प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 2 Subhash Mandale द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 2

क्रमशः-
२.
विठ्ठल- " आमच्या गावाकडं एक म्हातारी वारली, तर तिचा मुलगा,सुन नातवांडं यांना डायरेक्ट तिला अग्नी द्यायला जाऊन दिलं नाही. पहिलं त्यांना गावातल्या सरकारी दवाखान्यात चेक करायलं नेलं आणि नंतर अग्नी द्यायला जाऊन दिलं. तेही सगळ्यांनी तोंडावर रुमाल बांधले तेव्हा."
मी- " तुझं गाव कुठलं ?"
विठ्ठल- " सातारा जिल्ह्यात पाटण तालुका."
मी- " खेड्यातल्या लोकांच्यात अगोदरच अडाणीपणा असतो म्हणा ! व्हायरस चेक कसा करणार ? खेड्यात टेस्टींगच्या सुविधा उपलब्ध असतात का ?"
विठ्ठल- " सर, व्हायरस चेक करायच्या सुविधा नसतील, पण प्राथमिक तपासणी केली जाते. जसं, घरात कुणी आजारी आहे का? , मागच्या पंधरा दिवसांत परदेश दौरा केला आहे का? , घरातील कुणी आजारी माणसाच्या संपर्कात आला होता का ? अशा प्रश्नांची नोंद घेतली जाते."
संतोष- " सर, ते काहीच नाही. मी काल रात्री गावी फोन केला होता. गावात दवंडी पिटून सांगितलंय, 'जो कुणी २३ मार्चच्या आधी गावात येईल त्यालाच गावात घेतलं जाईल. २३ तारखेनंतर कुणालाही गावात प्रवेश दिला जाणार नाही, मग तो कितीही जवळचा असला तरीही. तसा बॅनर गावच्या वेशीवर आज टांगून ठेवणार आहेत. पुण्या मुंबईतून गावी येणाऱ्या लोकांच्यात व्हायरसची लक्षणं नसली तरीही २३ तारखेनंतर येणाऱ्यांना आपल्या घरी जाऊ न देता गावातल्या शाळेत १४ दिवसांसाठी कॉरंटाइन करून ठेवलं जाईल. जेवण खाणं ग्रामपंचायतीमार्फत दिलं जाईल आणि १४ दिवसानंतरच आपापल्या घरी सोडलं जाईल."
मी- " संतोष तुझं गाव कुठलं? "
संतोष- " नांदेड जिल्ह्यात नायगाव."
मी- " म्हणजे, तुलाही गावी जायचं आहे तर..."
संतोष- " हो सर. "
मी- " हे बघा, एका वेळी तुम्ही दोघे जण सुट्टी मागायला आला आहात, सत्तावीस जणांपैकी तुम्हा दोघांना सुट्टी दिली, तर बाकीचे पंचवीस जण पटापट सुट्टीचे अर्ज टाकतील. तेव्हा गपगुमान जाऊन काम करा. सुट्टी कुणालाही मिळणार नाही. मला काही मर्यादा आहेत, मी एका वेळी इतक्या लोकांना सुट्टी देऊ शकत नाही."
त्या दिवशी, दिवसभर ऑफिसात कुणी ना कुणी व्हायरस या विषयावर चर्चा करत होते. मला अशा निगेटिव्ह चर्चा करायला अजिबात आवडत नाहीत, त्यामुळे मी तशा कुठल्याही चर्चेत सहभागी झालो नाही.
नेहमी प्रमाणे दुसऱ्या दिवशीचा दिनक्रम सुरू झाला. प्रोडक्शन लाइनवर जाऊन सकाळच्या मिटींगला मी हजेरी लावली, पण सत्तावीस पैकी एकवीस जणच उपस्थित होते. काल इतकं सारं समजावून सांगून देखील दुसऱ्या दिवशी सहा जणांनी बिनधास्त सुट्टी मारली होती.
मी तिथं उपस्थित असलेल्या कामगारांना सुचना वजा दम भरला, 'जो विनापरवानगी सुट्टी घेईल त्याला कामावरून काढून टाकले जाईल. त्याने चालू महिन्याचा पगार विसरून जायचा आणि जे कुणी आज आले नाहीत त्यांच्यापर्यंत तसा निरोप पोहचवा. कुणाला काही अडचण असेल, तर आत्ताच सांगा." , असे मी म्हंटल्यानंतर नेहमी प्रमाणे कुणी प्रश्न किंवा विरोध दर्शविला नाही. तो शुक्रवारचा दिवस होता.
तिसऱ्या दिवशी, म्हणजे शनिवारीही कामगारांचं सुट्टी मारण्याचं सत्र कायम दिसलं. उरलेल्या एकवीस कामगारांपैकी पंधरा जण उपस्थित होते. त्यादिवशीच्या मिटींगमध्ये एक जणाने प्रश्न‌ केला, " सर, या व्हायरसला घाबरून सर्व जण गावी निघून चालले आहेत. कंपनी कधीपासून बंद राहणार आहे ?"
तो- " सर, कंपनीत कुणीच आलं नाही, तर कशी चालणार कंपनी? माझं ऐका, तुम्हीही सुट्टी टाका आणि आम्हालाही सुट्टी देऊन टाका. "
मी- " संपूर्ण कंपनी खाली होईल, त्यावेळी कंपनीतून बाहेर पडणारा शेवटचा माणूस मी असेन आणि कंपनीच बंद पडेल, तेव्हा कंपनीच्या गेटला लॉक लावणारा शेवटचा माणूसही मीच असेन." असं सर्वांसमोर ठणकावून बोललो, तसं कुणी काहीही न बोलता आपापल्या जागेवर जाऊन काम करू लागले.
आहे त्या कामगारांमध्ये त्या दिवशीचे काम करवून घेतले.
सायंकाळी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्युची घोषणा केली. एकच दिवस कर्फ्यु असल्यामुळे काही जण निश्चिंत होते, पण शेजारपाजारचे काही जण गावी जाण्याची तयारी करत होते. त्यात सायंकाळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत राज्यात कलम १४४ लागू करण्याची घोषणा केली म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन' (ताळाबंदी). सारं बंद, पण ज्या बस, रेल्वे निघालेल्या ठिकाणाहून आपापल्या ठिकाणी पोहचेपर्यंत चालणार होत्या. त्यामुळे जे निश्चिंत होते, तेही ताळाबंदीच्या काळात गावी जाण्यासाठी तयारी करू लागले. खूप दूरच्या म्हणजे परराज्यातील लोकांच्या डोक्यात गावी जाण्याचा विचार जराही डोकावू शकत नव्हता, तिथे महाराष्ट्रातल्या लोकांनी कलम १४४ लागू असतानाही सोमवारी सकाळी गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्थानक यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली. सकाळच्या बातम्यांत हे सगळं गर्दीचं चित्र बघितलं आणि माझ्या मनात गावी जाण्याचा जो हलकासा विचार आला होता, त्याची कणभरही शक्यता उरली नाही, कारण अशा गर्दीत नसलेला आजार आपल्याला चिकटेल, त्यापेक्षा जिथं आहे तिथंच गप्प पडून राहिलेलं बरं पडेल. 'एका आठवड्याचा तरी प्रश्र्न आहे !', असा मनाशी विचार करून रूमवर बसून राहिलो.