Ti Ek Shaapita - 23 books and stories free download online pdf in Marathi

ती एक शापिता! - 23

ती एक शापिता!

(२३)

बँकेच्या घड्याळाने 'टण' असा आवाज दिला. अशोकने घड्याळाकडे पाहिले. दुपारचे अडीच वाजत असलेले पाहून अशोक मनात म्हणाला, 'अडीच वाजले. म्हणजे पीयूष घरी पोहोचला असेल. त..त.. त्याने माधवीला मिठीत घेतले असणार आणि ज्या स्पर्शासाठी माधवी आसुसलेली आहे, ती ज्या सुखासाठी तळमळत होती ते सारे घडत असणार, घडले असणार. त्यांच्या प्रेमाला बहर आला असणार. माझा अडथळाही नसल्यामुळे ते दोघे अधिक उन्मुक्तपणे, बिनधास्तपणे, आक्रमकपणे ते सुख लुटत असणार...'

त्या दिवशी दुपारी पीयूष-माधवी या दोघांमध्ये अशोकला हवे असलेले संबंध स्थापित झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी अशोक बँकेच्या कामावर हजर झाला. त्यामागेही त्याचा त्या दोघांना पूर्ण एकांत मिळावा, ते संबंध अधिक दृढ व्हावेत, त्या संबंधातील सुख त्यांना अधिकाधिक मिळवता यावे हाच विचार होता. अशोक घरी असताना त्यांना ते सुख, तो आनंद मनमोकळेपणाने उपभोगता येत नव्हता. कुठेतरी एक प्रकारचे दडपण, एक भीती त्यांच्या मनात नक्कीच असणार. त्यांना हवा तो एकांत, हवे ते स्वातंत्र्य मिळावे या हेतूने अशोकने बँकेत जायला सुरुवात केली. तो बँकेत जात असला तरीही त्याचं सारं लक्ष घरीच लागलेले असे. विशेषतः दुपारचे अडीच वाजले की, आपल्या शयनगृहात काय चालले असेल हे चित्र तो रंगवत असे. त्याला वाटे,

'अडीच वाजले म्हणजे पीयूष घरी पोहोचला असेल. त्याला पाहताच माधवी आनंदाने बेहोश झाली असणार. आणि... आणि.. एका वेगळ्याच ओढीने तिने पीयूषला स्वतःच्या मिठीत घेतलं असेल.

पुढे...पुढे.. तेच घडले असणार...'

तिकडे त्याच्या घरीही तसेच होत असे. नेहमीप्रमाणे दररोज पीयूष अडीचच्या सुमारास अशोकच्या घरी पोहोचायचा. माधवी घरी एकटीच असायची. त्या दुपारच्या एकांतात दोन तरुण, अतृप्त असलेली शरीरं एकत्र यायची. एकमेकांच्या स्पर्शाने मोहीत व्हायची. मनमानेल तसे त्या सुखसागरात विहार करायची. सराईतपणे ती धुंदी, ती नशा उतरली की, माधवी सायंकाळचा सर्वांचा स्वयंपाक करून नंतर पीयूषसोबतच दै. जिव्हाळा कार्यालयात जायची. त्या दिवशी रात्री सुहासिनीसोबत झालेल्या वादानंतर माधवी का कोण जाणे कार्यालयात जाताना सायंकाळचा स्वयंपाक करून जात असे. त्यामुळे सासू-सुनेमध्ये होणाऱ्या वादाला विराम मिळाला होता.

डॉ. पाटील यांचा पीयूषवर पूर्ण विश्वास असल्यामुळे आणि त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळे पीयूषच्या कामगिरीला निराळेच धुमारे फुटले होते. सारी कामे मनाप्रमाणे होत गेली म्हणजे मानवाचा अश्वमेध पार उधळत सुटतो. तसंच पीयूषचेही झाले. त्यातच माधवीसोबतचे संबंध त्याला वेगळीच स्फूर्ती, जोम, जोश, इर्षा प्रदान करीत होते परंतु मानवाची प्रगती न आवडणारे, आपल्या प्रगतीमध्ये कुणीतरी बाधा बनतोय, आपल्या साम्राज्याला आव्हान ठरतोय हा विचार येणारी माणसे शांत बसत नाहीत ते नानाप्रकारे तो अश्वमेध रोकण्याचा प्रयत्न करतात. ऐनकेन अडचणी उत्पन्न करून चालत्या घोड्याला थांबविण्याचा प्रयत्न करतात. पीयूषचेही तसेच झाले.

कार्यालयात जाताना माधवीच्या घरी जाऊन तिच्यासोबत प्रेमाच्या चार गोष्टी करून तिला कार्यालयात सोबत घेऊन जाण्यासाठी म्हणून पीयूष निघाला होता. त्याने माधवीच्या गल्लीत प्रवेश केला. अचानक पाच-सात जणांचा घोळका त्याची वाट अडवून उभा राहिल्यामुळे पीयूषला स्कुटी थांबवावी लागली. पीयूष असमंजसपणे त्यांच्याकडे बघत असताना कुणीतरी विचारले,

"तुम्हीच का पीयूष? जिव्हाळ्याचे संपादक?"

"हो..हो..मीच.." पीयूष म्हणाला.

"परवाचे ते बाप-बेटी प्रकरण तुम्हीच चव्हाट्यावर आणलेत ना?"

"हो. पण काय झाले?"

"नाही. म्हटलं ते प्रकरण उजेडात आणलं. पण तुमचे प्रकरण कधी छापणार?"

"माझे? माझे कोणते प्रकरण?"

"आठवत नाही. स्वतः काचेच्या घरात राहणारांनी दुसऱ्याच्या घरावर..."

"तुम्हाला काय म्हणायचे आहे?"

"आले नाही लक्षात? जिव्हाळ्याच्या उप-संपादिका माधवीसोबत तुमचे चालू असलेले लफडे..."

"अरे, सोडा. लाथोंके भूत बातों से नही मानते..." असे म्हणत कुणीतरी हातातल्या काठीचा वार त्याच्या पाठीवर केला. त्यानंतर दोन-तीन मिनिटे जे झाले ती केवळ गुंडगिरी होती, दादागिरी होती. पीयूष निपचित पडल्याचे पाहून ते भाडोत्री निघून गेले. गल्लीच्या तोंडावर झालेला तो हलकल्लोळ अनेकांनी ऐकला... पाहिलाही. ते गुंड निघून जाताच अनेकांना जाग आली. नंतर ती बातमी गल्लीत सर्वत्र पसरली. पीयूषची वाट पाहत पलंगावर लोळणाऱ्या माधवीला कुणीतरी ती बातमी सांगितली आणि धडपडत ती घराबाहेर पडली...

अशोकच्या बँकेतला फोन खणाणला. अधिकाऱ्यांनी अशोकला त्याला फोन आल्याचे सांगितले. फोन कानाशी लावून अशोक म्हणाला,

"अशोक बोलतोय..."

"अशोक.. अशोक... मी माधवी. त.. तू.. लवकर ये."

"अग, पण काय ?" माधवीचा घाबरलेला स्वर ऐकून अशोकने काळजीने विचारले.

"अरे, पीयूषला कुणीतरी खूप मारले आहे. त्याला दवाखान्यात शरीक केलं आहे. त्याची प्रकृती खूप चिंताजनक आहे."

"मी लगेच निघतो. ठेवतो." असे सांगून अशोकने फोन ठेवला. साहेबांना सांगून तो ताबडतोब दवाखान्यात पोहोचला. दवाखान्यात बरीच गर्दी होती. त्याच गर्दीत असलेल्या जिव्हाळा परिवारात माधवीही होती. अशोकला पाहताच ती त्याच्याजवळ जात रडत म्हणाली,

"अशोक, पीयूषची अवस्था खूप चिंताजनक आहे. खूप मारले आहे..." तितक्यात बाहेर आलेले डॉक्टर म्हणाले,

"पेशंटची अवस्था भयंकर बिकट आहे. शस्त्रक्रिया करावी लागेल."

"डॉक्टर, काहीही करा पण.."

"आम्ही प्रयत्न करतोय. पण पेशंटला रक्त द्यावे लागेल..." डॉक्टर म्हणाले आणि अनेकांनी रक्त देण्याची तयारी दर्शवली. काही जणांचे रक्तगट जुळाले नाहीत तर ज्या एक-दोघांचे रक्तगट जुळले त्यांची शारीरिक अवस्था पाहून डॉक्टरांनी नकार दिला. शेवटी पीयूषने स्थापन केलेली रक्तपेढी त्याच्या मदतीला धावून आली. मरणासन्न अवस्थेत असलेल्या पीयूषला रक्तपेढीच्या अनेक दात्यांनी रक्त देण्याची तयारी दर्शवली.

त्याच रात्री खूप उशिरा पीयूषवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सुबोध-सुहासिनी दवाखान्यात पोहोचले होते. शस्त्रक्रिया संपल्यानंतर बाहेर आलेले डॉक्टर म्हणाले,

"आम्ही भरपूर प्रयत्न करीत आहोत. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आजची रात्र चांगली गेली की, आपण जिंकलो. पेशंटजवळ कुणीही थांबण्याची गरज नाही.."

"पण डॉक्टर, पेशंट..."

"नाही. तशी गरज नाही. सकाळी लवकर आले तरी चालेल..." डॉक्टर ठामपणे म्हणाले तसे सारे जण जड पावलांनी दवाखान्यातून बाहेर पडले...

त्या रात्री अशोकच्या घरी कुणालाच झोप लागली नाही. सारे आपापल्या जागेवर तळमळत होते. तसे ते घर नेहमीच तळमळत असे. रोजची अस्वस्थता वेगळी असे. त्या रात्रीची तळमळ, तगमग, बेचैनी वेगळी होती. माधवीला वाटले,

'का.. का.. माझ्याच नशिबी असे? लग्नापूर्वी ज्याचावर प्रेम केले त्याच्याशी लग्न तर झाले पण तो केवळ कुंकवाचा धनी ठरला. लग्नानंतर अनेक रात्री तळमळत काढल्या. हक्काचा नवरा शेजारी असतानाही मी त्या सुखासाठी अगतिक असताना ते सुख, समाधान, शांती कधीच मिळाली नाही. तशा अवस्थेत पीयूष भेटला. अशोकच्या समंजसपणामुळे, त्याच्या मनाच्या मोठेपणामुळे आम्हाला एकांत मिळाला, संधी मिळाली. त्यामुळे पीयूषबरोबर मी ते सुख भरभरून मिळवत असताना, आमचे संबंध पूर्ण बहरात येत असताना आजचा प्रसंग उभा राहिला. त्यात पीयूषचे काही... नको.. नको ..तो विचारही नको. आज ना उद्या.. काही दिवसातच पीयूष बरा झाला म्हणजे आमचा सहवास पुन्हा सुरू होईलच. पण तसे चोरटे संबंध फुलविण्यात अर्थ तो कोणता? पियूषच्या जवळ असले, त्याच्या मिठीत असले म्हणजे एक भीती नेहमीच मनात घर करून असते ती म्हणजे कुणी पाहिले तर? अशी चोरटेपणाची भावना मनात शिरली की, मग त्या संबंधात मोकळेपणाने, रसरसून भाग घेता येत नाही, आनंद लुटता येत नाही. प..प..पण पीयूष या आजारातून उठलाच नाही तर? तो मला कायमचा सोडून गेला तर? नको... नको..देवा, खूप वाट पाहिली. अवचित सापडलेला हा झरा असा हिसकावून घेऊ नकोस. ईश्वरा, आणखी अंत पाहू नको. पीयूषचे काही बरे-वाईट झाले तर मी या जगात राहणार नाही. त्यापेक्षा हे परमेश्वरा, त..त..तू, अशोकला का तुझ्याकडे बोलावत नाहीस? त्यामुळे माझ्या जीवनातील तिढा कायमचा सुटेल, निर्माण झालेले प्रश्नचिन्ह तरी राहणार नाही. देवा.. देवा, आता आणखी अंत पाहू नकोस...'

शेजारच्या पलंगावर अशोकने चुळबूळ केली तशी माधवी भानावर आली. त्याच्याशी काही तरी बोलावे त्यामुळे मनाची तगमग दूर होईल म्हणून तिने अशोकला आवाज दिला, हलवले परंतु अशोकने प्रतिसाद दिला नाही. 'झोपलेल्याला जागवणं सोपे असते परंतु झोपेचे सोंग वठविणाऱ्यास जागे करणे शक्य नसते..' असे पुटपुटत माधवी तिच्या पलंगावर येऊन डोळे मिटून पडली आणि काही वेळातच तिला झोप लागली...

दैवयोगाने पीयूषची प्रकृती सुधारत गेली. माधवीच्या सेवेचे तिला फळ मिळाले. ती दररोज सकाळी लवकरच दवाखान्यात येत असे. त्याला औषधपाणी, चहा देत असे. अशोक बँकेत जाताना त्या दोघांचा डबा घेऊन येत असे. माधवी पीयूषला जेवू घालून नंतर स्वतः जेवत असे. सुबोध सुहासिनीसह कार्यालयात जाताना किंवा कार्यालयातून घरी जाताना दवाखान्यात पियूषला भेटून जात असे. सायंकाळी अशोक पीयूषचा डब्बा घेऊन आल्यानंतर पीयूषचं रात्रीचे जेवण झाल्यानंतर अशोक माधवीला घेऊन घरी परतायचा.

पीयूषला राहून राहून एका गोष्टीचं वाईट वाटायचं की, त्याची पत्नी मीता त्याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतरही भेटायला आली नाही. त्याच्याशी असलेले सारे संबंध तिने तोडले असले तरीही माणुसकी म्हणून तिने भेटून चौकशी करायला हवी होती. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने भेटायला यावे याप्रमाणे ती भेटायला आली असती तरी हरकत नव्हती. एक समाधान पीयूषला लाभले असते. डॉ. पाटील अमेरिकेहून भेटायला आले. परंतु मीता तर फार दूर नव्हती. त्या गावात नसली तरीही जिल्ह्यातच होती. परंतु मीताची जागा मात्र माधवीने भरून काढली. रात्रंदिवस ती त्याच्यासाठी धडपडत होती. सारी काळजी घेताना त्याची जिथल्या तिथे व्यवस्था बघत होती...

त्या सायंकाळी पीयूषला दवाखान्यातून सुट्टी मिळणार होती. त्याला घरी पाठवणार होते. अशोक आणि सुबोधने पीयूषला त्यांच्याच घरी न्यायचा निर्णय घेतला. कारण पीयूषच्या जखमा जरी भरल्या होत्या तरी तो बराच अशक्त होता. त्याची प्रकृती मूळ पदावर येईपर्यंत त्याला खूप जपावे लागणार होते. घरी येताच पीयूषने विचारले,

"हे काय? मला इथे कुठे आणले?"

"कुठे म्हणजे? घरी!.." अशोक म्हणाला.

"मला माझ्या खोलीवर का नाही..."

"अहो, पीयूषजी, थोडे थांबा. काही दिवस इथेच रहा. मिळेल तो पाहुणचार गोड माना..." माधवीकडे पाहात अशोक म्हणाला. त्याच्या बोलण्यातला अर्थ पीयूष-माधवीच्या लक्षात आला.

घरी आल्यावर पीयूषची प्रकृती झपाट्याने सुधारत गेली. माधवी त्याची विशेष काळजी घ्यायची. त्याचे औषधपाणी, चहा, फराळ, जेवण ती सारे काही वेळच्या वेळी करायची. सुबोध, सुहासिनी, अशोक दररोज आपापल्या कार्यालयात गेले की, दिवसभर दोघेच घरी राहायचे. घरातील एकांत, वातावरण त्यांना पुन्हा एकत्र आणायला पोषक ठरले. त्या प्रकरणापासून खंडित झालेल्या संबंधाला पुन्हा चालना मिळाली. चुंबन, आलिंगन या सुरुवातीच्या चेष्टेनंतर शरीरसंबंध पुन्हा जोमाने सुरू झाले. पुनरुज्जीवीत झालेल्या त्यांच्या शारीरिक चेष्टांना उधाण आले. मनसोक्तपणे, निर्भयपणे, जोमाने ते दोघे त्या सुखाचा आस्वाद घेऊ लागले. परंतु मांजराने डोळे मिटलेले असले तरीही समाजाचे डोळे बंद नसतात. त्यांचे डोळे उघडेच असतात.

कार्यालयात विशेष काही काम नसल्याने आणि साहेबही नसल्यामुळे सुहासिनी त्यादिवशी लवकर घरी निघाली. परंतु मुख्य कारण वेगळेच होते. दुपारी घरी कुणी नसताना पीयूष-माधवी काय करतात हे तिला पाहायचे होते. पीयूषला दवाखान्यातून घरी आणल्यानंतर पीयूष-माधवीच्या वागण्यात कमालीचा मोकळेपणा आल्याचे सुहासिनीला जाणवत होते. माधवी अशोकऐवजी पीयूषच्या खोलीतच जास्त राहत असल्याचे तिने हेरले होते. ती त्याच्याशी हसत-खेळत असायची. त्या दोघांच्या हसण्याचा आवाज बाहेर ऐकू येत असे. ते कुणाला खटकत नसले तरीही सुहासिनीला मात्र ते आवडत नसे. कधी कामानिमित्त किंवा पीयूषची चौकशी करण्यासाठी ती पीयूषच्या खोलीत जायची त्यावेळी माधवी पीयूषला चिकटून बसलेली तिने अनेकदा पाहिले होते. एक वेळेस तर माधवी पीयूषच्या एवढी जवळ होती की, सुहासिनीला वाटले की, ती पीयूषचे चुंबन तर घेत नाही ना? परंतु ते सारे पाहूनही सुहासिनी शांत राहिली. सारी माणसे घरी असताना जर ते दोघे एवढे जवळ येत असतात तर घरात कुणीच नसताना दोघे काय करत असतील? अशा विचारा-विचारात सुहासिनी घरी पोहोचली. घराची दारे सताड उघडी होती. घरात वेगळीच शांतता असली तरी एका क्षणातच त्या शांततेचा भंग करणारे आवाज तिच्या कानावर आले. ते आवाज काही वेगळीच जाणीव करून देत होते. वेगळ्याच शंकेने, वेगळ्याच कुतुहलाने सुहासिनीने हलकेच खोलीत डोकावले आणि अपेक्षित दृश्य पाहून तिचे रक्त गोठले. खोलीत पीयूष-माधवी एकाच पलंगावर एकमेकांच्या मिठीत निर्वस्त्र अवस्थेत होते. भर दुपारी पती-पत्नी असणार नाहीत अशा अवस्थेत होते. ती हलकेच शेजारच्या पलंगावर टेकली. घामाने डबडबली. काही वर्षांपूर्वी आशाला, स्वतःच्या मुलीलाही तिने अशाच अवस्थेत पाहिले होते. त्यावेळी ती संतापाने थरथरली होती. परंतु का कोण जाणे सुनेला- माधवीला त्या अवस्थेत पाहून ती रागावली नाही, संतापली नाही तर तिच्या साऱ्या संवेदना, चेतना थंडावल्या, लुळ्या पडल्या. तिला काही सुचेनासे झाले. डोके गच्च धरून ती पलंगावर बसली. डोके जरी गच्च धरले असले तरीही विचारांचे गरगरणे वेगात सुरू होते,

'का... का..मलाच अशी दृश्यं पाहायला मिळतात? त्यावेळी आशाला अशाच अवस्थेत पाहिल्यानंतर मी माझी राहिली नव्हते. हातात येईल त्याने आशाला बडवले परंतु सुनेला तोच प्रकार करताना पाहून माझ्या संतापाचा उद्रेक का झाला नाही? आशाला बडविणारे हात आज का लुळे पडले? का? का? माधवी माझी सून आहे म्हणून? माधवीही आशाप्रमाणे घराण्याची लाज आहे, अब्रू आहे. तरीही मी गप्प का राहिले? तिला काही बोलले आणि तिने अशोकचे 'त्या' बाबतीतले अपंगत्व जगजाहीर केले तर? ही भीती तर मला वाटत नाही ना? घराणे बदनामीच्या जाळ्यात अडकेल या भीतीने तर माझ्या भावना थंडावल्या नाहीत? मग मी करु तरी काय? मी चूप राहिले तर ह्या दोघांचा धरबंध सुटेल. ते निर्लज्जपणे पुन्हा पुन्हा एकत्र येतील. मी किती दिवस चूप राहू? आशाप्रमाणे माधवीही पळून जाईल ही भीती तर मनात बसली नाही ना? माधवीप्रमाणेच मीही एका अर्धवट पुरुषाची बायको... पण मी...' सुहासिनी विचाराच्या भोवऱ्यात गरगरत असताना कपडे सावरत बाहेर आलेल्या माधवीने पलंगावर बसलेल्या सुहासिनीला पाहिले आणि तिचे धाबे दणाणले. ती नखशिखांत घामाने डबडबली. दोघींची नजरानजर झाली. तशा दोघींच्याही नजरा खाली वळल्या. एकीच्या नजरेत चोरटेपणाची, अपराधीपणाची भावना होती तर दुसरीच्या नजरेत असहाय्यपणाची, आपण काहीही करु शकत नाहीत, बोलू शकत नाही ही भावना होती.

माधवी स्वयंपाक घरात गेली. शरीराने ती स्वयंपाक घरात पोहोचली असली तरीही तिचं मन तिच्यापाशी नव्हतं. ते विचाराच्या सागरात गटांगळ्या खात होते. तिला वाटले,

'आई केव्हा आल्या? अशा अचानक कशा आल्या? आम्हा दोघांबद्दल तर त्यांना काही शंका आली नव्हती ना? घरी कुणी नसताना आम्ही दोघे काय करतो हे पाहण्यासाठी तर त्या लवकर आल्या नाहीत ना? त्यांना येऊन किती वेळ झाला असेल? आम्ही नको त्या अवस्थेत असताना तर त्यांनी आम्हाला पाहिले नसेल ना? तसे पाहिले असेल तर त्या पुढे काय करतील?बाबांना, अशोकला सांगितल का?ते तिघे मिळून काय करतील? नुकताच सापडलेल्या तृप्तीच्या मार्गावर जात असताना असा अडथळा का यावा? अशोक जरी डोळे बंद करून आम्हाला ती संधी उपलब्ध करून देत असला तरीही आम्हाला ते सुख मनमुराद लुटताच आले नाही. अशोक बाहेर आहे हे दडपण कायमस्वरूपी मनावर असल्यामुळे सारे कसे एक गरज म्हणून, एक व्यवहार म्हणून उरकावे लागत असे. कदाचित आमची ती अडचण अशोकने ओळखली आणि म्हणूनच त्याने बँकेत जायला सुरुवात केली. अशोकच्या त्या निर्णयामुळे आम्ही दिलखुलासपणे, मनसोक्तपणे ते सुख अक्षरशः ओरबाडून घेत होतो. मनावर कोणतेही दडपण नसल्यामुळे अधाशीपणे, जेवढे मिळविता येईल तेवढे सुख आम्ही मिळवत असताना आज आई अचानक का आल्या? त्यांनी आम्हाला त्या अवस्थेत नक्कीच पाहिले असणार? कारण मनमोकळेपणाने सुखाची चव चाखताना कशाचेही भान राहत नव्हते. अगदी दार लावण्याचे, ना कपड्यांचे, ना आवाजाचे. आई आल्यानंतर त्यांनी आमचे आवाज नक्कीच ऐकले असणार आणि त्यांनी खोलीत डोकावले असणार. बाप रे! आता त्या काय करतील? काय निर्णय घेतील? देवा, काय वाढून ठेवले आहेस भविष्यात? जे होईल ते होईल.. आता माघार घ्यायची नाही. होऊन .. होऊन काय होईल? या घराचे दरवाजे पीयूषसाठी कायम बंद होतील? झाले तर झाले! बाहेर कुठेही... त्याच्या खोलीवर.... लॉजवर भेटता येईल. तिथे तर कुणाचे निर्बंध नसतील, कुणाची आडकाठी नसेल. पण त्यांनी मलाच घरबाहेर काढले तर? काढले तर काढले! ती एक सुवर्णसंधी असेल, दुग्धशर्करा योग असेल. जी गोष्ट अशी चोरून, लपून मिळवावी लागते ते मिळविण्यासाठी अशोकसोबतचे समाजमान्य नाते तोडून पीयूषच्या सहवासात मिळत असेल तर मी कोणत्याही परिणामाची चिंता करणार नाही. त्या परिस्थितीत कुणाची भीती तर नसेल, मनावर दडपण तर नसेल? परिस्थितीला आपल्या बाजूने वळवून घ्यायचे. तडफड, तळमळ, तगमग सारे काही दूर करायचे. हे घर सोडावे लागले तरी चालेल. पण...पण.. माझ्या तशा

निर्णयामुळे अशोकची स्थिती काय होईल? तो असा आजारी...' विचारा-विचारात तिच्या मनात वेगळेच काही तरी आले. ती पटकन बाहेर आली. तिने सुहासिनीला विचारले,

"काय झाले? लवकर का आलात? बरे नाही वाटत का? चहा ठेवू का?"

"न..न..नको..." असे म्हणत सुहासिनीने चेहरा वळवला. तशी माधवी पुन्हा पीयूषच्या खोलीत गेली.

त्याच रात्रीची गोष्ट. सुबोध त्यांच्या खोलीत वर्तमानपत्र चाळत बसलेला असताना तिथे आलेली सुहासिनी पलंगाजवळ घुटमळत होती. दुपारी नको त्या अवस्थेत त्या दोघांना पाहिल्यानंतर तिच्या मनात वारंवार एकच विचार येत होता, 'सुबोधला सांगावे का नको? काय सांगावे? त्याला मी सांगितलेले खरे वाटेल?आशाच्या प्रकरणाची सारी जबाबदारी माझ्यावर टाकून सुबोध मोकळा झाला होता. माधवीचे प्रकरण ऐकल्यावर सुबोधची प्रतिक्रिया काय असेल? याही घटनेची सारी जबाबदारी पुन्हा माझ्यावरच तळ टाकणार नाही? काहीच नाही सांगितले तर का पीयूष-माधवीचे संबंध थांबणार आहेत? अशोकने दुपारचे ते दृश्य पाहिले असते तर? काय झाली असती त्याची अवस्था? तो नुकताच आजारातून उठलाय. त्यातच तो अशक्त आणि रक्तदाबाने आजारी. काय असेल त्याची प्रतिक्रिया...' सुहासिनीची तशी चिंताग्रस्त अवस्था, उतरलेला चेहरा पाहून सुबोधने विचारले,

"काय झाले, झोपायचे नाही का?"

"झोपायचे आहे पण झोप येईल का नाही..."

"का..का.. असे का वाटते?"

"पीयूष आता चांगला ठणठणीत बरा झाला आहे. तो इथून गेला.."

"बरोबर आहे पण अजून थोडी तब्येत सुधारली की जाईल ना तो."

"तो तसा जाईल असे मला वाटत नाही."

"का? तुला असे का वाटते?"

"जेवण, चहापाणी, औषधी सारे वेळेवर मिळत असताना त्याला माधवीकडून सुखच सुख.."

"सुख? कोणते?" सुबोधने विचारले.

"माधवी त्याच्या शरीराची भूकही..."

"पीयूषची? सुहा, तू काय बोलतेस?"

"भलतेच काही बोलत नाही. मला पूर्वीच संशय आला होता."

"तुला भास झाला असेल. "

"मुळीच नाही. असा आरोप प्रत्यक्ष खात्री झाल्याशिवाय कशी करेन? आज.. आज... भरदुपारी... दोघांच्याही अंगावर बोटभर चिंधी नसलेल्या अवस्थेत..."

"का...य..? भर दुपारी?"

"होय! मला येत असलेल्या संशयाची खातरजमा करावी म्हणून मी..."

"पण त्यांच्या तू म्हणतेस तशा संबंधाला अशोकची परवानगी असेल तर?"

"काय? अशोकची संमती? म..म.. म्हणजे त्या दोघांना अशोकने परवानगी..."

"असू शकते. एक काम कर. शांतपणे माधवीशी चर्चा..."

"माधवीशी चर्चा? नको रे बाबा. आमच्यामध्ये आधीच विस्तू आडवा जात नाही. नको. नको. ती वेगळाच गोंधळ घालील. आकाश-पाताळ एक करून माझ्यावरच नसता आरोप करायची."

"तेही बरोबर आहे. असे कर, घरी कुणी नसताना त्यांचे संबंध जुळतात ना तर मग काही दिवसांची रजा घे. नंतर ऐच्छिक सेवानिवृत्ती घे. तू घरी असली म्हणजे त्यांना तसा एकांत मिळणार नाही. निवृत्तीनंतर मिळणारी सारी रक्कम, ग्रॅच्युएटी बँकेत टाकली तर त्याचे व्याज आणि मिळणारे निवृत्ती वेतन भरपूर असेल. तुझ्या घरी असण्याने त्यांचे संबंध तुझ्या लक्षात येतील. त्यानंतर आपणास शांतपणे विचार करून मार्ग शोधत येईल परंतु मला निश्चितपणे असे वाटतेय की, त्या दोघांना अशोकची संमती..."

"काय म्हणत आहात तुम्ही? पत्नीला मित्राच्या मिठीत..."

"का? तू एवढ्या लवकर विसरलीस? मी जो मार्ग स्वीकारला होता त्याच रस्त्यावर अशोक जात असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको. माझाच वारसा तो पुढे चालवत असेल तर आपल्याला त्याचा अभिमान वाटायला हवा. झोप आता. उद्यापासून रजा घे.." असे म्हणत सुबोधने मान वळवून डोळे मिटून घेतले. मात्र त्याच्या वाक्याने सुहासिनीला अधिक दुःख झाले. कितीतरी वेळ ती कुस बदलत होती, तळमळत होती.... एखाद्या घायाळ झालेल्या पक्ष्याप्रमाणे...

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED