निर्णय - भाग ४ Vrushali द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निर्णय - भाग ४

निर्णय - भाग ४

पाचेक मिनीटात तिचा फोन वाजला. ती खुशचं झाली आणि का ना होईल, त्याचाच तर फोन होता. आता नक्कीच तारीफ करत बसेल.... बट मी आता त्याचा फोन उचलणार नाही.. लेट का केला त्याने.... आल्यावरच बघू दे..... हेहेहे.….. तिला आवडायचं त्याला अस बेचैन करायला. स्वतःचा लांबलचक घागरा सावरत ती उगाच इकडून तिकडे फेऱ्या मारत राहिली तरी तिची नजर न राहवून फोनकडे जात होती. मनात आणि पोटात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तीच हृदय जोराने धडधड करत होत. सर्वांग एक अनामिक जाणिवेने थरथरत होत.

" काय म्हणतायत आमच्या सुनबाई...??" दरवाजातून त्याच्या आईने प्रवेश केला. हिरव्या निळसर कॉम्बिनेशनची ही सिल्कची साडी तिने मुद्दाम त्याच्या आईसाठी मागवली होती. आज त्याच साडीच उदघाटन केलं होतं तिच्या सासूबाईंनी.

" सासूबाई आणि सुनबाई दोघंही उठून दिसतायत बर का...!! " मागोमाग सासऱ्यानीही एन्ट्री घेतली. त्यांच्या मागेच त्यांचे काही नातेवाईकदेखील दाखल झाले. एवढी माणसं येऊन तिच्या भोवती भिरभिरत होती पण ज्याची एवढी वाट बघतेय त्याचा पत्ताच नाही कुठे..हुssह....

तिचा हिरमुसला चेहरा काही कोणाच्याच नजरेतून सुटला नव्हता. पण तिला त्रास होण्यापेक्षा सरळ सांगितलेलंच बर... " आई... तो कुठे आहे..?" तिच्याकडून प्रश्न आलाच.

" कसय ना... आम्ही सगळे एकत्रच निघालो होतो. परंतु वाटेत येताना कोणाचातरी एक्सिडेंट झाला होता. व हा मागचा पुढचा विचार न करता सरळ मदत करायला धावला."

" तो तर ठीक आहे ना...?" तिने काळजीने विचारलं.

" तो ठीक आहे गं... पण माहितेय ना तो कसा आहे.... आता हॉस्पिटलाईज केल्याशिवाय काही येणार नाही. तरी चांगली धमकी देऊन आलीय.."

" बस एवढंच ना.... मला वाटलं काय झालंय न काय नाही " तिचा जीव भांड्यात पडला. " येऊदे सावकाश.. मी पाहीन वाट त्याची "

तिच्या डोळ्यातून आसू घरंगळले. त्या दिवसापासून आतापर्यंत ती वाटच तर पाहतेय. कोणाच्यातरी एक्सिडेंटच्या धावपळीत की ते फक्त निमित्त मात्र काहीही का असेना तिचा ' तो ' मात्र कुठेतरी हरवला. दुसऱ्या दिवशी एक सॉरी बोलण्यासाठी आणि असेच दोन तीन जुजबी फोननंतर त्याच्याशी संपर्क असा उरलाच नव्हता. नक्की काय घडतंय ह्याचा काही अंदाजच येत नव्हता तिला... त्याला सरळ जाऊन विचारावं का.... पण विचारायला तो भेटायला तर हवा...कुठे हरवलाय कुणास ठाऊक..... पण.... के तो सोक्षमोक्ष लावायचाच आता.

तिने त्याचा नंबर डायल केला. अपेक्षेप्रमाणे बिजी होता. काही दिवसांपूर्वी आपल्यासाठी चोवीस तास अवेलेबल असणारा तो अचानक कुठे बिजी झाला हे एक कोडेच होते तिच्यासाठी. बऱ्याच वेळाने का होईना पलीकडून कॉल उचलला गेला.

" हॅलो " तोच होता पलीकडे. त्याचा नुसता आवाज ऐकून तीच काळीज पाणी पाणी झालं. खूप ठरवलं होतं तिने की बरच काही बोलायचं पण त्याचा आवाज ऐकताच तिचा राग तिच्या डोळ्यात पाणी होऊन गोळा झाला.

" हॅलो " ती स्फुंदतच बोलली.

" काय झालंय " त्याने काळजीने विचारलं.

" तुला काय झालंय... का वागतोयस असा..?? का अचानक दूर पळतोयस...??? नाही करायचं का लग्न... तर सांग ना तस.... नाही पुन्हा त्रास देणार तुला." हृदयात खदखदणार दुःख शेवटी ओठांवर आलंच.

पलीकडून तो शांतच होता.

" बोल ना रे काहीतरी...." आता तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. किती वेळ ती तरी मनातच दुःख दाबून ठेवणार.

" राधिका परत आलीय माझ्या आयुष्यात..." तो काहीश्या अपराधी स्वरात उत्तरला.

" कोण... राधिका..." ती अडखळली. मनातून एक भीतीची लहर दौडत गेली.

" तीच... जिच्याशी ब्रेकअप झाल्यावर तिला विसरण्यासाठी म्हणून ट्रिप वर आलो होतो "

" तिला विसरूनच तू माझ्या प्रेमात होतास ना.. " ती वैतागली. पोटात विरणाऱ्या भीतीच्या गोळ्याला एका हाताने गच्च दाबत ती जवळजवळ ओरडलीच.

" हो ... पण....."

" पण काय......."

"............."

" बोल ना यार.... आता काय जीव घेणार आहेस माझा....?"

" आपण भेटूया का प्लिज..... मी एक्सप्लेन करतो तुला " त्याने अजिजीने विनंती केली.

एव्हाना तिच्या हातून फोन गळून पडला होता. हे अगदी अनपेक्षित होत. ज्या मुलीचा कधी साधा उल्लेखही झाला नव्हता आज तिच्यामुळेच हिच्या आयुष्यात आग लागली होती. तो काय एक्सप्लेन करणार.... त्याने न सांगताही त्याचा निर्णय काय असेल ह्याचा अंदाज तिला आलाच होता. मग का आणि कशासाठी भेटायचं आहे त्याला...?? प्रेम ब्रीम काही नसतं ह्या जगात.... सगळी अंधश्रद्धा आहे.