samiksha lekhan - 3 books and stories free download online pdf in Marathi

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग -३

वाचक -मित्र हो -

माझे साहित्य -समीक्षा लेखन "या उपक्रमास आपला प्रतिसाद पाहून अतिशय आनंद होतो आहे.

आजच्या भागात खालील ४ पुस्तकांचा परिचय करून देतो आहे.

१.परीघावरच्या पाउलखुणा - ललित -गद्यलेखन . ले-प्रा.डॉ.कृष्णा इंगोले

२ मनातल्या वावटळी- कथा -संग्रह -ले- प्रगती कोलगे

३. योग-जागृती - एक विचार - माहिती . ले- प्रल्हाद बडवे

४. माझी फेसबुकगिरी - ललित लेखन . ले- सचिन परांजपे

---------------------------------------------------------------------------

आपले अभिप्राय जरूर द्यावे.

पुस्तक परिचय...1.
"परीघावरच्या पाउलखुणा -
मनाला व्यापून टाकणाऱ्या जीवनानुभावांचे
लेखन "
-----------------------------------------------------------
सांगोला -जि-सोलापूर चे ख्यातीप्राप्त साहित्यिक प्रा.डा.कृष्णा इंगोले
यांचे विपुल असे लेखन विविध लेखन ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेले आहे.
तसेच अनेक ग्रंथांचे संपादन त्यांनी केलेले आहे.
"परीघावरच्या पाउलखुणा "-हे इंगोलेसरांचे नवे लेखन हे ललित गद्य लेखन
आहे.जीवन-अनुभवांचे हळुवार आणि भावनात्मक जाणीवाचे लेखन म्हणजे
ललितलेखन" असे म्हटले जाते. या प्रमाणे "परिघावरच्या पाऊलखुणा " मधील
लेख हे ललित शैलीतील आणि कथात्म असे असले तरी या लेखनाला महत्वाचे
असे विविध सामाजिक परिवर्तनाचे संदर्भ आहेत.
निखळ रंजनात्मक असे हे लेखन नसून व्यक्तीजीवनाची
वाटचाल करतांना ,सभोवतालच्या समाज जीवनातील
घडामोडींची,त्यातील बदलांची नोंद घेत असतांना ,लेखक
ज्या भावनेने आणि वैचारीकतेने व्यक्त होतो, जाणिवांचे
हे शब्दरूप अंतर्मुख व्हायला लावणारे आहे.या लेखनाचे
हे एक प्रमुख वैशिष्ट्य ठरावे.
विकासाच्या केंद्रस्थानी असणारी शहरे आणि या साठी
विन्मुख्लेला खेड्यातील माणूस-यांच्यातील भली मोठ्ठी तफावत
या लेखनाचा आस्थाविषय आहे."परिघावरच्या पाउलखुणा "
मधील लेखनातून हे प्रकर्षाने जाणवेल.
एका सामान्य माणसाच्या जीवन-प्रवासतील बऱ्या-वाईट,इष्ट -
अनिष्ट यावर लेखक फार सुंदर भावनिक व्यक्त होतात. या
लेखनात कथा आणि ललित लेख वाचावयास मिळतात. एकूण १६
लेख आणि कथा यांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे.
लहानसे खेडे आणि पुढारलेले शहर हा परीघ आणि यातील माणसांचे
चिंतनपर चित्रण लेखक अतिशय समरसतेने करून जातात.
जुने-लोक ,जुने दिवस या गोष्टी म्हणजे स्मरण रंजन करणाऱ्या
पण या लेखनात हेच विषय लेखकाचे चिंतन-विषय झालेले आहेत.
यात खंत आहे,विषाद आहे,चांगल्या गोष्टी नाहीश्या होत असल्या
बद्दलची जशी खंत आहे, त्याच बरोबर नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत करणारी
भावना देखील आहे."
"कथा हुकलेल्या लग्नाची ", "जयंती ", विचका ", "पाणी " या कथा आणि
"परिघावरून केंद्राकडे जाताना ",आवटे आबा ", चुकलेल्या वाटा ", अशा
लेखांतून लेखक प्रा.डा.कृष्णा इंगोलेसर यांच्या लेखन शैलीचा सुरेख प्रत्यय
येतो. बदल होत असतानाच्या प्रक्रियेचा परिवर्तनशील मनाने त्यांनी घेतलेला
समाजमनाचा ,समाज-व्यवहाराचा हा लेखन धांडोळा वाचकांना एक विचार आणि
अनुभव देणारा आहे.
माणसांच्या सह्वास्च्या आठवणीनी या "परिघा वरच्या पाउलखुणा " वाचकांच्या
मनावरती ठळकपणे उमटतील हे मात्र नक्की.
औरंगाबाद च्या रजत प्रकाशन आणि प्रकाशक श्री अशोक कुमठेकर यांनी अतिशय
सुरेख पुस्तक करून लेखक -प्रा.डा.कृष्णा इंगोले यांच्या वाचकांना सुंदर भेट दिली आहे.
चित्रकर-कलावंत-सरदार यांनी यथायोग्य मुख-पृष्ठाने भरच टाकली आहे.
"परिघा वरच्या पाउलखुणा " जरूर वाचावे असे पुस्तक आहे.
----------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक -परिचय :2.

-------------------------------------
भावनिक कल्लोळाच्या कथा "-"मनातल्या वावटळी "-
----------------------------------------------------------------
पुस्तक रूपाने येणारे लेखन लेखक-कवीचे वाण्ग्मयीन व्यक्तिमत्व साकारणारे असते. याचा परिणाम वाचकांच्या
मनावरती दीर्घकाळ रेंगाळणारा असतो. त्यातच लेखक-कवीच्या "पहिल्या पुस्तकाची बात कांही औरच असते.असा
अनुभव लेखिका-प्रगती कोलगे त्यांच्या "मनातल्या वावटळी " या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने घेतच असतील.
"ग्रंथाली "या मान्यवर संस्थेने प्रगती कोलगे यांचा कथा-संग्रह नुकताच -जुलाई -२०११ ला प्रकाशित केला आहे.
त्याचा हा स्वागतपर परिचय सानंद करून देतो आहे.
या संग्रहात एकूण ९ कथा आहेत.कथांमधील व्यक्तीरेखा वाचकांशी निवेदनातून संवाद साधतांना -आपापल्या जीवनतील
भावनिक घटना,प्रसंग ,व्यक्ती-संदर्भ आठवणी सांगतात.या निवेदनात्मक कथेतून एक समान भावनिक धागा आहे
असे जाणवते .हा धागा आहे तो "मनात कल्पिलेले असे कांही आणि वाट्यास आलेली जीवनतील वास्तव " यातील
तफावतीने उध्वस्त: मनाने आयुष्याला सामोरे जाताना -मनाची झालेली अवस्था ,भोगावे लागणारे ताण-तणाव ,विचार,आणि
भावना यांच्याशी करावी लागणारी यातानाकारक तडजोडी -आणि यामुळे सामाजिक व्यवहार -आणि भावनिक व्यवहार यातील
संघर्ष कराव्या लागणाऱ्या व्यक्तींची भावनिक ससेहोलपट -असे अनेकविध कंगोरे टिपणे आणि त्यावर भाष्य करणे -हे
लेखिका-प्रगती कोलगे यांचा पहिला लेखन-प्रयत्न जमून आलेला आहे.असे म्हणावेसे वाटते.
'कृष्णा( कान्हा देवकीचा की यशोदेचा),रागिणी (जनम पत्रिका आणि लग्न),माया (लादलेला संसार),वर्षा-(ओढ हक्काच्या -
संपूर्ण प्रेमाची),सुहास -(अज्ञात वास्तव).या काही कथांचे उल्लेख करावेसे वाटतात.
माणसांची नाजूक स्वप्ने,त्यांच्या कोमल भावना ,सहजीवनाची रंगबिरंगी चित्र, या सर्वांची झालेली निराशाजनक होरपळ
मनातली वावटळी "मधील कथांचे विशेष आहे.
कृष्णाचे दुखः: ,माधवीची कथा,वर्षाची व्यथा ,माणिकराव यांची अपेक्षा ,नितीनच्या अधुऱ्या प्रेमाची विफलता ,हे या कथा लेखनाचे
विषय आहेत.केवळ नशीब-आणि नियती यामुळे भोगावे लागणारे दुख:,त्यामुळे हे माणसे अगतिक,हतबल,आणि नैराश्यग्रस्त होऊन
जगण्याला सामोरी जात आहेत असे चित्र उभे राहते.त्यामुळे नकारात्मक भावनाचे सावट दाटून आले आहे ,असे वाचकांना जाणवेल.
लेखिका प्रगती कोलगे यांनी अतिशय समरसून लेखन केले आहे.आपल्या भोवती असलेल्या माणसांविषयी असलेलेल्या आस्था
त्य्नाच्या कथेतून दिसून येते.कथानकातील व्यक्तिरेखांना लेखिकेचे पाठबळ लाभल्यामुळे की काय ,या कथांमधून भावनिक-
आणि वैचारिक अशा दोन्ही भावनांचे चमकदार शब्दरूप पहावयास मिळते.
लेखिका प्रगती कोलगे यांचे या लेखन उपक्रम बद्दल अभिनंदन.
-------------------------------------------------------

पुस्तक-परिचय- 3.

-----------------------------------------------------------------------

"योगजागृती - एक विचार …!

उपयुक्त लेखन-उपक्रम -"

ले- प्रल्हाद बडवे …!

----------------------------------------------------------------------------

"योगजागृती - एक विचार -" या लेखनाचे पुस्तक -स्वरूप करणारे

लेखक -श्री .प्रल्हाद बडवे - हे लौकिक अर्थाने सेवानिवृत्त बँक-अधिकारी .

त्यांच्या सोबत काम करण्याचा योग माझ्या वाट्यास आला , आणि

हा सहवास-योग मैत्रीच्या रुपात अजूनही ताजा आणि टवटवीत आहे.

उमद्या आणि रसिक व्यक्तिमत्वाचे प्रल्हाद बडवे मित्र-परिवारात

लोकप्रिय असणे सहाजिकच आहे.

जून -२००९ पासून "योग मित्रमंडळ -औरंगाबाद ", हे केंद्र सुरु झाले,

आणि केंद्र-प्रमुख प्रा ,माहोरकर व श्री .गोपाळ कुलकर्णी या योग-शिक्षकांच्या

मार्गदर्शन लाभले , त्यानंतर नासिक येथील "योग विद्याधाम , आणि

मुंगेर (बिहार ) येथील "बिहार स्कूल ऑफ योगा , आणि स्वामी शिवानंद

आश्रम रिखिया( झारखंड ) येथे जाऊन आल्या नंतर .बडवे यांच्या मनात

प्रस्तुत विषयाला अनुसरून लेखन करून , पुस्तक रूपाने "योग-अभ्यास "

सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत घेऊन जावा असा मानस दृढ झाला असावा .

त्या दृष्टीने " योगविषयक जागृती व्हावी - असा प्रचार व प्रसार विषयक हेतू

त्यांच्या "योग जागृती - एक विचार " या पुस्तकाने नक्कीच पूर्ण झाला आहे.

"योगजागृती " या पुस्तकातील लेखनाचा उद्देश "जेष्ठ -वयस्कर लोकांना

व्हावा " म्हणून सोप्या व सुलभ योगिक क्रिया -व्यायाम , योगासने यांची

माहिती तर दिलीच आहे , शिवाय इतर अनेक विषयावरील उपुक्त माहिती

लेखक -प्रल्हाद बडवे यांनी आवर्जून दिली आहे.

८४ पृष्ठांच्या या मार्गदर्शक पुस्तकात एकूण १४ प्रकरणातून लेखकांने

योगविषयक मार्गदर्शन केले आहे. आणि हे समजावून सांगणारी भाषा -शैली

साधी आणि सुबोध आहे. तसेच योगासन - छायाचित्र" अधिक उपुक्त आहेत.

"सर्व वयोगटासाठी ३० मिनिटे योगाभ्यास ", हे समारोपा अगोदरचे

प्रकरण सर्वात अगोदर वाचावे असे सुचवीन. कारण अजूनही अनेक मंडळी

योगसाधना " म्हटले की अजूनही अनुत्सुक आहेत, त्यांच्या साठी हे अधिक

महत्वाचे आहे. कारण ३० मिनिटाचे नियोजन समजून घेतले तर नक्कीच

योगसाधने विषयी मनात अनुकूल मत होईल.

हे लेखन आणि पुस्तक खरे म्हणजे सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे,

यातील प्रकरणे -जेष्ठ -नागरिकांना जरी अधिक मदत करणारी असले तरीही

"योग आणि योगसाधना " या विषया बद्दल वाचकांच्या आणि नव्या साधकांच्या

मनातील गोंधळ कमी करू शकणारी अशी माहितीपूर्ण आहेत.

म्हणूनच लेखक -प्रल्हाद बडवे यांच्या पुस्तकाला एक सामाजिक मोल आहे .

ज्या जाणीवेने आणि उद्देशाने त्यनी "योगजागृती " हा एक विचार मानला आहे,

तो आपल्या सर्वांच्या हितार्थ असाच आहे.

त्यांच्या या कार्याला आपण ही यथाशक्ती हातभार लावला पाहिजे.

लेखक -आणि योगसाधक -प्रचारक आणि प्रसारक -असे बहुआयामी कार्य

करणाऱ्या मित्रवर्य -प्रल्हाद बडवे यांचे अभिनंदन करतो , आणि शुभेच्छा देतो.

-------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक-परिचय -4.

-------------------------------------------------------------------------
आभासी दुनिया आणि वास्तवातील दुनियेचा
धांडोळा घेणारे ललित रम्य लेखन -!
"माझी फेसबुकगिरी "-
----------------------------------------------------------------------------------------------------
श्री .सचिन मधुकर परांजपे - लिखित "माझी फेसबुकगिरी ", हा लेख-संग्रह नुकताच
वाचण्यात आला .
"फेसबुक " या मायानगरीत आनंदाने रमणारे असे प्रचंड आहेत.या माध्यमातून
आपल्यातील कलावंतास रसिकांच्या सामोर आणावे अशी इच्छा असणे स्वाभाविकच आहे.
या अशा धडपडीच्या भावनेला फेसबुकवर अजिबात अडथळा नाही,आणि म्हणूनच
"जो-तो आपल्या लेखन-क्षमता आणि मर्यादेप्रमाणे - लेखक-कवी आणि साहित्यिक
म्हणून आपली साहित्यसेवा सदर करीत असतो..

लेखक -सचिन परांजपे यांचे प्रस्तुतचे लेखन हेही "फेसबुकवरील लेखन आहे",
फेसबुक वरील वाचकांनी आणि मित्रांनी या लेखनास आपली पावती या अगोदरच दिलेली आहे .
हेच लेखन आता सर्व वाचकांच्या भेटीस "माझी फेसबुकगिरी " या लेख-संग्रहाच्या
स्वरूपात आले आहे. हे लेखन वाचल्यावर असेही म्हणता येईल की-
"फेसबुकवर सुद्धा छान ललित लेखन केले जाते."

या लेखनातला "मी " हा या लेखनाचा लेखक असला तरी, या "मी- मध्ये ,
वाचकाला स्वतःचे प्रतिबिंब आहे असा भास होतो, याचे कारण असे आहे की,
या संपूर्ण लेखनास "एक सार्वत्रिक भावनेचा स्पर्श आहे", म्हणून यातील लेखन-
-विषय , यातील व्यक्तीरेखा ", फक्त लेखक सचिन परांजपे यांच्याच न वाटता त्या आपल्याही
परिवारातील परिचित आहेत असे वाटते. हे श्रेय लेखकाचे आहे.

प्रसंग आणि घटना -हे नित्यनियमित घडत असतात , या सर्वांना सामोरे जात असतांना
सामान्य माणूस "नेमका काय करतो? , कसा व्यक्त होतो ? ,! याची अनेक उदाहरणे लेखकाने
फार बारकाईने टिपली आहेत. त्यामुळे असेही जाणवते की -
हा लेखक -माणसाशी एक नाते जोडून आहे ,आणि हे नाते ,जपून ठेवण्याची त्याची असोशी ",
या लेखनातील भावपूर्ण असा धागा आहे.

साडेतीनशे पृष्ठांच्या या पुस्तकात -लेखक सचिन परांजपे यांनी भरभरून
लिहिले आहे .या लेखनात त्यांच्या मनातील खंत-विषाद , आस्था -अनास्था ,
विषमता आणि विसंगती , व्यक्ती आणि त्यांच्तील नमुने , नियती- प्रारब्ध ,
संचित ", जीवन आणि त्यातील सर्व प्रकारचे भले-बुरे अनुभव " अगदी प्रभावी
शैलीतून व्यक्त झालेले आहे.

या संग्रहातील कोणत्याही लेखांचे संदर्भ मी मुदाम टाळले आहेत कारण , हे लेख
आवर्जून वाचावे असेच आहेत . मला आवडलेल्या काही लेखांची शीर्षके देतो..
"बापमाणूस "- (पृ -१५ ), श्रीधराप्पा"- (पृ -२९) , "चैताली "- (पृ -४३ ),
मोहिते "-(पृ- ५५) , गणूभटजी "-(पृ- ६३ ), "सोफियासिंग "-( पृ- ७७ ),
"जाहिरात -एक प्रबोधन "-(पृ.१४२ ), "माहितीये मला "- (पृ- १५९ ) ,
मध्यमवर्गीय माणसांचे जग , त्यातील माणसे यांची अतिशय भावपूर्ण दर्शन
रसाळ अशा शब्दातून लेखक -सचिन मधुकर परांजपे यांनी केले आहे.

"माझी फेसबुकगिरी ", या संग्रहाने वाचनीय आनंद नक्कीच दिला आहे.या बद्दल मी
माझे प्रकाशक -मित्र आणि शब्दांजली प्रकाशनाचे -श्री .राज जैन यांना धन्यवाद देतो.
------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक परिचय -
-अरुण वि.देशपांडे -पुणे
संपर्क - ९८५०१७७३४२ .
------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED