मागील भागावरून पुढे......
दुसऱ्या दिवशी मंदाकिनी सकाळी लवकर उठली.आपले स्नान , जेवण वैगरे आटपून ती आजी कडे गेली...
" आजी ! मी आलेय. "
" ह्म्म्म.... मंदाकिनी , आता मी काय बोलतेय ते नीट लक्षात घे... मी तुला काही मंत्र शिकवणार आहे. ते तू चांगल्या प्रकारे पाठांतर करून घे.... "
" पण आजी मला ते मंत्र कशाला पाठ करायचे आहेत? "
" वेळ आली की मी सांगीन.... सध्या मी जसे म्हणतेय तसें ते मंत्र माझ्या मागून म्हणत जा..."असे म्हणून आजीने मंत्र म्हणायला सुरवात केली. दुपारी दोघी जेवायला थांबल्या. आणी पुन्हा संध्याकाळी परत मंत्र पठण चालू केले. सलग दोन दिवस असे करून आजीने तिच्या कडून ते मंत्र पाठ करून घेतले...
" आता आपल्या देवघराच्या खोलीत एक पेटी आहे. त्यात एक मोठे जुने पुस्तक आहे. ते घेऊन ये. "आजीने तिला सांगितले.
" मंदाकिनी ! हे पुस्तकं खूप जुने आणी दुर्लभ आहे. फार कष्टाने मी ते मिळवले आहे. ह्यात वेगवेगळ्या सिद्धी , मंत्र , धार्मिक यंत्रे ह्यांची सखोल माहिती आहे..." आजी त्या प्राचीन पुस्तकावरून हळुवार हात फिरवत तिला सांगत होती. ते पुस्तकं तिच्या मनाच्या खूप जवळचे दिसत होते.
" मी तुला जे मंत्र शिकवले आहेत ते. कसले आहेत माहित आहेत ? "आजीने हसून तिला विचारले.
" पूर्णपणे माहित नाही आजी... पण माझ्या माहिती प्रमाणे ते मंत्र गुप्तधन वैगरे मिळवण्यासाठीचे आहेत. "
" बरोबर .... मी त्या ब्रम्हसमंधा च्या मार्फत आजूबाजूच्या परिसरातील गुप्तधनाचा शोध घेतला.. अश्या खुप जागा मला माहित आहेत. पण ते गुप्तधन मिळवणे सोपे नाही. ते गुप्तधन सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्यावर काही मंत्र विधी केलेले असतात. जे विधिवत सोडवल्या शिवाय कोणीही ते गुप्तधन मिळवू शकत नाही. हे मंत्र तुला त्या मंत्रविधी ला सोडवण्यात मदत करतील..."
" ह्या मंत्राच्या साह्याने जेव्हा तू विधिवत साधना करशील ते गुप्तधन तुला मिळेल.. "
" पण आजी आपल्याला त्या गुप्तधनाची गरज काय ?"
" आपल्याला नकोय ग.... पण तुला किशोर शी लग्न करायचे असेल तर त्या सगळ्यांना ह्याचे आमिष खूप कामाला येईल. अशी मुलीला कोणी नाही म्हणेल का ? "
आजी अतिशय साळसूदपणे म्हणाली. आता मंदाकिनीच्या लक्षात तिचा डाव आला.
जर मंदाकिनी बरोबर किशोरचे लग्न झाले तरच त्यांना ते गुप्तधन मिळणार होते. नाहीतर त्यांना त्यावर पाणी सोडावे लागणार होते. माणसाच्या एकूण लोभी स्वभावाचा विचार करता ते त्या गोष्टीला नकार देतील ही शक्यता कमीच होती...
" मी आता तुला पुढे निरनिराळ्या यंत्र आणी त्यांचे विधी बद्दल शिकवीन... "
" आजी एक विचारू ? "
" ह्म्म्म... "
" तुला ह्या सगळ्या गोष्टीचे ज्ञान कसे ? "
" ज्या मांत्रिकाने मला त्या ब्रम्हसमंधा ला बांधण्याचा विधी सांगितला होता. तो नंतर बऱ्याच वर्षांनी पुन्हा इकडे आला होता. त्या वेळी पण मी त्याची यथायोग्य सेवा केली होती. त्यामुळे त्याने आपल्या शेवटच्या दिवसात जाताना त्याच्या सगळ्या तांत्रिक विद्या , सिद्धी मला दिल्या... वेळ आल्यावर त्या विद्या तसाच कोणाला तरी देण्यास सांगून तो कायमचा समाधीत गेला. "
" मग आता ह्या सगळ्या विद्या तु कोणाला देणार आहेस ? " मंदाकिनीने अधीरतेने विचारले.
" किशोर ला..." आजी म्हणाली... आणी ते उत्तर ऐकून मंदाकिनी काहीशी नाराज झाली. आजीच्या ते लक्षात आले.
" अग तुला मी गुप्तधन आणी इतर यंत्र विधी शिकवीन आणी त्याला ह्या तांत्रिक विधी आणी सिद्धी देईन म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांना पूरक व्हाल. एकमेकांच्या मदतीने तुम्ही सगळे काही नीट करू शकाल... "
मंदाकिनी पण आजीची दूरदृष्टी बघून चकित झाली होती... तिने आधीच सगळे ठरवून ठेवले होते पण त्याची काहीही गंधवार्ता तिने मंदाकिनीला होऊ दिली नव्हती...
पुढे पंधरा दिवसांनी किशोरसह सगळा परिवार पुन्हा एकदा आपल्या जुन्या माने वाड्यात परत जमा झाला. सगळा गोतावळा बघून आजीनं समाधानाने डोळे पुसले. आपल्या सगळ्या परिवाराला एकत्र बघून तिचे मिचमिचे डोळे लाकाकून गेले होते....
मंदाकिनीने सगळ्या साठी वाड्यातील खोल्या साफसफाई करून ठेवल्या होत्या. वाड्यात साफसफाई करून झाली होती. कोणाचीही कोणतीही गैरसोय होणार नाही ह्याची जातीने दोघींने काळजी घेतली होती.
दोन दिवस सगळे आनंदात त्या वाड्यात राहत होते. लहान मुलांना तर हा वाडा आपला आहे ह्या बद्दल माहितीच नव्हती. पण इथे खेळायला , उनाडायला खूप जागा असल्याने बच्चे कंपनी पण जाम खुश होती. किशोर चे दोन काका आणी एक आत्या आपल्या मुलांना सोबत घेऊन आले होते. खूप वर्षांनी ते सगळे परत वाड्यात आल्याने सगळे जुने दिवस आठवत होते. चार पाच दिवसानंतर आजीने सगळ्याच्या समोर किशोर आणी मंदाकिनीच्या लग्नाचा विषय काढला.
सगळे ते ऐकून अवाक झाले.
" बघ नारायणा ! " आजी नीट आपले बोलणे समजावून सांगत म्हणाली.
" मंदाकिनी एक चांगली मुलगी आहे. मागील काही वर्षात तिने माझी खुप काळजी घेतली. शिवाय बाबू आणी ती दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात."
" पण आजी.... " किशोरच्या वडिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
" नारायणा ! तिला माझ्याशिवाय कोणी नाही. त्यामुळे मी तिला एक सिद्धी दिली आहे. " आजी सांगू लागली.
" जर तिला आपल्या घराची सून करून घेण्यात तुम्हाला अडचण असेल तर मला पण त्या पोरीची पुढची तरतूद केली पाहिजे नां ? "
" तसं असेल तर मी तिच्या भविष्याची काही तरतूद करतो." किशोरचे वडील म्हणाले.
" त्याची काही गरज नाही. मी हे घर तिच्या नावावर करीन शिवाय मी ज्या सिद्धी तिला दिल्यात त्याच्या जोरावर ती अगदी आयुष्यभर पैश्यात लोळत पडली तरी तिला काही कमी पडणार नाही. "
" काय ? " सगळे चमकले. तसं पाहिले तर किशोरचे सोडले तर बाकी सगळ्यांची परिस्थिती तशी बेताचीच होती. जेमतेम खाऊन पिऊन सुखी म्हणता येईल अशीच त्याचे दोन काका आणी आत्याची परिस्थिती होती. त्यामुळे तिला एव्हडे पैसे मिळणार म्हंटल्यावर नाही म्हणले तरी सगळेच चमकले.
" अशी कोणती सिद्धी तिच्या जवळ आहे. किशोरच्या काकांनी विचारले. " आजीच्या बोलण्यानी त्याच्यातील लोभ जागा झाला होता .
" ऐका.. ब्रम्हसमंधाच्या मार्फत मी इथल्या आजूबाजूच्या भागातील गुप्तधना बद्दल माहिती काढून ठेवली आहे. पण ते असे सहजा सहजी बाहेर काढता येणार नाही. त्याच्या साठी विधिवत मंत्र साधना करावी लागते. आणी त्याचे संपूर्ण ज्ञान मी तिला दिले आहे. "
" आता तुमच्यावर आहे की , तुम्ही जर तिला सून म्हणून आपल्या घरात घेतली तर ते सगळे धन पण तुम्हालाच मिळेल..." आजीने योग्य शब्दात त्यांना परिस्थिती समजावून सांगितली....
" पण आई ! " किशोरच्या बाबानां अजून पण खूप शंका होत्या.
" किशोर माझा एकच्या एक मुलगा आहे. त्यामुळे मला ह्या सगळ्यांत खूप भीती वाटतेय... "
" नारायणा ! बाबू तुझा मुलगा आहे तसाच माझा नातू नव्हे काय ? त्यांनी इथे येऊन सगळे माहित असताना पण त्या ब्रम्ह समंधाच्या जाचातुन आपल्या सगळ्यांना सोडवले आहे हे पण मी विसरली नाही. मग त्याच्या जीवाला अपाय होईल असे मी काही करीन कां ? "
आता सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघत होते. असा मिळणार पैसा कोणाला नको होता. पण किशोरचे वडील सगळ्यात मोठे असल्याने शिवाय लग्नाचा विषय किशोरचा असल्याने आता जे काय ते किशोरचे वडीलच ठरवणार होते.
पुढील दोन दिवसात सगळ्यांनी आपसात चर्चा केली. त्यावर किशोरचे मत घेण्यात आले. खरंतर किशोरच्या वडिलांना पैश्याचा लोभ नव्हता पण आपल्या इतर भावंडाची परिस्थिती बघून त्यांना मदत करता यावी म्हणून ते मंदाकिनीला आपली सून करून घ्यायला तयार झाले.
शेवटी ही गोष्ट त्यांनी आजी ला आणी मंदाकिनीला सांगितली.
" खूप चांगला निर्णय घेतलास तू.. नारायणा ! ही पोरगी आपल्या घराण्यात कधी काही कमी पडू देणार नाही.. लक्ष्मीचे दुसरे रूप आहे ती..... " आजी तिची स्तुती करत म्हणाली.
" अग पण आजी ! असे कोणाचे तरी गुप्तधन आपल्याला कसे काढता येईल ? आणी ते चुकीचे नाही कां ? त्यावर असलेला शाप आपल्या सगळ्या घराण्याला भोगावा लागेल ना ? " किशोर ला हे गुप्तधन वैगरे मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता... म्हणून त्याला हे जरा विचित्र वाटत होते.
" बाबू ! अरे आपण त्या धनाचा जो वारस आहे त्याच्या परवानगीने ते काढणार आहोत. आपण जर त्याला ते काढून दिले नाही तर त्याला ते कधी भेटेल ?... नाही. म्हणून त्याला सांगून आपण ते काढायचे शिवाय वारस असल्याने त्याच्यावरील शाप आपल्याला लागणार नाही. त्याच्या बरोबर आपण मिळणाऱ्या संपत्तीची वाटणी करायची म्हणजे तो पण खूष आणी आपण पण खूष..."
" ह्म्म्म... " किशोर म्हणाला.
"'बाबू ! तू आता ह्यांच्या बरोबर मुंबईला जाऊ नकोस. मी तुला काही गोष्टी शिकवणार आहे. " आजीने हळूच त्याला सांगितले.
" शिवाय गुप्तधन काढताना कशी काळजी घ्यायची ते पण मला मंदाकिनीला शिकवायचे आहे... तेव्हा तू काही दिवस इथे राहा... मग नंतर तुम्ही दोघे पण मुंबईला गेलात तरी चालेल.. "
" अग पण आजी मला एव्हडी सुट्टी मिळणार नाही. "
" बाबू ! तुला आता नोकरीची गरज आहे का ? तुझ्या लक्षात येतेय कां की तुला किती संपत्ती मिळणार आहे ते ? " आजीने त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हंटले...
" बरं... आजी आता तू म्हणशील तसें..." शेवटी किशोर पण तयार झाला.
" ह्म्म्म... हे सगळे इथून गेले की , आपण कामाला सुरवात करू. " आजीने सांगितले.
पुढे काही दिवसांनी सगळे पुन्हा मुंबईला निघून गेले. फक्त किशोर मागे राहिला.
त्या नंतर आजीने त्याला नीट समजावून एका माणसाकडे पाठवले. ह्या माणसाच्या जागेत त्याच्या पूर्वजांनी गुप्तधन पुरून ठेवले होते. त्या माणसाला त्या बद्दल माहिती देऊन त्यांनी त्याच्या बरोबर वाटाघाटी केल्या.
" बाबू ! अजून एक महत्वाची गोष्ट. हां सगळा गुप्तधनाचा मामाला आहे. एव्हडी सगळी संपत्ती बघून माणसाची नियत फिरते. कदाचित एखादा तुला पण दगाफटका करू शकतो म्हणून तुला सावध राहिले पाहिजे. "
" उद्या सकाळी अंघोळ वैगरे करून माझ्या कडे ये..
मी माझ्या सगळ्या विद्या तुला देईन... म्हणजे तुला कोणाचेही भय राहणार नाही. "
दुसऱ्या दिवशी आजीने आपल्या सर्व तांत्रिक विद्या , सिद्धी ज्या तिला त्या बाबा कडून मिळाल्या होत्या त्या किशोर ला दिल्या.
" किशोर आता तुला माझ्या सगळ्या विद्या आणी सिद्धी मिळाल्या आहेत. मंदाकिनीला गुप्तधन काढायची विद्या अवगत आहे. आता तुम्ही दोघे ही एकमेकांना मदत करून आयुष्यात सुखी राहा. मंदाकिनी तुझा संसार खूप चांगला करेल. गुणी आहे पोरगी." आजी म्हणाली.
पुढील काही दिवसात किशोर आणी मंदाकिनीने त्या माणसाच्या जागेतून गुप्तधन बाहेर काढले. अफाट धन असल्याने तो माणूस पण खुश झाला. ठरल्या प्रमाणे त्यातील काही हिस्सा किशोर आणी मंदाकिनीला मिळाला.
सर्व काही नीट आणी सुरक्षित पार पडल्याने दोघेपण खूप खुश होते. त्या पैश्यातून त्यांनी आपले काका आणी आत्या दोघांनाही मदत केली.
शेवटी सगळ्यांच्या संमतीने एका चांगल्या मुहूर्तावर किशोर आणी मंदाकिनीचे लग्न लागले. खुप वर्षांनी माने वाड्यात एखादे शुभकार्य पार पडले... लग्न पार पडल्या नंतर आजीने समाधानाने डोळे पुसले. आता तिला कोणाचीही चिंता नव्हती. सगळ्यांची तिने व्यवस्थित सोय लावली होती. आता ती आपल्या शेवटच्या प्रवासाला मोकळी होती. किती वर्ष ती मृत्यूला टाळत आली होती. पण आता तिला पण निजधामाला जाण्याची ओढ लागली होती....
© सर्वाधिकार लेखकाकडे.....
======== समाप्त =========