ती एक शापिता! - 25 - अंतिम भाग Nagesh S Shewalkar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती एक शापिता! - 25 - अंतिम भाग

ती एक शापिता!

(२५)

त्या दिवशी सकाळी सुबोधला जाग आली. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याच्या शेजारी सुहासिनी शांत झोपलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं. कारण भिंतीवरच्या घड्याळात सात वाजत होते. एवढा वेळ सुहासिनी कधीच झोपत नसे. परंतु आदल्या दिवशी रात्री माधवीचे पत्र त्यांना मिळाले. अशोकच्या मृत्यूला बरोबर महिनाही झाला नाही तोच माधवी पीयूषचा हात धरून निघून गेली. तो धक्का सुबोधप्रमाणेच सुहासिनीलाही बसला होता. त्यारात्री अन्नाचा कणही न खाता ते दोघे झोपण्याचा प्रयत्न करीत होते परंतु उपाशी पोटी झोप येत नाही असे म्हणण्यापेक्षा बसलेल्या धक्क्याने ते उद्ध्वस्त झाले होते त्यामुळे दोघांनाही उशिरापर्यंत झोप लागली नाही. झोप लागली आहे तर तिला झोपू द्यावे या हेतूने सुबोधने तिच्या पायाजवळची चादर तिच्या अंगावर टाकली आणि पलंगावर असलेल्या लोडला तो टेकून बसला. काही क्षणातच त्याचे लक्ष अशोकच्या फोटोकडे गेलं. फोटोतला अशोक हसतोय असे त्याला वाटले म्हणून सुबोध मनातल्या मनात परंतु अशोकला उद्देशून म्हणाला,

'अशोक, बाळा का रे हसतोस? कोणत्या संकटात तू आम्हाला टाकले आहेस? अरे, आधीच आम्ही दुःखाचा डोंगर सर करत असताना आशाने आम्हाला पार खाली ढकलले... पुन्हा दुःखाचा तोच डोंगर सर करताना वाटलं होतं, आता तरी सारी दुःखं संपतील, नातवंडांच्या बोबड्या बोलात आम्ही सारी दुःखे विसरून जाऊ. पण छे! उलट सुनेच्या काळात आम्हाला अधिकच दुःखं मिळत गेली. तुझ्याकडे पाहून, तुझ्या आजारामुळे मी स्वतः चूप होतो आणि तू कोलमडू नये म्हणून सुहालाही शांत राहण्यासाठी सुचवत होतो. तशा परिस्थितीत तू ते क्रांतिकारी पाऊल उचलले. स्वतःच्या मित्राला स्वतःच्याच पत्नीच्या बेडरूमचा रस्ता दाखवला. अशोक, बेटा तू खरेच मोठ्या मनाचा निघालास रे. जे मी करु पाहत होतो परंतु प्रत्यक्ष नजरेसमोर ते घडावे अशी मानसिक तयारी होत नव्हती. निलेश-सुहाला एकांत मिळावा म्हणून मी माझी बदली करून घेतली परंतु माधवी- पीयूषला ते संबंध जोडण्याची संधी उपलब्ध करुन देताना ते दृश्य स्वतः पाहण्याचं, ते नाद- प्रतिनाद स्वतःच्या कानांनी ऐकण्याचे धाडस तू केलेस परंतु शेवटी व्हायचं तेच झालं. तुझा मोठेपणा, तुझे धाडस तुझ्याच आईला बघवले नाही. ती परिस्थिती तिनेही अनुभवली होती. जे दिव्य तिच्या नवऱ्याने केले होते, तिच परिस्थिती तिच्या सुनेवर येताच तेच दिव्य तिचा मुलगा करत असताना का कोण जाणे ते तिला पाहवलं नाही. कदाचित वारंवार उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे, सातत्याने तशाच बसणाऱ्या वासनेच्या धक्क्यामुळे तिचा तोल गेला असावा आणि त्याची परिणती तू त्या दिवशी बेशुद्ध झाला आणि डॉक्टरांच्या लाख प्रयत्नांनंतर तिसऱ्या दिवशी तू हे जग सोडून गेला. बेटा, माझा एकमेव आधार, माझे भविष्य तुझ्या रुपाने आम्हाला सोडून गेले. एक कायमचे प्रश्नचिन्ह, एक अंधार आमच्या जीवनात पसरला. जाण्यापूर्वी काही क्षणच शुद्धीवर आलास आणि माधवीकडून पीयूषसोबत लग्नं करण्याचे वचन घेतलेस. बेटा, तू जिंकलास. अरे, शंभर वर्षाच्या म्हाताऱ्याला मरण नको असते तू तर कोवळ्या वयात स्वतःच्या मरणाचा विचार करताना इतरांच्या आनंदाचा विचार करत होतास. तुझ्या समक्ष जे संबंध प्रस्थापित झाले होते ते कायम राहावेत त्यात अंतर पडू नये म्हणून तू तसे वचन घेतलेस. तुझ्या गेलास आणि बरोबर पाचव्या दिवशी माधवी कामावर हजर झाली. अशोक, तुझ्या नावाने दहा दिवस बाजूला बसणेही तिला जमले नाही. आणि ..आणि काल तुझ्या मृत्यूला जिथं एक महिना झाला त्याच दिवशी तिने आमचा, या आपल्या घराचा कायमचा निरोप घेऊन पीयूषसोबत घरोबा थाटला. अशोक, तुझ्या इच्छेची, वचनाची पूर्ती मी स्वतः करणार होतो. ती कोवळी पोर कुणाच्या भरोशावर सारे जीवन काढेल या विचाराने मी तिच्या लग्नाचा साक्षीदार बनणार होतो. तिचा हात पीयूषच्या हाती आनंदाने देणार होतो. परंतु अशोक बेटा, ते भाग्यही माधवीने मला दिले नाही. आमचा साधा निरोपही तिने घेतला नाही. अरे, तू गेलास म्हणजे का आम्ही तिचे कुणी नव्हतो. का.. का.. आम्ही तिला घरात बंदी बनवून ठेवणार होतो? जाऊ दे. तिच्या निर्णयामुळे तू आनंदी, समाधानी असशील आणि असे असताना मी का तुला रडकथा ऐकवतोय...' सुबोध विचारात दंग झालेला असताना टेबलावरील माधवीच्या पत्राने फडफड केली. तिचे पत्र पुन्हा वाचावे म्हणून तो उठला. टेबलाजवळ गेला. माधवीचे पत्र उचलणार की, त्याचे लक्ष टेबलावर ठेवलेल्या एका जाडजूड लिफाफ्यावर गेले. तो लिफाफा उचलून त्याने त्यावरील अक्षर पाहिले ते बरेच ओळखीचे वाटत असताना दुसऱ्याच क्षणी त्याच्या तोंडातून निघाले, 'अरे, हे तर निलेशचे अक्षर! निलेशचे पत्र कधी आले आहे? कालच आले असणार. माधवीच्या पत्रामुळे बसलेल्या धक्क्यातून सुहा हे पत्र दाखवायला विसरली असेल...' असे म्हणत सुबोधने तो लिफाफा फोडला. त्यात एक लांबलचक पत्र दिसले. तो कागद बाहेर काढून सुबोधने वाचायला सुरुवात केली,

प्रिय सुबोध,

माझे पत्र पाहून तुला आश्चर्य वाटेल. कैक वर्षांनंतर तुझी आठवण का झाली असाही प्रश्न तुला पडला असेल. तुझेही खरे आहे आणि खोटेही आहे. खरे यासाठी की, आपली भेट झाली नसली तरी तुझ्या प्रत्येक घडामोडीची माहिती मला आहे. तू इथून गेल्यापासूनचा सारा इतिहास मला माहिती आहे. आता तू म्हणशील एवढे सारे सांगतोस तर भेटला का नाहीस? तेही सांगतो. त्या अगोदर एक सांगतो, तू जे संबंध माझ्यामध्ये आणि सुहासिनीमध्ये निर्माण करु पाहत होतास, ज्यासाठी तू तुझी बदली करून घेतली आणि सुहासिनीसोबत तसे संबंध स्थापन कर म्हणून मला जे पत्र टाकलेस, सुहासिनीलाही तसेच पत्र पाठवले... ते.. ते.. तुझे सारे प्रयत्न फोल ठरले. कारण तुझ्या 'तशा' परवान्यानंतर आणि तुझ्या अनुपस्थितीत मी आणि सुहासिनी कधीच त्या दृष्टीने एकत्र आलो नाहीत. तू कल्पनेत रंगविलेले ते संबंध आम्ही कधीच प्रत्यक्षात आणले नाहीत. होय! सुहासिनी आजही तशीच पवित्र आहे, जशी तुझी तिला पवित्र ठेवायची इच्छा नव्हती. हे सारे मी तुला प्रत्यक्ष भेटून सांगितले असते तर तुला ते खरे वाटले नसते आणि कदाचित ते संबंध प्रस्थापित करण्यासाठी आमच्यावर सक्तीही केली असतीस. आणा-शपथाही घातल्या असत्या आणि कदाचित मी त्यात वाहवलो असतो.

तुझी बदली झाल्यानंतर आम्हा दोघांमध्ये ते नाते निर्माण झाले असतील या समजूतीने तू सुहासिनी बाळंत होईपर्यंत इकडे फिरकला देखील नाही. तू पुढेही तसाच वागशील आणि इच्छा नसतानाही मी तू निर्माण केलेल्या चक्रव्यूहात अडकला जाईल म्हणून.. म्हणून मी साहेबांना पैसे देऊन तिची बदली तुझ्या कार्यालयात केली. ती बदली केली नसती तर तू दिलेली परवानगी आणि सुहासिनीचे रुप मला ते कृत्य करायला भाग पाडले असते कारण.... जेव्हा सुहासिनी आपल्या कार्यालयात पहिल्यांदा हजर झाली तेव्हा मीही तिच्या रुपावर भाळलो होतो. होय! आपल्या कार्यालयातील इतरांप्रमाणे मीही तिला गटविण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु तिचे पारडे तुझ्याकडे झुकताना पाहून आणि तुम्हा दोघांमध्ये निर्माण होत असलेले प्रेम पाहून मी माझे पाऊल मागे घेतले. कदाचित माझं ते जुनं, एकतर्फी प्रेम उफाळून येईल आणि तो तुझ्याशी विश्वासघात ठरेल म्हणून मी तिची बदली केली. मला आजही प्रश्न पडतो की, तुला तसा विचार सुचलास कसा? स्वतःच्या पत्नीला इतर कुणाच्या मिठीत ढकलायचा विचार एका नवऱ्याच्या डोक्यात शिरतो हेच मुळी एक आश्चर्य आहे. असेल तुझा तो विचार तुझ्या ठिकाणी महानही असेल परंतु त्याचवेळी बायकोचा, मित्राच्या मनाचा विचार? तो तू का केला नाहीस? असेल सुहासिनी अतृप्त असेल, तू तिला समाधानी करु शकत नसेल परंतु पतीच्या साक्षीने इतरांची मिठी? शक्यच नाही. कितीही अतृप्त, असमाधानी किंवा बाहेरख्याली स्त्री असली, पतीच्या पश्चात तिचे इतरांशी संबंध असले तरीही पतीची आठवण येताच, त्याच्या इच्छेने आपण हे कृत्य करतोय हे लक्षात येताच त्या बाईच्या भावना थंडावणार नाहीत? ती त्या साथीदाराला रसरसून, भरभरून साथ देईल? तू आम्हाला एका खोलीत सोडून रखवालदार होऊ पाहत होतास, तू तो स्वतःचा पराभव तशाप्रकारे विजयात बदलू बघत होतास? होय! बायकोला ते सुख न देणे हा पतीचा पराभव! परंतु तो तसा प्रकार करताना माझ्या भावनांचा विचार केलास का? तुला मी काय लिंगपिसाट वाटलो? तू म्हणाल्याबरोबर मी सुहाला मिठीत घेऊ? काय झाल्या असत्या त्यावेळी माझ्या भावना? अरे, आपण घरी नसताना आपला मित्र घरी आला होता. तो तासभर बसून पत्नीशी गप्पा मारून गेला हे समजताच तळपायाची आग मस्तकात शिरते आणि तू... तू... मी तुला होकार भरेल असा विचार तू केलाच कसा? माझ्या लक्ष्मीसोबत मी प्रतारणा करेनच कसा? सुहासिनीचे- माझे संबंध लक्ष्मीला कळाले असते तर?त्या साध्वीच्या नजरेला नजर मी देऊ शकलो असतो? आमचा संसार तसा मोडला नसता?

सुबोध, विचार करणे फार सोपे असते रे परंतु त्याचे परिणाम काय होतील हे कुणी सांगू शकत नाही. त्यावेळी तुझ्या मनाचा मोठेपणा पाहून, पडत्या फळाची आज्ञा याप्रमाणे सुहासिनीला ते सुख देत असताना, कालांतराने तुझी चूक तुला समजली असती किंवा आमच्या दोघांच्या संबंधात तू आम्हाला खटकला असता तर? काय झाले असते? कुणाचा एकाचा मृत्यू? एकाला फाशी किंवा जन्मठेप? दोघांच्या बायका, लेकरे, दोघांचे संसार काय झाले असते? हा सारा विचार तू का केला नाहीस?

सुबोध, तू फक्त तोच विचार का केलास? नंतर तुझा संसार तुला सांभाळता आला नाही. संसारवेलीवर उमललेल्या त्या दोन फुलांना तू योग्य प्रकारे विकसित करू शकला नाहीस, जपू शकला नाहीस? मी अगोदरच सांगितलंय की, तू सुहासिनीला इथून घेऊन गेल्यापासून तुझ्या जीवनात घडलेल्या प्रत्येक घटनेचा कण न कण मला माहिती आहे. ते मला कसे माहिती झाले हे नंतर सांगतो. तू तसा क्रांतिकारी(?) विचार करत असताना तुझी मुलगी आशा, सुहासिनीच्या पोटात होती. म्हणतात ना की, अभिमन्यू चक्रव्यूहात शिरण्याचे, त्याचा छेद करण्याचे तंत्र मातेच्या पोटात शिकला, कुणी त्याला धार्मिक थोतांड म्हणाले तरी विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, गर्भवती जसा विचार करते, जे विचार आचरणात आणते तशाच विचाराची संतती निपजते. आशा पोटात असताना सुहाला लैंगिक स्वातंत्र्य देण्याचा टेंभा तू मिरवलास, सुहासिनीला तसे पत्र लिहिले, त्यावेळी निश्चितपणे सुहासिनीच्या मनात अनेक महिने त्याच सुखाचे विचार घोळले असणार, त्या विचारांचे रवंथ झाले असणार आणि त्याचा रस तिच्या गर्भाशयात वाढत असलेल्या आशाच्या मनात शिरला असेल... तिला तसे बाळकडू मिळालं असेल...

तू त्या कुटुंबाचा नायक होतास, प्रमुख होतास, तुला पुढाकार घेऊन काही गोष्टी करणे भाग होते. सुहासिनी अगोदरच तिच्या दुःखात होती. तिने ते सुख माझ्याकडून मिळवले हा तुझा समजही तिला नेहमी डाचत होता. परिणामी तुझ्या घरात हास्य-विनोद नव्हता. नेहमीच एक प्रकारचा ताण- तणाव असे. तू पुढाकार घेऊन तो तणाव बाजूला करायला हवा होता. कोणत्याही आणि प्रत्येक संकटाच्या वेळी स्वतःचे दुःख बाजूला सारून कुटुंबाला सावरणे आणि कुटुंबात मोकळे वातावरण निर्माण करणे, हसणे पेरणे हे काम कुटुंबप्रमुखाचे असते परंतु तू ते केलेच नाहीस...

आशाचे वागणे ज्यावेळी तुझ्या लक्षात आले आणि सुहासिनी- आशामध्ये का कोण जाणे पण एक दुरावा होता जो तुझ्या लक्षात आला नाही किंवा तू तिकडे दुर्लक्ष केले. तो दुरावा लक्षात घेऊन तू सुहासिनीला समजावयाला हवे होते. तिच्याकडून आशाला समजावले असते तर कदाचित आशा बदनाम झाली नसती. पुढचा प्रसंग टळला असता. अशोकच्या बाबतीतही तेच झाले. त्याला दोन- तीन दिवस लघवी होत नव्हती हे तुझ्या लक्षात आले नाही. हे समजण्यासारखे आहे परंतु त्याच्या शरीरात होत असलेले इतर बदल तुला का समजले नाहीत? तुझ्या कुटुंबात मोकळेपणा असता तर अशोकने त्याला होणारा त्रास तुला सांगितला असता. परंतु तू त्याला प्रेमाने कधी जवळ घेतले नाही. अशोक लग्नाला नकार देत होता, त्यावेळी त्यामागची भूमिका तू समजावून घ्यायला हवी होती. त्याच्या नकाराची कारणमीमांसा न करता तू माधवीने केलेल्या 'गर्भवतीच्या' नाटकात फसलास. केवढा हा पोरकटपणा! अरे, त्या दोघांचे लग्नापूर्वी तसे संबंध असते तर त्याच्या लग्नाचा विषय निघताच अशोकने तुम्ही कराल ते चांगले म्हणून नकळत संमती दिली असती. प्रेम करणारे तरुण लग्नाला ठाम नकार देत नाहीत तर ते स्वतःची पसंती, त्याचं प्रेम हस्ते-परहस्ते पालकांपर्यंत जावे हे बघते. लग्नानंतर तो तुझ्याप्रमाणेच आहे हे समजल्यावर तू जर त्याला चांगल्या डॉक्टरांना दाखवले असते तर? तुम्हाला पैशाची काही कमी नव्हती. वाट्टेल तेवढा पैसा खर्च करून तू त्याची प्रकृती सुधारू शकला असता. विज्ञानयुगात आज काहीही अशक्य नाही परंतु तुझी भूमिका कुणालाच समजली नाही. तू तसा का वागलास? तुझ्याप्रमाणे अशोकनेही स्वतःचा अर्धवटपणा लक्षात येताच बायकोच्या सुखाचा डंका पिटत पीयूष- माधवीला एकत्र येण्याची संधी दिली, तशी काळजी घेतली. ती गोष्ट तुझ्या, सुहासिनीच्या लक्षात आली त्यावेळी तुम्ही दोघांनी एकत्र बसून विचार करून मार्ग काढण्याचा प्रयत्न का केला नाही? अशोक आणि माधवीला समोरासमोर बसवून त्या संबंधापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न का केला नाही? पीयूष काही तुमच्यासाठी नवीन किंवा परका नव्हता. तो लहानपणापासून घरी येत होता. प्रसंगी पीयूषलाही त्या संबंधातील तोटे का सांगितले नाहीत? तुम्ही दोघांनी वेळीच उपाययोजना केली असती तर कदाचित त्यांचे संबंध जुळून आलेच नसते..

जाऊ देत. झाले ते झाले. तू अगोदरच दुःखात असताना मी तुला अजून त्रास देतोय पण राहवत नाही. महिना, दोन महिन्यात तू राहत असलेल्या शहरात चक्कर टाकून तुझ्या कुटुंबाच माहिती घेत होतो. परंतु का कोण जाणे तुझ्यासमोर यायचे धाडस झाले नाही. मात्र येणाऱ्या राखीपोर्णिमेला नक्कीच येणार आहे... सुहासिनीकडून राखी बांधून घेण्यासाठी! त्यापूर्वी हा पत्रप्रपंच! आता तरी सुहासिनीविषयीचा तुझा तो महान गैरसमज काढून टाक. मित्रा, कधी काळी आपण एका ताटात जेवलो, त्याच तळमळीने हे पत्र लिहिले... क्षमा करशील?

तुझाच,

निलेश.

'निलेश... निले.. तू.. तू... सुहा... सुहा...' म्हणत सुबोध पलंगाजवळ गेला आणि सुहासिनीला लखलख हलवत म्हणाला,

"सुहा... सुहा... तू निलेशचे पत्र वाचलेस का? माझे डोळे उघडले. सुहा...सुहा.. आपली जी वाताहत झाली.. आपली संसार नौका विषय- वासना सागरात बुडाली त्याला... त्याला मीच कारणीभूत आहे. सुहा, तू केवढी महान आहेस ग? तुझी महानता मला समजलीच नाही गं. मी , मुलगी, मुलगा आणि सूनही तुला वेगळ्या नजरेने पाहत असताना, तू न केलेल्या पापांचा पाढा वाचत असताना तू.. तू.. प्रत्येक वेळी चूप का राहीली? बदनामीचा डाग अंगावर वागवत राहिलीस. सुहा, तू ऊठत का नाहीस? तू बोलत का नाहीस?..." असे म्हणत तिच्या अंगावरची चादर बाजूला केली पण ती हलली नाही. त्याने तिच्या अंगाला हात लावला, तिच्या नाकासमोर बोट धरले, तिच्या छातीकडे पाहिले परंतु...

"नाही.. नाही, सूहा नाही. साऱ्यांनी मला सोडले... त..तू.. मला सोडू नकोस गं सुहा. मला माफी मागायची संधीसुद्धा दिली नाहीस? सुहा, मी स्वतःला महान विचाराचा, क्रांतिकारी समजत होतो पण खरी महान तर तू आहेस, सुहा तू आहेस. जीवनाच्या अंतापर्यंत तू तुझे पावित्र्य सांभाळून ठेवले पण ते कधी मिरवले नाही. मलाही समजू दिले नाही. मीही ते समजू शकलो नाही. ज्याचे पावित्र्य त्यालाच माहिती असते... ते दाखवता येत नाही, त्याचा आव आणता येत नाही हे तू सिद्ध केले, सुहा, तू सिद्ध केले. एक शापित सती म्हणून जगलीस तू.... केवढी महान आहेस तू. तू असे का केलेस? आशाच्या प्रकरणाच्यावेळी मी तुमच्या नसलेल्या संबंधाचा हवाला देऊन तुला पोटच्या पोरांसमोर बदनाम केले. त्याचवेळी तू खरे का सांगितले नाहीस? त्यामुळे नंतर तुझे होणारे अपमान तर टळले असते. परंतु तू तसे का वागली? सुहा... माझी सुहा, एकदाच डोळे उघडून बघ. मला क्षमा मागू दे. 'माफ केले...' एवढे दोनच शब्द बोल गं. सुहा, या दोन शब्दांसाठी माघारी ये. मला असे टाकून जाऊ नको. मी तुला ओळखू शकलो नाही. अर्धवट संसारातही तू समाधान मानलेस. त्या तुझ्या अर्धवट सुखालाही मी दुःखाची किनार लावली. तू.. तू.. मला माफ कर. अशोक...अरे, अशोक, सांग ना रे, तुझ्या आईला. अरे, आपण तिला जसे समजत होतो तशी ती नाही रे. ती पवित्र, समाधानी, खूप सहनशील होती रे. आजची स्त्री कुणी 'का ग' म्हटलेले सहन करीत नाही तिथे तुझ्या आईने आपल्या सर्वांकडून अगदी सुनेकडून होणारा आरोपही मुकाट्याने सोसला रे. अशोक, तू तरी तिला आवाज दे, एकदाच तिला बोल म्हणावे... अशोक...अशोक... सुहासिनी, तू हे काय केलेस? मला न सांगता .... माझा निरोप न घेता... एवढे रागावलीस का? तुझे तरी काय चुकले? माझ्या सारख्याचे तोंड न पाहणे, निरोप न घेणे बरोबर केलेस... सुहा, मी स्वतःच पेटवलेल्या वासनाकुंडात मी माझ्याच कुटुंबातील एकेका व्यक्तिची आहुती देत गेलो. त्या आचेने आपण सारे होरपळत असतानाही माझे डोळे उघडले नाहीत. शेवटी... शेवटी आहुती तुझ्या रुपाने वासनाकुंडात अर्पण झाली. आता .. आता शेवटची आहुती देऊन... सुहा... सुहासिनी, मला माफ कर..." असे म्हणत सुबोध खाली कोसळला. त्याचवेळी अशोकचा फोटोही खाली सरकला. टेबलावरील निलेश आणि माधवीच्या पत्रांनी फडफड केली... बाहेर कुठे तरी कुत्र्याचे रडणे आणि बोक्याचं भकास रडणं ऐकू येत होते...

।। समाप्त ।।

@ नागेश सू. शेवाळकर,

पुणे (महाराष्ट्र) 9423139071