Mehendichya Panaver - 7 books and stories free download online pdf in Marathi

मेहंदीच्या पानावर (भाग-७)

’तुझी गाडी राहु देत इथे, चल माझ्याबरोबर, जरा चक्कर मारुन येऊ’, असे म्हणुन राज त्याच्या गाडीत शिरला, मी सुध्दा त्याच्या मागोमाग गाडीत जाउन बसले.

राजने गाडी परत गावात न घेता घाटातुन वर न्हेली. बर्‍याच वेळ वर वर गेल्यावर राजने त्याची गाडी एका लांब.. मोकळ्या पठारावर उभी केली.

तेथुन खालच्या गावातील प्रखर दिवे सुध्दा छान मंद, अंधुक भासत होते. आसमंत कसल्याश्या सुगंधाने भरुन गेला होता. थंडगार वार्‍याने अंग अंग मोकळं झाल्यासारखे वाटत होते. मी केसांना बांधलेली रिबीन काढुन टाकली आणि इतक्यावेळ आकसुन बसलेले केस वार्‍याच्या झुळकीबरोबर उडु लागले. मनावर बसलेली वैचारीक धुळ सुध्दा उडुन गेली आणि एकदम हलकं हलकं वाटायला लागलं.

एक मोठ्ठा उसासा घेतला आणि मनावर उरले सुरलेले ओझे नकळत गळुन पडले.

आम्ही दोघंही गाडीच्या बॉनेटला टेकुन खालुन वहाणार्‍या दिव्यांच्या माळेकडे बघत होतो.

कुठुन सुरुवात करावी ह्याचा विचार करत असतानाच माझे लक्ष शेजारच्या झाडीकडे गेले. मी संथपणे चालत त्या झाडीपाशी गेले. माझी खात्री आहे राज माझ्याकडेच बघत होता. मी स्वतःला पुर्ण मोकळं सोडुन दिले होते.. एखाद्या पिसासारखे. त्या झाडाची काही पान तोडली आणि परत राजपाशी येउन उभी राहीले. त्या झाडाची पानं हातावर चुरगळली आणि तो सुगंध श्वासाबरोबर मनामध्ये भरुन घेतला आणि मग राजला म्हणाले..

’राज तुला माहीत आहे ही कसली पानं आहेत?’

राजने नाही म्हणत मान डोलावली.
मी माझे दोन्ही हात पुढे केले. हाताच्या ओंजळीमध्ये अजुनही पानांचा चुरा तस्साच होता. राजने त्याचा चेहरा माझ्या तळहातांवर टेकवुन तो सुगंध घेतला.

’राज, ही मेहंदीची पानं आहेत. ह्या माळरानावर कदाचीत त्याची किंमत शेळ्यामेंढ्यांना खाण्यासाठी असेल पण जेंव्हा ह्याच पानांची मेहंदी तयार होते आणि ती मेहेंदी एखाद्या नववधूच्या हातावर नटुन, सजुन बसते तेंव्हा त्याची किंमत अमोल असते.’

’प्रत्येक मुलीचे स्वप्न असते अश्या रंगलेल्या मेहंदीने लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्याचे. ती मेहंदी खुप रंगावी आणि इतरांनी त्या लालभडक रंगाकडे पहात ’खुपच प्रेम दिसतेय बाबा नवरोबांचे’ म्हणत त्यांच्या नात्यातील प्रेमावर साज चढवावा हे एक मनाशी जपलेले स्वप्न असते. सगळ्यांचे असते, माझे ही आहे. आणि त्याबद्दलच मला तुझ्याशी बोलायचे आहे.. कुठलेही आढे वेढे न घेता, कुठलीही गोष्ट लपवुन न ठेवता..’

’राज.. आय.. आय.. लव्ह यु राज..!!’
माझी मान अजुनही खालीच झुकलेली होती. मी फक्त डोळे वर करुन पाहीले, राज माझ्याकडेच बघत होता. मी नजर पुन्हा जमीनीकडे फिरवली आणि पुढे बोलु लागले..

’तुला माहीती आहे राज, मी स्टुडीओ सोडुन सिमल्याला का निघुन गेले? त्या दिवशी तु आणि निधी.. मला ते सहन नाही झाले. मी तुला माझ्यासमोर दुसरीबरोबर फिरताना पाहु शकत नव्हते. मला माहीती आहे राज, मीच काय माझ्यासारख्या कित्तेक जणींना तु आवडतोस. तुला कोण आवडावं हा तुझा वैयक्तीक प्रश्न आहे. पण माझ्या मनाला हे समजत नाही नं. म्हणुनच मी इथुन निघुन गेले.

मी खुप वाईट्ट आहे का राज? तु खुश आहेस हे पाहुन मी खुश व्हायला हवे होते का? कदाचीत मला ते जमलं नसतं.

पण नशीबाने पुन्हा तुझी आणि माझी भेट घडवुन आणली. तुझ्याबरोबर घालवलेले ते काही दिवस खुप्पच सुखाचे होते. काही क्षण तर खरंच इंटेन्स होते. असो. पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पहिल्यासारखे मी माझ्या मनाला नाही समजवु शकले आणि मी पुन्हा एकदा इथे आले.

मला तुझ्या आणि निधीच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही करायची राज. तुम्ही दोघं सुखी आहात आणि कायमचं सुखी रहावं अस्संच मला वाटतं. पण त्यापुर्वी माझ्या मनातले तुला सांगावेसे वाटले आणि म्हणुनच..’

पुढचे शब्द मी बोलु नाही शकले. नजर अचानक अंधुक झाल्यासारखी वाटली. त्या थंडगार वार्‍यात गालांवरुन ओघळलेले अश्रुंचे दोन गरम थेंब अंगावर शहारा आणुन गेले.

एव्हाना राज माझ्या समोर येउन उभा राहीला होता. मी केंव्हापासुन हातातल्या बांगड्यांशी दुसर्‍या हाताने गोल गोल फिरवण्याचे उद्योग करत होते. त्याने माझ्या हातांचे नकळत चाललेले हे खेळ थांबवले. माझे दोन्ही हात त्याने आपल्या हातात घेतले.

मी वर त्याच्या चेहर्‍याकडे पहाण्याचा प्रयत्न केला, पण त्या निळसर अंधारात मला फक्त त्याची आकृतीच दिसत होती. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव टिपणे केवळ अशक्य होते. पण त्याचा स्पर्श, त्यातील उबदारपणा, कदाचीत आपलेपणा मला जाणवत होता. तो काही तरी बोलेल म्हणुन माझे कान आसुसले होते. पण तो काहीच बोलला नाही. मी स्वतःला थांबवु नाही शकले आणि त्याला घट्ट मिठी मारली. इतकी घट्ट की त्या क्षणी तरी निदान मला त्याच्यापासुन कुणीच दुर करु शकले नसते. त्याने त्याचे हात हळुवारपणे माझ्याभोवती गुंफुन टाकले.

त्याच्या त्या मिठीमध्ये एक प्रकारचा आश्वासकपणा होता, आपलेपणा होता, नविन नात्याची एक मुहुर्तवेढ होती. माझे शरीर आणि मन पिसासारखे हलके झाले होते. आजुबाजुचा सर्व परीसर धुसर होत होत जणु नाहीसाच झाला होता. त्याच्या छातीतील धडधड मला स्पष्टपणे ऐकु येत होती. हीच ती जागा होती जेथे मला माझे स्थान हवे होते.. किंबहुना मी ते आता मिळवले होते. माझा हात आपसुकच त्याच्या हृदयावर जाऊन स्थिरावला. मी अलगदपणे डोळे मिटुन घेतले. माझा हात त्याच्या छातीवरुन अलगदपणे फिरत होता आणि अचानक माझ्या हाताला काही तरी टोचले. राज सुध्दा अचानक त्या सुखद तंद्रीतुन जागा झाला.

मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहीले. त्याने शर्टच्या आतुन त्याच्या गळ्यातील लॉकेट बाहेर काढले. सोनेरी रंगाचे, हृदयाच्या आकाराचे नक्षीदार असे खुपच गोड असे ते लॉकेट होते. मी अलगदपणे ते हातामध्ये घेतले त्याच्या पुढच्या बाजुला ’विथ लव्ह- निधी’ असं लिहीलेले होते. क्षणभर जोरात चटका बसावा तसं मी ते लॉकेट हातातुन सोडुन दिले.

राजची मिठीची पकड आता ढिली झाली होती. मी अलगदपणे बाजुला झाले. त्याच्या त्या स्पर्शातील भावना जणु काही बदलली होती. आम्हा दोघांनाही नकळतपणे निधीची इथे नसुनही अस्तीत्वाची जाणीव झाली होती. शेवटी काहीही झाले तरी त्या दोघांचा साखरपुडा झालेला होता.

’चल, जाऊ यात आपण, उशीर झालाय..’ असं म्हणुन राज झपझप त्याच्या कारकडे निघुन गेला, मी सुध्दा त्याच्या मागोमाग निघुन गेले.

गाडीमध्ये कोणीच कोणाशी बोलले नाही, माझं मन मात्र मलाच इतकं दुषणं देत होतं.. काय गरज होती? कश्याला ते लॉकेट बाहेर काढलंस.. राज तुझाच झाला होता.. फक्त तुझाच..

२३ मार्च
आयुष्याने मांडलेला हा ’सि-सॉ’ चा खेळ डोईजड होत चालला आहे. सकाळी जाग आली तेंव्हा फार मोठ्ठा प्रवास करुन आल्यावर जस्सा थकवा येतो ना तस्साच आला होता.

काल संध्याकाळच्या धावपळीत घरातला पसारा तस्साच पडला होता. घरातली शांतता खायला उठली होती म्हणुन शेवटी एफ.एम.. चालु केला. रेडीओवर गाणं चालु होतं

“हम तेरे बिन कही रहे नही पा ते
तुम नही आते तो हम मर जाते..
प्यार क्या चीज है ये जान नही पाते..”

आयरॉनीकली, असं वाटलं, ’तुम आये इसीलीये तो…’ राज नसता आला आयुष्यात तर खरंच सुखी होते, पण त्याचं असणं आणि असुनही नसणं फारच असह्य होत होते.

“….तुम्हे प्यार करनेको जी करता है, इकरार करने को जी करता है..“.. रेडीओवरचे ते रडगाणे चालुच होते, शेवटी बदलुन टाकले. ह्या रेडीओवाल्यांना काय सिक्थ सेन्स असतो का, त्या त्या वेळेला तिच कशी काय बाबा गाणी लावतात?

विचार करतच होते तेवढ्यात मॅन्डी नावाचं वादळ येऊन धडकले. चेहर्‍यावरुन उत्सुकता अगदी ओसंडुन वाहात होती तिच्या, पण माझा अवतार पाहुन ती काय समजायची ते समजली असावी.

दुपारी जबरदस्तीने मला तिच्या घरीच घेऊन गेली जेवायला. आशुलापण बोलावले होते. मॅन्डीच्या आईने तर आधी मला ओळखलेच नाही..’काय गं?’ म्हणे.. ’आजारी आहेस की काय?’ पण मॅन्डीने कसेबसे टाळले. जेवण पण आम्ही मॅन्डीच्या खोलीतच घेतले.

दुपारी आमचे ’ऑल टाईम फेव्हरेट’ ’पोपाय आणि त्याची गर्लफ्रेंड ऑलीव्ह’ चे कार्टुन लागले होते. सॉलीड हसलो आम्ही, मस्त वेळ गेला. घरी जाताना काकु पुन्हा एकदा माझ्याकडे अश्या विचीत्र नजरेने बघत होत्या. फारच ऑकवर्ड झाले, मी आपली नजर टाळत तेथुन सटकले.

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय