ती एक शापिता! - 16 Nagesh S Shewalkar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती एक शापिता! - 16

ती एक शापिता!

(१६)

सायंकाळची वेळ होती. अशोक नुकताच बँकेतून आला होता. नेहमीप्रमाणे तो हातपाय धुवून तयार होत असताना बाहेरून पीयूषचा आवाज आला,

"अशोक... अशोक.."

"काय रे? आलो. आलो. अग, मी बाहेर जाऊन येतो..." माधवीला सांगून तिच्या उत्तराची प्रतिक्षा न करता आणि तिच्याकडे न बघता अशोक बाहेर पडला. त्याला पाहताच पीयूष ओरडला,

"आशक्या, अबे, लक लागलं. नशीब फळफळलं रे."

"अरे, पण झाले काय?"

"काकदृष्टी हे आपले वर्तमानपत्र पंधरा दिवसात बाहेर पडणार."

"पंधरा दिवसात? काय लॉटरी लागली की काय रे?"

"होय. तसेच समज. आपले पालकमंत्री आहेत ना, ते वर्तमानपत्र काढत आहेत. मी सुचवलेले काकदृष्टी हेच नाव त्यांना आवडले आणि त्यांनी निवडले. मुख्य संपादक म्हणून माझी नेमणूक झाली आहे."

"व्वा! व्वाह! क्या बात है। त्रिवार अभिनंदन! तुझ्या तपश्चर्येला फळ आलं. खूपच आनंद झाला."

"पण जबाबदारी वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे साहेबांशी पटायला हवे. कसे आहे, आजकाल वर्तमानपत्र काढणे ही एक फॅशनच झाली आहे. राजकारणी स्वतःचे वर्तमानपत्र काढतात. त्यातून विरोधकांवर तुफान हल्ले चढवतात, स्वतःचा उदोउदो, गोडवे गाऊन घेतात. एखादा पत्रकार हाताशी धरून त्याच्या लेखणीचा वापर स्वतःसाठी करून घेतात."

"हे बघ, आत्ताच नकारात्मक विचार करू नकोस. बरे, मीता काय म्हणते?"

"ती काय म्हणणार? आज प्रथमच आनंदी आहे..." बोलत बोलत दोघे नेहमीच्या ठिकाणी आले. खिशातून कागद, पेन काढून पीयूष म्हणाला,

"पाच मिनिटे हं. लेख लिहायचा आहे... हनिमूनवर! पॉईंट काढतो लगेच.." असे म्हणत पीयूष पटापट लिहू लागला आणि अशोक तिथल्या मऊशार, लुसलुशीत गवतावर कलंडला परंतु हनिमून या शब्दाने त्याच्या डोक्यात थैमान घातले....

त्यादिवशी सकाळी अशोकचे मूल माझ्या पोटात वाढतेय हे माधवीने विनासंकोचपणे सांगितले आणि अशोकसह सुबोध-सुहासिनी आश्चर्यचकित झाले. त्याची बाजू कुणी ऐकूनच घ्यायला तयार नव्हते कारण कोणतीही मुलगी असे खोटे बोलणार नाही यावर सर्वांचा विश्वास होता. त्यामुळे सुबोधने पुढाकार घेऊन पीयूष-मीता यांच्यासह अशोक-माधवी हे दोन्ही विवाह विशेष गाजावाजा न करता नोंदणी पद्धतीने लावून दिले.

त्याचदिवशी रात्री तो क्षण आला. ज्यासाठी निसर्गाने स्त्री-पुरुष ह्या जाती निर्माण केल्या. विवाहानंतर नवरा-बायको आतुरतेने वाट पाहतात तो क्षण म्हणजे मधुचंद्र! अशोक- माधवीच्या मधुचंद्राची रात्र उजाडली. अशोकची खोली आकर्षकरीतीने सजविण्यात आली होती. रात्री माधवी त्या खोलीत अशोकची वाट पाहत बसली होती. अशोक खोलीत आल्याची चाहूल लागूनही माधवी पलंगावर पडून राहिली. अशोककडे लक्ष नाही असे दाखवत ती छतावर फिरणाऱ्या पंख्याकडे पाहू लागली. अशोकने खोलीचे दार लावले आणि तो हलकेच पलंगाच्या दिशेने निघाला. ते तितकेसे अंतर कापतानाही त्याला धाप लागली. चेहरा घामाने डबडबला. ह्रदयाची स्पंदने वाढली. घशाला कोरड पडल्याची तीव्र जाणीव झाली. पलंगाच्याशेजारी ठेवलेल्या पाण्याच्या प्याल्यातले पाणी पिऊन तो हलकेच पलंगाच्या काठावर बसला. त्याचे लक्ष माधवीकडे गेले. सजलेली माधवी खुपच सुंदर दिसत होती. शरीराची गोलाई नजरेत भरत होती. तिच्या सौंदर्याच्या दर्शनाने शरीरातील रक्त प्रवाह गरम झाला असल्याचे त्याला जाणवले. तो तिच्या लावण्याचे निरीक्षण करीत असताना माधवीने त्याच्याकडे पाहिले आणि चोरी पकडल्याप्रमाणे त्याने पटकन नजर खाली वळवली. काही क्षणच पाहिले असले तरीही त्यामुळे त्याला वेडावलं होतं, त्याच्यातल्या धाडसाला जागं केलं होतं तो पुन्हा तिच्या शरीराकडे लालसेने पाहत असतानाच त्याला काही तरी आठवले. त्याच्या शरीरातील रक्तप्रवाह थंडावला. अचानक त्याने विचारले,

"कुणाची वाट पाहतेस?"

"कुणाची म्हणजे?" माधवीने असमंजसपणे विचारले.

"नाही म्हटलं ज्याचं बाळ पोटात आहे तो येणार असेल ना?"

"हो..हो.. तोच.. तोच आलाय ना आणि डोळे फाडून माझ्या शरीराचे..."

"माधवी, खोटे बोलू नकोस. खरे सांग कुणाचे पाप..."

"कुणाचे म्हणजे? तुझेच..."

"माधवी, त्यासाठी आपली शरीरं एक व्हायला हवीत ना?"

"अय्या ! खरेच की! मी तर विसरलेच की. तू आणि मी यापूर्वी कधीच एकत्र आलो नाहीत का? मग कोण असेल बुवा..." माधवी नाटकीय अंदाजाने म्हणाली.

"आठव.. आठव ना, कोण आहे तो?" असे म्हणत अशोकने दुसरीकडे चेहरा वळवला. तशी माधवी उठली. त्याच्या पाठीला मिठी मारून गळ्यात हात टाकून म्हणाली,

"अशोक, माझ्या राजा, रागावलास? अरे, गंमत होती ती. खरेच रे."

"पण का...का...तशी वागलीस?"

"या. या. राजपुत्राला मिळविण्यासाठी. तुझ्या घरासमोर राहायला आल्यापासून तू मला आवडायला लागला होता. नकळत मी तुझ्या प्रेमात पडले. तू प्रेमाचे तर सोड पण कधी माझ्याकडे बघायचेही कष्ट घेतले नाहीस. नंतर मीच पुढाकार घेतला. तुझ्याकडे पाहून हसू लागले, तुला खुणावू लागले पण कशाचाही तुझ्यावर परिणाम होत नव्हता. तुझे लक्ष माझ्याकडे खेचून घेण्यासाठी मी कमी पडले. मग मीही जिद्दीला पेटले आणि प्रतिज्ञाच केली की, लग्न करेल तर या श्यामळूशी, लाजाळूशीच. पण मी ते सांगणार कुणाला आणि कसे? कितीही धाडसी असले तरीही तुझी साथ नसताना मी सांगू कशी? तुझी साथ असती तर डंक्यावर ओरडून जगाला सांगितले असते पण हे माझे दैवत, सर्वस्व मला कौल देत नव्हते. मी तरुण होते. गरीब शिक्षकाची मुलगी होते. ते मला किती दिवस घरात ठेवणार ना? त्यांनी मला स्थळं पाहायला सुरुवात केली. तितक्यात मला पीयूष भेटला. हं...हंं... थांब. गैरसमज नको. त्यानेच मला 'गर्भवती' चे नाटक करायचा सल्ला दिला. पीयूषचे तुझ्यासोबत आणि तुझ्या घरच्यांसोबत असलेले संबंध लक्षात घेऊन मी धीट झाले. योगायोगाने त्याचे मीताशी जमलेच होते. तू हवं तर पीयूषला विचारु शकतोस. तो तुझा खास मित्र आहे. त्याच्यावर तर नक्कीच तुझा विश्वास असेल..."

"म..म.. म्हणजे तू ..तू..."

"नाही. मी गर्भवती नाही. याक्षणापर्यंत तरी कुमारी आहे. काही क्षणानंतर कदाचित... हवे तर उद्या वैद्यकीय तपासणी..."

"त्याची गरज नाही..." असे म्हणत अशोकने माधवीला मिठीत घेतले. दोघांचेही हात एकमेकांच्या शरीरावर फिरत असताना तो अचानक बाजूला झाला आणि तिच्या शरीराकडे, त्या सुंदर शिल्पाकृती सौंदर्याकडे नुसताच पाहत राहिला. पुढे काही करायचे हेही तो विसरून गेला. त्या सौंदर्याचे नखशिखान्त निरीक्षण करताना तो पलंगावर कलंडला आणि दुसऱ्याच क्षणी स्वाधीन झाला.. मिठीत शिरला...झोपेच्या! पुरुषाच्या पहिल्या वहिल्या स्पर्शाने वेडावलेली, शहारलेली माधवी त्याचे ते वागणे पाहून भांबावली. तिला काय करावे ते सुचेनासे झाले. शरीर वेगळेच काही तरी मागत होते, तो शेजारी असूनही तिला ते मिळत नव्हते तिची अवस्था..'धरण उशाला, कोरड घशाला!' अशी झाली. काही क्षण वाट पाहून तीही तळमळत, तडफडत अशोकच्या शेजारी पहुडली पण तिला झोप येत नव्हती. रात्री एक-दोन वेळा चुळबूळ करणाऱ्या अशोकला तिने स्वतः पुढाकार घेऊन मिठीत घेतले. त्याच्यामध्ये ती चेतना, ती भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला. ती यशस्वी होतेय असे लक्षात येताच ती आनंदली पण दुसऱ्या क्षणी हिरमुसली. कारण अशोक बाजूला झाला होता. 'का झाले असे? कदाचित त्याला अनुभव नसेल. कारण त्याच्या एकूण हालचाली तो अनुभवशून्य असल्याचेच जाणवत होते. होईल. एक- दोन दिवसात सारे व्यवस्थित होईल. अपयश ही यशाची पहिली पायरी...' या आशेवर ती वरवर शांतपणे पण आतल्या आत तळमळत पडून राहिली...

अशोक! तो तरी कुठे शांत झोपला होता? तोही तळमळत होता. दुःखी झाला होता. त्याला समजत नव्हते तसे का झाले. विचारांच्या गर्तेत सापडलेल्या अशोकला अचानक काही तरी आठवले. त्याला त्याच्या परिस्थितीचे कारण सापडले. त्याला आठवले की त्याला एकच किडनी आहे. तीही दान म्हणून मिळालेली. कुठेतरी वाचले होते की, 'एक किडनी असलेला पुरुष आपल्या पत्नीला लैंगिकदृष्ट्या समाधान देण्यासाठी असमर्थ असतो. पत्नीला पूर्ण तृप्ती देऊ शकत नाही. ते आठवताच अशोक मनाशीच दुःखी झाला. घरात कुणाला विचारावे तर भलताच अर्थ काढतील. पीयूषला विचारावे तर त्याला तरी काय माहिती? बरे जे वाचले ते तरी खरे कशावरून? त्यातली सत्यता कशी पडताळून पहावी?' अशा विचारात असताना अशोकलाही झोप लागली...

"अशोक... अरे, अशोक, चल बाबा. झाला बघ हनिमूनवरील लेख तयार. सॉरी यार! आज तुझ्याशी गप्पा मारता नाही आल्या. आता लवकर निघावे लागेल. मीता वाट पहात असेल. आई गेलीय गावाला तेव्हा रात्र आमचीच. चल. चल. पटकन. कधी एकदा घरी जातोय. असे झालेय."

पीयूष म्हणाला आणि ते दोघे घरी निघाले...

अशोक घरी परतला तेव्हा सुहासिनी-माधवी या सासू-सुनेचं चांगलंच बिनसलेलं दिसत होतं. कारण तसे शुल्लक होते. सायंकाळचा स्वयंपाक करायचा म्हणजे काय तर फक्त वरणाला फोडणी घालायची होती. सुहासिनीने माधवीला सांगितले परंतु 'डोकं दुखतं' म्हणून माधवी खोलीत जाऊन झोपली. तणतणत सुहासिनी वरणाला फोडणी देत असताना बाहेरून आलेल्या सुबोधने विचारले,

"का ग, तू स्वयंपाक करतेस? माधवी..."

"झोपल्यात महाराणी! दिवसभर ऑफिसात काम करून अंग कसं आंबून जाते, आकसते."

"मी काही मुद्दाम झोपले नाही. मी नाटकही करीत नाही. घरी राहतेय म्हणजे दिवसभर झोप नाही काढत." तणतणत आलेली माधवी म्हणाली.

"बस झालं गं बाई! पुरे झाले. एक शब्द..."

"एक शब्द तरी का सहन करावा? मीही माणूस आहे. उठल्यापासून काम करताना माझंही अंग ताठून जाते... "माधवी प्रत्युत्तर देत असताना अशोक आल्याचे पाहून दोघीही शांत झाल्या परंतु आदळआपट सुरुच होती.

जेवण करून माधवी खोलीत आली. अशोकच्या शेजारी पहुडली परंतु दोघेही शांत होते. पहिल्या रात्रीनंतर दोघे अनेकदा एकत्र आले परंतु क्षण-दोन क्षणातच अशोक माघारी परतत असे. प्रत्येक वेळी सुरुवातीला अशोक माधवीकडे, तिच्या शारीरिक सौंदर्याकडे वेड्यासारखा पाहतच राहायचा. नंतर माधवीने पुढाकार घेतल्यानंतर तिच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा पण लगेच तिला अर्ध्यावर सोडून परतायचा. नंतर तिला तळमळताना पाहून त्याला का कोण जाणे पण एक वेगळाच आनंद मिळत असे. त्यादिवशीही तसेच झाले. माधवी जवळ झोपली आणि वेगळ्याच तिरमिरीत त्याने तिला मिठीत घेतले. काही क्षणातच तिला नैसर्गिक अवस्थेत आणले आणि नेहमीप्रमाणे तो एकटक तिच्या शरीरावर नजर फिरवत असताना तळमळणाऱ्या माधवीने विचारले,

"असे काय पाहतोस?"

"काय म्हणजे? तुझे हे सुंदर शरीर!"

"ते तर रोजच पाहतोस."

"हो. तरीही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. तुला या अवस्थेत मला बघतच बसावेसे वाटते..."

"पण या शरीराला इतर कशाची गरज असते..."

"असेल परंतु मला मात्रं स्त्रियांना अशा अवस्थेत बघायला आवडतं..." अशोक बोलून तर गेला परंतु आपण नको तो बोलून गेलो असल्याची त्याला जाणीव झाली. परंतु माधवीने तोच धागा पकडत विचारले,

"म्हणजे तुझे लग्नापूर्वी अनेक स्त्रियांशी संबंध होते तर."

"नाही. तसे नाही. तसा संबंध येणारी तू एकमेव स्त्री आहेस. पण.. पण.. मी अनेक स्त्रियांना अशाच अवस्थेत पाहिले आहे..."

"क..क..कुणाला?" माधवीने वेगळ्याच संशयाने विचारले.

"अ.. अ... आईला... आ.. आशाला.."

"काय? प्रत्यक्ष आईला आणि बहिणीला?"

"होय. काय होत असे.. पूर्वीच्या घरी आईबाबांना वेगळी खोली नव्हती. आम्ही चौघेही एकाच खोलीत शेजारीच झोपत असू. सुरुवातीला लहान असताना काही समजत नसे परंतु रात्री केव्हा तरी जाग आली की, आईबाबांचा 'रात्रीचा खेळ' समोर दिसत असे. पण .. पण काही क्षणातच बाबा आईपासून दूर होत असत त्यावेळी आई तळमळत असे, स्वतःचे हात..."

"म्हणजे आपल्यासारखीच अवस्था..."

"तसे म्हणायला हरकत नाही. त्यांचे आमच्याकडे लक्ष नसायचे. नंतर आम्ही मोठे होत गेलो. एक अस्वस्थता वाटत असायची, एक हुरहूर वाटायची, तगमग होत असे. आईची अवस्था बघत बघत आशाही स्वतःच्या शरीरावर हात फिरवत असे..."

"अच्छा!अशारीतीने तुला..."

"होय! मला तशी सवय लागली... ती विकृती बनली. पुढे पुढे आशा अमरच्या नादी लागली. भरदिवसा त्यांचे संबंध आमच्या घरी कुणी नसताना रंगत असत. एकदा तब्येत बरोबर नाही म्हणून मी घरी आलो. घराचे दार उघडेच होते. आत येऊन पाहतो तर आशा-अमर चक्क.... नंतर नंतर तर मी मुद्दाम घरी येऊ लागलो..."

"त्यांचा खेळ पाहायला! आले. आले. लक्षात. एक सुंदर शरीर पाहायला मिळते म्हणून..."

"ह... ह... होय!"

"अरे, पण ती तुझी बहीण होती. स्वतःच्या लहान बहिणीला त्या संबंधापासून परावृत्त करायचे सोडून.. तू.. तू... शी! किती घाणेरडी सवय तुला लागली आहे."

"हो. मान्य आहे. परंतु ही समज त्यावेळी नसे की, ती माझी पाठची बहीण आहे. तर एक सुंदर शरीर पाहण्याची लालसा होती. कुणालाही स्पर्श करण्याची इच्छा कधीच झाली नाही. एखादे सुंदर शिल्प पाहावं, आकर्षक मूर्ती पाहावी यादृष्टीने मी त्या शरीराकडे बघत होतो..."

"आणि आताही.. लग्न झाल्यावरही तुझी ती सवय गेली नाही. उलट वाढतेय.."

"हो. त्यावेळी मनामध्ये एक अपराधापणाची भावना होती, चोरीची भावना होती. आपण ते शरीर न्याहाळतोय हे कुणी पाहिले तर हा विचार..."

"आता तुला निरीक्षण करायला हक्काचे शरीर मिळाले आहे. तू तुझी इच्छा, लालसा, विकृती पूर्णपणे भागवून घेतोस परंतु त्याचवेळी...

" मान्य आहे. पण माझी तशी इच्छाच होत नाही. निरीक्षणानंतर काही असते हे मला आठवतच नाही मुळात इच्छा नसल्यामुळे तू पुढाकार घेऊनही तुझ्यासोबत येऊ शकत नाही. तू स्त्री आहेस, तुलाही भावना आहेत, तुझीही इच्छा आहे सारे समजते पण माझी इच्छा होत नसल्यामुळे शरीर साथ देत नाही. मी माझ्या विकृतीच्या हातची कठपुतळी झालोय. मला नाही माहिती मी या चक्रव्यूहातून कधी बाहेर पडेल... पडेल की नाही.." असे म्हणत अशोक कुशीवर वळून डोळे लावून पडला. फार मोठा धक्का बसल्याप्रमाणे माधवीही आसवं गाळीत पडून राहिली...

*****