saahitya samikshaa lekhan Part -5 books and stories free download online pdf in Marathi

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग -५

१.

पुस्तक परिचय-" लेखक- अरुण वि.देशपांडे
---------------------------------------------
" चांदोबाचा दिवा " ... बालमित्रांसाठी धमाल बालकवितासंग्रह -
-----------------------------------------------------------------------
विजयकुमार देशपांडे हे सोलापूरचे कवी, गझलकार, चारोळीकार, त्याचबरोबर मिस्कील आणि हलकेफुलके लेखन करणारे साहित्यकार आहेत. विविध वर्तमानपत्रांच्या पुरवणी, मासिके आणि दिवाळी अंकातून यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. बालमित्रांसाठीही ते आवर्जून लेखन करतात. किशोर मासिकात कविता प्रकाशित, तसेच पुणे आकाशवाणीवरून त्यांचे बालकवितावाचन प्रसारित झाले आहे.
इंटरनेटच्या दुनियेत त्यांनी स्वतःचा वाचक-वर्ग निर्माण केला आहे.
"लेखन प्रपंच" या त्यांच्या ब्लॉगवर त्यांचे साहित्य उपलब्ध असते.
या वाटचालीत त्यांच्या ४० बाल -कवितांचा संग्रह "चांदोबाचा दिवा " या शीर्षकाने प्रकाशित झाला आहे., त्याचा परिचय मी करून देत आहे.
बालकवितांना आशयानुरूप रेखाटने आणि चित्र असणे, या कवितांच्या बालवाचकांसाठी खूप उपयोगाचे असते. "चांदोबाचा दिवा" या संग्रहातील कवितांच्या सोबत मस्त रंगी-बेरंगी आकर्षक चित्रांमुळे, हे पुस्तक सुरेखच झाले आहे.
बालमनाला आवडणाऱ्या विषयावरील कविता, कवी-विजयकुमार देशपांडे यांनी अतिशय सहजतेने लिहिल्या आहेत.
पक्षी-प्राणी, खेळ आणि खेळणी, आई-बाबा..आणि बाळाची दोस्त मंडळी- अशा कितीतरी विषयावरील कविता वाचनीय झाल्या आहेत.
काही कवितांचे उल्लेख आवर्जून करतो--
१. आकाश, आकाशातला चांदोबा ,चमचमत्या चांदण्या.. किती छान दृश्य असते हे.. या कवितेतील बाळ त्याच्या आईला म्हणते-
आई ग आई
चांदोबा -चांदण्या
ठेऊन अंगणात
रात्री छान खेळेन
त्यांच्या प्रकाशात... (शीर्षक कविता -पृ.४६)
२. खेळकर-खोडकर असा बाळ घरातला गुणीबाळ, कौतुकाने काही म्हणा, त्याला ते आवडत असते. या कवितेतील
लाडोबा- आहे घोडोबा.. तो म्हणतो..
घोडोबा मी घरी लाडका
खेळायला पुढे पुढे
शंभर टक्के परीक्षेत गुण
अभ्यासातही सदा पुढे ...(दोन पायांचा घोडोबा ..पृ.३८)
३. बाळाला खाऊ घालणे म्हणजे बाळाच्या आईसाठी सोप्पे काम मुळीच नसते ,अशावेळी बाळाचे दोस्त आले की अशी मजा येते..त्याची ही कविता -
बाळाची अंगत पंगत
पक्षी प्राण्यांची संगत
हातवारे बाळाचे
वाढत आहे रंगत .....(इवल्या इवल्या बाळाचे..पृ.२५)
४. चिऊताई आणि चिमुकला बाळ यांचे मैत्रीचे नाते खूप गोड असते. अंगणात येऊन गाणे म्हणणारी चिऊताई बाळाची आवडती आहे- यात आश्चर्य ते काय ?
दाणे पडले टप टप टप
चिमण्या गोळा पट पट पट
चिव चिव करता टिपती दाणे
टिपता टिपता म्हणती गाणे ...( चिव चिव गाणे ..पृ.१६)
५. बागेमधेे जाणे, तिथे मनमुराद खेळणे, फुलांनी बहरून गेलेल्या बागेत फेरफटका मारणे सर्वांनाच आवडते, ही कविता बागेत गेल्यावर, काय काय छान आहे हे सांगते..
बागेमधली विविध फुले
रंगामाधुनी कशी बहरती
रंग लेउनी मोहक अंगी
वाऱ्यावरती गंध पसरती ...(बागेमधला फेरफटका ..पृ..१४)
या शिवाय-- "ससा आणि कासव", "बंडू आणि परी", "अजबगजब", "ससे आणि जादुगार", "झुकझुकगाडी ", "माझे विमान", "शाळा ".. अशा अनेक कविता आहेत.. ज्यातून बालमनाचे भावविश्व साकारण्यात, कवी विजयकुमार देशपांडे मनापासून रमून जातात, जाणवत राहते .
साधीसोपी शब्दरचना, आवडते आणि परिचित विषय, कवितेला असलेला मायेचा, कौतुकाचा, वात्सल्याचा भावस्पर्श.. यामुळे विजयकुमार देशपांडे यांच्या या बाल-कविता लहानथोर सर्वांनाच खूप आवडतील- असा विश्वास वाटतो.
कवितेस अनुरूप रेखाटने चितारणाऱ्या कलावंत- कु.साक्षी संजय पुजारी यांच्या चित्रांचा उल्लेख करायला हवा. त्यांचे अभिनंदन ! प्रकाशिका- सौ. संयोगिता स्वामी व कुजबुज प्रकाशन लातूर.. यांनी हा सुंदर बालकवितासंग्रह प्रकाशित करून, बालमित्रांना कवितेचा खाऊ दिला आहे. त्यांना धन्यवाद !
["सखे तुझ्यासाठी" हा विजयकुमार देशपांडे यांचा चारोळीसंग्रह, या बालकवितासंग्रहासोबतच प्रकाशित केलेला आहे..]
------------------------------------------------------------

२.

छान छान कवितांची मस्त ट्रीप -
" चंद्रावरची सहल "
-----------------------------------------------------------
अंबड -जिल्हा -जालना येथील श्री.नारायण खरात यांच्या बालकविता लेखनाने
मराठवाड्यातील बालसाहित्य लेखनात एक नव्या उमेदीचे व्यक्तिमत्व दाखल झाले आहे
ही मोठी आनंदाची गोष्ट आहे.
बाल -कुमार मित्रांसाठी "चंद्रावरची सहल "हा त्यांचा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

बालसाहित्य लेखन करीत असतांना साहित्यिकाला अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते .
आपला वाचक आणि त्याचे आकलन "याबद्दल जाणीव ठेवून कवी- नारायण खरात यांनी
प्रस्तुत संग्रहातील कविता लेखन केले आहे हे विशेष कौतुकाचे आहे असे म्हणावे लागेल.
चंद्रावरची सहल "या संग्रहात एकूण ३० कविता आहेत. .यातील कवितांची शीर्षके नेहमीपेक्षा
वेगळी वाटणारी आहेत . उदा .." निसर्गदूत कावळा ", सूर्याला विनंती ", "वीज ताई ",
"सूर्य झाकायचे ठरले ", "समुद्राची हाक " , "शिडीवरून ढग उतरले खाली ", "राजाला अद्दल घडली ",
"आकाशाची गोधडी ", "कपटी बगळा ", .ई ... .!
या गोष्टी सदृश्य शीर्षकामुळे बालमनात नक्कीच उत्सुकता वाढेल आणि ते अगोदर या कविता नक्की
वाचतील .

"मनोरंजन आणि प्रबोधन "हे दोन हेतू साध्य करण्याची जबाबदारी बालसाहित्याची लेखन करणाऱ्या
साहित्यिकांकडून नेहमीच केली जाते ", कवी-नारायण खरात यांनी प्रस्तुतच्या कविता -लेखनातून
या अपेक्षांची पूर्ती कण्याचा चांगला प्रयत्न केला आहे असे जाणवते .

आपल्या समोर आलेल्या कविते मधून रोजचेच विषय वाचायला मिळतात
त्या विषयांचे काव्यरूप बालमानावरती संस्कार करणारे असते . कवी नेमकेपणाने
ओळखीच्या गोष्टींची पुन्हा नव्याने ओळख करून देत असतो ते शब्द-आणि ती कविता
वाचकमनाला भावणारी असते. असे वास्तव आणि कविकल्पना याचा सुंदरसा मेळ "म्हणजे
नारायण खरात यांच्या "चंद्रावरची सहल" संग्रहातील बालकविता आहेत.

या कविता मोठ्या अर्थपूर्ण आणि सामाजिक संदेश देणार्या आहेत" कविता पूर्ण
वाचून झाल्यावरच शीर्षकाची योजना लक्षात येईल. जसे..

"कावळा नाही बावळा
कावळा मोठा हुशार
माणसाला ही केवढा
करायला लावतो विचार ..(निसर्गदूत कावळा पृ.-३ )

जीवनदायिनी अशी नदी ..तिची ही कविता -
"माझी नदी गेली कुठे
तिच्याविना जीव तुटे
तिचं जीवन हिरावून घेतलं
तिच्यावर नव्हे आपल्यावर बेतलं .. ( नदी ५),

झाडे लावा -झाडे जगवा .हा संदेश देणारी कविता-
झाडं नका तोडू झाड नका तोडू
झाडालाही येतं माणसासारखं रडू ..(झाडं नका तोडू.. पृ-२८),

आणि -ही एक गंमतशीर कविता -
आभाळच आलं खाली "(पृ-३१ )

रस्त्याने फिरू लागली
चांदोमामासोबत मुले
बागेमधल्या कळ्यांची
होऊ लागली फुले ..

याशिवाय .."सर , "अप्पल पोटया ", पाखरांची शाळा ", पाऊस ", चंद्रावरची सहल ",
स्वप्न " , उन्हाळ्याची सुट्टी "अशा इतर कविता ज्या बाळ-मित्रांना खूप आवडण्यासारख्या आहेत
.
प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर-सर - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ -नांदेड " यांनी कवी -
नारायण खरात यांच्या कविता -लेखनाची यथायोग्य भलावण केली आहे.
चित्रकार -मित्र - प्रमोद दिवेकर यांच्या अनुरुप अशा रेखाचीत्रांनी या कवितेला छान सजवले आहे ,
त्यांची ही कामगिरी उल्लेखनीय अशीच आहे.
प्रकाशक श्री. -दत्ता डांगे आणि त्यांचे इसाप प्रकाशन "बालसाहित्याचे मोठा आधारस्तंभ आहे ,
त्यांनी "चंद्रावरची सहल" हा संग्रह आकर्षक स्वरूपात सिद्ध केला आहे
बाल-कविता लेखनात कवी-नारायण खरात यांच्या कवितांची लक्षणीय अशी भर पडली आहे.
यापुढे ही त्यांची कविता नित्यनेमाने बाल-मित्रांच्या भेटीस यावी अशी अपेक्षा करू या.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३.

बालकविता संग्रह -
आमच्या गावात आमची शाळा
-----------------------------------------------------------
सातत्याने बालसाहित्याचे लेखन करणारे लेखक कवी " म्हणून माझे कविमित्र श्री.बबन शिंदे यांचे नाव सर्वपरिचित झालेले आहे.गोष्टी आणि कविता ,हे दोन्ही लेखन प्रकार करणाऱ्या या साहित्यकार मित्राचे वैशिष्ट्य म्हणजे .. ते प्रबोधन करीत करीत ते बालकुमार मित्रांचे मनोरंजन तितक्याच छानपणे करीत असतात.
त्यांचा नवा कविता संग्रह - " आमच्या गावात आमची शाळा " नुकताच आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे.एकूण ३७ कविता असलेल्या या संग्रहात कवी बबन शिंदे यांनी .बाल-मनाला परिचित विषयावर संस्कारक्षम अशा कविता लिहितांना त्या बोजड आणि रुक्ष होणार नाहीत याची खूप काजी घेतली आहे हे सतत जाणवते
.उपदेशपर आणि कंटाळवाण्या " कविता न होता त्या खूप छान समजावून सांगणार्या गंमत -कविता झाल्या आहेत असे म्हणावेसे वाटते..
काही कविता उल्लेख -
" सर्वांच्या उपयोगी पडावे, मदत करण्यास तत्पर असावे " या विषयीच्या
म्हणूनच आम्ही टिकलो- या कवितेत कवी काय सांगतो ते बघा -
"कुणीही सांगत असे
अडले नडले काम
खाऊच्या रुपात मग
मिळे हातावर दाम ..... (म्हणूनच टिकलो ..पृ..१७ )
आपल्याला कुणी केलेली सूचना आणि दिलेला सल्ला खूप मोलाचा असतो ,त्यात दडलेले आपले हित आपणच ओळखायला पाहिजे
" सल्ला या कवितेत ह्त्तीदादाचा कसा फायदा झालाय ते महत्वाचे आहे..
अगडबंब हत्ती
लालची फार
खाण्याचा त्याला नाही सुमार ,
वनराज वैद्य
आले मदतीला
वाजवी अह्राचा सल्ला दिले
हत्तीने सर्व
पथ्ये पाळली
तब्येत त्याची
छान सुधारली ....( सल्ला ..पृ..२२ )
लहान असो वा मोठे ..रहदारीचे नियम पाळणे "अपेक्षित असते .पण प्रत्याक्ष्यात आपण पाहतो आहोत ..बेशिस्त -आणि गोंधळ ,,म्हणजेच रहदारी ..हे पाहून कवी मोठ्या कळकळीने आपल्याला सांगतोय की बाबानो ...
" जीव अनमोल जपा जरा त्याला
रस्त्याने चालतांना भान ठेवून चाला ||
वर्दळीच्या जागी खेळायचे टाळा
वाहतुकीचे नियम काटेकोर पाळा || ( काटेकोर पाळा..पृ..२७ ),
निसर्ग आणि प्राणी-पक्षी ,आपली सजीव सृष्टी ..याबद्दल लिहितांना कवीच्या प्रतिभेला उधाण येत असते ..कवी-बबन शिंदे यांची कविता या सर्व विषयावर खूप छान व्यक्त होणारी आहे ..
ते म्हणतात ..
"सर्वच वृक्ष
असती बहुगुणी
नेहमीच आपण
असावे ऋणी ..
असंख्य वृक्ष
सर्वत्र लावा
नजर त्यावर
सदैव ठेवा ....( वृक्ष ...पृ..३१ ),
आपल्यावर संस्कार करणारे आपले गुरुजन , वडीलधारी मंडळी,आपले आई-बाबा यांच्या बरोबरच आपल्याला जीवनानुभव सांगून संस्कार करण्यासाठी म्हणून तळमळीने-लेखन करणारे " ,लेखक-कवी देखील आपले मार्गदर्शक आणि गुरूच असतात ..
कवी बबन शिंदे हे एक उत्तम शिक्षक आहेत , बालमनाची जडणघडण " कशी करायची असते " याची त्यांना जाण आहे .म्हणून त्यांच्यातील कवी ..प्रेमळ मनाच्या शिक्षकाची भूमिका मनापासून बजावत असतो ..याची प्रचीती .बबन शिंदे यांच्या सर्वच लेखनात येते .तितकीच ती प्रस्तुतच्या "आमच्या गावात आमची शाळा " संग्रहातील कवितातून येते .
नेमकेपणाने व्यक्त करणे त्यांच्यातील कवीला सहजतेने जमते ..म्हणूनच "यशाचे सूत्र "अचूक सांगू शकतात ...
" करेल धडपड त्याचेच यश
गाठता येते त्याला कळस
यशाचे सूत्र तू ध्यानी धर
प्रत्येक काम वेळेवर कर ....(यशाचे सूत्र ..पृ ..३३ )
तर मित्र हो ,या शिवाय अनेक छान छान कविता या संग्रहात आहेत..
"वारी , ", माकडा माकडा ", थांबेल परेशानी ", पाखरा पाखरा ", अनमोल संपत्ती ", "वाचत जावे ", चला गड्यांनो ",
"मेघा रे मेघा ", लाडकी मुलगी ", "शाळा ",
अनेक कवितातून कवी बबन शिंदे सहज सोप्या शब्दातून सुंदर चित्र उभे करतात ..जे बाल्मानला भावणारे असेच आहे , संग्रहातील अनुरूप अशी रेखाचित्र कवितांना अधिक अर्थवाही करणारी आहेत
चित्रकार -मित्र प्रमोद दिवेकर यांनी सुरेख मुखपृष्ठ केले आहे.
प्रकाशक दत्ता दंगे आणि इसाप प्रकाशन नांदेड यांनी बालकुमार मित्रांसाठी एक छान पुस्तक प्रकाशित केले आहे ,त्या बद्दल त्यांचे अभिनंदन करू या.
कवी -लेखक बबन शिंदे यांच्या लेखन प्रवासास अनेक शुभेच्छा.
--------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय