ती एक शापिता! - 18 Nagesh S Shewalkar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती एक शापिता! - 18

ती एक शापिता!

(१८)

पीयूष सकाळी लवकर उठला. शयनगृहात नजर फिरवत असताना त्याचे लक्ष भिंतीवर लावलेल्या त्याच्या आणि मीताच्या फोटोकडे गेलं. नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर त्यांनी मोठ्या हौसेने तो फोटो काढला होता. त्यावेळी ते दोघे विशेषतः मीत खूप आनंदी दिसत होती. का नाही दिसणार? तिचे ज्याच्यावर प्रेम होते, ज्याच्या धाडसावर, वृत्तपत्रातील बेधडक परंतु अभ्यासू आणि वास्तव लेखनावर जिचं प्रेम होते त्या मीताला तिचा प्रियकर पती म्हणून लाभला होता. पीयूषचे तरी वेगळे काय होते? जिच्या रुपावर भाळून तो प्रेम करीत होता ती प्रेयसी त्याच्या जीवनात पत्नी म्हणून आली होती. सहसा बहुतेक कुटुंबात प्रेमविवाहाला विरोध असतो परंतु त्याबाबतीत पीयूष- मीता भाग्यवान ठरले होते. कारण सुबोधच्या मध्यस्थीने त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम नात्यामध्ये रुपांतरित झाले होते.

लग्नानंतरचे दिवस कसे पंख लावल्याप्रमाणे जाऊ लागले. पीयूष यशापयशाच्या भोवऱ्यात गरगरत होता. दुसरीकडे मीताची खूप प्रगती होत गेली. विविध परीक्षा देऊन त्यात यश मिळवून ती पदोन्नतीच्या पायऱ्या चढत होती. पीयूष वर्तमानपत्रात काम करीत असला तरीही कमाईच्या नावावर शून्य असे. जो काही त्याच्या प्रामाणिकपणाचा पैसा मिळायचा तो सारा समाजकार्य, पत्रकारिता आणि रक्तपेढीत खर्च होत असे. घरी पैसा देण्याचे सोडा परंतु अधूनमधून त्याला मीतापुढे हात पसरावा लागायचा. सुरुवातीला मीताला त्याचे कौतुक वाटायचे परंतु नेहमी तेच तेच घडत गेले. स्वतःच्या तत्त्वापोटी पीयूषला काही वर्तमानपत्रातील नोकरी सोडावी लागली. त्यामुळे सदैव बेकार असणारा पीयूष तिला जड नाही परंतु डाचू लागला. त्याचा प्रामाणिकपणा तिला दंश करु लागला. ती उघडपणे त्याला इतर पत्रकारांप्रमाणे भ्रष्टाचार करायचा सल्ला देऊ लागली. परंतु पीयूष वारंवार स्वतःचीच टेप वाजवत असे. मीता त्याला समजावयाची,

"तुमच्या प्रामाणिकपणाने तुम्हाला काय दिले? हाती झोळीच ना? मला काय मिळाले? वास्तविक पाहता लग्नानंतर पती पत्नीला जगवतो. तिची हौसमौज करतो, शानशौक पुरवितो परंतु तुमच्या पत्रकारितमुळे माझी हौसमौज, शानशौक तर सोडाच परंतु मलाच तुमची हौसमौज पुरवावी लागते..." त्यानंतर दोघांमध्ये वाद होत असत. त्यातून दोघांमध्ये एक संकोच उभा राहत गेला. मीताचे लक्ष नटण्या मुरडण्याकडे जाऊ लागले. न्यायालयात जाताना तिचा थाटमाट, नट्टापट्टा असा असायचा जणू एखादी नटी शुटिंगला जातेय. तिच्या बदलत्या रुपाचा आणि वागण्याचा पीयूष वेगळाच अर्थ लावू लागला. चाळीतले अनेक लोक जे बोलायचे ते त्याच्या कानावर येत असे. अनेक जण म्हणत असत की, मीताची नोकरीत होणारी प्रगती यासाठी ती स्वतःचे शरीर वापरतेय. न्यायालयात कारकूनी करणारी आणि कमाईच्या नावावर बेकार असणाऱ्या पतीच्या पत्नीला एवढा ऐषोराम मिळेलच कसा? अशी चर्चा त्याच्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था चर्चाकार करत असत. त्यामुळे पीयूषच्या मनातही विचार यायचा,

