कोणी बोलावले त्याला ?
श्याम आणी किशोर दोघे लहानपणा पासूनचे मित्र. बाजूबाजूला राहणारे , एकाच शाळेतून , कॉलेज मधून शिकलेले. अतिशय जवळचे मित्र. आता दोघे कामाला लागले होते. पण तरीही न चुकता दोन चार दिवसात एकमेकांकडे फेरी ही ठरलेली. आई वडिलांन पासून सगळ्या कॉलनीला त्यांची मैत्री माहित होती.
मार्च एंडिंग संपली. आणी दोघांनी काहीसा सुटकेचा श्वास सोडला. ह्या मार्च एंडिंग मध्ये बॉस नी त्यांचा चांगलाच घाम काढला होता. जास्त किशोर वैतागला होता. त्याचा बॉस एक नंबरचा खडूस... मग काय ?
किशोरला त्यांनी चांगलाच राबवून घेतला होता.
" खूप कंटाळा आलाय रे...." नेहमी प्रमाणे कॉलनीच्या गार्डन मधील बाकावर दोघे बसले होते. दोन दिवसापासून दोघे पुन्हा भेटायला लागले होते . नाहीतर मागील महिन्यापासून दोघांना एकमेकांची तोंडे पाहायला पण वेळ नव्हता इतके दोघे कामात बुडले होते. जेवणाची शुद्ध नाही , घरी येण्याची वेळ नाही. पण आता सगळे टार्गेट्स पूर्ण झाले होते. त्यामुळे दोघे आज मस्त मूड मध्ये गार्डन मध्ये बसले होते.
" मला पण खूप कंटाळा आलाय. मागच्या महिन्याभरात जाम राबवलं रे कंपनीने.... " श्याम त्याच्या बोलण्याचीं री ओढत म्हणाला.
" मला कधी कधी असे वाटते की , आपण हे सगळे कशाला करतोय? म्हणजे बघ उतारवयात स्थिरता यावी म्हणून आपण आपली जवानीची सगळी वर्षे फुकट घालवत आहोत. एव्हडे राब राब राबल्यावर आपण म्हातारपणा पर्यंत जगू कां ? " किशोर आपल्या जीवनाचे सार अगदी श्री कृष्णाने गीता सांगितल्या सारखे
सांगायला सुरवात केली.
" ह्म्म्म.... " श्यामने फक्त हुंकार भरला. ह्या आधी पण त्याने हे सार किशोरच्या तोंडून ऐकले होते. आणी आता पण अर्जुनाच्या भक्तिभावाने तो पुन्हा ऐकत होता.
" मला तर हे सगळेच एकदम फोल वाटते. आयुष्यभर मरमर मरा... लग्न करा , पोरं काढा , आणी मग एकदिवस मरून जा... काय आहे आयुष्यात ?
मला मोकळ , स्वछंदी जगायचे आहे. काम करावे पण ते करताना पोट भरण्याबरोबर एक छंद , आवड असे असायला हवे. "
" हा... हे बरोबर आहे. म्हणजे मूड आला तर कामाला जायचे नाहीतर पंधरा वीस दिवस नाही गेले तरी चालेल. "
श्याम ने हसून त्याला उत्तर दिले.
" अगदीच तसें नाही. पण असे मान मोडून काम करणे कसे शक्य आहे? " किशोर वैतागून म्हणाला.
" अरे आता त्याला आपण काय करणार ? त्रास सगळ्यांनाच आहे. आलिया भोगासी असावे सादर ह्या उक्ती प्रमाणे आपण फक्त वागत राहायचे..." श्याम त्याला समजावत म्हणाला.
"'नाही आपण त्याच्यावर काही तोडगा काढला पाहिजे.."
किशोर म्हणाला आणी श्याम दचकला. आता हा काय नोकरी सोडायचे बोलतो की काय ?
" जॉब सोडायचा विचार पण मनात आणू नकोस." ठामपणे श्यामने सांगितले.
" ए... भित्र्या जॉब सोडायला नाही म्हणत आपण चार आठ दिवस कुठेतरी जाऊया. "
" हां हे ठीक आहे." श्याम सुटकेचा श्वास सोडत म्हणाला. तसें त्यांचे फिरायला जाणे हे काही नवीन नव्हते. जॉब करून कंटाळा आला की , चार आठ दिवस मस्त फिरायला जायचे. मस्त मज्जा करायची , निसर्गाच्या सानिध्यात ताजेतवाने व्हायचे. आणी परत कामाला लागायचे हे त्यांचे नेहमीचे. त्या व्यतिरिक्त त्यांना दुसरे कोणते व्यसन नव्हते.
" बरं ठीक आहे. कुठे जायचे ? "
" तुच ठरव... किशोर म्हणाला. "
" ठीक आहे. एक माझ्या मित्राचे फार्महाऊस आहे. एकदम आड बाजूला आहे. एका बाजूला गर्द जंगल , त्याच्या बाजूने वाहणारी नदी. एका बाजूला एक लहानसे गाव. "
" चालेल.... कधी निघायचे ? "
" हो...हो... मला त्या मित्राला विचारू दे... आणी आताच तुला सांगून ठेवतोय की तिथे कोणत्याही सोयी सुविधा नाहीत.. नेटवर्क नाही , tv वैगरे नाही. नाहीतर नंतर माझ्या नावाने शंख करशील... " श्याम त्याला सांगत होता.
" हरकत नाही... निसर्ग आहे ना बस झाले. "
" हो तो भरपूर आहे. उंच डोंगर , गर्द जंगल तुला फोटो काढायला खूप काही आहे. " श्याम डोळे मिचकावत म्हणाला.
" मग माझ्या कडून डन.... दोन दिवस आधी सांग मला रजा टाकायला... ठीक आहे. "
" ठीक आहे... "
थोडा वेळ आणखीन गप्पा मारून दोघे घरी निघाले.
================
चार दिवसांनी त्यांचे सगळे ठरले. मित्राच्या फार्म हाऊसवर जायची त्यांची तयारी झाली. किशोर ने स्वतःची xuv सोबत घेणार होता. दोघे चालवू शकत असल्याने अडचण नव्हती. श्यामच्या मित्राने त्याच्या केअरटेकर ला ते दोघे येत असल्याचे कळवले होते. घरच्यांना पण त्यांचे जाणे नेहमीचेच असल्याने त्यांनी कुठे जातंय वैगरे हे विचारलेच नाही . हां पण सांभाळून जा , गाडी सावकाश चालवा वैगरे ढीगभर सूचना सोबत बांधून दिल्या.
पहाटे पहाटे दोघे निघाले. किशोर गाडी चालवायला बसला होता. गाडीत डिझेल वैगरे भरून त्याने टायर मध्ये हवा वैगरे चेक केली. सगळे आलबेल असल्याची खात्री झाल्यावर त्याने कोकणात प्रस्थान ठेवले. वाट तशी दूरची... प्रवासात चांगले आठ दहा तास लागणार होते. आणी शेवटच्या तासाभराचा प्रवास तर अक्षरशः हाडे मोडणारा होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते दोघे फार्म हाऊस वर पोचले.
दुपारची वेळ असून पण आसमंतात एक थंडवा होता. जिकडे नजर जाईल तिकडे मोठमोठे डोंगर आणी गर्द जंगल पसरले होते. आजूबाजूला दुसरे काहीच नव्हते.
" या... या.... " त्यांना बघून त्या फार्महाऊसचा केअर टेकर संपत पुढे झाला.
" संपत ना...? "
" हो... साहेब... तुमचीच वाट बघत होतो. तस साहेबांनी सांगितले होते की तुम्ही येताय म्हणून . "
" मस्तच आहे... रे.. " किशोर मोठा श्वास घेत म्हणाला.
" साहेब अजून तुम्ही बघितलेच काय आहे. डोंगरच्या पायथ्याशी नदी वाहते. समोर गच्च जंगल आहे. कधी कधी एखादे जंगली जनावर पण दृष्टीस पडते. जंगलात किती वेगवेगळे पक्षी , प्राणी आहेत. "
" संपत इथे जवळपास गाव पण होते ना ? "
" हो आहे ना... ह्या हातानी खाली गेले की , साधारण अर्ध्यातासात गावात जाता येते. मी पण तिथेच राहतो. "
" आच्छा. म्हणजे तु इथे राहत नाहीस ? "
" नाही साहेब... एकटा इथे कोण राहील ? शिवाय गावात माझा परिवार आहे... तुम्ही पण नीट राहा. रात्रीचे दरवाजे नीट बंद करून घ्या.. जंगली भाग आहे. कधी कधी वाघ , बिबट्या आजूबाजूला फिरतो... सावध राहा.."
" ह्म्म्म... बरं जेवणाचे काय ? "
" संध्याकाळी तुम्हाला जेवण आणून देईन ... रात्री तुम्ही गरम करून घ्या... बाकी सगळे सामान आहे. "
" ठीक आहे.. ते आम्ही करू... "
" ठीक आहे चला तुम्हाला सगळे दाखवून ठेवतो..." असे म्हणून संपत त्यांना आंत घेऊन गेला.
त्यांना सगळे दाखवून जरुरीच्या सूचना देऊन संपत गेला तेव्हा संध्याकाळचे पाच वाजायला आले होते.
त्या संध्याकाळी दोघांनी गप्पा मारण्यात आणी प्रवासात आलेला थकवा काढण्यात घालवली. रात्री पण लवकर जेवण करून दोघे झोपले. सकाळी संपत येणार होता. त्याच्या बरोबर आजूबाजूचा परिसर फिरायला जायचे होते. थकल्यामुळे त्यांना छान झोप लागली.
सकाळी संपत आला तरी ते झोपलेलेच होते. तो आला तसें गडबडीने त्यांनी आपले आवरले. आणी त्याच्या बरोबर निघाले. दुपार पर्यन्त ते आजूबाजूचा परिसर फिरत होते. गर्द रान , उंच डोंगर कपारी , निरनिराळे पक्षी त्याचे फोटो काढत दोघे त्यात रमून गेले. जंगलातील एका रस्त्याने ते चालले होते. रस्ता कसला पायवाट होती. वर्षानुवर्षे त्यावरून चालत राहिल्याने ती तयार झालेली नागमोडी , झाडीझुडपे टाळत कधी वर चढणारी तर कधी खाली उतरणारी..
त्यावाटेवर काही वेळ चालल्यावर किशोर स्तब्ध झाला.
" काय झाले ? " दोघांनी त्याला विचारले. त्यांना हातांच्या इशाऱ्यावर त्याने गप्प केले. आणी तो आजूबाजूचा परिसर नीट निरखून पाहू लागला. त्याची नजर चमत्कारिक होती.
" संपत ही वाट पुढे गावाकडे जाते का ? " अचानक किशोरने प्रश्न विचारला. त्याच्या त्या प्रश्नावर संपत चमकला.
" हो... पण तुम्हाला कसे काय माहित ? " संपतचा स्वर आश्चर्याचा होता.
" मला असे वाटतेय की मी इथे आलोय..... खूप आधी..."
" काय बोलतोय...? हे कसे शक्य आहे...? " श्याम त्याचे बोलणे उडवत म्हणाला.
" अरे नाही ! मी खरं बोलतोय.. "
" हं... अरे.. जंगलात अशे भास होतात... असे वाटते की आपण आधी पण इथे आलोय... सगळे जंगल एक सारखे वाटते म्हणून असे भास होतात..." श्याम त्याची समजूत काढत म्हणाला.
" मला भास होत नाहीत... संपत...! पुढे एक मोठे पिंपळाचे झाड आहे ना ? त्याच्या खाली लोक अंगावरून उतरलेले अन्न ठेवतात ? " किशोरने एक दिशा दाखवत बोट दाखवले. त्या दिशेला दृष्टीक्षेपात तरी कोणतेही मोठे पिंपळाचे झाड नव्हते. श्याम ने पण बघून खात्री केली.
" हो आहे.... पण तुम्हाला हे सगळे माहित आहे हे आश्चर्य आहे. " संपत आता पुरता चकित झाला होता.
" संपत मला अजून पण बऱ्याच गोष्टी माहित आहेत चल... " आणी किशोर आता त्या तिघांत पुढे चालू लागला.. काही वेळातच ते त्या अवाढव्य पिंपळाच्या झाडाखाली आले. झाडाखाली अंगावरून काढलेले अन्न छोट्या छोट्या मडक्यात काढून तिथे ठेवलेले दिसत होते. काही मडकी प्राण्यांनी फोडली होती. त्याच्या कापऱ्या इतरस्त पसरल्या होत्या. पिंपळाच्या खाली येऊन किशोरने त्या मोठ्या पिंपळावर नजर टाकली... त्याच्या नजरेत वात्सल होते. जणू काही जुना दोस्तच असावा...
काही वेळ तेथे थांबल्यावर ते गावाच्या दिशेने निघाले... दहा पंधरा मिनिटात ते गावात पोचले.. गाव कसले एक लहानशी वाडी होती. दहापाच घर... काही गुरांचे वाडे... इकडे तिकडे बघत किशोर गावातून फिरत होता. आणी त्याच्या मागे संपत आणी श्याम.
शेवटी एका घराच्या दारावर किशोर थांबला.. मोठे घर होते. दरवाजा पण अवजड आणी भक्कम होता. तो त्या दरवाज्यावर थांबला आणी संपतचे काळीज मोठं मोठ्याने धडधड करायला लागले.
" साहेब... चला इथून... ह्या घराची सावली पण पडता कामा नये आपल्यावर..." संपत त्याचा हात धरून त्याला मागे खेचत म्हणाला. संपतच्या आवाजावरून श्याम ला पण धोक्याची जाणीव झाली... तो पण किशोरला मागे फिरायला विनवायला लागला.
" हे माझेच घर आहे...." किशोर अतिशय थंड आवाजात म्हणाला. आणी त्या बरोबर संपतने त्याचा धरलेला हात पटकन सोडला. आणी दोन पावले मागे गेला. त्याच्या चेहऱ्यावर भीती आता स्पष्ट दिसत होती. श्यामला कळत नव्हते की इथे नक्की घडतेय काय ?
पुढील भाग लवकरच....
© सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित...