Gharat parat roshni aali books and stories free download online pdf in Marathi

घरात परत रोशनी आली

मे महिन्याचे दिवस. संध्याकाळी ५-६ च्या दरम्यानची वेळ . नुकतेच बाहेरून आल्यामुळे प्रचंड गरम होत होते म्हणून आल्याआल्या दारे खिडक्या बंद करून एसी ऑन केला आणि सोफ्यावर रिलॅक्स झालो. थोड्या वेळात माझी बायको स्वप्ना म्हणाली… कुठून तरी बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय… पण मी दुर्लक्ष केले. पण थोड्या वेळात ती पुन्हा तेच म्हणाली. मी म्हटले बाजुला देवळात कोणीतरी लहान मुल घेऊन आले असेल ते रडत असेल – जाऊ दे पण ती अस्वस्थ झाली. बाहेर जाऊन बघितले तर देवळात शांतता होती. मग आवाजाचा कानोसा घेत ती मागच्या दारी गेली तर शेजारील चाळीच्या बंद दारातून लहान मुल रडत असल्याचे निष्पन्न झाले. आता तिच्यातली आई जागृत झाली. त्या घरापाशी जाऊन पाहिले तर दाराला बाहेरुन कुलुप होते. शेजार पाजारी चौकशी केल्यावर समजले की तेथे एक उत्तर भारतीय कुटुंब नव्याने वास्तव्यास आले आहे. ती व्यक्ती संध्याकाळी एका स्वीटस् दुकानात चाट भांडार सांभाळते तर त्याची बायको पाश्चिम विभागात स्वतःची चाटची गाडी लावते व रोज जाताना दीड वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन जाते आणि सहा महिन्याच्या मुलीला घरी झोपवून जाते. आता त्या मुलीचा रडण्याचा आवाज वाढू लागला तसे स्वप्नाने पोरांना स्वीटस् वाल्याकडे पाठवले. परंतू त्या व्यक्तीने उलट निरोप धाडला… अभी भिड है मै नही आ सकता… आप मेरी बिवी को बुला लो. तिला गाडीवर निरोप धाडला तर ती ही गिऱ्हाईक संपले की येतेच असं म्हणाली. इकडे आता त्या मुलीचा रडण्याचा आवाज कोंडल्यागत येऊ लागला आणि स्वप्नाचा संयम तुटला. अगदी माझ्यासकट कोणी पुढाकार घेत नाही म्हटल्यावर तिने घरातून बत्ता आणून कुलुप तोडायला सुरवात केली तसे आम्ही काही जण मदतीस गेलो. कुलुप तोडून दार उघडले तर छताचा पत्रा तापलेल्या खोलीत टेबल फॅनसमोर जमिनीवर पसरलेल्या चादरीवर एक चिमुकली घामाघूम… लालेलाल होऊन रडून-रडून थकून गेली होती. स्वप्नाने तिला उचलले व दाराला कडी आणि तुटके कुलुप अडकवून आम्ही तिला घेऊन घरी आलो. एसीची थंड हवा आणि मायेची उब मिळताच ती मुलगीही शांत झाली. थोड्या वेळाने त्या घरातून आरडा-ओरडा व रडण्याचा आवाज आला तेव्हा स्वप्ना परत गेली तर तिची आई माझी मुलगी कुणीतरी नेली म्हणून रडत होती व तिचा नवराही तेथे कावरा बावरा बसला होता. स्वप्नाने त्याही अवस्थेत दोघांना झाप-झाप झापलं व परत जर ही वेळ आली तर मुलगी परत मिळणार नाही असा सज्जड दमदेखील भरला. त्या दोघांनीही क्षमा मागितली आणि त्यानंतर आम्ही रोशनीला त्यांच्याकडे देऊन आलो.

पण त्या दिवसानंतर रोशनी रोज संध्याकाळी ५ वाजले की आमच्या घराकडे पाहून रडायला सुरवात करते. आमच्या चौघांपैकी कोणातरी एकाला जाऊन तिला घरी घेऊन यावेच लागते. मग रात्री झोपल्यावरच बाईसाहेबांना घरी पोहचवण्यात येत. एरवी तिच्या आईनेही हाका मारल्या तरी ती जात नाही व जबरदस्ती नेलेच तर रडून गोंधळ घालते. अगदी संध्याकाळी आम्हाला कुठे जायचेच असले तर आता तिलाही बरोबर न्यावे लागते. गंमत म्हणजे माझी मुलगी अदितीला लहान मुलांची आवड तर सोडा… प्रचंड चीड यायची. पण ती घरी आली की रोशनी तिच्याकडे बघून खूप हसायची व दोन्ही हात वर करून घे म्हणायची. सुरवातीला टाळले तरी आता मात्र दोघींची चांगलीच गट्टी जमली आहे.

मधे हे कुटुंब महिनाभरासाठी गावी गेले होते. पण तिथे रोशनी आजारी पडली. ती रोज संध्याकाळी रडून तुमची आठवण काढायची असे तिच्या आईने सांगितले. त्यामुळे ते १५ दिवसांतच परत आले. परतल्यावर घरी जायचे सोडून रोशनीने आमचे घर गाठले. आता ती दर संध्याकाळ पुरती आमची लेक आहे घरात परत रोशनी आली….!


इतर रसदार पर्याय