Dominant - 10 books and stories free download online pdf in Marathi

डॉमिनंट - 10

डॉमिनंट

भाग दहा

डॉमिनंट भाग नऊपासून पुढे....

पोलिसांच्या जीप निघाली आणि थंडगार वार्याच्या झुळकीमुळे अगोदरच घायाळ झालेला मंदार थकून आपले सर्वांग सैल सोडून भूतकाळ आठवू लागला.

विक्रमचे त्याच्या गावात येणं, त्याच्याशी झालेली दोस्ती.. विक्रमची श्रीमंती आणि रूबाब यांनी तर मंदारवर सुरुवातीपासूनच भुरळ घातली होती. त्यात समाजसेवेच्या नावाखाली असलेले विक्रमचे काळेधंदे मंदारला माहीत पडले होते. शिवाय गावोगावी स्त्रीयांच्यासाठी चालवण्यात येणार्या एन् जी ओ ला मिळणार्या पैश्यात विक्रमचा हिस्सा ठरलेला असायचा. या सर्व बाबींचा जाब मंदारने विक्रमसमोर बेधडकपणे विचारला होता. मुळात निडर असलेला मंदार म्हणजे विक्रमसाठी एक आयतीच संधी होती. त्याने शांत डोक्याने मंदारला पैसा दाखवत आपल्या बाजूने वळवून घेतले होते. मग काय तिथून पुढे मंदार जणू विक्रमचा उजवा हातच बनला होता.

अवघ्या वर्षभरात फक्त कोल्हापूर आणि आसपासची पंचक्रोशीच नव्हे , तर मंदार विक्रमसोबत काम करत करत पुण्यापर्यंत पोहोचला होता. आणि हळूहळू विक्रमचा उजवा हात असलेला मंदार त्याचा जिगरी दोस्त झाला होता. विक्रम मंदारच्या चलाख आणि तल्लख बुध्दीवर जाम खुश होता. एन जी ओ च्या नावाने भल्याभल्या दानविरांकडून मंदार आर्थिक मदत मिळवत असे, त्याची एखाद्याला आपलंसं करून घेण्याची पद्धत, आकर्षक देहबोली, एखादी योजना समोरच्या व्यक्तीला समजावताना त्याची पडणारी छाप या बाबी तर विक्रमसाठी जमेच्या होत्याच. शिवाय त्याच्या अंगातली ताकदही ऐनवक्ताला कामी येण्यासारखी होती. आणि म्हणूनच आपल्या फायद्यासाठी म्हणून का होईना विक्रमने मंदारला दोस्त बनवले होते.

मंदारसोबत मुंबईमध्ये सुद्धा आपला बिझनेस वाढवायचे विक्रमच्या मनात होते. पण ऐनवेळेस हिश्श्यावरून झालेल्या वादातून त्या दोघांत कमालीचे वैमनस्य निर्माण झाले आणि सर्वकाही फिसकटले. मंदारच्या मते तो करत असलेले काम आणि त्या बदल्यात त्याला मिळणारा मोबदला फार कमी होता.

आपण सगळी मेहनत करून माल मिळवायचा आणि वरून विक्रम आपल्याला त्याच मालातले परसेन्टेज देणार... व्हॉट् इज् दी लॉजिक इन दिस्..

मंदारने विक्रमला याबाबत विचारत निम्मी पार्टनरशीप मागितली. विक्रमने तेव्हा शांत डोक्याने विचार करत त्याचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. खरेतर विक्रमने त्याला पन्नास टक्के दिलेही असते पण मंदारसारखा माणूस पुढे जाऊन त्याला महागात पडला असता. विक्रमने मंदारला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करून पाहीला. पण मंदार त्याच्या जागी योग्य होता. वास्तविक पाहता विक्रम मंदारला फक्त कॉन्टॅक्ट्स् आणून द्यायचा पण बाकी सगळी कामं तर मंदारच करायचा.

विक्रमने दिलेला नकार मंदारच्या जिव्हारी लागला होता. विक्रमसारखी लाईफस्टाईल त्याला कसेही करून हवीच होती. पण एकंदरीत आता ते शक्य नव्हते. म्हणूनच 'मी नाही तर तो पण नाही' या मनुष्यस्वभावाप्रमाणे मंदारने विक्रमचे कारनामे प्रथम स्वतःच्या गावात उघडकीस आणले, शिवाय गावातल्या महीलांसोबतचे विक्रमचे वर्तन चुकीचे असल्याच्या खबरी गावभर पसरवत त्याने विक्रमला बदनाम करून सोडले. त्याचाच परिणाम म्हणून एक दिवस चवताळलेल्या गावकर्यांकडून विक्रमला बेदम चोप पडला होता. विक्रम त्यामुळेच मंदारवर जाम संतापला होता.

एवढेच करून मंदार थांबला नाही, तर त्याने त्याला माहीत असलेल्या विक्रमच्या सर्व जागा, त्याचा कच्चाचिठ्ठा बाहेर काढत पोलिसांना दिला. परीणामी ठिकठिकाणच्या पोलिस ठाण्यात विक्रमवर विविध गुन्हे दाखल झाले होते. विक्रमने एवढ्या वर्षात जमा केलेल्या संपत्ती आणि इज्जतीवर मंदारमुळेच पाणी पडले होते. मनात मंदारबद्दल प्रचंड राग असूनही विक्रमने मंदारविरूद्ध कुणासमोरही 'ब्र' काढला नव्हता.

पोलिसांची जीप गचका देऊन थांबली तसा मंदार भानावर आला. मागे बसलेल्या दोन हवालदारांनी मंदारला आधार देत बाहेर काढले. मंदार अजूनही पळून जाण्याच्या स्थितीत नव्हता. त्याने समोर नजर फिरवली आणि पाहतो तर समोर सरकारी इस्पितळ होते. इन्स्पेक्टरने मागे येत हवालदारांना मंदारला आत घेऊन येण्याच्या सुचना दिल्या. मंदार त्या दोघांच्या आधाराने हळूहळू आत जात होता. पडणार्या एकेका पाऊलासोबत त्याची नजर सभोवतालच्या हरएक गोष्टी न्याहाळत होती. बाहेर पडण्याचे कोणकोणते मार्ग असू शकतात वा कोणकोणते अडथळे पार करावे लागतील यावर मंदारच्या डोक्यात विचार सुरू होते.

पुढे गेलेल्या इन्सपेक्टरने सर्व तजवीज केल्याच्या आविर्भावात हवालदारांना पुढील बाबींची माहीती दिली. आणि काही वेळातच मंदार इस्पितळाच्या एका खोलीत बेडवर पहुडला होता. बाहेर पाळत ठेवण्यासाठी म्हणून तेच दोन हवालदार होते ज्यांनी त्याला तिथे आणले होते. इन्स्पेक्टर साहेब सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करून निघून गेले. मंदारला उपचाराची आवश्यकता होतीच. अंगात ठिकठिकाणी घुसलेल्या काचा आणि इतक्या वरून पडल्यामुळे लागलेला मार व त्याच्या वेदना त्रासदायक होत्या. पण त्या अवस्थेतही मंदारची नजर आणि डोकं ताळ्यावर राहून आपले काम चोख बजावत होते. एकंदरीत इस्पितळात आत प्रवेश केल्यापासून ते त्या बेडवर येईपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर मंदारने बारीक ऑब्झरवेशन केले होते. आणि एक-दोन दिवसांत बरे झाल्यावर तिथून बाहेर पडण्याचा मार्ग कसा काढायचा यावरच त्याचा मेंदू आपली शक्ती खर्च करत होता. शिवाय बेडवर पडल्या पडल्या दुसरे काही कामही तर नव्हते.

**********

मंदारला घेऊन पोलिस गेले तसे मनू बारपासून घरी जाण्यासाठी निघाली. पोलिसांकडून तिने आरीफला घेऊन गेलेल्या ॲम्ब्यूलस आणि हॉस्पिटलचीही माहीती घेतली होती. दुसर्या दिवशी त्याला भेटायला जायचे मनाशी ठरवून मनू मुख्य रस्त्यावर आली आणि ऑटो रिक्षाची वाट पाहू लागली. तितक्यात तिथं विक्रमची कार येऊन तिच्यासमोर थांबली.

"काय मग.. तुझा गुन्हेगार पोलिसांच्या हवाली झाला ना.." विक्रमने कारची काच खाली करत मनूला हसत विचारले.

"हो.. पण अजून मन शांत नाही आतून... हे सगळं कश्यासाठी आणि का..? तेच मला कळालं नाही अजून..." मनू उत्तरली.

"सोड गं ते.. आता काय त्याच गोष्टीवर पुन्हा विचार करायचा.. तुझा गुन्हेगार भेटला बास्स्.. मग अजून काय हवेय.. येशील का माझ्यासोबत.. हम्म्.. ॲज अ फ्रेंड विचारतोय हा.. नाहीतर तु पुन्हा तुटून पडायचीस माझ्यावर..." विक्रम घाबरण्यासारखं करत म्हणाला.

"तुझ्यासोबत.. कश्यासाठी.. आय् मीन्.. तु अजूनही अनोळखी आहेस मला.. मग फ्रेंडशीप कसली... आणि कश्यावरून तुझ्यासोबत जाणं माझ्यासाठी सेफ राहील.." मनू त्याच्या कारच्या विंडोवर हात ठेवत विचारू लागली.

विक्रमला खरेतर मनू आवडली होती. आणि त्यासाठीच तिच्यासोबत मैत्री करण्याचा त्याचा विचार होता. पण डायरेक्ट तसं काही बोलणं त्याला ठिक वाटलं नसावं.

"आणि तुझ्या मनातली अशांतता मी दूर करू शकलो तर..." विक्रम काहीसा विचार करत म्हणाला.

मनू त्याच्या उत्तरावर रागानं लाल झाली, तिची बॉडीलॅग्वेजही झटक्यात बदलली. विक्रमने ते ओळखले. मनू काही उलटून बोलणार इतक्यात तिला शांत करत विक्रम म्हणाला..

"हेय... आय् मीन् टू सेय.. की तु मघाशी म्हणालीस ना.. की अजून मन शांत नाही आतून.. म्हणून तुला मंदारविषयी सर्व माहीती मी सांगू शकतो.. असं म्हणायचं होतं मला..." विक्रमने अतिशय चलाखीने मनूवर डाव टाकला.

विक्रमच्या तश्या खुलाश्यानं मनूही एकक्षण विचार करू लागली. आणि त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.

"चल मग.. पण रात्री मला घरी ड्रॉप करावं लागेल..आणि बेटर यू थिंक अगेन्... काही चुकीचं करण्याचा प्रयत्न झाला.. तर मी जीव द्यायला आणि घ्यायलाही कमी करणार नाही..." मनू विक्रमसोबत जायला तयार तर झाली पण तिनं अगोदरच त्याला वॉर्नही केलं.

"तशी वेळही येणार नाही मॅडम... चला बसा, आपल्यासाठी मी स्वतः ड्रायव्हींग करतो..." विक्रमने असं बोलत इरफान भाईला खुणावले. इरफान भाई आणि चंदू कारमधून उतरले. आणि मनूला सोबत घेऊन विक्रम निघून गेला.

रस्त्यावर अंधार पसरलाच होता. मागून येणार्या धावत्या रिक्षाला हात करत चंदूने थांबण्याचा इशारा दिला. काहीश्या वेगात असलेली ती रिक्षा थोडी पुढे जाऊन थांबली. रिक्षावाल्याशी जाण्याचं ठिकाण निश्चित करत चंदू आणि भाई रिक्षात बसले. रिक्षा पुन्हा सुरू होत वेगाने पुढे धावू लागली आणि मागून कुणीतरी पुकारत असल्याचा भास झाला. थोडं आणखी पुढे गेल्यावर भाईला पुन्हा त्याच्या नावानं जोरात पुकारल्याचा आवाज आला आणि भायने मागच्या बाजूला बाहेर डोकावत पाहीलं.

डिग्री मागे रस्त्यावर असहाय्य अवस्थेत दोन्ही हात उंचावत हलवत उभा होता. प्रथमदर्शनी तर त्याची कुणाशीतरी मारामारी झाल्याचे भासत होते. भायने
तत्काळ रिक्षा थांबवायला सांगितले. रिक्षा पूर्णपणे थांबण्याची वाट न बघताच भाय आणि चंदू त्यातून खाली उतरत मागे डिग्रीच्या दिशेने धावले. मागून रिक्षावाला त्यांच्या नावाने ओरडू लागला पण तिकडे लक्ष देण्याची तसदी भाय आणि चंदू दोघांनीही घेतली नाही.

डिग्रीने भायला उतरताना पाहीले. इरफान भाई त्याच्याकडे धावतच येत होता. चंदूही डिग्रीकडे पाहत धावत होता. डिग्री हळूहळू खाली वाकत जमिनीवर कोसळला आणि त्याच्या पाठीत घुसलेला सुरा इरफान भाई आणि चंदूला दिसला. खाली पडल्यावर डिग्रीने एकक्षण मान वर करून त्यांना पाहीले आणि भाईला पुकारत पुकारत त्याने शेवटचा श्वास घेत डोळे उघडेच ठेवत प्राण सोडला.

डिग्रीजवळ पोहोचताच भाईने त्याला हलवून पाहीले, त्याच्या अंगावरच्या जखमा तो तपासू लागला. चंदूही झाल्या प्रकारानं मनातून घाबरला होता. तरीही भाय सोबत असल्याने थोडंफार हायसं वाटत होतं. चंदू आसपास पाहू लागला, कुणी पळताना दिसतयं का.. वा कुणी डिग्रीचा खुन होताना पाहीलंय का.. पण छ्या... नुकतेच तिथे पोलिस येऊन गेले होते. म्हणून आसपास कुणीच दिसत नव्हतं. सगळे चोरचकार, उच्चके, खबरी अगोदरच तिथून पांगले होते.

"भाय्... अगर मंदार को पुलिस ले गई.. तो डिग्री को किसने...." चंदूच्या प्रश्नात साफ चिंता दिसत होती.

त्याच्या प्रश्नानं भायचा चेहराही काहीसा चिंताग्रस्त झाला. भायनं लगेच सावरत विक्रमला फोन केला आणि सविस्तर वृत्त कळवले. मंदारशिवाय हे कोण करू शकत होतं. आता प्रश्न खरोखरच गंभीर होत चालला होता.

***********

भायने सांगितलेल्या न्यूजने विक्रमलाही धक्का दिला. आता हा कोण नविन दुश्मन आला आणि त्याचा डिग्रीला मारण्याचा काय उद्देश असावा. गाडी चालवत विक्रम विचार करू लागला आणि त्याला कळाले की बाजूच्या सीटवर मनू त्याच्याकडेच पाहत होती.

"डिग्रीचा खुन झालाय आताच.. तिथंच.. त्याच बारजवळ..." विक्रम मनूला म्हणाला.

"काय.. कसं शक्य आहे हे... एक मिनिट.. म्हणजे मंदार खुनी नाहीयं तर.. हो ना... तु कार मागे फिरव..." मनूलाही तो धक्का पचवणं काहीसं अवघड जात होतं.

"अगं.. हो... काल्म् डाऊन्... डिग्री म्हणजे कुणी जवळचा सख्खा वगैरे नाही हा माझा... आणि गाडी मागे फिरवणं मुर्खपणाचं ठरेल.. ऑलरेडी तिथं क्राईम प्लेस् आहे आणि त्यात आणखी एक खुन.. इट्स नॉट अ जोक्.." विक्रम थोडा जोर देत म्हणाला.

"हम्म्.. आय थिंक यु आर् राईट्... बट्... खुनी कोणीतरी दुसरा नक्कीच असण्याची शक्यता नाकारता येत नाही..." मनू म्हणाली.

अश्या प्रसंगीही विक्रमच्या थंड डोक्याने विचार करण्याच्या खुबीचे मनूला कुतुहल वाटले.

"शक्य नाही... मौसमला आणि नसीरला मंदारनेच मारलेय.. हा.. डिग्रीचा खुन कुणी जून्या वैरातून केला असू शकतो.." विक्रम शांतपणे म्हणाला.

"तू असा कसा रे.... एकदा पडताळून पाहू तरी शकतो आपण.. जर हा तोच खुनी असेल आणि मंदार दोषी नसेल तर्...." मनू आता विक्रमवर वैतागली.

त्यांची कार कल्याणमधल्या खडकपाड्यातील विक्रम राहत असलेल्या टॉवरखाली येऊन थांबली. गाडी पार्कींगकडे वळवत विक्रम म्हणाला...

"चल तुला जे ऐकायचे आहे ते सर्व सांगतो..."

मनू विक्रमसोबत त्याच्या फ्लॅटवर जाऊ लागली. लिफ्टमध्ये दोघांनीही चकार शब्ददेखिल काढला नाही. काही क्षणांतच मनू विक्रमसोबत त्याच्या घरी सोफ्यावर विराजमान होती. विक्रमही तिच्यापासून काही अंतरावर असलेल्या चेअरवर शांत बसला होता.

विक्रमने सांगायला सुरूवात केली...

चार वर्षांपूर्वी मंदारने दगा दिल्यानंतर विक्रम गपचूप कोल्हापूरहुन निसटून मुंबईला रवाना झाला होता. पूर्वी जमा केलेला पैसा, बिझनेस सगळं मंदारमुळेच मातीत मिळालं होतं आणि मग आपले थोडेफार कॉन्टॅक्ट्स् आणि स्वतःच्या कुशाग्र बुद्धीचा वापर करत त्याने चार वर्षांतच ठाणे परीसरात विविध प्रकारच्या दोन नंबरच्या धंद्यात आपले बस्तान बसवले. पण यावेळी तो प्रत्येक धंद्यात गुमनाम राहीला. मिळणार्या सर्व मिळकतीचा कारभार पाहण्यासाठी त्यानं सुरूवातीच्या काळातली आणि विश्वासातली माणसं ठेवली होती. अशी माणसं जी स्वतः त्याला प्रत्यक्ष न भेटताही त्याच्यापर्यंत सगळा माल पोहोचता करायची.

ती मोजकीच माणसं वगळता इनफॅक्ट सध्यस्थितीला त्याच्या स्वतःच्या एखाद्या धंद्यातला कोणताही व्यक्ती प्रत्यक्ष विक्रमला भेटला नव्हता. तशी एकप्रकारची चैनच विक्रमने बनवून ठेवली होती. मंदार प्रकरणापासून धडा घेतच त्यानं खबरदारी म्हणून तसं केलं होतं. शिवाय कुठल्याही कारणाने जर त्याचं नाव लीक् झालं असतं तर अगोदरच्या गुन्ह्यांचा शोध घेत पोलिस त्याच्यापर्यंत लगेचच पोहचू शकत होते. म्हणूनच विक्रम ताकही फुंकून प्यायल्यागत सदैव चौकस असायचा.

मंदारलाही तो विसरला नव्हता. म्हणून मंदारसमोरही त्याचं नाव पुन्हा कधी जाणं सोईचं नव्हतं. मंदारचा वचपा काढायचाच असा चंगच जणू विक्रमने बांधला होता. तो अगोदरही तसं स्पष्ट करू शकला असता. जेव्हा मंदारने त्याची गुपितं उघडली होती तेव्हा मंदारवरही प्रत्यारोप करण्याचा चान्स् विक्रमकडे होता. पण नाही, विक्रम अगोदरच सांगितल्याप्रमाणे सायलेंट किलर प्रवृत्तीचा माणूस होता. त्याला मंदारला एखाद्या मोठ्या प्रकरणात गुंतवायचे होते. म्हणूच त्याने चार वर्षे वाट पाहीली. पुन्हा स्वतःचा एक बेस् निर्माण केला. आणि मंदारला जाळ्यात ओढण्यासाठी त्याने हळूहळू फासा बनवायला सुरूवात केली.

मंदार अगोदरपासूनच डिटेक्टीव्हगिरीचा शौकीन असल्याचे विक्रमला ठाऊक होते.

"मला माहीत होते.. तो मूर्ख जाहीरात वाचून एका पायावर इकडे यायला तयार होईल ते.. म्हणे डिटेक्टीव्ह्... साधी चौकशी केली नाही नेटवर.. वा विचारही केला नाही की इथली जाहीरात कोल्हापूरमधल्या त्या फडतुसड्या गावातल्या भिक्कार सलून बाहेर कुणी का लावेल.. त्याला नाहीतरी दुसर्याच्या चहाड्या करण्याची सवयच होती. आणि सलून शिवाय अश्या रीकाम्या लोकांना गावातल्या खबरी कुठून मिळणार.. मग तो तिथंच सलूनजवळ पडून असण्याचा माझा अंदाजही खरा ठरला..."

मनू लक्षपूर्वक विक्रमचे बोलणे ऐकत होती. विक्रमने जे काही घडवून आणले ते खरोखरच वाखाणण्याजोगे होते.

"या कामासाठी मी माणसंही भाड्याची निवडली. अशी माणसं ज्यांचा माझ्याशी प्रत्यक्ष असा काही संबंध असणार नव्हता... शिवाय मला एकदम प्रोफेशनल टाईप माणसं नको होती, मला थोड्याफार चुका करणारी आणि मंदारला 'क्लू' देऊ शकत असलेलीच माणसं हवी होती.. एका दमात सावजाची शिकार करण्यात काय मजा.. त्याला खेळवून खेळवून मारण्यातच खरा आनंद मिळतो. शिवाय त्याला थोडी डिटेक्टीव्हगिरी करण्याची संधीही मला द्यायची होती. माझ्या अंदाजाप्रमाणे मंदारही काही प्रोफेशनल डिटेक्टीव्ह नव्हता म्हणूनच त्याची मजा घेत त्याला अडकवणं मला आवडलं.. आणि म्हणून मी इरफान भाईला आमंत्रण दिलं, त्याची माणसं नाही त्या वेळी बर्याचदा चुकलीत.. पण तरीही तो ठोंब्या ओळखू शकला नाही.. की हे सगळे त्याला अडकवण्यासाठी चालू आहे.. हाऽहाहाऽऽऽ..." विक्रम बोलता बोलता मंदारच्या मूर्खपणावर हसत सुटला.

मनू अजूनही मध्ये काहीही न बोलता ऐकत होती.

"त्याने माझे सर्व गुपित बाहेर तर काढलेच.. पण मी न केलेल्या गुन्ह्याबद्दलही मला शिक्षा मिळाली.. मी कधीच कुणा बाईशी लगट करण्याचा प्रयत्न केला नाही, पण तरीही मला सगळ्या गावाकर्यांनी मिळून मारले.. खुप मारले... काय करनार ना... मी एकटा... चुपचाप मार सहन केला.. पण विचार मनाशी पक्का करतच... सुड तर मी घेणारच.. काहीही करून... कसंही... माझ्यावर उगारलेला एक एक हात मी लक्षात ठेवला..."

"माझं नाव त्याने स्त्रीयांसोबत जोडले म्हणूनच त्याचं नाव मी किन्नराच्या सोबत जोडण्याचा प्लॅन केला आणि पहा.. आज तो प्लॅन सक्सेसफुल झालाय... उलट आतातर त्याच्यावर त्या मौसमच्या हत्येचा गुन्हाही दाखल झालाय.. न्यूजपेपर, टिव्ही सगळीकडे त्याची बदनामी झालीय.. शिवाय गावात आता त्याला तोंड दाखवायचीही शरम येईल असंच काहीसं त्याच्या गावात वातावरण आहे.."

विक्रमने मंदारबद्दल मनूला सर्वकाही सांगितले. मनूनेही त्याला मध्ये कोठेही न थांबवता ऐकून घेतले. खरंतर मौसमला या प्रकरणात गुंतवण्यात विक्रमच कारणीभूत होता. म्हणूनच मनूच्या मनात आता त्याच्याबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली होती. पण तीनं तसं काही चेहर्यावर येऊ दिलं नाही. विक्रम शातीर खिलाडी होता. आणि त्याच्यासाठी स्पेशल अशी वेगळी खेळी करण्याची गरज होती. विक्रम असो वा मंदार दोघेही कायद्याचे गुन्हेगार होतेच कारण दोघांनीही भूतकाळात गुन्हे केलेच होते अथवा सध्याही करत होते. मनू गंभीर मुद्रेत विचारमंथन करत होती.

"मनू, मी मंदारप्रमाणेच माझ्याबद्दलही तुला सगळं सांगितलंय.. काही म्हणजे काही लपवून नाही ठेवलं.. मी माझ्यावरचे गुन्हे तुझ्यासमोर फेटाळू शकलो असतो. पण मी एक अन् एक गोष्ट तुझ्यासमोर उघड केली.. यामागे खरंतर तसं कारणही आहे.. ते मात्र मी तुला आता नाही सांगू शकत.." विक्रमच्या चेहर्यावर समाधानकारक भाव होते.

मनूने ताबडतोब त्याच्या बोलण्यातला भाव ओळखला पण तीने त्याबद्दल खोदून विचारण्याचे टाळले. पण काहीश्या संभ्रमावस्थेतच तिने त्याला विचारले.

"पण विक्रम.. यावरून मंदार मौसमचा खुनी असेल, हे सिद्ध कुठे होतेय...?"

"मनूऽऽ.. मंदारची एवढी पाठराखण का.. तो क्रिमिनल होता आणि आहे.. तुला माझ्यापेक्षा तो जवळचा वाटतो का.." विक्रम बोलून गेला खरं, पण मग काहीसा शरमला.

"प्रश्न पाठराखण करण्याचा नाहीच मुळी विक्रम.. मला फायनली ट्रूथ पर्यंत पोहोचायचे आहे.. आणि जरी तो क्रिमिनल होता किंवा असला तरी तूही तर आहेसच की.. आणि त्याला गुन्हे करायला तुच शिकवलंस, नाही का..?" मनू रोखठोक त्याच्या डोळ्यांत डोळे घालून विचारले.

तिच्यापासून आपली नजर फिरवत विक्रमने गप्पच राहणे पसंद केले.

"सध्यातरी मला मंदार अथवा तू दोघेही जवळचे नाहीत, मला थोडी वाट पाहावी लागेल.." मनूने विक्रमच्या मघाच्या प्रश्नाचे उत्तर चलाखीने आता दिले होते.

"टेक् युअर टाईम् बेबी... तुला कळलेच आहे की मला काय विचारायचे होते तर मी तुला अडवणार नाही.. तुझा जो काही निर्णय होईल मला मान्य असेल.. मग आता पुढे काय...?" विक्रमने शांतपणे तिला विचारले.

"पुढचं जाऊ दे.. आता मला सॉलीड भूक लागलीयं.. मला ड्रॉप कर चल आणि वाटेत काही डिनरची काही व्यवस्था करणार आहेस की नाही तू.. की उपाशीच जाऊ..." मनूने वैतागल्याची ॲक्टींग करत म्हटले.

"ॲट् युअर सर्व्हिस् मॅम्...." विक्रमने क्षणाचाही विलंब न करता टी पॉय वर ठेवलेल्या कारच्या किल्ल्या उचलून बोटांत गरागरा फिरवत रेडी झाला.

काही वेळातच मनू आणि विक्रम तिथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करत बसले होते.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED