Ti Ek Shaapita - 19 books and stories free download online pdf in Marathi

ती एक शापिता! - 19

ती एक शापिता!

(१९)

सुबोध-सुहासिनी कार्यालयातून परतले. हातपाय धुऊन सुहासिनी चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. सुबोध खुर्चीत बसून वर्तमानपत्र चाळत असताना सुहासिनी चहाचे कप घेऊन आली. सुबोधने वर्तमानपत्र बाजूला ठेवले. चहाचा कप घेताना सुबोधने विचारले,

"माधवीचा चहा..."

"आता तेच बाकी आहे. सुनेच्या पुढे पुढे करायचे. या वयात कार्यालयात काम, घरी आले की, घरकाम करून सुनेचेही कामे करते. वाढलेले ताट तिच्यापुढे ठेवते आणि तिचे उष्टेही काढते..."

"काही कळत नाही, माधवी अशी का वागते? आपले सोड पण त्या दोघांमध्ये कधी हसणं-खेळणे, रुसणं-फुगणं दिसत नाही. शेजाऱ्यांप्रमाणे दोघे समोरासमोर बसतात, एका खोलीत झोपतात. वास्तविक या वयात दोघांनी कसं..."

"त्यांचंही आपल्यासारखेच आहे असे वाटते."

"म्हणजे?"

"माधवीची स्थिती माझ्याप्रमाणेच आहे..."

"म्हणजे अशोक तिला पूर्ण सुख देत नाही?"

"असेच वाटतेय."

"अग, पण त्यांच्या खोलीतून येणारे आवाज..."

"ते माधवीचे असतात. परंतु ती तळमळतानाचे, असमाधानाचे आणि अतृप्तीचे असतात."

"परंतु लग्नापूर्वी तर तिने गर्भवती असल्याचे सांगितले होते ना? पुन्हा कधी तो विषय निघाला नाही. मी असे समजत होतो की, लग्नानंतर आताच संतती नको म्हणून तुझ्या संमतीने तिने 'सुटका' करून घेतली असेल आणि नंतर दोघे काही तरी साधने वापरत असतील..."

"तिने ते नाटक केले होते."

"काय? लग्नापूर्वीचा गर्भ हे तिचे नाटक होते? कशासाठी?"

"अशोकशी लग्न करण्यासाठी तिने तसे नाटक केले होते. अशोकवर तिचे एकतर्फी प्रेम होते. परंतु अशोकच्या मनाचा तिला थांगपत्ता लागत नव्हता. तिला पती म्हणून अशोकच हवा होता. तिच्या घरी तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात झाली होती. त्यामुळे पीयूषने तिला तसा सल्ला दिला होता."

"व्वा! काय जबरदस्त नाटक होते."

"परंतु ते नाटक तिच्या बिचारीच्या अंगलट आल..."

"अग, पण..." त्यांचा संवाद सुरू असताना माधवी तिथे आली आणि त्यांचं बोलणं थांबलं. पाठोपाठ अशोकही बँकेतून परतला...

त्याच रात्री जेवण झाल्यानंतर माधवी खोलीत आली. कैक महिन्यांपासून ती वेगळं झोपत होती. परंतु अशोकने तिला जवळ ओढले. तशी तिने सुटण्यासाठी धडपड करू लागली. परंतु अशोकने तिला घट्ट मिठीत घेतली. त्याचे हात आणि ओठ कामाला लागले. त्या स्पर्शाने माधवी विरघळली. तिचा विरोध कमी होत गेला. शेवटी तीही स्त्री होती, तरुण होती, उपाशी-अतृप्त- असमाधानी होती. तीही अशोकला भरभरून साथ देऊ लागली. काही क्षणातच उत्कट कामोत्तेजनेमुळे ती अधिक आक्रमक झाली. ती स्वतःच पुढाकार घेऊ लागली. तिच्या भावना अनावर झाल्यामुळे तिच्या मुखातून वेगवेगळे आवाज निघू लागले. परंतु अशोकचे काय? माधवी जरी त्याला भरभरून साथ देत असली तरीही तिची आक्रमकता सहन करण्याची, तिला हवं ते द्यायला तो असमर्थ ठरत होता. तिचे भरभरून मिळणारे प्रेम त्याला सोसवत नव्हते, जणू त्याची झोळी फाटकी होती. परिणामी तो काही क्षणातच बाजूला झाला. त्याचं काम संपल्याप्रमाणे तो दुसऱ्या कुशीवर झाला. त्याचवेळी माधवीच्या तोंडातून अनावर झालेल्या कामवासनेचे उसासे, श्वास आणि सोबतच अनेक शब्दही बाहेर पडू लागले. तिने पुन्हा अशोकला मिठीत घेतले. अधिक आक्रमकपणे ती अशोकला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु त्या तिच्या प्रयासाने अशोक फुलण्याऐवजी, त्याच्यामध्ये रक्तसंचार वाढण्याऐवजी तो गुदमरला, कष्टी झाला. काही क्षणातच तिला दूर करण्याचे त्याने प्रयत्न केले. तिला वेगळं करू लागला. परंतु माधवी त्याला सोडत नव्हती. ती अधिकच हिंसक झाली. ती थांबत नाही, बाजूला होत नाही असे पाहून अशोकने तिला जोराने ढकलले. तशी माधवी पलंगाजवळ पडली. पडलेली, चिडलेली, अपमानित झालेली माधवी कपडे व्यवस्थित करत कडाडली,

"का असा माझा छळ मांडलाय?"

"मी कोणता छळ करतोय?"

"हे छळणे नाही तर काय? माझ्या शरीरात मशाल पेटवता आणि तिची तृप्ती करायचं सोडून तू वरचेवर असमाधानाचे तूप टाकून माझ्या भावनांशी का खेळत आहेस?"

"अग, पण मी तुला समाधान देण्याचा..."

"हे असे समाधान? तू विकृत झालाय. तुला जी विकृती जडलीय ना त्यामुळे आपला संसार जळून खाक होतोय आणि .. आणि मलाही.. ही..ही.. अशी विकृती जडू पाहतेय. दबलेली कामवासना जेव्हा सातत्याने अपूर्ण राहते ना तेव्हा ती व्यक्ती अशीच हिंसक होते, अविचाराने वागते. वासना नैसर्गिक आहे, तिचे वेळीच शमन होणे... जाऊ देत तुला सांगून तरी काय फायदा? पालथ्या घागरीवर पाणी अशी तुझी अवस्था..."

"काय बोलतेस तू हे?"

"खरे तेच बोलतेय. तुझ्याजवळ स्त्रीला तृप्त करण्याची शक्ती नव्हतीच तर मग लग्न केलेच कशाला? हे असे रोजच्या रोज जळणे मला जमणार नाही."

"मग तू काय करणार आहेस?" अशोकने विचारले.

"मला माझा मार्ग शोधावा लागेल. कारण या वयात जर मला माझ्या हक्काचे सुख, माझा अधिकार मला मिळाला नाही.."

"तर...तर.."

"तू तरी काय करणार? तुला सांगून तरी .."

"काय करशील? तू.. तू...आईप्रमाणे..."

"कुणाच्या मिठीत जाऊ?"

"प्रेम, तृप्ती, वासना यापलीकडेही एक जग आहे... प्रेमाचं! बंधनाचं! त्याच बंधनात राहून आईने संसार केला..."

"केला ना! पण त्यासाठी त्यांनी पतीच्या मित्राची मदत घेतली. पतीकडून जे हवं होतं ते त्यांनी त्या मित्राकडून घराच्या चौकटीत मिळवलं. त्यांना त्यास प्रोत्साहित करणारा, मित्राच्या मिठीत जायचा खुला परवाना दिला होता तुझ्या बाबांनी! बाबांनी ते धाडस केलं म्हणून त्या घरात राहिल्या, नाही तर त्याही..."

"मा..ध..वी.."

"ओरडू नको. मी काही खोटे बोलतेय का? तुझ्यापेक्षा तुझे वडील फार मोठ्या मनाचे! ते संकुचित वृत्तीचे नाहीत. ज्यावेळी त्यांना स्वतःचा कमीपणा लक्षात आला तेव्हा मोठ्या मनाने, कदाचित मनावर फार मोठा दगड ठेवून त्यांनी तो निर्णय घेतला आणि स्वतःच्या बेडरुममध्ये स्वतःच्या मित्राला जायची परवानगी दिली अर्थात तो मोठेपणा तुला नाही कळणार आणि जमणारही नाही. तो वारसा पुढे चालविणे तुला कधीच नाही जमणार.." असे म्हणत माधवीने पलंगाजवळ गादी टाकली आणि तिने त्यावर अंग टाकले....

दुसऱ्या दिवशीची सकाळ सुबोधच्या घरात एक प्रलय घेऊन आली. त्यादिवशी माधवी सकाळी लवकर उठली. तिने आवराआवर सुरू केली. तिची ती घाई पाहून अशोकने विचारले,

"हे काय करतेस तू?"

"मी.. मी.. हे घर सोडतेय."

"पण का?"

"ते तुला चांगले माहिती आहे."

"अग, पण तू कुठे जाणार आहेस?"

"कुठेही जाईन."

"समाज अशा स्त्रियांसाठी टपून बसलाय.."

"काही करणार नाही. उगीच समाजाची भीती दाखवू नका.."

"माधवी, असे काय करतेस? मी हात जोडतो. पाया पडतो परंतु असा आततायीपणा करू नको. माझं ऐक, माधवी, ऐक. जाऊ नकोस..." अशोक हात जोडून म्हणत असताना सुबोध-सुहासिनीने खोलीत प्रवेश केलेला पाहून दोघेही शांत झाले. शेवटी सुबोधने विचारले,

"अशोक, काय चालले आहे? रात्रीही तुम्ही बराच वेळ भांडत होता... "

"तिलाच विचारा. लग्न करायचं नाही असा मी हट्ट धरला असताना तुम्ही अट्टाहासाने आणि हिच्या नाटकाला फसून माझे लग्न लावले. आता त्याची फळं मी भोगतोय."

"अरे, पण झाले तरी काय?"

"माधवी घर सोडून जात आहे."

"का? कशासाठी?"

"साऱ्याच गोष्टी सांगायच्या नसतात बाबा."

"का? का सांगायच्या नसतात? लाज वाटते सांगायला?" माधवी कडाडली.

"अग, शांत हो. असे ओरडू नको. नवऱ्याची..."

"मग काय करु? लग्नानंतर मी कुमारिका तर राहिलेच नाही आणि स्त्रीही झाले नाही. कुमारिका म्हणावे तर याच्यासोबत अनेकदा... स्त्री म्हणावं तर ज्या सुखामुळे.. ज्या संबंधामुळे तरुणी स्त्री बनते ते सुख मी या क्षणापर्यंत मिळवलं नाही, मिळालेले नाही."

"अग, पण..."

"मी हे घर सोडणार, वैद्यकीय तपासणी मला 'स्त्री' सिद्ध करू शकणार नाही, मी कुमारिका नाही असे म्हणण्याची वैद्यकीय शास्त्राची छाती नाही कारण ... " माधवी बोलत असताना खिडकीजवळ उभा असलेला अशोक खिडकीवर कोसळलेला पाहून सुबोध धावला. अशोकला सावरत पलंगावर झोपवले आणि सुबोधने पटकन जाऊन रिक्षा आणली आणि अशोकला दवाखान्यात नेले...

दवाखान्यात सुबोध, सुहासिनी आणि माधवी तिघेही होते. ते सारे अशोकला ठेवलेल्या खोलीत बसून होते. अशोकला बेशुद्धावस्थेत पाहून तिघांनाही अपराधी असल्याचे जाणवत होते. डॉक्टर अशोकवर लक्ष ठेवून होते. डॉक्टरांच्या खोलीत पोहोचलेल्या सुबोधने विचारले,

"डॉक्टर, सांगा ना, अशोकला काय झाले आहे?"

"त्याचा बी.पी. लो झाला आहे."

"का..य..?"

"होय! अशोकचा रक्तदाब लो झालाय. यापुढे त्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्याला धक्का बसेल अशी, त्याला सहन होणार नाही अशी कोणतीही गोष्ट घडू नये. त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावं लागेल."

"पण यावर काही इलाज..."

"एकच.. त्याला जीवापाड जपणे." डॉक्टर म्हणाले.

डॉक्टरांचा निरोप घेऊन सुबोध अशोकच्या खोलीत पोहोचला. अचानक माधवीच्या पायावर ओणवा होऊन म्हणाला, "माधवी..बेटी.. अशोकला वाचव. त्याचे जीवन आता तुझ्या हातात आहे."

"बाबा..बाबा, हे काय करता?.." गोंधळलेल्या माधवीने बाजूला होत विचारले. सुबोध म्हणाला,

"बाळा, अशोकचा बी. पी. लो झालाय. यापुढे त्याला न आवडणारी गोष्ट घडणे म्हणजे त्याचा मृत्यू!

तेव्हा तुला हात जोडून विनंती आहे, त्याला सांभाळ. तुझं दुःख कळतंय आम्हाला... तू कोणत्या घरून आलीस, त्या घरची संस्कृती, वारसा लक्षात घे. तो वारसा जप आणि भाळी लावलेल्या कुंकाचे रक्षण कर पोरी रक्षण कर... तू मला माझ्या आशासारखी. जीवनात अनेक दुःखं सोसली. आता परतीचा प्रवास सुरु असताना तुझ्या कपाळी काळी टिकली, काळं गंध नाही पाहू शकणार. केवळ तू आणि तूच माझी इच्छा पूर्ण करु शकतेस... पोराच्या खांद्यावर जायची इच्छा पूर्ण कर पोरी. एवढं कर. शांत रहा..." असे म्हणत भरलेल्या डोळ्यांनी सुबोध तिथून बाहेर पडला...

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED