nirnay - 1 books and stories free download online pdf in Marathi

निर्णय - भाग १

निर्णय - भाग १

आपल्या भरजरी लेहेंग्याचा दुपट्टा सांभाळत आणि चेहऱ्यावर उसनं हसू आणत तिने पुन्हा नंबर डायल केला. पलीकडून पुन्हा फोन बंद असल्याची सूचना मिळाली. इतका वेळ गुलाबासारखा टवटवीत तिचा चेहरा हया फोनमुळे पार कोमेजून गेला होता. हिरमुसून तिने फोन कट केला व सभोवार नजर फिरवली. जमलेल्या सर्वांमध्ये कसलीतरी कुजबुज चालू होती. आवंढा गिळत, त्याकडे दुर्लक्ष करत स्वतःशीच उसनं हसत ती मागे वळली. मागे त्या आसू भरल्या डोळ्यांनी तिची माफी मागत होत्या. भरजरी साडीतील नेहमीचा रुबाब जाऊन एक हताश अवघडलेपण त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं होत. त्यांना असं बघताच ती शरमली.

" अहो आई... अस काय करताय.... " तिने त्यांना प्रेमाने मिठीत घेतल. त्याच्या आईवरदेखील तीच अगदी स्वतःच्या आईइतकंच प्रेम होतं.

" अग काय हे.... ऐन साखरपुड्यादिवशी हा कसल्या समाजसेवा करत फिरतोय...?" इतका वेळ बांधून ठेवलेला त्यांचा संयम तुटला. बोलता बोलता त्यांना हुंदका दाटून आला. आपल्या नाजूकश्या रुमालाने त्यांनी आपले अश्रू अलगद टिपले.

" आई...... चांगलय ना... कोणी ना कोणी तरी मदत केलीच पाहिजे ना... त्यात काय..?" तिने नेहमीप्रमाणे त्याचीच बाजू उचलून धरली. तिचा जीवनसखा होता ना तो. परंतु घरच्यांची अशी अवस्था बघता आता तिचाही गळा भरून आला होता पण घसा खाकरत तिने हळूच आईच्या पाठीवर थोपटल.

" बरे भेटलायत एकमेकाना..." मनोमन तिला धन्य म्हणत आई ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघून गेल्या.

खरंतर आज तिचा आणि त्याचा साखरपुडा होता. दोन वर्षांच्या त्यांच्या प्रेमाला आता एका नात्यात बांधलं जाणार होत. दोघांच्याही घरून त्यांच्या रिलेशनला मान्यता असल्याने दोघेही खुशचं होते. त्यांच्याहीपेक्षा जास्त उत्सुकता तर त्यांच्या पेरेन्ट्सला होती. साखरपुडा ठरल्यापासून दोघांच्याही आया अगदी कंबर कसून तयारीला लागल्या होत्या. दोघीनीही आपापल्या नवऱ्याना कामाच्या मागे सळो की पळो करून टाकलं होतं. त्याच्या घरी तर ती सगळ्यांच्याच मनात भरली होती. मग काय सगळ काही तिच्याच पसंतीने ठरलं होतं. जणू काही ती दोन्ही घरची मुलगी होती.

" काही कॉन्टॅक्ट झाला का ..??" लगबगीने जवळ येत तिच्या आईने विचारलं.

" नाही " तिने नकारार्थी मान हलवली. आईच्या चेहऱ्याकडे न पाहताही या क्षणी ती किती रागावलीय ह्याची तिला कल्पना होती. म्हणूनच एकाच शब्दात उत्तर देऊन ती गप्प झाली.

" काय फालतूगिरी लावलीय देव जाणे...." आई वैतागली तर होतीच.

" आई .... अस काय बोलते...? तो काही मजेत लेट झालाय का..?" ती थोडी उसळलीच.

" जगात तो एकटाच उरलाय का सर्वांची काळजी घ्यायला....? बर... ठीक आहे.... पण त्या जगात त्याच घर पण येत हे माहीत नाही का त्याला...?" आता आई चालू झाली होती. आणि आई रागावलीय म्हणजे तो तर गेलाच पण त्याच्या आधी हिला लेक्चर मिळणार होत. आईला आता थांबावण म्हणजे.....

" अगं.... आई..." तरीही तिने एक बारीकसा प्रयत्न केला.

" काही गरज नाहीये तुला त्याच्या वतीने एक्सप्लेनेशन द्यायची. आपलं सोड स्वतःच्या आई वडिलांचा तरी विचार करायचा. हे जमलेले सगळे लोक काही बाही विचार करून टोमणे मारतायत. साखरपुड्याला चक्क नवरा मुलगाच गायब... मुलाचं कुठेतरी अफेयर असेल नाहीतर मुलीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल नाहीतर तो दुसरीसोबत गेला असेल पळून एक ना दोन....... लोकांच्या टोमन्यांनी आणि पोराच्या काळजीने रडून रडून हैराण झालीय त्याची आई. आणि ह्याला मात्र जगदुनियेच पडलंय... येऊ दे त्याला बघतेच मग...." तणतणत तिची आई निघून गेली खरी पण तिच्याही डोळ्यातून नकळत हलकासा अश्रू तिच्या गालावर ओघळला. मगापासून खूप काही तिच्याही कानावर पडत होतं. कितीही इग्नोर करावं म्हटलं तरीही कान आपसूकच आवाजाचा वेध घ्यायचेच.

कालपासून किती खुश होती ती. जेव्हापासून दोघांच्याही घरच्यांनी होकार दिलाय ती जणू हवेतच होती. आणि का बर नसावी. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलय तोच जीवनसाथी बनणार होता ते ही सर्वांच्या संमतीने. त्यालाच आवडेल म्हणून अबोली रंगाचा हा भरजरी लेहंगा खास दिल्लीवरून मागवला होता. त्याला सरप्राईज म्हणून आपल्या दोन्ही हातावर अगदी कोपरापर्यंत भरगच्च मेहंदी काढून घेतलेली. रात्रभर किती स्वप्न बघितली होती तिने. फोटोग्राफरला ऍडव्हान्स मध्ये वॉर्निंग देऊन ठेवलेली. तिच्यासाईडने ती एकदम प्रिपेअर होती. पण तिला कुठे माहीत होतं उद्या काय होणार आहे.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED