नको चंद्र तारे, फुलांचे पसारे....
(3)
बाहेर काळाकुट्ट अंधार पसरला होता. चंद्रही नव्हता, फक्त चांदण्यांची लुकलूक. आज शनिवार, निता बोटांवर दिवस मोजत होती. आणखी सात आठ दिवसांनी लग्न होतं. कानात हेडफोन लावून ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोनवर गप्पा मारत होती. बेडच्या समोरच लावलेल्या आरश्यात पाहत ती केसांशी खेळत होती. खिडकीतून मंद गार वारा येत होता. तिच्या गालाला हलकेच स्पर्शून जात होता. ती लाजत होती, हळूच हसत होती. हॉलमधल्या दोलकाच्या घड्याळात अकराचे टोले पडत होते. अचानक खिडकीतून येणार वारा शांत झाला. वातावरणात एक गूढ शांतता पसरली. ती शनिवारची रात्र होती. अमावस्या!
रूममधील नाईट बल्ब लुकलुकू लागला. समोर आरश्यात नंदाची प्रतिमा धूसर होऊ लागली. तिच्या जागी तिला दुसरंच कुणीतरी दिसू लागलं. ती प्रचंड घाबरली. फोनवरून तिच्या नवऱ्याला समीरला हाका मारू लागली. पण व्यर्थ तिला त्याचा आवाज ऐकू येईना. काय झालं तिला कळेना. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. तिला कुणीतरी आरशाच्या दिशेने ओढतंय, खेचतंय असं भासू लागलं. ओरडण्याचा खूप प्रयत्न केला पण आवाज फुटत नव्हता. कुणीतरी गळा दाबल्यासारखं, श्वास कोंडल्यासारखं वाटत होतं. जीवाची तगमग होत होती. सगळं अवतीभवती गोल गोल फिरत होतं. कुठेतरी अनोळखी ठिकाणी ती होती. आजूबाजूला पाहू लागली. डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागली. पण समोर काही दिसेना. सगळीकडे पांढुरका धूर पसरला होता. ती इकडे तिकडे पाहू लागली. धूर विरळ होऊ लागला. समोर खिडकीतून मंद गार वारा अंगाला झोम्बत होता. ती एका टेबलावर लॅम्पच्या प्रकाशात कसलंस पुस्तक वाचत होती. त्यात एका कवितेच्या ओळी ती वाचत होती.
नको चंद्र तारे,
फुलांचे पसारे...
जिथे मी रुसावे,
तिथे तू असावे...
तुझ्या पावलांनी,
मी स्वप्नात यावे...
नजरेत तुझिया,
स्वतःला पाहावे...
ती ओळी गुणगुणत होती. डोळे मिटून पुनः पुनः मनातल्या मनात म्हणत होती. तोच अचानक चार पाच काळे कपडे घातलेले इसम तिला खेचू लागले. तिला अलगद उचलून कुठेतरी घेऊन चालले होते. पायऱ्यांवरून आपल्याला कुणीतरी खांद्यावर घेऊन जात असल्याचं वाटतं. अन अचानक तिला खाली जमिनीवर ढकलून दिलं. त्यांचे चेहरे पाहण्याचा तिने प्रयत्न केला पण छे! ती पाहू शकली नाही. आजूबाजूला काही दिसतंय का म्हणून नजर फिरवली. एक अडगळीची खोली. जुनं समान सुमान ठेवलेलं होतं. शंभर वॅटचा बल्ब शेजारच्या भिंतीवर टिमटीमत होता. ते लोक काहीतरी बडबडत होते. त्यातला एकजण दूर जाऊन उभा राहिला. तिच्या अंगावरची वस्त्र कुणीतरी फाडून काढत होतं. ती थांबवायचा प्रयत्न करत होती पण व्यर्थ. अचानक तिच्या अंगावर दाब वाढू लागला. तिच्यावर एकजण जबरदस्ती करत होता. तिच्या अंगाशी नको तिथे किळसवाणे स्पर्श होऊ लागले. अचानक, शरीरात काहीतरी घुसवल्या जात होतं. असह्य वेदना होत होत्या. डोळ्यांत रक्त साठलं. डोळे पांढरे झाले. मेंदूमध्ये असंख्य मुंग्या एकाच वेळी ढसाव्यात, अश्या झिणझिण्या येऊ लागल्या. ती किंचाळू लागली. मोठं मोठ्याने ओरडू लागली. पण तिथं तिचं ऐकणारं कुणीही नव्हतं. ते सारे हसत होते. एका पाठोपाठ एक चौघांनी तिच्यावर अत्याचार केले. तिला ओरबाडू लागले. ती असाहाय्य होती. ओरडत होती. विनवण्या करत होती. पण कुणीही तिच्याकडे लक्ष देत नव्हतं. तिचं अंग अंग ठणकत होत. ती निश्चल पडली होती. उजव्या बाजूला तिचं लक्ष गेलं. तिथं आडव्या पडलेल्या आरश्यात तिला ते चार इसम स्पष्ट दिसू लागले. तिला तो आरसा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं. ती त्यांना त्यात पाहायचा प्रयत्न करू लागली. पण इतक्यात तिला कुणीतरी ओढलं आणि खड्ड्यात झोकून दिलं. तिच्या अंगावर मातीचा ढिगारा पडू लागला. दाब वाढू लागला. श्वास कोंडू लागला. अन एक क्षण आला, तिचा श्वास बंद पडला. समोर फक्त अंधार. काळाकुट्ट अंधार दिसत होता.
ती धाडकन बेडवरून खाली पडली. डोकं सुन्न झालं होतं. अंगात त्राणही शिल्लक नव्हतं. तिला हलताही येत नव्हतं. सारं अंग वेदनांनी ठणकत होतं. हळू हळू तिची बोटं हलू लागली. हात, पाय आणि सर्व शरीर तिला हलवता येऊ लागलं. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. सगळे कपडे बेडवर अस्ताव्यस्त पडले होते. जवळ पडलेला मोबाईल पाहिला. एक वाजून गेला होता. मोबाईल वर समीरचे पन्नास मिस कॉल पडले होते. कसंबसं उठून ती बेडवर बसली. नाईट गाऊन घातला. जवळच्या ग्लासमधलं पाणी घटघटा प्यायली. आणि उशीवर डोकं ठेवून शांत झोपी गेली.
एखादं स्वप्न असेल किंवा आपल्याला भास झाला असेल, म्हणून निता विसरून गेली. त्यानंतर महिन्याभरात पुन्हा असे तिच्याबाबतीत कधीच घडले नाही. महिन्यांनंतर तिचे लग्न झाले. तीन महिने कसे आनंदात गेले कळले देखील नाही.समीर दोन दिवसीय सेमिनारसाठी दुसऱ्या राज्यात गेला होता. निता त्याच्याशी फोनवर गप्पा मारत बसली होती.
"मला खूप भीती वाटतेय रे?"
"हा हा... कसली भीती? आणि काय झालं आता?"
"काही नाही रे! असं एकटं एकटं वाटतंय. काहीतरी विचित्र असं वाटतंय."
"अगं काय हे! एक काम कर... आईजवळ जाऊन झोप. जरा गप्पा मार. झोप येईल आपोआप."
"हम्म"
"आणि परवा संध्याकाळ पर्यंत येतोच आहे मी."
"हो रे... पण आज तू जवळ असावं असं वाटतंय!"
"ओहह असं आहे तर..."
"चल रे... तुला नेहमी तेच बर सुचत..."
आजही शनिवार आणि अमावस्या. निताला याची कल्पनाही नव्हती, की आजही पुन्हा तेच घडणार आहे! बोलता बोलता अकरा कधी वाजले कळलंही नाही. पुन्हा एकदा नाईट बल्ब लुकलुकू लागला. ती घाबरली. समोरच्या आरश्यात स्वतःच प्रतिबिंब हळू हळू धूसर होऊ लागलं. तिचा श्वास वाढू लागला. हृदय धडधडू लागलं. डोळे विस्फारून ती आरश्याकडे एकटक पाहत होती. आरश्यात तिला तिच्या जागेवर कुणीतरी दुसरी बाई दिसू लागली. तीच जी मागच्या वेळी दिसली होती. आत्ता मात्र निता पुरती हादरली. ती समीरला काही सांगू पाहत होती. पण व्यर्थ! तिचा आवाजच फुटत नव्हता. आरश्यातून पांढुरका धूर तिच्यादिशेने येऊ लागला. ती तिथून उठून जायचा प्रयत्न करू लागली पण तिला कुणीतरी बांधून ठेवलं ठेवलं होतं. एक अनामिक, अदृश्य शक्ती तिला हळू हळू आरश्याकडे ओढू लागली. तिने मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाजच येत नव्हता. आणि पुन्हा एकदा ती त्याच जागेवर टेबल लॅम्पच्या प्रकाशात तेच पुस्तक आणि तीच कविता वाचत होती. तोच प्रसंग, ते चार अनोळखी इसम, त्या विनवण्या, त्याच किंचाळ्या, आणि तोच असह्य अत्याचार पुन्हा एकदा तिला अनुभवायला लागला. पण या वेळी मात्र, तिने बाजूचा आरश्यात एक इसमाला पाहिलं.
रात्रीचे साडे बारा एक होत आले होते. मोबाईलवर समीरचे पंधरा वीस मिस कॉल येऊन गेले होते. त्या रात्री मात्र ती वेगळ्याच विचारात झोपी गेली. सकाळी उठायला उशीर झाला. समीरशी जरा फोनवर बोलून ती बाजूच्या खोलीत आजीकडे गेली. झाला प्रकार आजीला सांगितला. आजीने तिच्या जुन्या ट्रँक मधून, जुन्या पांढऱ्या मळलेल्या कापडात गुंडाळलेले काही जुने फोटो काढले. ब्लॅक व्हाइट रंगात काढलेले फोटो होते. काहींचा रंग उडालेला होता. त्यामुळे अस्पष्ट दिसत होतं. आजी तिच्या बापाबद्दल सांगत होती.
'आधी सगळे ढवळेवाडीत राहायला होतो. तुझा बाप असाच गावात उनाडग्या करत, लांडया लबाड्या करत फिरायचा. दोन तीन वेळा पोलिसांनी पकडून सुद्धा नेलं होतं. पण सुधारला नाही. एका रात्री अचानक सगळ्यांना पहाटे तयार राहण्यास सांगितलं. तेव्हा तू फक्त दोन तीन वर्षांची होतीस. आणि सारा गाव जागा व्हायच्या आत आम्ही गाव सोडला. आणि शहराकडे आलो. आता वीसेक वर्षे झाली असतील.'
ऐकता ऐकता निता फोटो पाहत होती. आणि अचानक एक फोटो पाहून ती भयंकर हादरली. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले. ती डोळे विस्फारून त्या फोटोकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताच आजी म्हणाली,
"काय गं? काय झालं?"
"अ अ आज्जे, ही कोण गं?"
"ही होय? लय चांगली बाय होती बग. साऱ्या गावावर माया करायची. बटुराणी नाव तिचं. सारा गाव तिला वहिनीसाब म्हणायचा."
"आत कुठंय ती?"
"अगं जशी आली तशी गेली ती. कुठं गेली? काय झालं? काही कळलं नाही बग. पण सारा गाव म्हणायचा की, पाटलांच्या पहिल्या बायकोनच तिला मारलं."
"मी आईला विचारलं, की आपलं गाव कुठे आहे. बाकीची माणसं कुठं आहेत. तर ती म्हणाली की, आपण पहिल्यापासून इथंच राहतोय."
"तुझी आई न्हाई काही सांगायची. तुझ्या बापाला घाबरून अजून किती दिस काढणार कुणाष्टोक."
"मग तुला नाही भीती वाटत."
"माझं काय? माझी लाकडं गेल्यात मसणात कधीच. मी कशाला कुणाला घाबरू?"
"आज्जे मला सगळं सगळं सांग ना."
"बरं बाई सांगते पण तुझा बापाला जर कळलं की तू हितं आली होती तर माझं आनखाणं बंद होईल बग. त्याच्याशिवाय आणखी काय करणार त्यो मुडदा."
"मी आहे आज्जे, तू सांग."
आजीने सांगायला सुरुवात केली.
*******