राखणदार. - 4 Amita a. Salvi द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राखणदार. - 4

राखणदार

प्रकरण ४

तो माणूस काठी उगारून उभा आहे ; तो आता काठीचा आघात आपल्यावर करणार आहे हे तानाजीरावांनी पाहिलं; आणि सरळ-सरळ त्याला भिडले. त्या माणसानेही काठी फेकून दिली; आणि दोन हात करायला सुरूवात केली. काही वेळातच तानाजीरावांच्या लक्षात आलं की 'तो ' सुद्धा कसलेला पैलवान होता. प्रत्येक डावाला त्याच्याकडून प्रत्युत्तर मिळत होतं. " एवढा मोठा पैलवान अजून पर्यंत आपल्याला कोणत्याच कुस्तीच्या फडात दिसला कसा नाही?" तानाजीरावांना आश्चर्य वाटत होतं. पण त्यांना एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं त्याला मारलेले ठोसे त्याचं शरीर चुकवून भलतीकडे जात होते. त्याला कितीही पकडायचा प्रयत्न केला; तरी तो हातातून निसटत होता. "कशी कुस्ती शिकलाय हा माणूस? हे कोणी मला सांगितलं असतं तर मी कधीच मान्य केलं नसतं."

त्या दोघांचे डावपेच बराच वेळ चालले. कुस्तीचा एवढ्या वर्षांचा अनुभव असलेल्या तानाजीरावांच्या लक्षात आलं; की; 'तो' आपल्याला खेळवतोय. एखाद्या लहान मुलाशी लुटूपुटुची लढाई करावी ; तशी त्याची लढत आहे. तो शक्तीनेही श्रेष्ठ आहे. तानाजीरावांची शक्ती हळूहळू कमी होऊ लागली होती. आता कधीही आपल्याला ग्लानी येईल असं त्यांना वाटू लागलं. शेवटी त्यांनी विचारलं,

" तू आहेस तरी कोण? तुझं नाव काय? तू कुठल्या गावचा रहाणारा?" त्यांच्या या प्रश्नावर हसण्याचा गडगडाट करत 'तो' म्हणाला,

"मी इथला राखणदार! घराण्याचा मूळ पुरूष! अमावास्या आणि पौर्णिमा हे माझे दिवस! त्या दिवशी सगळं काही ठीक आहे; हे पहायला येतो. तू कोण?"

"मी तुमचा वारसदार! माफ करा मला!" तानाजीरावानी हात जोडले आणि क्षणात त्यांची शुद्ध हरपली.

रात्रभर ते बेशुद्धीत होते. सकाळी वामनच्या हाकांनी त्यांना जाग आली.. कोणीतरी त्यांना गवताच्या शय्येवर झोपवलं होतं. अंगावर त्यांनी घरून आणलेलं कांबळं नीट पांघरलेलं होतं; तरीही ते थंडीने कुडकुडत होते. सूर्याची किरणं खोपटात आली होती; पण तरीही उबदारपणा जाणवत नव्हता. असं वाटत होतं ; की वामनने येऊन उठवलं नसतं; ते कधी जागे झाले नसते. डोकं बधिर झालं होतं ; आणि हात - पाय सुन्न पडले होते. जणू काही आजवर ज्या शक्तीचा त्यांना अहंकार होता; ती त्यांना सोडून गेली होती.

"कधीपासून हाका मारतोय तुम्हाला? ह्या रानात एवढी सुस्त झोप कशी लागली तुम्हाला?" वामन विचारू लागला.

तानाजीरावांनी वर उठण्याचा प्रयत्न केला; पण उठता येईना! वामनने त्यांना हात देऊन उठवण्याचा प्रयत्न केला; आणि त्याच्या हाताला चटका बसला.

"केवढा ताप आहे तुमच्या अंगात! सावकाश उठा! चूळ भरून हा चहा प्या! तुम्हाला रात्रभर जागरण झालं असेल म्हणून तुमच्यासाठीच आणला होता! नंतर तुम्हाला हळू हळू घरी नेऊन सोडतो." वामनला आता मालकाची काळजी वाटू लागली होती. मालकानी वडीलकीच्या नात्याने चूक झाली तर कान धरले होते; पण त्याच्या प्रत्येक अडचणीलामदतीचा हात पुढे केला होता. त्याचे वडील लहानपणीच गेले; पण तानाजीने त्याला आधार दिला होता. त्याची आज ही अवस्था बघून तो घाबरला होता. पण तानाजीरावांच्या अंगात चालत घरी जाण्याइतकी शक्ती नव्हती. ते तिथेच झोपून राहिले. काही वेळाने रहदारी चालू झाली. शेतावर जाणारे लोक तानाजीरावांना खोपटात झोपलेले पाहून चॊकशी करू लागले. गावाकडून आलेल्या एका बैलगाडीवाल्याला विनंती करून त्यांनी तानाजीरावांना त्यांच्या घरी पोचवलं.

त्या दिवसा पासून तानाजीराव अंथरूणाला खिळले. घरच्या लोकांनी अनेक उपाय देव - देवस्की करून पाहिले.. " याला भुताने झपाटलंय" हे तर प्रत्येक भगत सांगत होता. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. पण भूत उतरवणं मात्र कोणालाच जमत नव्हतं. तानाजी खंगत चालला होता. मोठमोठया डाॅक्टरांना- मानसोपचार तज्ज्ञांना दाखवलं; पण सगळे रिपोर्टस नाॅर्मल येत होते. त्याला कोणता आजार झालाय याची परीक्षाच कोणालाच होत नव्हती; मग औषध काय देणार? त्यांची तब्येत काही सुधारायचं नाव घेईना! जेवण थांबलं! अन्नावरची वासना गेली होती; म्हणून टाॅनिक सुरू केली होती; पण पश्चात्तापाने जळणा-या तानाजीची जगण्याची उमेद संपली होती, तर टाॅनिक किती शक्ती देणार?

"मी माझ्या देवतुल्य पूर्वजावर हात उगारला! हे पाप कुठे फेडू मी! एवढा कृतघ्न मी कसा झालो?" ते सतत स्वतःला दोष देत होते. हा विचार मनात आला; की त्यांचे डोळे भरून येत आणि ते हुंदके देऊ लागत. त्यांचा पूर्वीचा थाट ज्यांनी पाहिला होता; त्यांच्या मनात ' याला आमराईतल्या भुताने पछाडलंय ' ; याविषयी संशय रहात नसे. पण याला उपाय तरी काय करायचा?

त्यांची पत्नी कांता--मुलं--भाऊ-- सगळे हतबल झाले होते. अजूनपर्यंत घराची पूर्ण जबाबदारी तानाजीरावांनी घेतली होती. सगळ्यांना फुलासारखं सांभाळलं होतं. त्यांची अशी अवस्था बघून सगळं घर हवालदिल झालं होतं. एका महिन्यात त्या दणकट माणसाची हाडं दिसू लागली होती. अन्नग्रहण न करता माणूस किती दिवस जगणार? डाॅक्टर म्हणतात-- " त्यांच्या मनात काही सल आहे का?-- हे जाणून घ्या! पण तो कोणाशी बोलत नाही. रात्रंदिवस मी पापी आहे; हे एकच वाक्य बोलतो. इतक्या उमद्या स्वभावाच्या माणसाकडून असं काय पाप घडलं? सांगितल्याशिवाय कोणाला कळणार कसं?"

शेवटी एके दिवशी सगळ्यांनी ठरवलं; उद्या पौर्णिमा आहे. ही घटनाही पौर्णिमेला घडली होती. जिथे त्यांना हा धक्का बसला; तिथेच जाऊन साकडं घालूया. आता दुसरा कुठला उपाय शिल्लक राहिला नाही. भाऊ तानाजीरावांना बैलगाडीत बसवून संध्याकाळी त्या आमराईत घेऊन गेले. तानाजीरावांना आठवलं; "आंब्यांची चोरी पकडण्यासाठी आपण इथे आलो. आपल्या जमिनीची आपल्यापेक्षा जास्त काळजी कोणी घेत असेल; असं कधीच वाटलं नव्हतं; पण त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलं! त्या राखणदाराचा जीव वर्षानुवर्षांपासून या वास्तूत घुटमळतोय ; त्याला त्याच्या कर्तव्यभावनेमुळे मुक्ती अजून मुक्ती मिळाली नाही. हे त्या आत्म्यासाठी चांगलं नाही; त्यांनी पुढच्या पिढीवर विश्वास ठेवायला हवा होता. घराण्याच्या संस्कारांवर विश्वास ठेवायला हवा होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सृष्टीत घडणारी प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या इच्छेनुसार घडते. इथे जी गोष्ट अस्तित्वात आहे; तिचा एक दिवस अंतही निश्चित आहे; कोणतीही गोष्ट आपण किती दिवस सांभाळणार? मोठमोठी साम्राज्य काळाच्या ओघात नष्ट होतात तर आपण वेगळे कोण आहोत? हा विचार करायला हवा होता; म्हणजे वर्षानुवर्ष हे मायापाश सांभाळावे लागले नसते." त्यांचं विचारचक्र थांबत नव्हतं. परत त्यांचे विचार मूळ पदावर आले,

"हे जरी खरं असलं तरीही माझ्या हातून माझ्या पूर्वजाचा अपमान झाला; ज्याला नमस्कार करायचा; त्याच्याशी मी लढलो ही सुद्धा अक्षम्य चूक झाली आहे. ते जे कोणी माझे आजोबा- पणजोबा असतील ; ते कधीच मला माफ करणार नाहीत. हे मला चांगलंच माहीत आहे. माझ्यासारख्या अहंकारी माणसाला जगण्याचा अधिकार नाही. पण माझे भाऊ माझ्यावर एवढं प्रेम करतात, त्यांचं मन राखायला हवं! " त्यांच्या मनातली अपराधाची भावना सतत डोकं वर काढत होती. मनाबरोबर शरीरालाही खात होती.

तिथल्या मातीत सगळे नतमस्तक झाले. त्यांनी मनापासून प्रार्थना केली "याच्याकडून जर काही चूक झाली असेल; तर क्षमा करा! आमचा भाऊ बरा होऊ दे! अजूनपर्यंत सांभाळंत तसंच यापुढेही सांभाळा!" खरं म्हणजे आपण ही प्रार्थना कोणाला करतोय हेसुद्धा त्यांना माहीत नव्हतं. ज्या वास्तूत भाऊ आजारी पडला; त्या वस्तूला ते प्रार्थना करत होते एवढंच! शेवटी परत एकदा धरणीमातेला हात जोडून सगळे घरी गेले. त्यांना कल्पना नव्हती; पण त्यांची प्रार्थना योग्य ठिकाणी पोहोचली होती.

**********

contd. -- part 5