'खरेच तसे असेल का? समाजाचे काय? समाजाला कुणाचे चांगले चाललेले बरे दिसत नाही. कुठे काही चांगले दिसले की, तिथे बिब्बा घालून ती चौकट विस्कटण्यासाठी समाज टपलेला असतो. समाजाचा हात कोण धरणार, त्याचे तोंड कोण बंद करणार? परंतु मीताचे वागणे बदलले आहे हेही खरेच आहे. लग्न झाल्यानंतर सतत माझ्या भोवती भोवती राहणारी मीता आजकाल त्रयस्थपणे वागते आहे. दररोज रात्री कायम जवळ असणारी मीता आता पंधरा-पंधरा दिवस जवळ येत नाही. लग्नाला पाच वर्षे झाली म्हणजे का आम्ही म्हातारे झालो आहोत? उलट अजून बाळाची चाहूल लागली नाही म्हणजे तीही आडकाठी नाही. आमच्या प्रणयात, वागण्यात जो जोश, जोम असावा तो का वाटत नाही? अचानक का लुप्त व्हावा? पावला- पावलांवर मीता का संतापते? तिचे तरी काय चुकले म्हणावे? कोणत्याही तरुण पत्नीच्या ज्या अपेक्षा असतात त्याच मीताच्या असतील ना? तिच्या स्वाभाविक, सहजप्रवृत्तीच्या आड माझा वृथा प्रामाणिकपणा नेहमीच येत गेला. तिच्याच पैशावर मी उड्या मारतो पण मी तरी काय करू? जिथे कुठे माझा जम बसू पाहतोय तिथे काही तरी आडवं येते आणि मग नोकरीवर पाणी सोडावे लागते. माझ्या तत्त्वाला, मनाला भ्रष्टाचार पटत नाही तो स्वीकारण्याचा अट्टाहास का करावा?

काकदृष्टी या वर्तमानपत्राचा संपादक झाल्यानंतर मला माझ्या काही तत्त्वांना तिलांजली द्यावीच लागली. गवाक्ष लिहिताना माझ्या लेखनात जो जोम होता, जे चैतन्य होतं ते सारं काकदृष्टीत गहाण टाकल्यातच जमा आहे. मी माझ्या स्वभावाला मुरड घालत असताना मीताने का तसं स्वैरपणे वागावे? इतरांचे सोडा पण मी.. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी तिला कुणा ना कुणासोबत हॉटेलमध्ये जाताना बघितलं आहे तेव्हा काय वाटलं असेल मला? परंतु नोकरी करणाऱ्या महिलांना तेवढं स्वातंत्र्य द्यावे लागतेच. मी बेकार असल्यामुळे मीतासाठी माझी किंमत कवडीमोल असणार. स्त्रीच्या स्वप्नातला राजकुमार बलदंड असतो परंतु तो जर बेकार असेल आणि पत्नीच्या कमाईवर जगणारा असेल तर मग मात्र तिच्या प्रेमाला ओहोटी लागते. कमावता, श्रीमंत पती कुरुप असला तरी स्त्रीचे त्याच्यावर प्रेम असते. माझ्या मीताचेही तसेच झाले..." विचारांच्या मच्छरदाणीत अडकलेल्या पीयूषच्या कानावर आवाज आला,

"पीयूष... अरे, पिया..." पाठोपाठ आत आलेला अशोक म्हणाला,

"किती सुखी माणूस आहेस रे तू? अरे, आठ वाजेपर्यंत झोपतोस.."

"खरे आहे तुझे. सध्या तरी मी सुखीच आहे."

"म्हणजे? मी नाही समजलो?"

"अरे, मीता आठ दिवसासाठी दौऱ्यावर गेली आहे. बस, मी चहा करतो..." असे म्हणत पीयूष आत गेला. खुर्चीवर बसलेल्या अशोकला वाटले,

'काय वल्ली आहे हा. बायको आठ-आठ दिवस घराबाहेर राहते आणि हा सुखी असल्याचे सांगतो. ह्याला तिचे हे वागणे पटते तरी कसे? पीयूषचे सोडा पण मीताला तरी कसे एकटीला राहावे वाटते? परंतु मी पीयूषच्या संसाराचा विचार का करतो? माझ्या संसाराचे काय? मी स्वतः..."

"काय झाले? कसला विचार करतोस?" चहा घेऊन आलेल्या पीयूषने विचारले,

"तुझाच..." अशोक म्हणाला.

"चला. या जगात एक तरी व्यक्ती माझा विचार करणारी आहे म्हणायची."

"पिया, खरेच कुणाला असे वाटणार नाही की, नेहमी सर्वांना हसविणाऱ्या पीयूषच्या जीवनात आनंद नसेल म्हणून..."

"बरोबर आहे. हलवाई मिठाई खातोच असे नाही किंवा दारु विकणारा दारु पितोच असे नाही तसाच हा प्रकार आहे."

"बरे, ते जाऊ दे. तुझे मालक काय म्हणतात? तुमच्या मागण्या मान्य झाल्या काय?"

"नाही रे. मालक फारच ताणून धरीत आहेत तर कामगारही ऐकायला तयार नाहीत. संपाचे हत्यार उपसावे असे वाटु लागले आहे."

"पण तुला संपात..."

"संपादक असलो तरीही शेवटी कामगार किंवा नोकरच आहे ना. कालपासून आपली भेट नाही. कालच संघटनेची बैठक झाली. अध्यक्षपदी माझी निवड झाली आहे."

"अरे, वा! म्हणजे संपाची सारी सूत्रं तुझ्या हातात आली म्हणायची..."

"तसे नाही रे. मी अध्यक्ष आणि संपादक असलो तरी मला दोघांचेही हित जपताना सत्याची कास धरावी लागणार आहे. मालकासोबत संघर्ष अटळ आहे."

"म्हणजे रे? "

"अध्यक्ष झाल्यानंतर मंत्र्यांनी म्हणजे मालकाने बोलावले होते. अभिनंदन करताना एक गळ... आदेशच दिला म्हण ना... संप मिटवा, कामगार तुमच्या हातात आले आहेत. तुम्ही मला मदत करा मी तुम्हाला मदत करतो. ते मला सरळसरळ विकत घेऊ पाहत होते. मी त्यांच्या चक्रव्यूहात थोडीच अडकणार. थोडीथोडकी नाही तर चक्क सात लाख रुपये देऊ केले होते पण मी ती ऑफर लगेच धुडकावून लावली आणि सरळ संपाची आणि आमरण उपोषणाची नोटीस देऊन बाहेर पडलो."

"त.. त.. तू आमरण उपोषण करणार?" अशोकने आश्चर्याने विचारले.

"होय. त्यात तुला आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? मी मुदत दिलीय. त्या अवधीत त्यांनी मागण्या मान्य केल्या नाहीत तर माझा निर्धार कायम आहे." पीयूष ठामपणे म्हणाला.

"अरे, पण तुझा.."

"जीवही जाऊ शकतो. गेला तर गेला. काय हरकत आहे? कामगारांच्या भल्यासाठी माझे जीवन सार्थकी लागत असेल तर? तसे कसेही माझ्या जीवनात शिल्लक तरी काय आहे?"

"अरे, हा निराशावाद, हे पलायन कशासाठी?"

"नाही. अशोक, नाही. हे ना तर पलायन आहे ना, हा निराशवाद आहे. पण मी खरेच कंटाळलोय."

"मला माहिती आहे. पीयू, माझ्याकडे बघ. माझ्याकडे काय स्थिती आहे? असेल, थोडा फरक असेल. एका अर्थाने आपण समदुःखी..."

"नाही. अशोक, नाही. समदुःखी नाही. अरे, बोलू तरी कसे? माधवी उपाशी, अतृप्त असेल पण तिचे पाऊल वाकडे तर पडलेले नाही..."

"पडले नाही. पण पडणार नाही असेही म्हणता येणार नाही..." अशोक सांगत असताना पीयूषने मध्येच विचारले,

"म्हणजे?"

"अरे, आता माधवी शरीरसुखाच्या बाबतीत आक्रमक आणि कठोर होऊ लागलीय. जाऊ दे. पण तू मात्र संपाबाबत पुन्हा विचार कर. येतो मी." असे म्हणत अशोक तिथून निघाला...

उर्वरित कामे आटोपून पीयूष बाहेर पडला. तो कार्यालयात पोहोचला. आलेल्या बातम्यांची निवड करीत असताना शिपायाने 'मालकांनी बोलावले' असा निरोप दिला. पीयूष मालकाच्या दालनात शिरला. त्याला पाहताच पालकमंत्री म्हणाले,

"या. या. संपादक-अध्यक्ष, या. मी तुमचीच वाट पाहतोय."

"का? काही विशेष?" पीयूषने विचारले.

"एक सांगायचे होते, सरकारने काही वर्तमानपत्राचा कागदाचा कोठा कपात केलाय. त्यात काकदृष्टीही आहे."

"साहेब, तुम्ही त्याच सरकारमध्ये मंत्री असतानाही..."

"तरीही आपला कोठा कपात होणार आहे. निव्वळ विरोधकांच्या मालकीच्या वर्तमानपत्राचा कोठा कपात करता येणार नाही. शिवाय तुमच्या अनेक अग्रलेखांमुळे अनेक मंत्री आणि खुद्द मंत्रीही नाराज आहेत."

"हा तर अन्याय आहे. आपण उठाव करू.."

"हे..हेच. तुम्ही फार लवकर गरम होता बुवा. संपाची भाषा प्रत्येकवेळी योग्य नाही. कोठा कमी करू दिला नाही, विरोध केला तर आमचं मंत्रीपद जाऊ शकते. एक काम करा, तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवा. आपण चर्चेतून काही तोडगा निघाला तर पाहूया.."

काही क्षणातच संघटनेचे पदाधिकारी आणि पीयूषने मालकांच्या दालनात प्रवेश केला. सर्वांना बसायला सांगून मंत्री म्हणाले,

"मित्रांनो, ही बघा सरकारची नोटीस. आपल्या अनेक अग्रलेखांवर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री नाराज आहेत. आपल्या कागदाच्या कोठ्यात तर कपातीचे आदेश निघालेच आहेत.

कदाचित लवकरच आपल्या सरकारी जाहिरातीही बंद होतील अशी शक्यता दिसते आहे. त्यामुळे आपले वर्तमानपत्र तोट्यात जाईल अशी शक्यता आहे. त्यात तुमचा असा आडमुठेपणा..."

"साहेब, हा आठमुठेपणा नाही तर आमचा हक्क आहे."

"पीयूष, तरीही आम्ही कामगारांच्या साऱ्या मागण्या मान्य करण्याचा विचार करीत आहोत. तुम्ही म्हणजे कामगारांनीही आम्हाला सहकार्य करावे अशी आम्ही अपेक्षा..."

"आपली अपेक्षा रास्तच आहे. मागण्या मान्य होत असतील तर आम्ही आनंदाने आपल्याला सहकार्य करु." पीयूष म्हणाला.

"मला तुमच्याकडून विशेष अपेक्षा आहे..."

"मला काय करावे लागेल?"पीयूषने असमंजसपणे विचारले.

"तुम्हाला संपादकपद आणि अध्यक्षपद दोहोंचा राजीनामा द्यावा लागेल."

"स..र.."

"नाही. आम्ही हे होऊ देणार नाही." पदाधिकारी म्हणाले."

"तेवढं सोडून बोला साहेब.." एक जण म्हणाला.

"थांबा.." पीयूष पदाधिकाऱ्यांना थांबवत पुढे म्हणाला, "असे भावनाविवश होऊन चालणार नाही. एका पीयूषच्या बदल्यात सर्व कामगारांचा फायदा होणार असेल तर काय हरकत आहे? आपल्या नोकऱ्या कोणत्या सरकारी आहेत? आज ना उद्या सोडावीच लगणार आहे. त्यापेक्षा कामगारांचे हित समोर ठेवून मी आपला प्रस्ताव स्वीकारतो. मी राजीनामा तयार..."

"त्याची गरज नाही, मि. पीयूष! आम्ही दोन्ही तयार केले आहेत. हा तुमचा राजीनामा आणि हा आमचा करार. तुम्ही तिथे सही करा, आम्ही इथे सही करू." मालक म्हणाले. तशी पीयूषने सही केली आणि सारे बाहेर पडले. बाहेर कामगार त्यांची वाटच पाहात होते. अनेकांनी एकदम विचारले,

"काय झाले? मागण्या मान्य झाल्या का?"

"मागण्या मान्य झालेल्या आहेत पण त्यासाठी पीयूषसाहेबांना नोकरीवर पाणी सोडावे लागले."

"का..य..? नाही. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही."

"होय! आम्ही असे होऊ देणार नाही. "

"आम्ही आत्तापासूनच काम बंद करू."

"या.. या इमारतीला आग लावू."

"थांबा! असे बेभान होऊ नका. तुम्हाला सांगतो, सध्याच कुणाला सांगू नका. माझी कर्जाची फाईल मान्य झाली आहे. लवकरच माझं स्वतःचं वर्तमानपत्र सुरु होते आहे. मी स्वतः होऊनच बाहेर पडणार होतो..."

"खरे सांगताय?" कामगारांनी विचारले.

"अगदी खरे. फार कशाला पंधरा दिवसांनी तुम्हाला समजेलच. अच्छा! गुडबाय! ..." असे म्हणत पीयूष तिथून बाहेर पडला. तिथून निघालेला पीयूष निरर्थक भटकून भटकून बराच वेळाने घरी पोहोचला. घराचे दार उघडे होते याचा अर्थ मीता परतली होती. मीताची आठवण येताच तो घाईघाईने घरात शिरला. मीता नेहमीप्रमाणे मस्त लोळत पडली होती. तिचा मूड बराच चांगला वाटत होता. त्याच्या आगमनाची विशेष दखल न घेता मीताने तिचे लक्ष हातातील पुस्तकावर केंद्रित केले. ते पाहून पीयूषने जोराने आवाज दिला,

"मी..ता.."

"ओरडायला काय झाले? मी बहिरी नाही.."

"नवरा बाहेरून आलाय..."

"बाहेरूनच आलाय ना? कुठे पराक्रम गाजवून तर आला नाही आणि अशा बेकार..."

"होय! आहेच मी बेकार! मी काकदृष्टीच्या नोकरीवर लाथ मारून आलोय."

"केवढा मोठ्ठा पराक्रम केलाय ना? तसाही तुझ्या नोकरीचा मला काहीच उपयोग नव्हता. पाच वर्षात तू तुझ्या कमाईची एखादी साडी सोड पण साधा गजरा तरी आणलास का? कधी सिनेमा तरी दाखवलास का? बरे, माझे जाऊ देत. मी काही तुझ्यावर अवलंबून नाही पण लग्नानंतरच्या पाच वर्षात एकदा तरी स्वतःचा शर्ट, पायजमा सोड ते महाग असतात साधा रुमाल तरी विकत घेतलास का? प्रत्येक गोष्टीसाठी माझाच पैसा खर्च होतो.."

"हो.हो.हो. हे तू.. तू.. बोलत नाहीस. तर तुझ्यासोबत कोर्टात काम करणारा..."

"त्या माझ्या मित्राचा इथे काय संबंध? स्वतःचे अपयश झाकण्यासाठी तू कशाचाही वापर करू नको. पीयूष, लग्नापूर्वी माझ्याही काही अपेक्षा होत्या. तुझ्यातला धाडसी पत्रकार तर मला भावलाच होता. त्या पत्रकारावर मी जीव ओवाळून टाकत होते. वाटलं होतं, हा धाडसी पत्रकार मला हवं ते पैसा, दागदागिने, साड्या, कार सारे सारे देईन परंतु माझा भ्रमनिरास झाला. दुनिया विमानात बसत असताना, चंद्रावर जात असताना तू मात्र बैलगाडीतून फिरत असतो. जग एकविसाव्या शतकात असताना आम्ही मात्र अठराव्या शतकात वावरत आहोत. तुझं प्रामाणिकपणाचे महात्म्य काय वर्णावे? उद्या कुणी बायको नेतो म्हणाले तर.. तर... तू अत्यंत उदार अंतःकरणाने त्याच्या हातावर पाणी सोडाल. तुझ्याकडून भ्रमनिरास झाल्यावर 'तो' मला भेटला. तो..तो.. त्याच्याकडे काय नाही? गाड्या आहेत, बंगले आहेत, लखोपती आहे. शिवाय माझ्यासारख्या विवाहितेला..."

"मी..ता.."

"ओरडू नको. मलाही ओरडता येते..." असे म्हणत मीता रागारागाने स्वयंपाक घरात निघून गेली...

*****