शेतकरी माझा भोळा - 9 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेतकरी माझा भोळा - 9

९) शेतकरी माझा भोळा!
टरकाची वाट फाता फाता चार-पाच दिस निघून गेले पर त्यो आलाच हाई. गणपत रोज फाटे मारुतीच्या दर्शनाला गेल्यावाणी कार्खान्यावर जायचा. दिसभरात कव्हातरी मुकीरदमाची गाठ पडायची. मुकीरदम त्येला ग्वाड ग्वाड बोलून पाटील-रावसाब म्हून वाटेला लावायचा. सांच्याला दोन-तीन टरक धाडून देत्यो आस रोजच बोलायचा. घरामंदी यस्वदाची किरकिर वाढली व्हती. सावकार बी पैक्यासाठी तंग करु लागला. जाता-येता कलाकेंदराचा मालक पैक्याच काय झाल म्हून ईचारायचा. कोंडबा रात-रात घरी येत न्हवता. आश्येच आठ-धा दिस गेले. त्या सांच्याला गणपत मारुतीच्या पारावर बसला व्हता. दुसरे बी शेतकरी बसले व्हते.सम्देच परेश्यान व्हते. ऊसामुळं मिळणाऱ्या पैक्यापायी आनंद वाटण्यापरीस सम्देच दुकात व्हते. कोन्ह ऊसाकड फावून पोरीचं लगीन काढलं व्हतं, कोन्ही रिन काढून तारस टाकलं व्हतं, कोन्ही पोराच्या नवकरीसाठी कर्ज काढलं व्हतं. समदे सोत्ताच रडगाण गात असताना, येक धा-बारा वरिसाचं पोरग तेथं आलं. काळकुट कापड आन् पाच सात दिसात आंगूळ केली न्हाय आसा आवतार आसलेल्या पोरानं ईचारल,
"गणपतरावाचं घर कोन्त हाये?"
"कार बाबा?"
"ऊसतोडीसाठी टरक आन्ला हाय."
"मी-मी-मीच गणपत हाय. चल." पोराच्या रुपानं जसा देव घरी आल्याच्या आनंदात त्येनं ती खुसखबर यस्वदीला देली.
"ऊस काय आत्ता तोडणार हाईत?"
"न्हाई व्हो मौसी. दिसभर काम करुनशानी समद्यायचं आंग कस आंबून गेल हाय. फाटे फाटे बिगिनं कामाला लागणार हावोत."
"यस्वदे, मो येंची येवस्था लावून यितो. तू च्यार पाच मान्सायचा जेवाण कर. "
"च्यार-पाच? पाटील, पंद्रा-सत्रा मान्सायचा जोड हाय. उद्या सांच्यापस्तोर तुमची उसतोडणी झालीच फायजेत अशी मुकरदमाची सक्त ताकीद हाय."
"बर.. बर यस्वदे..."
"ठीक हाय. " यस्वदा म्हण्ली.
थोडूस फुंड गेल्यावर त्ये पोर्ग म्हन्ल, "पाटील, जेवण काय कर्णार हायेसा?"
"काय म्हंजी? चपाती, डाळ झालच त.."
"पाटील, आमी मान्स काय तुमास्नी डाळ-रोटी खाणारे वाटलो व्हय? दोन येक्कराचा ऊस तोडाया आंगात ताकद फायजेत का न्हाई? आस सपाकशार खाल्लं तर कस व्हाव?"
"मंग?"
"कोंबड, बकरं आसं झणझणीत होवू द्या. तुमीच न्हाई त सम्दे लोक ह्येच कर्तात. आमाला सांगायची बी येळ येत न्हाई. पाटील, दुकानातून पाच मजुर कट्टे, तीन बिरीसस्टालचे पाकीट, पाच-सात माचीसा, एखांदा तंबाकुचा म्हंजी तोट्याचा बाकस्, पावकिलू फाडी सुपारी, तीन चार किलू साखर, आरधा पाव च्याचा पुडा आन् आंगाच्या दोन साबना घ्या."
"आजूक का काही?"
