प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 5 Subhash Mandale द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 5

क्रमशः

५.
मी - " हा बोल भाऊ, दादांच्या फोनवरून कसा काय फोन केलास ?."
भाऊ - " आरं... दादास्नी दवाखान्यात घेऊन निघालोय."
जेवताना माझ्या हातातला घास कधी गळून पडला, समजलंच नाही. क्षणार्धात अंगातून वारं निघून जावं, अशी माझी अवस्था झाली. तोंडातून शब्द फुटत नव्हता. पुन्हा तोच बोलला, " खेराडला आलोय. सरकारी दवाखान्यात."
मी - " का ? काय झालंय ? "
भाऊ - " दुपारपासून पोटात दुखत होतं. गावातल्या क्लिनिकमध्ये चार वाजता इंजेक्शन करून आलो. दोन तीन बरं वाटलं आन्‌ परत दुखायला लागलं. "
मी - " आरं, मग खेराडला कशाला जायाचं ?"
भाऊ - " आपल्या गावात कुठं दवाखाना आहे ? "
मी - " एवढं मोठं विटा शहर सोडलं आणि खेराडला खेडेगावात घेऊन गेलायस."
भाऊ - " विट्याला घेऊन गेलो होतो, पण एकही खाजगी दवाखाना चालू नाही. विट्यातल्या सरकारी दवाखानात घेऊन गेलो, पण तिथंही या व्हायरसमुळं घेतलं नाही. खेराडच्या सरकारी दवाखान्यातला डॉक्टर आपल्या ओमिनी कार चालवणाऱ्या आण्णाच्या चांगला घसटीतला होता, म्हणून बरं झालं. त्याच्या ओळखीमुळं त्याची ओमिनी करून दादास्नी दवाखान्यात घेऊन आलोय."
मी - " काय सांगितलं डॉक्टरांनी ?‌"
भाऊ - " काय नाही, सोनोग्राफी करावी लागेल म्हणून सांगितलंय आन् हा लहान सरकारी दवाखाना आहे, त्यामुळं इथं सोनोग्राफीची व्यवस्था नाही आन् ह्या गावात व्हायरसनं एक जण मेला आहे. पुर्ण गाव क्वॉरंटाइन आहे, त्यामुळं सरकारी दवाखान्यात कुणालाच नविन अॅडमिट करून घेत नाहीत."
मी - " मग ?"
भाऊ- " डॉक्टरांनी काही गोळ्या लिहून दिल्या आहेत. त्या गोळ्या देऊन बघतो. तरीदेखील फरक पडला नाही, तर मग विट्याला घेऊन जातो."
मी - " दादांच्याकडे फोन दे."
भाऊ- " त्यांच्या तोंडातून शब्द निघत नाही. इतकं जाम झालेत. दवाखान्यातून घरी निघालोय. जाता जाता मेडीकलमधून गोळ्या घेतो. ठेव फोन मी बघतो, काय होतंय ते." असे म्हणून त्याने फोन ठेवला.
मी अजूनच घाबरलो. नेमकं पोटातच दुखतंय, कि दुसरं काय झालंय. कारण कधीच दादांना अचानक इतके आजारी पडताना कधी पाहिले नव्हते. भाऊ नेमकं खरं सांगतोय की मला जादा काळजी वाटू नये, म्हणून खोटं बोलतोय. हे कळायला मार्ग नव्हता. क्षणा क्षणाला माझ्या काळजाला चिमटा बसत होता. मन रहावत नव्हतं. मी अजून काही वेळाने फोन करून भावाला विचारले, " काय झालं ? मिळाल्या का मेडीकल मधून गोळ्या ?"
भाऊ- " हे मेडीकल बंद आहे. मेडीकलच्या बाहेर फोन नंबर लिहला आहे, पण तो लागत नाही. स्विच ऑफ आहे. दुसऱ्या मेडीकलकडे निघालोय. गोळ्या मिळाल्यावर तुला फोन करतो. आता ठेव फोन." असे म्हणून त्याने फोन ठेवला. थोडा वेळ गेला. अर्धा तास होऊन गेला, तरीही त्याच्या फोन आला नाही , मग मीच पुन्हा फोन केला आणि बोललो, " काय झालं ? मिळाल्या का गोळ्या ?"
भाऊ- " मी मेडीकल जवळ उभा आहे, पण हेही मेडिकल बंद आहे. मेडीकलच्या बाहेर फोन नंबर आहे. त्यावर फोन लावला. त्यानं फोन उचलला, पण तो मेडीकल चालवणारा गावात नाही. त्यानं 'दुसऱ्या गावाला गेलो आहे' म्हणून सांगितलं. या गावात दोनच मेडीकल आहेत. एक ते बंद होतं आणि हे दुसरं."
मी - " मग आता कसं करायचं ?"
भाऊ - " काय नाही. फोनवर त्याला खूप इमरजंन्सी आहे आणि आता जवळपास कुठेच दुसरं मेडीकल नाही म्हंटल्यानंतर ह्या मेडीकलवाल्याने त्याच्या बायकोला फोन केला आणि मेडीकल मधून गोळ्या द्यायला सांगितले आहे. बारा वाजून गेल्या आहेत. इतक्या रात्रीचं, एक वाजता राहत्या घराकडून बाई माणूस मेडीकल उघडायला येईल की नाही कुणास ठाऊक, पण वाट बघत बसण्यापेक्षा आता दुसरा मार्गच उरला नाही. म्हणून आत्ता त्या बाईची वाट बघत बसलोय."
मी - " दादांस्नी बरं वाटतंय का ?"

क्रमशः