कोणी बोलावले त्याला ? ( भाग 6 ) निलेश गोगरकर द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोणी बोलावले त्याला ? ( भाग 6 )

मागील भागावरून पुढे.....

दुसऱ्या दिवशी किशोर मुंबईला जायला निघाला.
जाण्या आधी तो काही वेळ आजी बरोबर बोलत बसला होता.

" बाबू ! सगळ्यांना एकदा घेऊन ये इकडे... खूप वर्ष झाली कोणी इकडे फिरकले नाही. "

" आजी ! मी माझा पूर्ण प्रयत्न करीन. "

" बाबू ! अजून पण खुप काही गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. सगळे इकडे आले तर मला त्यांना त्या समजावून सांगता येतील... त्यात त्यांचेच भलं आहे... "

" मी समजावून सांगीन त्यांना.. आणी आता तर इथे येण्यात काही धोका पण नाहीय. त्यामुळे त्यांना इकडे यायला काहीच अडचण नसावी असे मला वाटते आहे. आणी शेवटी तु त्यांची आई , आजी आहेस त्यांना पण तुला भेटायची इच्छा असणारच नां ? "

" हो... आता तशी काहीच अडचण नाही. पण खुप वर्ष झालीत त्यामुळे नात्यातील बंध किती मजबूत राहिलेत ते आपल्याला कसे कळणार ? "
" म्हणूनच मला जरा शंका आहे रे...." आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत खिन्न आवाजात म्हणाली.
आता ह्या क्षणाला किमान आपण एक तरी आजीच्या जवळ आहोत ह्या गोष्टीचा त्याला आनंद झाला. आपल्या मुलां, नातवंडात , सुना,, मुलीत शेवटचे एकदा राहावे असे वाटणे स्वाभाविक होते...

" आजी तुला एक विचारू ? "

" ह्म्म्म विचार.... "

" आजी ! मंदाकिनीचे काय ? "

" तिचे काय ? तिला जायचे असेल तर ती मोकळी आहे. पण मला माहित आहे ती मला सोडून जाणार नाही.
पोरीने माझ्यावर खुप जीव लावला आहे... "
" पण तु अचानक का विचारलेस ? "

" काही नाही असेच सहज मनात विचार आला... "

" तिला घेऊन मुंबईला जायचा तर तुझा विचार नाही ना? पोरगी चांगली आहे. तुझा संसार चांगला करेल. पण तुझ्या आईबाबांना चालेल का ती ? कारण ती इथे माझ्या बरोबर होती. त्यामुळे मी विचारतेय... "
आजीने अगदी बरोबर विचारले होते. कारण जेव्हा किशोर तिला घेऊन मुंबईला पहिल्यांदा आला होता तेव्हाच त्याच्या घरी गदारोळ माजला होता. मग ती कोण ते ऐकून सगळे शांत झाले खरे. पण तिला सून करून घेणे म्हणजे अगदीच अशक्य होते...

" कसला विचार करतोस ? तुला ती आवडते नां ? "
त्यावर किशोरने मान हलवली.

" मग मी काय बोलते त्या कडे लक्ष दे.. त्या सगळ्यांना इथे घेऊन ये. त्यांचा फायदा तर आहेच शिवाय तुला पण मंदाकिनीशी लग्न करायला त्यांची परवानगी मिळेल... "

" काय बोलतेस आजी ?" किशोरने अविश्वासाने विचारले. त्याला ह्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता...

" ह्म्म्म.... माझ्यावर विश्वास ठेव... ते सगळे मी जुळवून आणीन... " आजी हसून म्हणाली.. तिच्या बोलण्याने किशोरच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला.

" बरं आजी मी निघू ? लवकर निघाले पाहिजे नाहीतर पोहोचायला रात्र होईल... "

" सावकाश जा... घाई करू नका... आणी सगळ्यांना घेऊन लवकर ये... माझं काही आता खरं नाही. "

" बरं... " किशोर उठला... जाताजाता मंदाकिनीला भेटावे म्हणून तो तिच्या रूम मध्ये गेला. ती आपल्या पलंगावर बसली होती . तिचे डोळे पाणावले होते. किशोर आता कदाचित परत कधीच येणार नाहीस अशी तिला भीती वाटत होती. आयुष्यात पहिल्यांदा कोणाच्यात ती गुंतली होती. अगदी मनापासून तिचे त्याच्यावर प्रेम जडले होते. पण ती आजीला पण सोडू शकत नव्हती...

" मंदाकिनी ! " त्यानं हलकेच आवाज दिला. तिने पटकन वळून त्याच्याकडे पाहत आपले डोळे पुसले...

" निघालास ? " ती उठून म्हणाली.

" अग रडतेस काय ? मी येणार आहे नां परत.. आजीला भेटायला सगळ्यांना घेऊन येणार आहे."

" सगळे इथे येतील का ? " तिने शंका घेत विचारले.

" येतील. मी त्यांना घेऊन येईन. कारण सगळे इथे आल्यावर आजी आपल्या लग्नाबद्दल त्यांच्याशी बोलणार आहे. आणी आपल्या लग्नाला ते परवानगी देतील ह्याची तिला खात्री आहे. "

" खरंच..? "

" ह्म्म्म.... मग तर मला त्यांना इथे आणावेच लागेल ना ? त्याने तिच्या मोठ्या डोळ्यात आपले डोळे मिसळत विचारले. त्याच्या अश्या बघण्याने ती लाजली... आपोआप तिची मान खाली गेली. किशोरने आपल्या तर्जनीने तिची हनुवटी अलगद पुन्हा वर उचलली.

" चल मी निघू....? "

" खूपच घाई आहे तुला..." तिने लटक्या रागाने विचारले.

" अग , लवकर निघालो तर लवकर पोचेन... उद्या पासून पुन्हा कामाला जायचे आहे. " तो तिला समजावत म्हणाला.

" अजून श्याम नाही आला तर बसना.... काही वेळ.." ती म्हणाली.

" बरं..." तो तिच्या बाजूला बसला. त्याने सावकाश आपला हात तिच्या हातावर ठेवला. त्या स्पर्शाने ती पुन्हा मोहरून उठली. त्याचा स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता.

" तु नक्की येशील नां ? मी तुझी वाट बघत आहे हे विसरू नकोस ..." ती भरलेल्या कंठाने म्हणाली. तिचा असा दाटलेला कंठ , डोळ्यात भरलेले पाणी बघून किशोर स्वतःला रोखू शकला नाही. त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं.... कितीवेळ दोघे एकमेकांच्या मिठीत होते. त्याचा हात प्रेमाने तिच्या पाठीवरून फिरत होता. त्या स्पर्शाने तो तिला आश्वस्थ करत होता. तिने ही त्याच्या मिठीतुन बाहेर पडण्याचा अजिबात प्रयत्न नाही....

काही मिनिटाने त्याने तिला सोडले. आणी एक चुंबन तिच्या कपाळावर घेत त्याने आपल्या प्रेमाची निशाणी तिच्या कपाळावर कोरली....
त्याच वेळी बाहेरून श्यामने गाडीचा हॉर्न वाजवला....

" मला आता निघाले पाहिजे..." तो उठत म्हणाला... तिने पुन्हा एकदा आवेगाने त्याला मिठी मारली...डोळ्यातील पाणी रोखत तिने हसत हसत त्याला निरोप दिला.. आजी आणी मंदाकिनीचा निरोप घेऊन दोघे मुंबईच्या दिशेने निघाले....

======================

तो गेला त्या दिवशी मंदाकिनी आपल्या आपल्यातच होती. तिचे धड कुठे लक्ष नव्हते... आणी ही गोष्ट आजीच्या लक्षात आली...

" मंदाकिनी ! काय झाले ? किशोर गेला आणी तुझा चेहरा एकदम पडला.." आजीने तिला विचारले.

" काही नाही आजी.." ती कसेबसे म्हणाली.

" अग तो येणार आहे परत... तु खुप प्रेम करतेस नां त्याच्यावर...? किशोर मला सगळे सांगून गेलाय.मी त्याला तुमचे दोंघाने लग्न लावून देईन असे म्हणाली आहे.. " आजी म्हणाली. तशी तिची चर्या जरा उजळली.

" पण त्याच्या घरचे तयार होतील का आजी ? "

" ते सगळे माझ्यावर सोड... माझ्या कडे अशी काही गोष्ट आहे तिला ते नाही म्हणू शकत नाही.. "
" फक्त तु माझ्या हो ला हो करत जा... "आजी हसून म्हणाली .

" असे काय आहे आजी ? " मंदाकिनी ने उत्सुखतेने विचारले...

" आहे काहीतरी.. आणी त्याची माहिती मी तुला देणारच आहे... काळजी करू नकोस तुझे लग्न किशोर बरोबरच होईल हा माझा शब्द आहे.. " आजी म्हणाली... तेव्हा मंदाकिनीच्या मनावरचे दडपण उतरले...

किशोर मुंबईला निघून गेला त्याला आता दोन महिने झाले होते. तो अधून मधून मंदाकिनीला फोन करत असे. अजून त्याला सगळ्यांना समजावण्यात यश आले नव्हते. सगळ्यांच्या मनावर अगोदरच्या घटनांचा जबरदस्त पगडा होता त्यामुळे कोणीही परत गावाला जायला तयार नव्हते... पण त्याच्या पुन्हा पुन्हा केलेल्या प्रयत्नाने शेवटी एकदाचे सगळे गावाला यायला तयार झाले.
किशोरने खूप खुश होऊन ही बातमी आजी आणी मंदाकिनीला दिली... त्या दोघी पण खुश झाल्या... पुढील काही दिवसात त्यांचे निघण्याचे ठरणार होते..

" मंदाकिनी ! आता वेळ आलीय.. "

" कसली वेळ आलीय आजी ? "

" तुला काही गोष्टीची माहिती देण्याची.. " आजी सूचकपणे म्हणाली..

" मला काही कळले नाही. आजी.. "

" लवकरच कळेल... उद्या सकाळी पहाटे लवकर अंघोळ वैगरे आटपून माझ्या कडे ये... तुला एका गोष्टीची माहिती द्यायची आहे... "

" बरं आजी..." मंदाकिनी म्हणाली. पण तिच्या मनात उद्या काय? ह्याबद्दलची खुप उत्सुखता लागली होती....


पुढील भाग लवकरच....

© सर्वाधिकार लेखकाकडे...