"नगं. बास झालं. लाग्लच तं सांगीनच की. तुमी का परके हायेसा?"
पोरानं सांग्लेल सम्द सामान उदारीवर घिवून गणपत त्येच्यासंग वावराकडं निघला.
"टरक कोठायत रे?"
"त्ये वावरात पोचले बी असतील."
"पर वावर म्हाईत हाये की."
"तर मंग." बोलत बोलत दोग वावरात पोचले. त्येंच्यापैलेच दोन टरक आन पंद्रा-ईस मान्स पोचली व्हती. त्येंना फाताच गणपतच्या जीवात जीव आला.
"आले का रे पाटील?"
"व्हय. आलं की." गणपतनं आन्लेलं सामान ठिवत पोरगं फूड म्हन्लं,
"पाटलानं जेवाय चपाती-डाळीची आरडर दिली. "
"काय? चपाती? डाळ?"
"तसं न्हाई. मला ठावूक न्हवतं. उद्या दुपारच्याला..."
"पाटील, दोपारच्याला कोंबडी खावूनशानी काय झोपा काढायच्या हाईत व्हो?"
"पण या वक्ती?
"मिळत्ये ! तुमी फकस्त पैका तं द्या. ह्ये पोरग समदी येवस्था कर्ते."
"कित्ती देयाचे?"
"देवा की... पाच...सातशे..."
"सातशे?"
"तर मग? पाटील, ईस मान्साचा जोड हाये. तव्हा पाच-सात कोंबडे कमीच पडतील. आजूक मसाला हाय. "
"घे बाबा.आण.." आस म्हण्ताना गणपतने सातशे रुपै पोराजवळ देले.
"बरं आता म्या यिवू का?"
"हां. या. घंट्याभरान पोरगं यील तव्हा रोट्या तैय्यार ठिवा."
"बरं..." म्हन्ता म्हन्ता गणपत घराकडे निघत आसताना त्येच ध्यान टर्काकड गेले. झंडूच्या रानात टरक घातले व्हते. सम्दा झंडू पार मोडला व्हता. बायांनी झोपड्या ऊबारायसाठी टमाट्याची रोपं ऊपटली व्हती. क्यानालच्या काठनं लावलेली सागवानाची झाड बी तोडली व्हती. डोक्यावर हात मारत गणपत घराकडं निंघला .
दुसऱ्या दिशी गणपत आन यस्वदा भल्या बिगीन ऊठले. गणपत म्हन्ला,
"यस्वदे, म्या फूड व्हतो. तू बी बिगीबिगी करुन ये. पुंजा करुन मंगच तोडाय सुरु करू."
"बरं.." यस्वदा म्हण्ली तसा गणपत वावराकडं निंघला. दुरुन त्येला वावर दिसू लागलं, वावरातल्या झोपड्या बी नजरत भरु लागल्या पर... पर... रातरचे टरक कोठच दिसत न्हवते.गणपतचं काळीज टणाटणा ऊडू लागलं. त्यो पळत-पळत वावरात आला. वावरात मान्स बी न्हवती. दोन-चार बाया खोपटाफुडं बसून डोक्स ईचरत व्हत्या. येक बाई आंगूळ करीत व्हती. छातीवर साबण लावत व्हती. गणपतला कसकानू वाटू लागल. आंग गरम झालं, डोळे जड पडले. आस पैले कव्हाच झालं न्हवत. बाईनं अंगावर पाणी घेत्ल. बाईन गणपतला फायल पर कायबी दखल घेतली न्हाई. ऊलट आजूक आंग चोळू लागली. आखरीला गणपती फुडं सरकला.खोपटाम्होरी बसलेल्या येका बाईला त्येनं ईचारलं,
"का व्हो, मान्स कोठे हाईत?"
"आमी हावोत की..." म्हणताना त्या बाईनं गणपतकडं आस्सं रोखून फायलं म्हण्ता की गणपत खाली बघत म्हण्ला,
"तसं न्हाई व्हो. पर टरक..."
"टरकाचं इच्चारता व्हय? त्ये काय त्या वावरात हाईत की..." म्हण्ताना त्या बाईनं बोट दाखवलं.
गणपतनं तिकडं फायलं. तात्यासायेबांच्या वावरात मान्स समदी ऊसाच्या फडात घुसली व्हती. गणपत तात्याच्या वावरात गेला. तात्यासायेब आन् त्येंच खटलं जातीनं उबं व्हतं. गणपतला फाताच तात्या म्हन्ले,
"ये गणपत, ये. म्या आताच तुही सय काढली व्हती."
"ती कहापायी?"
"कालच लैट बील आलं हाय."
"किती आलंय?"
"सात हजार रुपये..."
"काय? सात हजार?" गणपतने दचकून इच्चारलं
"व्हय..."
"पर मालक, पाण्याच्या दोनच पाळ्या..."
"गणप्या, दोन दिस पाचाची मोटर चालली व्हती. तरी म्या पैयलेच सांगलं व्हतं. मझा कारभार लई रोखठोक आसतो.सांगलं व्हत ना तुला?"
"व्हय मालक. उंद्याच्याला ऊस जाईल. चार-आठ दिसात पैका मिळताच आपला समदा येवहार नील करतो. पर मालक, राती ह्ये दोन टरक मझ्या वावरात व्हते."
"पाटील. त्येचा आस झाल..." त्या कळपाचा म्होरक्या फुडं म्हन्ला,
"आज गणपतरावाचा फड मोडायचा व्हता म्हणून दोन्ही टरक आन झोपड्या टाकल्या व्हत्या..."
"मंग आत्ता..."
"पर फाटे आजूक दोन टरक आले, मुकीरदमाचा सांगावा घिऊन.."
"कोणता सांगावा?"
"पैले दोन दिसात तात्यासायेबाचं रान खाली करा आन् मंग येका दिसात चारी टरक भरून गणपतरावाचा फड तोडा."
"तात्यासाहेबांच्या बाद मंदी..."
"पाटील, दोन दिस जास्त झाले का जी ? उंद्या दोपास्पस्तोर ह्यो फड़ खाली करुन तुमच्या फडात घुसतो का न्हाई ते बगा." म्होरक्या म्हन्ला. तात्यासायेब तेथं उबे असल्यामुळं गणपतला जास्ती बोलता बी येईना. मातर त्यो येव्हढं म्हन्ला,
"येक मातर करा, की मालकाचं रान खाली झाल्याबरुबर मझ्या वावरात..."
"त्येची काळजी नगा. काय बी करु... दोन-तीनसे रुपै माघून घिवू पर, खाल्ल्या थाळीत छेद कराचो न्हाई."
गणपत तिथून निघाला तेव्हा तात्यासायेब म्हन्ले, "गणपत.."
"जी..."
"सांगू न्हाई पर येक आडचण आली हाय."
"काय झाल?"
"आमच्या खटल्याची येक भन हाय...."
"बर. त्येच काय?"
"तिच्या नातीच्या पोरीला पोरग झाल हाय. उद्या बारसं हाय. खटलं जायाच म्हन्ते."
"काय?"
"आस कर, या लोकांच्या जेवायची येवस्था तू करशील?"
"मालक, न कराया काय झालं?"
"दोघांचा ऊस तोडून जाईस्तोर व्हणारा जेवणाचा खर्च्या म्या देईन."
"मालक, कावून गरिबाला लाजीवता? करीन की मी..." तात्यासायेबाला व्हो भरुन गणपत घराकडं निंघला. रस्त्यात येस्वदा बी भेटली. गणपतचा रडकुंडी आलेला चेहेरा फात म्हन्ली,
"काय झाल व्हो? तुमी बीगीन कावून मांघ फिरले?"
"यस्वदे, त्ये लोक पैयले तात्या सायबाचा फड तोडणार हाईत."
"आन मंग आपला?"
"उद्या या परवा?"
"मग व्हो?"
"मंग काय? जे व्हईल ते फावावं."
"ऊस वाळाय बी लागला."
"व्हय. पर कर्णार तरी काय? मरीआईचा फेरा दिसुतया. सटवीन जे लिवून ठिवलं ते व्हणारच त्येला आपून काय बी न्हाई करु शकणार." बोल्ता बोल्ता दोग घरी पोचले.
कोंडबा घरी आल्ता. त्येला फाताच तळपायाची आग मस्तकात शिरल्यावानी कव्हा न्हाई त्यो गणपत कडाडला, "कोठं मेल्तारे रातभर?"
"क...क...काय?"
"त्वांडातून सब्द कस फुटाल रे, हराम्या? बोल, रातभर कोठं व्हतास?"
"मी...मी.."
"हा सांग...सांग....कोन्च्या रांडकडे..."
"तुमाला काय झालं जी? आस कावून बोलता? सम्दा राग पोरावर कावून काढता?"
"त्या त्येलाच ईच्चार, त्या कलाकेंदरात जाताना म्या सोत्ता फायलय.."
"व्हय रं, कोंडबा?"
"कोन्त्या त्वांडानं त्यो व्हय म्हणल? जरासी तरी लाज हाय का? घरात तरनी ताठी भन हाय आपून कहाला सेण खावावं ?"
"व्हय. म्या गेल्तो..." आसं जोरानं ओरडत कोंडबा घराबाहीर पडला. गणपत काही बोलणार तेवढ्यात सखी बाहीरून आली आन् दोघंबी गुमान बसले.
व्हता व्हता तात्यासायेबाचा फड खाली व्हायला आठ रोज लागले. गणपत रोज फाटे-दोपारी- सांच्याला लेबरायच जेवण घिऊन जायचा. कंदी मंदी काखान्यावर जावूनशानी मुकीरदमाची भेट घेयाचा. पर सम्द निस्फळ व्हयाचं. आखरीला त्या राती दोन टरक् त्येच्या वावरात पुना उबे ऱ्हायले. गणपतला कोणी तरी म्हन्लं,
"गणपत, आज राती तू वावरातच नीज. फाटे पुना टरक कोठे जावू लागले तर बिनदास्त टरकाम्होर पड."
गणपत रातीच लेबरायचं जेवाण आन सोत्ताचं हातरून पांघरून घिवून वावरात पोचला.
"काय पाटील, आज वावरातच झोपायचा ईच्चार हाय?"
"व्हय.."
"पाटील, आमच्याबर येवढुसा बी ईस्वास न्हाई व्हय?"
"तस न्हाई..."
गणपत त्येच्यापासून दूर जावून पडला. कलाकेंदरापेक्सा लेबरायचा धिंगाणा जास्ती व्हता. बाया सगट समदे फुल्ल पेले व्हते. रातभर सम्दे हासत व्हते, रडत व्हते आनि भांडत बी व्हते. कोण कोणाच्या मिठीत घुसत व्हते त्ये कोणालाच समजत न्हवतं.फाटे-फाटे त्येंचा धिंगाणा संपला. गणपतचा रातभर डोळ्याला डोळा लागला न्हाई. फाटे उठून मातर लेबरं वेगानं कामाला लागले. मान्सायनी आंघुळी करुन ऊस तोडाय सुरु केला अन गणपत सुकावला, त्येचा जीव भांड्यात पडला. ऊजाडता-ऊजाडता यस्वदा बी च्याहाचं भांड घिवून आली आन् काम सुरु झालेलं फावून म्हन्ली, "लागला का येकदाचा मुहरत?"
"व्हय. लागला बग. फाता-फाता समद्या ऊसाला निजवतील." घंटाबराचं काम झालं. लेबरायच्या आंगातून घाम गळाया लागला. कोन्ही शिगारेटी वढीत व्हत, कोन्ही बिडी वढत व्हत तर कोन्ही हातावर तंबाकू चोळत असताना येक मोटरसायकल गणपतच्या वावरात शिरली. मुकीरदमाला फाताच त्येच्या काळजात धस्स झालं.
"ह्यो मुकीरदम कावून आला हाय? लेबरायला दुसऱ्या फडात नेणार हाय का?" गणपतला यस्वदा ईच्यारत आसताना त्येच्यापाशी आलेला मुकीरदम म्हन्ला,
"काय पाटील, काय म्हणतो फड?"
"तुमीच फावा. आजपस्तोर मझ्या हातात पैका पडाय फायजे व्हता..."
"खर हाय पाटील. पर ह्ये काम आशेच असत्यात काय तरी आडचण येतीया. आता आजच फा ना..."
"झालं काय?"
"आज दिसभरात तुमचा सम्दा ऊस कारखान्यात पोचला असता का नाही? पर आता काय बी खरं न्हाई?"
"काय झालं मुकीरदम? मझ्या वावरातून लेबरायला नेयाची कोशीश कराची न्हाई. तुमाला सांगून ठिवतो, मझा ऊस टरकात भरला न्हाई ना तर...तर म्या- म्या टरकाखाली निजल. मग मह्या मड्यावून लेबरं कुठं बी घिऊन जावा."
"पाटील, जरा दमान घेवा. आक्रोस्ताळपणा करु नगा, माझे ऐका, अव्हो कारखान्यात कामगारायचा संप हाय. रातीपासून कारखाना बंद हाय."
"कार्खाना बंद? संप? पर कावून?" मुकीरदम आलेला फावून तेथं आलेल्या कोणी तरी ईचारल.
"आर बाबा, कामगारायला आठ म्हैन्यापसून पगार न्हाई. कित्ती दिस त्ये फोकट काम करतील?"
"त्यांचा पगार कावून न्हाई?"
"पाटील, ह्या सहकारी संवस्थाचं काय बी खर नसते. राबणारे, दिसरात कस्ट उपसणारे कामगार बाजुला ऱ्हातात आन् मलिदा चाटाय फुडे व्हत्यात चेअरमन, डायरेक्टर मंडळ आन् कार्खान्याचे अधिकारी."
"पाटील आंदळ दळत्ये आन् कुत्तर पीठ खात्ये आशीच या कार्खान्यायची आवस्था ऱ्हाते."
"कामगारायची ती तऱ्हा तर या लेबरायची तऱ्हा लईच न्यारी. मला सांगा ह्ये लेबर बगा परमुलखातून कोन्हाच्या आदारावर आले.. कार्खान्याच्या भरोस्यावर ना? पर म्हन्त्यात ना भरोश्याच्या म्हशीनं हालगट देलं त्या परमानं कारखान्यानं या लेबरायला आजपस्तोर धत्तुरा दावला. बेचारे आठ म्हैन्यापासून राबराब राबत्यात आन् तुमच्यावानी कनवाळू मान्सायनं देलेल्या मीठ भाकरीवर गुजरान करतात. बर, लेबरायनो, तुमची संगटना बी संपात ऊतरली हाय, कामगार आन् लेबर आज धा वाजेपासून उपोसणाला बसणार हाईत...."
"किती दि हो उपोषण चालणार हाय?" यस्वदान ईच्चारलं,
"तस तं पैका मिळोस्तर. आरदा निर्दा तरी पैका मिळजेस्तोर चालल बगा. कोण येणार हाय तुमच्यापैयकी?"
"मी...मी..."
"पर मुकीरदम, मझा ऊस?"
"पाटील, कसं ईचारता? मला येक सांगा देवळात देवच नसाल तं निवेद कोणास्नी दावाल? तसं कार्खाना बंद आसल तर ऊस निवूनशानी उपेग काय? संप मिटेस्तोर नेलेल्या ऊसाचे लाकडं व्हतील. पाटील, तुमचं तकदीर लै चांगल बरं.."
"त्ये कसं?"
"सम्दा ऊस तोडून टाकला असताअन् मंग संप झाला असता तर? या तात्यासायेबाचं बगाना, ऊस तर नेला पर आजूक माप व्हयाचं हाय. संप मिटेजोस्तर त्यो ऊस वाळलं का ऱ्हाईल? चला रं चला."
आवग्या पाच मिन्टात रान खाली झालं. झेंडू आन् टमाट्यायचा चिक्कल झाला व्हता. सागवानचे तीस-पस्तीस झाड त्यांनी तोडले व्हते. त्ये लाकड बी त्येंनी टरकात भरले...
०००नागेश सू. शेवाळकर