल, निळ्या वॉश्ड रंगाचे जर्किन, त्यातुन डोकावणारा व्हॅनीला-व्हाईट रंगाचा शर्ट, एक कॉलर किंचीतशी वर गेलेली, खिश्यामध्ये हात आणि चेहऱ्यावर मिश्किल हास्य. त्याला बघताच मी डायरी खाडकन बंद केली. ‘मुर्ख आहेस का तु?’ स्वतःलाच जोरात ओरडले मी मनाशीच. इतकी घाबरले मी त्याला बघताच. ‘आय जस्ट होप की त्याने काही वाचले नसावे’. कधी कधी कुठल्या तंद्रीत असते मी मलाच कळत नाही.

सकाळी ग्रुप मधली एक जण विचारत होती, ‘बोथ ऑफ यु टुगेदर? कपल?’ आणि मी कसनुस हसुन उत्तर दिलं.. ‘नो.. जस्ट गुड फ्रेंड्स’

काल अर्धवट सोडलेली डायरी पुढे लिहीन म्हणलं.. पण काय लिहीत होते तेच लक्षात येईना.

असो, त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला त्याच्याबद्दल वाटणारी ओढ आधीकच वाढवत
आहे. हातातुन निसटुन गेलेला प्रत्येक क्षण मनाला तो लवकरच दुर होणार आहे ह्या विचाराने अनंत यातना देत आहे. मला लवकरात लवकर काही तरी केले पाहीजे.. पण काय? नशीबाने राजला पुन्हा एकदा माझ्यासमोर आणुन उभे केले आहे यावेळेला मी काही केले नाही तर.. तर कदाचीत, कदाचीत?? मलाच माहीत नाही तर काय होईल.

मी वेडी होईन? ती तर मी आधीच झाले आहे!, मग कदाचीत मरुन जाईन?? पण छे.. असं कुणाच्या आठवणीने कुणी कधी मरतं का? काय होईल माझं मलाचं माहीत नाही, पण जे होईल ते नक्कीच चांगलं नसेल.

मी ठरवलं आहे. मी एकदा तरी प्रयत्न करीन. राजला ह्याची पुसटशी का होईना जाणीव करुन देइन की तो मला आवडत होता आणि अजुनही तितकाच आवडतो.

“टु लेट समवन नो यु लव्ह हिम इज टु टेल हिम”, वाक्य साधं सोपं.. पण जमेल मला ते?? कदाचीत येणारा काळच ठरवेल..

२७ फेब्रुवारी
आज मी जास्ती काही लिहीणार नाही, लिहुच शकत नाही. आजची संध्याकाळ मनावर कायमचीच कोरली गेली आहे, पण ती कागदावर उतरवली तर कदाचीत.. कदाचीत, पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल म्हणुन त्या धुंदीतच डायरी पुढे ओढली.

कॅंम्पचा उद्या शेवटचा दिवस. आजचा बेस कॅंम्प पॅंगॉंग लेक पाशी होता. सर्व जणं निशब्द होते. अवर्णनीय. प्रत्येकजण आपल्याच विश्वात हरवला होता. राज आणि मी आम्ही दोघंही तळ्यात पाय सोडुन बसलो होतो. राजच्या हाताला जाणुन बुजुन स्पर्श करायचा, मी ठरवलेच होते. ह्रुदय खुप धडधडत होते. त्या शांततेत धडकण्याचा आवाज राजला ऐकु जाईल की काय अशी उगाचच भिती वाटत होती. हाताची बोटं उघड बंद होत होती, त्या थंड वातावरणातही कपाळावर घर्मबिंदु जमा झाले होते. छातीवर प्रचंड ओझं जाणवत होते. शेवटी घट्ट डोळे मिटुन घेतले आणि हळुवारपणे हात त्याच्या हातावर ठेवला. माझ्या अचानक स्पर्शाने त्याचे दचकणे माझ्या हाताला जाणवले होते पण त्याच्या चेहऱ्यावरील हाव-भाव बघायची मला हिम्मत होत नव्हती. मी अजुनही डोळे गच्च बंद करुन बसले होते.

माझा हात त्याच्या हातावरच होता, काही क्षण आणि नंतर त्याच्या मजबुत, तरीही हळुवार पकडीमध्ये तो समावुन गेला. मी डोळे बंद करुन ते क्षण अनुभवत होते. तो अनुभव खराच होता का? का तो केवळ मनाचा एक खेळ होता? स्वतःचे केलेले एक सांत्वन होते? मला माहीत नाही. आणि माहीत करुन घ्यायची इच्छाही नव्हती. त्या स्वप्नील सुखात मला आकंठ बुडुन जायचे होते आणि मी तेच केले होते.

थंडगार वाऱ्याने अंगावर रोमांच उभे केले होते. ह्रदयाची अजुनही धडधड चालुच होती. हा अनुभव खराच आहे का? माझा तेंव्हाही विश्वास बसला नव्हता आणि अजुनही बसत नाहीये.

कुणाच्यातरी गाडीच्या आवाजाने माझी स्वर्गीय तंद्री भंगली. मी त्याच्याकडे न बघताच माघारी वळले.

[क्रमशः]