koni bolavel tyala - 5 books and stories free download online pdf in Marathi

कोणी बोलावले त्याला ? (भाग 5)

मागील भागावरून पुढे....


जसे श्याम आणी संपत ने बाहेरून तांदळाचे रिंगण घातले. त्यांनी मोबाईलच्या फ्लॅश लाईट ने त्यांना इशारा केला. श्याम आणी संपत आपल्या गळ्यातील तावीज घट्ट पकडून उभे होते.
जसा संपत आणी श्यामचा इशारा मिळाला तसा किशोर त्वरेने आजी कडे आला.

" आजी त्याचा बाहेर जायचा रस्ता बंद केला आहे." किशोर उत्साहात म्हणाला.

" ठीक आहे. चल आता वेळ आलीय... " आजी पण म्हणाली. आता तिच्या जीर्ण शरीरात काहीशी तरतरी आली. आजी त्या दोघांच्या पुढे दरवाजा उघडून बाहेर आली. आणी तिच्या मागे किशोरने बाहेर पाय ठेवला आणी तो दचकला. समोर असलेला समंध बघून त्याची बोबडी वळली. दहा एक फूट उंच , भक्कम शरीर , डोक्याला असलेली शेंडी गोरापान रंग पण चेहऱ्यावर असणारे क्रुद्ध भाव बघून किशोर मनातुन चरकला...
त्याचा पाय पुढेच पडेना. पण मंदाकिनीने त्याचा हात आपल्या हातात घेतला. आणी त्याला हलकेच पुढे ढकलले. ब्रम्हसमंधाने त्या तिघांना पाहिले. आणी त्याच्या खाण्यात अडथळा आणला म्हणून तो अतिशय चिडला. तो रागाने लाल झाला. अचानक तिघांच्या गळ्यात असलेल्या तावीज कडे त्याचे लक्ष गेले. आणी त्याच्या लक्षात सगळा प्रकार आला.

" तुमच्या कडे तर मी बघतोच... ह्याची चांगलीच शिक्षा तुम्हाला मिळणार आहे. पण आज नाही... " असे म्हणून तो दरवाज्यातून बाहेर पळू लागला... पण तांदळाच्या रिंगणा बाहेर त्याला जाताच आले नाही. तसा तो आणखीन चवताळला... रागात तो पुन्हा आंत आला. कराकरा दात खात तो त्या तिघांच्या भोंवती फिरू लागला. पण ताविजा मुळे त्यांना पण त्याला त्यांना हात लावता येत नव्हता...

" म्हातारे..... अजून वेळ गेली नाही... मला जाऊदे.. नाहीतर परिणाम फार वाईट होतील..." तो संतापाने थरथरत होता.

" किशोर , मंदाकिनी दोघे रिंगणात बसा... " आजीने आदेश दिला. आजचा तिचा आवाज काही वेगळाच होता. किशोर आणी मंदाकिनी रिंगणात बसले. आजीने त्वरेने त्याच्या समोर यज्ञकुंड ठेवले... बाजूला समिधा ठेवल्या . काय घडतेय हे आता समंधाला नीट कळले होते. पण त्याला आताच मुक्ती नको होती. त्यामुळे तो थयथयाट करू लागला... अतिशय वेगाने तो घरातून बाहेर पडायला मार्ग शोधत होता. पण त्याला बाहेर पाळायला एकही मार्ग किशोर आणी मंदाकिनीने ठेवला नव्हता. एव्हडेच काय पण बाथरूम आणी टॉयलेट च्या दारावर पण त्यांनी त्याला अटकाव करायला आजीने सांगितल्या प्रमाणे यंत्र काढून त्या दरवाज्यात लिंबू आणी बिब्ब्याने त्याचा तो मार्ग पण बंद केला होता. तो वेड्या सारखा ह्या खोलीतून त्या खोलीत फिरून बाहेर पडायचा रस्ता शोधात होता... तेव्हड्या वेळेत आजीने किशोर ला नीट समजावून सांगितले. आणी हलकेच त्याच्या तळ हातावर चाकूने एक लहानसा छेद दिला. आता त्यातून रक्त येऊ लागले.

" बाबू... आता मी मंत्र म्हणायला सुरवात करत आहे. प्रत्येक मंत्राच्या शेवटी एक समिधा तुझ्या रक्त बुडवून यज्ञकुंडात टाकत जा. आणी त्याच्या बोलण्यावर अजिबात लक्ष देऊ नकोस... " किशोर ने मान डोलावली. आणी आजी ने रिंगणात बसकण मारली. आणी डोळे मिटून तिने सुरवातीला कोणाचे तरी स्मरण केले. आणी मंत्र म्हणायला सुरवात केली. जसा त्या अगम्य मंत्राचा घोष तिथे येऊ लागला. समंध अजूनच खवळला. घरातून बाहेर पडायला रस्ता नाही हे लक्षात आल्यावर तो नाना तर्हेने किशोर ला घाबरवू लागला... आपले अतिशय अक्राळविक्राळ रूप दाखवूंन तो किशोर ला घाबरवत होता. पण किशोरचे सगळे लक्ष आजी कडे होते. तिने हात खाली यज्ञकुंडाच्या दिशेने दाखवला की किशोर आपल्या रक्ताने भिजलेली एक समिधा समोरील यज्ञकुंडात टाकत होता. पहिलीच समिधा पडल्यावर समंध जिवाच्या आकांताने ओरडला. त्याचा तो भयंकर आवाज ऐकून किशोर पण घाबरून गेला. पण आजी आपले मंत्र म्हणतच होती.. तिच्या इशाऱ्याने किशोर एकेक समिधा यज्ञकुंडात टाकत होता. समंध आता रागाने लाल झाला . त्याचा चेहरा अतिशय क्रूर आणी भयानक झाला. तो वेड्या सारखा तिथून बाहेर पडण्याचा रस्ता शोधत होता. पण त्याचा पक्का बंदोबस्त किशोर आणी मंदाकिनीने केला होता म्हणून त्याला तेथून बाहेर पडायला कुठेच जागा सापडत नव्हती... सुरवातीला तो किशोर ला भीती दाखवत होता. कराकरा दात वाजवत वेगवेगळ्या धमक्या देत होता. पण जश्या जश्या समिधा पडत होत्या त्याचा धीर खचत चालला होता.किशोर त्याच्या धमक्यांना घाबरत नाही हे बघून आता तो किशोरच्या समोर भीक मागू लागला... त्याला वेगवेगळी प्रलोभन दाखवत होता. त्याची वेगवेगळी प्रलोभने ऐकून एखाद्या वेळेस किशोर त्याचे ऐकेल की काय अशी मंदाकिनीला भीती वाटत होती. त्याने तसें केले तर सगळ्यांच्या जीवावर बेतणारे होते. म्हणून मंदाकिनी रिंगणात पण किशोरचा हात घट्ट धरून बसली होती. वेळोवेळी त्याला सावध करण्याचे काम ती करत होती. समंधाच्या गोड गोड बोलण्यात किशोर फ़सू नये म्हणून ती पूर्ण खबरदारी घेत होती.

हळू हळू समिधा संपत आल्या. आणी समंधाचा आवाज कमी कमी होत गेला. त्याला आता कळून चुकले की आज आपल्याला मुक्ती दिल्या शिवाय हे लोक थांबणार नाहीत. शेवटी त्याने पण त्यांना समजावणे आणी भीती दाखवणे सोडून दिले.... सर्व समिधा टाकून झाल्या. आता त्याच्यातील सगळी शक्ती कोणीतरी काढून घेतल्याची त्याला जाणीव होत होती..

शेवटच्या काही मिनिटाच्या अगम्य मंत्र उच्चारात आजी यज्ञ कुंडात काळे तीळ , काळी हळद , अजून काही काही साहित्य टाकू लागली... आता त्या ब्रम्ह समंधाचा आकार विरळ होऊ लागला... हळूहळू तो त्या यज्ञकुंडातील धुरा सारखाच दिसू लागला... हळू हळू त्याचा सर्व आकार त्या धुरात दिसेनासा झाला.... एकदा शेवटचे जोरदार आग उसळली आणी यज्ञकुंड शांतपणे पुन्हा जळत राहिले.... ते पाहून आजीने समाधानाने कपाळावरचा घाम पुसला . आता तिच्या चेहऱ्यावर खूप दमल्याचे चिन्ह दिसत होती.. त्याच बरोबर एक अपूर्व असा आनंद पण होता. आज तिच्या सगळ्या घराण्याच्या डोक्यावर असलेले सावट आज दूर झाले होते. ह्या सगळ्या प्रकारात आता रात्रीचे दोन वाजले होते.

" बाबू ! आता तु जाऊन झोप..." आजी म्हणाली.

" बरं आजी... आधी माझ्या मित्राना सांगून येतो ते काळजी करत बसतील... "

" बरं... मंदाकिनी मला जरा माझ्या खोली कडे घेऊन चल...." आजी खूपच दमली होती. एव्हडी दगदग तिने मागील काही वर्षात घेतली नव्हती. तिचा श्वास फुलला होता. धापा टाकत कशीबशी ती बोलत होती...

किशोर ने श्याम आणी संपत ला बोलावून सगळे सांगितले समंधाला मुक्ती मिळाली ते ऐकून त्यांना पण आनंद झाला. त्या रात्री श्याम संपतच्या घरी राहणार होता.... आज त्या घरात राहण्याची त्याची काही हिम्मत होणार नव्हती. त्यामुळे संपत आणी तो निघून गेले.

ते गेल्यावर किशोरने दरवाजा बंद केला... आणी घरात परत आला... आज खऱ्या अर्थाने माने घराण्यावरचे सावट निघाले होते. त्यात आपला पण सहभाग होता म्हणून तो स्वतःवर खुश होता. आपल्या खोलीत आला तर मंदाकिनी तिथे त्याची वाट बघत होती. तिच्या हातात काही औषधे होती. रक्त देण्यासाठी आजीने त्याच्या हातावर एक छेद दिला होता. त्या जखमेतून आता रक्त वाहत नव्हते पण इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याच्यावर मलमपट्टी करण्यासाठी ती थांबली होती.

" आजी झोपली....? "

" हो झोपली... खूप दमल्या आहेत... ही दगदग त्यांना आता सहन होत नाही.... " त्याचा हात आपल्या हातात घेत तिने त्याची जखम पाहिली... मग सावकाश तिने पाण्याने जखम धुवून काढत तिच्यावर औषध लावून मलमपट्टी केली.... आणी ती जाऊ लागली...

" बस ना जरा वेळ..." किशोर म्हणाला...
तशी ती थांबली...

" बस नां इथे..." आपल्या बाजूला जागा करत त्याने तिला इशारा केला... ती काहीशी लाजत त्याच्या बाजूला बसली... रात्र खूप झाली होती... वाड्यात ते दोघेच जागे होते... त्याच्या अशी जवळ बसल्याने ती एकदम मोहरून गेली....

" आता मग पुढे काय करणार आहेस ? " त्याने सावकाश तिला विचारले...

" बघू आजी आहे तो पर्यन्त राहीन इथे... मग बघू पुढे...."

" माझ्या बरोबर मुंबईला येशील ? "

" आणी आजी ? " तिने विचारले . त्याला ते आवडले एव्हडे सगळे सुखी जीवन समोर असताना पण ती आजीचा विचार करत होती...

" हो.. तिच्या जवळ पण कोणीतरी हवे नां ? " तो विचार करत पडलेल्या आवाजात म्हणाला. तिला पण ते जाणवून गेले. पण ती काही बोलली नाही. खरंतर हा गुंता कसा सोडवायचा हे दोघांनाही कळत नव्हते... ते एकमेकांवर प्रेम करत होते तशी त्यांनी कबुली दिली होती. पण लग्न करणे काहीसे अवघड वाटत होते. ती काही आजीला सोडून त्याच्या बरोबर मुंबईला येईल असे त्याला वाटत नव्हते. 1दोघे नुसतेच बसून होते.

" मी उद्या परत निघतोय... "

" लगेच...? काही दिवस थांबला असतास... "

" नाही ते जमणार नाही. काम खूप आहेत आणी आधीच माझ्या खूप सुट्ट्या झाल्यात. शिवाय श्याम पण बरोबर आलाय. त्याला पण जायचे आहेच... "

" परत कधी येणार...? "

" नाही येणार...." तो भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला.
" आलो तर परत तुझ्यावर प्रेम होईल. मग माझी वाट खूप अवघड होईल. आता मी स्वतःला कसेबसे सावरले पण नेहमीच असे सावरता येईल? तु मुंबईला येणार नाहीस आणी मी इथे राहू शकत नाही.... मग कसे काय आपल्याला पुढे जाता येईल...? " त्याने शांतपणे आणी समजूतदारपणे तिला समजावले.

" किशोर ! आजीने मला खूप सांभाळून घेतली. राहायला घर , खायला अन्न , नेसायला कपडे दिलेत. आता तिच्या म्हातारपणात मी तिला सोडून जाणे योग्य दिसते कां ? मला ते पटत नाही म्हणून मी मुंबई ला येऊ शकत नाही. पण असे नाही की माझे तुझ्यावर प्रेम नाही. तुला ज्या दिवशी पहिल्यांदा पाहिला त्या दिवसापासून मी तुझ्या प्रेमात पडले आहे...." मंदाकिनीने नजर खाली घालत आपल्या प्रेमाची पुन्हा एकदा कबुली दिली.

" खरचं... ! त्याने खुश होऊन विचारले...
" मग मी आजी ला विचारू ? तीला आपण आपल्या बरोबर मुंबईला नेऊ... "

" आजी नाही येणार... तिची सगळी ह्यात ह्या गावात गेलीय आणी आता आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत ती मुंबई ला येणार नाही. " मंदाकिनी त्याला समजावत म्हणाली.

" मंदाकिनी मला पण खूप वाटते ग की , आजीला आपल्या सोबत घेऊन जावे. आपल्या मुलांबाळात तिला ठेवावे. इतकी वर्ष सगळे तिच्या पासून लांब राहिलेत. कमीतकमी आयुष्याच्या शेवटी तरी सगळ्याच्यात तिने राहावे.... "

" असं वाटते तर मग सगळ्यांना इथेच घेऊन ये... तुमच्या वाड्यात जसे खूप वर्षांआधी तुम्ही सगळे एकत्र राहत होतात तसेच सगळे चार आठ दिवसासाठी या... आजी तेव्ह्ड्याने पण खुश होईल... "

" ह्म्म्म.... असे करता येईल... मी उद्या मुंबईला जातो आणी बघतो कसे काय जमतेय..." किशोर खुश होऊन म्हणाला..

" जरी ते लोक येत नसतील तरी तु मात्र एकदा ये....येशील नां ?" मंदाकिनी ने गहिवरलेल्या आवाजात विचारले.

" ह्म्म्म... येईन... " किशोरने तिला आश्वासन दिले...

" ठीक आहे... आता झोप खूप रात्र झालीय... " ती त्याला म्हणाली आणी आपल्या खोलीत निघून गेली...

सकाळी किशोर उठला तेव्हा दहा वाजून गेले होते.
मंदाकिनीचीं कामाची लगबग चालू होती... तो बाहेर येऊन बसला... त्याच्या समोर ती पटपट कामे आवरत होती... आजीला तिने अंघोळीला पाणी काढले . मग आजीला सावकाश आणत तिने आपल्या हातानी अंघोळ घातली... किशोर ते बघून खरोखर शरमिंदा झाला. ती किती आजीचीं सेवा करत होती... आणी आपण आज आजीला तिला सोबत घेऊन जाऊ का म्हणून विचारणार होतो... आणी आजीने त्याला हसत हसत परवानगी दिली असती पण त्याच्या पेक्षा आजीलाच तिची गरज जास्त होती....

शेवटी आपले सगळे आवरून दुपारी किशोर मुंबईला निघाला. श्यामने गाडी वाड्याबाहेर लावली होती.

" बाबू ! सावकाश जा रे... " आजी म्हणाली.ती एका खुर्चीत बसूनच त्याला निरोप देत होती.

" होय आजी... तु पण काळजी घे... मंदाकिनी आजी चीं काळजी घे... " त्याने तिला सांगितले. तिचे पण डोळे भरून आले होते...

" अरेच्या.... " असे म्हणत तो पुन्हा आपल्या रूम मध्ये गेला....
" मंदाकिनी... " त्याने तेथूनच तिला हाक मारली.

" आले.... " ती त्याच्या रूम मध्ये आली तर किशोर तिचीच वाट बघत उभा होता... दोघांची नजरानजर झाली. दोघांचे डोळे पाणावले होते. त्याने तिला नजरेनेच जवळ बोलावले... ती जवळ आली तसें त्याने तिला आपल्या मिठीत बद्ध केले... ती पण समरसून त्याच्या मिठीत शिरली होती.. दोघे अबोलपणे एकमेकांच्या मिठीत होते.

" आजीची काळजी घे... मी लवकरात लवकर सगळ्यांना घेऊन परत येतो... " किशोर ने तिला सांगितले. त्यावर तिने भिजलेल्या डोळ्याने मान हलवली... तिचे डोळे पुसत किशोर ने तिच्या कपाळावर एक चुंबन घेतले.... आणी तिला सोडले...

" चल उशीर होतोय......" असे म्हणत तो बाहेर आला... आजीच्या पाया पडत त्याने दोघींचा निरोप घेतला आणी घराबाहेर पडला......


पुढील भाग लवकरच.....

© सर्वाधिकार लेखकाकडे....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED