nirnay - 3 books and stories free download online pdf in Marathi

निर्णय - भाग ३

निर्णय - भाग ३

खिडकीतून येणारा उन्हाचा कवडसा तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्याला स्पर्शून तिला जागवायचा प्रयत्न करत होता. रात्रभर तिचे डोळे झोपेच्या अधीन न झाल्याने एक कंटाळवाणी चुरचुर डोळाभर पसरली होती. तिची ओलसर दबलेली उशी तिच्या रात्रभर जागण्याची कहाणी मूकपणे खुणावत होती. तिने सुजलेल्या डोळ्यांनी मोबाईलकडे पाहिलं. मागच्या काही वर्षांत पहिल्यांदाच तो रात्रभर शांत होता. तिने घाबरतच फोन ऑन केला. त्याचे बरेचसे मिस्डकॉल आणि मेसेजेस तिची वाट बघत होते. खरेतर ती रागातच होती आणि तिला त्याच्याशी बोलायचही नव्हतं पण त्याचे इतके सारे मिस्डकॉल्स बघून तिचा राग विरघळून गेला. लटक्या रागाने तिने त्याचा नंबर डायल केला.... आह...... द नंबर यू आर ट्राइंग इज करंटली बिजी.... सकाळी सकाळी ह्याचा नंबर बिजी....? आता तिच्या डोक्याची तारच सणकली. त्याचा राग तिचा स्मार्ट फोन आपटण्यात निघाला.

" अग ए.... जरा बोल...." आईने धावतच येऊन तिच्या हातात आपला फोन टेकवला.

" मला नाही बोलायचं कोणाशी...." तिने फणकारून मान फिरवली.

" अरे........" आई काहीतरी बोलतच होती तोच तिची नजर स्क्रीनवर गेली.... अच्छा.. म्हणजे हा शहाणा आईला मनवत होता तर...

" हॅलो.." तिने थोड्या नाराजीनेच फोन उचलला

" सॉरी " पलीकडून त्याचा मधाळ आवाज.

" आता काय आहे...?" ती अजूनही रागातच.

" अग कालसाठी सॉरी.... खूप...." त्याच्या आवाजात आर्जव होत.

" काही गरज नाहीये तुझ्या सॉरीची... आणि मला पुन्हा कॉल पण करू नको..." तिने फोन कट केला. त्यासरशी तिला धोका देत डोळ्यातून आसू ओघळलेच. दुःखाने आपल हृदय फुटून जाईल की काय असच वाटत होतं.

' गजब का है दिन....' तिचा फोन सारखा वाजत होता. आपले सुजलेले डोळे एका हाताने चोळत तिने फोनच्या दिशेने पाहिलं. तिच्या बेडवर अस्ताव्यस्त पडलेल्या फोनच्या स्क्रीनवर एक अननोवन नंबर झळकत होता. तिने गडबडून बेडरूमच्या दरवाजाकडे पाहिलं. दरवाजा बंदच होता.... म्हणजे ... आई आलीच नाही काय... म्हणजे..... इतका वेळ मी स्वप्नात.....शी... निराशेने ती बसल्याच जागी पडली. मागचे काही दिवस हे असच होत होतं. जेव्हापासून एंगेजमेंट तुटलीय, ती ही आतून तुटून जात होती. आणि तो.... त्याच वागणं अचानक का कोण जाणे बदलल्यासारख वाटत होतं.... पण असं का वाटतंय देव जाणे... काही झालच तर नाहीये.... आपण उगाचच विचार करतोय.. क्षणभर ती मनाला समजावू लागली.. आताही तो दिवस तिला लख्ख आठवत होता. कितीही विसरू म्हटलं तरीही तिच्या स्मृती पटलावरून त्या आठवणी पुसट होत नव्हत्या. त्याला जशी आवडेल तशीच तयार होऊन ती केव्हाची त्याची वाट पाहत बसली होती. आज अंमळ लवकरच तयार झाली होती. स्वतःकडे बघून खुदकन लाजली. ' कोणाची नजर नको लागायला ' तिच्या आईने कडकडून दोन्ही हात तिच्या वरून फिरवून नजर काढून टाकली. सगळ्यांना बाहेर पळवून ती एकटीच आरशासमोर स्वतःशी हितगुज करत होती. आपल्या नाजूक उघडझाप करणाऱ्या पापण्याआडून स्वतःलाच न्याहाळत होती. हवेच्या झोताने कपाळावर रुळणाऱ्या बटांना सावरताना ती उगाचच वैतागत होती. कधी एकदा तो येतोय आणि आपल्याला पाहतोय अस तिला होऊन गेल होत. तसा तो नेहमीच वेळेत यायचा पण आज अर्धा तास जास्त उलटून गेला तरी काही पत्ता नव्हता.... मे बी ट्राफिक मध्ये असेल.... स्वतःशीच गोड हसत तिने आपल्या खट्याळ केसांना हळूच सावरत एका हातात सेल्फी ऑन केला. डावा डोळा मिचकावत पटकन क्लिक केलं. पहिलाच क्लिक इतका मस्त होता.... ती स्वतःवरच खुश झाली. तिची डायमंड नोजरिंग सगळ्यात जास्त चमकत होती.... आज तो पुन्हा प्रेमात पडेल बघ... तिने लगेचच त्याला व्हाट्सअपला सेंड केला आणि त्याच्या सीन करण्याची वाट बघत होती....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED