Prem bhavnecha mrudu rang bharnara virus - 3 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 3

क्रमशः-

३.

हा हा म्हणता दोन आठवडे निघून गेले. जसजसे दिवस जात होते, तसतशी भारतात, त्यातल्या त्यात पुण्यात या व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढलेली बातम्यांत पाहायला मिळत होत. ताळाबंदीचा कालावधी अजून वाढण्याच्या शक्यता बातम्यांत वर्तवल्या जात होत्या. आता मात्र घरच्यांच्या आणि गावाकडच्या इतर आठवणींने एक एक दिवस आभाळा एवढा मोठा जाणवू लागला. पुण्यात रूममध्ये बंदिस्त होतो, पण कुणीतरी भल्या मोठ्या दगडाखाली आपलं काळीज बंदिस्त केलंय असं जाणवत होतं. जीव घुसमटायला लागला होता. आण्णाभाऊ साठेंच्या 'फकिरा' कादंबरीत त्यावेळी साथीचा रोग पसरल्यानंतर त्या समाजाची दैनीय अवस्था, पसरलेल्या रोगराईमुळे गावंच्या गावं ओसाड पडलेला प्रसंग, त्यामुळे गावांच्या झालेल्या भकास अवस्थेचे चित्रण प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते.
गावाकडून आई वडिलांचे रोज फोनवर फोन येऊ लागले होते. एकदा फोनवर वडील बोलत होते, जवळ जवळ ओरडतच होते, " तुला अगोदर सांगिटलं हुतं, पटदिशी गावाकडं निघून य, पण बापाचं आयकायचं कुणी. म्हणत हुतास, 'एवढं काळजी करायसारखं काय न्हाय. कंपनी चालू हाय.' सगळी माणसं इडी म्हणून मिळंल त्या वाहणानं गावाकडं आली. आन् तु लय शाणा पडलास, म्हणून तिथं आडकून बसलायस."
त्यांच्या ओरडण्यात त्यांचं प्रेम लपलेलं असतं, त्यामुळे मला त्यांच्या ओरडण्याचं कधी वाईट वाटलं नाही आणि वाटणारही नाही.
दोन चार दिवसांत कुणाचाही फोन आला नाही. की कुणी 'कसा आहेस बाबा!' अशी साधी चौकशीही केली नाही, पण १० तारीख ओलांडून गेली, तशी ११ आणि १२ तारखेला कंपनीतील कामगारांचे ठराविक वेळेच्या अंतराने फोन येऊ लागले. फोनवर बोलताना सगळे विचारपूस करत होते. त्यात ," तुम्ही कुठे आहात, पुण्यातच की गावी ?" , " ठीक आहात ना ?" आणि शेवटचा प्रश्न, " पगार कधी करणार आहे ?" जवळजवळ सगळ्यांचेच प्रश्र्न एकसारखे वाटत होते. २७ कामगारांपैकी २६ जणांचे फोन आले होते. या सर्व लोकांनी माझ्या काळजीपोटी फोन केले नव्हते, तर कामाचा पगार कधी मिळणार हे विचारायला फोन केला होता, हे स्पष्ट जाणवलं. पेमेंट करणे न करणे हे कंपनीच्या अकाउंट डिपार्टमेंट अंतर्गत येते, पण कामगारांना येणाऱ्या सर्व अडचणी दूर करणे, हे बॉस या नात्याने माझं परम कर्तव्य आहे. मीही सर्वांना एकच उत्तर दिले, " पेमेंट चेकवर अकाउंट डीपार्टमेंटची सही बाकी आहे. कंपनीचं कामकाज सुरू झाल्यावर सर्वांचा पगार होईल, पण जे लॉकडाऊन नंतर वेळेत कंपनीत कामावर हजर राहतील त्यांनाच पेमेंट मिळेल." ताळाबंदीनंतर जरी ते कामावर आले नाहीत, तरी त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला द्यावाच लागतो. हे मला माहित असूनही यातील निम्मे उत्तर सर्वांना बरोबर दिले आणि पण नंतरचे उत्तर मी माझ्या मनाने जोडले. हेतू हाच, की सर्वांनी वेळेत कंपनीत कामावर यावे. माझ्या अशा उत्तरानंतर दहा ते बारा जण फोनवर बोलले, "सर, लॉकडाऊननंतर पगार होईल, पण तोपर्यंत ?..." सर्वांच्या तोंडी शेवटचं वाक्य अगदी हेच होतं आणि त्यानंतर कुणी काही बोलत नव्हते. यावरून वाटत होते, की या सर्वांनी ठरवून फोन केला आहे आणि ठरवूनच पगाराबद्दल विचारत आहेत. त्यामुळे मी कुणालाही 'तोपर्यंत काय करणार आहात' याबद्दल विचारलं नाही.

दोन दिवस सर्वांना एकच उत्तर देऊन वैतागून गेलो होतो. हे कामगार पण कामावरून विनापरवानगी बिनधास्त सुट्टी घेतात आणि पगाराच्या वेळी मात्र न चुकता विचारतात, "सर, पगार कधी होणार ? " , असे मनातल्या मनात बोलत होतो. इतक्यात फोनची रिंग टोन वाजली. झालं !, २७ जणांपैकी २६ जणांनी अगोदरच फोन केला होता. उरलेला होता तो सातारा जिल्ह्यातील पाटणमधील विठ्ठल. हा त्याचाच फोन असणार हे मी मनोमन ओळखले आणि फोन उचलला. तिकडून आवाज आला, " हॅलो, मी पाटणमधून...."

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED