Rakhandar - 5 - last part books and stories free download online pdf in Marathi

राखणदार. - 5 - अंतिम भाग

राखणदार

प्रकरण ५

"अहो! ही पेज तुमच्यासाठी बनवलीय! थोडीशी तरी पिऊन बघा! अंगात शक्ती येईल. तुम्हाला चवीला थोडं लिबाचं लोणचं पण देते! " कांता तानाजीने काहीतरी खावं म्हणून तिच्या परीने प्रयत्न करत होती. आपल्या पतीची गलितगात्र अवस्था बघून ओलावलेले डोळे नव-याला दिसू नयेत म्हणून खोटं हसत होती.

"हो! दे मला थोडी पेज! पण आता नको. थोड्या वेळाने दे! " तानाजीला बायकोची काळजी कळत होती. पण इच्छा नसताना काही खावं असंही वाटत नव्हतं.

"आता संध्याकाळ झालीय! तुम्ही दुपारीसुद्धा असाच बहाणा करून काही खाणं टाळलं! तुम्हाला काय खावंसं वाटतं; मला सांगा! मी बनवून देईन! पण असे उपाशी राहू नका! स्वत:ची तुम्ही काय अवस्था करून घेतलीय कल्पना आहे का?" कांता त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होती.

"मला थोडा वेळ अंगणात बसवशील? घरात जीव कोंडल्यासारखा झालाय! मोकळ्या हवेत जरा बरं वाटेल!" तानाजीने बायकोला विनंती केली.

"पण बाहेर वारा सुटलाय! तुम्हाला सोडणार नाही!" कांता म्हणाली. पण पतीचं मन तिला मोडवेना. " अगदी थोडा वेळ बसा! चालेल?" तिनं विचारलं.

कांताने त्यांना अंगणात खाट ठेवून बसवलं. सूर्य अस्ताला गेला होता; पण अजून बाहेर चांगला संधिप्रकाश होता. वारा मंद वहात होता. घरासमोरून येणारे जाणारे लोक ब-याच दिवसांनी तानाजीला घराबाहेर बसलेला पाहून खुशाली विचारून पुढे जात होते.

"मोहन आणि शांताराम कुठे आहेत?" तानाजीरावांना भावांबरोबर चार गोष्टी बोलायची इच्छा झाली. 'माझा काही भरवसा नाही! व्यवहाराच्या चार गोष्टी त्यांना सांगून ठेवलेल्या ब-या!' ते विचार करत होते.

"पावसाळा जवळ आलाय! शेतावर खूप कामं बाकी राहिलीयत. तिकडे गेलेयत दोघेही. जरा वेळने येतील!" दाटून आलेल्या आभाळाकडे पहात कांता म्हणाली. तानाजीच्या आजारपणामुळे सगळया कामांकडे दुर्लक्ष झालं होतं. पण ती आता घाई - घाईने पूर्ण करणं आवश्यक होतं.

"मला थोडा चहा करून आणशील? तो पर्यंत मी इथेच बसतो." तानाजी म्हणाले. त्यांना अंगणात जास्त वेळ बसण्यासाठी निमित्त हवं होतं.

"बरं आणते! पण तुमच्याजवळ इथे कोणी नाही!" त्यांना एकट्यांना संध्याकाळच्या वेळी घराबाहेर बसवणं कांताला योग्य वाटत नव्हतं.

"इथे समोरून कोणी ना कोणी येतंय! इथे मला सोबत कशाला हवी? तू जा!" त्याच वेळी नरसूकाकाला येताना पाहिलं; आणि कांता चहा करायला घरात गेली.

नरसू दोन मिनिटं त्यांच्याशी बोलून वेगाने उतरणा-या अंधारकडे बघत घाईघाईने घराकडे निघाला.

आता रात्र झाली होती. घरातल्या दिव्यांचा प्रकाश मंद होऊन घराबाहेर येत होता. येणारे - जाणारे लोकही आता अगदी तुरळक होते. अशक्तपणामुळे तानाजीरावांचा डोळा लागला. पण क्षणभरातच त्यांना जाग आली; त्यांच्या समोर एक आकृती उभी असलेली त्यांना दिसली. उंच- पिळदार अंगकाठी--- काळा वर्ण, पांढ-या शुभ्र मिशा, खांद्यावर काबळं -- हातात तीच घुंगुर लावलेली काठी----तानाजीरावांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना---- ते कसेबसे चाचरत म्हणाले,

"राखणदार --- आजोबा--- तुम्ही? " ते असंबद्ध बडबड करू लागले,

"आजोबा! मला माफ करा! मी मोठी चूक केली! मी पापी आहे." तो माणूस हसला; आणि म्हणाला,

"कोण राखणदार? मी संतू रामोशी ! डोंगरावरच्या वस्तीत रहातो! त्या दिवशी मी शहरात गेलो होतो. बस लेट झाली. काळोखातून चालत घरी जाण्याऐवजी तुझ्या अमराईतल्या खोपटात रात्र घालवावी; असा विचार केला आणि तिथे आलो. तुला आत झोपलेला पाहून तिथून निघालो होतो; पण तू माझ्या अंगावरच आलास. तुझं नाव माहित होतं; पण तुला कधी पाहिलं नव्हतं. कसं ओळखणार तुला? मी ही तुला भिडलो. पण नंतर तू भारी पडणार हे लक्षात आलं एवढा ताकतीचा पैलवान तानाजीच असू शकतो हे मी ओळखलं; आणि राखणदाराची थाप ठोकून दिली. तू कशालाच घाबरत नाहीस हे ऐकून होतो; पण तू एवढा भाऊक असशील असं वाटलं नव्हतं. खरं म्हणजे मीच तुझी माफी मागायला पाहिजे! मी तुझं मन दुखावलं! तू पैलवान गडी! मनानं इतका हळवा असशील असं वाटलं नव्हतं. आज तालुक्याला गेलो होतो. बाहेरून तुला पाहिलं ! इतका खराब झालायस हे पाहिलं मन राहीना ; आजारी आहेस का; ते विचारायला आलो. त्या दिवशी रात्रीच्या वेळी तू मला पाहिलं होतंस; लगेच ओळखशील असं वाटलं नव्हतं." त्यानं तानाजीच्या मस्तकावर हात ठेवला. त्या हातातला मायेचा ओलावा तानाजीला जाणवला.

"आता मनातली अपराधीपणाची भावना काढून टाक! मी तुझं मन दुखवलं--- तूच माफ कर मला!" तो हात जोडत म्हणाला.

"तुम्ही माफी मागू नका! तुम्हीसुद्धा मला आजोबांसारखेच आहात! तुमच्यावर मी हात उगारायला नको होता. पण ती वेळच तशी होती. मी चोरीचा छडा लावायला गेलो होतो. बागेत तुम्हाला बघून चोर समजलो! क्षमा करा!" तानाजीराव त्याचा हात धरत म्हणाला.

"येतो मी! रात्र वाढतेय!" अवागत निरोप घेत म्हणाला.

"बसा आजोबा! चहा घेऊन जा!" तानाजीला त्याच्याशी आणखी बोलावंसं वाटत होतं.

"आज नको! उशीर होतोय! लांबचा पल्ला गाठायचाय. स्वतःला जप! लवकर बरा हो!" तानाजीच्या पाठीवर हात फिरवून तो निघाला आणि अंधारात दिसेनासा झाला.

त्याच वेळी दोघे भाऊ घराकडे येताना तानाजीला दिसले.

"तुला एकट्याला कसं बसवलं इथे?" मोहन रागाने म्हणाला.

"एकटा नव्हतो! एक पाहुणा आला होता. त्याच्याशी बोलत होतो. मन शांत झालं! जणू माझं कोणी खूप जवळचं -- माझ्यावर माया करणारं माणूस भेटून गेलं; असं वाटतंय मला! मला मान सगळीकडे मिळतो; पण डोक्यावर - पाठीवर मायेचा हात फिरला; आणि मन सुखावलं! तुम्हाला ते बाहेर दिसलेच असतील! आताच गेले!" तानाजी आज खूप आनंदात दिसत होता.

"आम्हाला बाहेर कोणीच दिसलं नाही! " मोहन बुचकळ्यात पडला होता.

"तुम्ही आलेल्या दिशेनेच गेले ते! तुम्ही बोलण्यात गुंग असाल; म्हणून दिसले नसतील!" तानाजीरावांच्या या बोलण्याला कोणी उत्तर दिलं नाही. भाऊ आनंदात आहे. हसतोय यावरच दोघेही खुश होते.

कांता चहा घेऊन बाहेर आली.

"चहा करेपर्यंत किती अंधार पडलाय बघा! माझ्या लक्षातच आलं नाही ! तुम्ही मला हाक का मारली नाही? येऊन आत घेऊन गेले असते!" ती स्वतःला दोष देऊ लागली.

" बरं झालं तू आली नाहीस. तसा फार वेळ गेलेला नाही. झट्कन् अंधार पडला! तुझ्या कसं लक्षात येणार? जेवायला वेळ आहे! हे दोघे दमून आलेयत; त्यांनाही चहा आण." बोलताना तानाजीराव चक्क हसत होते; कांता अनेक दिवसांनी त्यांना इतक्या चांगल्या मनःस्थितीत बघत होती.

" त्या माणसाने याच्यावर अशी काय जादू केली ?" दोन्ही भाऊ विचार करत होते. पण ह्याच्या मनावरचा भार हलका झाला; आता हा नक्कीच लवकर बरा होईल; अशी खात्री पटल्यामुळे त्या माणसाचे मनोमन आभार मानत होते.

त्याच्यातला हा बदल एका झाडामागे उभा राहून 'राखणदार' पहात होता. त्या घराला समाधानाने आशीर्वाद देत होता! माझे वंशज असेच नेहमी आनंदात असोत अशी प्रार्थना करत होता. देवाला हात जोडून विनवत होता,

"माझे वंशज पराक्रमी - चारित्र्यवान माणुसकी जपणारे आहेत! एकमेकांना सांभाळून घेतायत! मला राखणदार बनून रहायची काय गरज आहे? मला आता मुक्ती दे "

त्याची निर्वाणाची वेळ झाली होती.

संपूर्ण

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED