ha khel savalyanchaya books and stories free download online pdf in Marathi

हा खेळ सावल्यांचा...

या गोष्टीची सुरूवात झाली ती साधारण पंधरा-वीस अब्ज वर्षांपूर्वी! एक प्रचंड ऊर्जेने भरलेला महाभयानक विस्फोट झाला. आणि अवघ्या ३ मिनिट ४६ सेकंदाच्या कालावधीत विश्वाचा जन्म झाला. प्रचंड उष्णता निर्माण झाली त्यावेळी... तापमान जवळपास ९० कोटी अंश सेल्सिअस झाले. त्यामुळे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन संलग्न होऊ लागले. पण न्यूट्रॉन मुळात अस्थिर!! त्यामुळे त्यांचे प्रोटॉनमध्ये रूपांतर होऊ लागले आणि त्यातून हायड्रोजनची निर्मिती झाली. काळ सरू लागला तसे हे तापमान कमी होत ३०० अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले. त्यामुळे हायड्रोजन व हेलियमसारख्या वायूंना स्थैर्य प्राप्त झाले. आणि या स्थैर्यातूनच काही अब्ज वर्षांत माझा जन्म झाला. मी... तुमचा लाडका मित्र भास्कर. मला तुम्ही रवी, दिनकर, आदित्य अशा नावांनीही ओळखतात. गेल्या पाच अब्ज वर्षांपासून नित्य तुमच्या अधिवासाला जो चराचरात उजळवून टाकतो तो मी... सूर्य!!

मी तुम्हाला रोज आकाशात दिसतो, हो की नाही? पण या विश्वाच्या भव्य पसाऱ्यात मी राहतो आकाशगंगा नावाच्या दीर्घिकेत. दीर्घिका म्हणजे अनेक ताऱ्यांचा समूह. अनेक म्हणजे साधारण १०० ते २०० अब्ज तारे बरं का! तर या आकाशगंगेत साधारण १५०अब्ज तारे आहेत. या साऱ्यांना स्वतःचे दैदिप्यमान तेज आहे... त्यामानाने मी पुष्कळ दुय्यम आहे. पण असे असले तरी मी तुम्हाला रोज दिसतो तसा मोठ्या आंब्याएवढा पिटुकला पण नाही हा!! मी तुम्हा पृथ्वीवासीयांपासून खूप खूप म्हणजे जवळपास १५ कोटी किलोमीटर एव्हढ्या अंतरावर आहे, म्हणून छोटूसा वाटतो तुम्हाला. पण मी भरपूर मोठा आहे, इतका मोठा की माझ्या गरगरीत गोल व्यासावर पृथ्वीसारखे १०९ गोल सहज समोरासमोर ठेवता येतील. आता आला अंदाज माझ्या भव्यतेचा? साधारण ५ अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा मी इतका मोठा नव्हतो पण नंतर हळूहळू माझा आकार वाढत गेला. आजही तो वाढतोच आहे. सध्या माझ्या पृष्ठभागाचे तापमान ६००० अंश सेल्सिअस आहे. आकार वाढेल तशी कालांतराने माझी उष्णताही हळू हळू वाढत जाईल.

तुम्हाला माहिती आहे का की नऊ भावांप्रमाणे असणाऱ्या नवग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच का आहे जीवसृष्टी? कारण आहे पृथ्वी आणि माझ्यामध्ये असणारे १४ कोटी ७१लाख किमी अंतर! जीवसृष्टीच्या सुदृढ संगोपनासाठी आवश्यक असणारी उष्णता, ऊर्जा, या अंतरात परिपूर्ण होते. संरक्षक कवचाप्रमाणे काम करणाऱ्या ओझोनमुळे तुम्हाला माझ्यातून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांचा त्रास होत नाही, आणि पृथ्वीच्या पृष्ठापासून ९००किमी उंच वातावरण असल्यामुळे माझा प्रकाश आणि उष्णता सर्वत्र पसरते. पृथ्वीवर जे ऋतुचक्र अविरत फिरते त्याला मी सुद्धा जबाबदार आहे बरं!! पृथ्वी स्वतःभोवती फिरत असतानाच मलाही प्रदक्षिणा मारते. तिचा आस जरा कललेला आहे. मग तिच्या या परिभ्रमणात जो भाग माझ्या संमुख असतो तिथे उन्हाळा असतो, आणि जो नसतो तिथे हिवाळा! पृथ्वीसारखाच मी पण स्वतःभोवती फिरत असतो. २४ दिवस आणि १६ तास लागतात मला अशी एक फेरी मारायला. म्हणजे जर तुम्ही माझ्या पृष्ठभागावर राहायला आलात तर तुमचा एक दिवस साडेचोविस दिवसांचा असेल. पुरेल का तुम्हाला! नाही म्हणजे पृथ्वीवर २४ तासांचा एक दिवस मिळतो, तोही तुम्हाला आजकाल पुरेसा नाही होत म्हणून माहिती दिली बाकी काही नाही. आणि त्या पेक्षा भन्नाट गोष्ट सांगू का? तुमचे एक वर्ष असते ३६५ दिवसांचे, तसे माझे किती असते माहिती? तब्बल २२ कोटी ५० लक्ष वर्षांचे. कारण मला तेवढा वेळ लागतो ना, आकाशगंगेभोवती परीभ्रमण करायला!

तर अशी आहे ही सगळी फिराफिरीची धमाल!! मी आकाशगंगेभोवती, पृथ्वी माझ्याभोवती, आणि चंद्र पृथ्वीभोवती!! चंद्र... माझ्या प्रकाशाने उजळून अंधाऱ्या रात्री तुम्हा पृथ्वीवासीयांना शीतलता देणारा तुमचा लाडका मामा! तशी आमची दोस्ती मस्त आहे बरं का! मी, पृथ्वी, आणि चंद्र गुरुत्वाकर्षणरुपी बंधाने एकमेकांशी जोडलेले आहोत. अवकाशाच्या विस्तीर्ण पटांगणावर आम्ही गुण्यागोविंदाने नांदतो, मुक्त विहरतो. पृथ्वीच्या परिवलन, परिभ्रमणामुळे चंद्र आणि मी तुम्हाला उगवता मावळताना दिसतो. ज्या दिवशी आम्ही एकत्र उगवतो आणि मावळतो तो दिवस म्हणजे अमावस्या. 'अमा' म्हणजे एकत्र आणि 'वस' म्हणजे राहणे. आमच्या या एकत्र असण्यामुळे तुम्हाला चंद्रदर्शन होत नाही. आणि कधी कधी काय गंमत होते माहिती? जेव्हा चंद्र आणि मी अमावस्येला असे एकत्र फिरत असतो न तेव्हा अशी एक स्थिती निर्माण होते जेव्हा मी आणि पृथ्वी यांच्या अगदी मधोमध हा इटूकला चांदोबा येऊन बसतो. जणू काही आम्ही शाळेच्या मुलांप्रमाणे रांगेतच उभे आहोत असे वाटेल कोंणी पाहिले तर! अर्थात इतक्या वर आम्हाला कोणी पाहायला येत नाही ही गोष्ट वेगळी, पण मी आपल उगाच गंमत म्हणून सांगितलं. तर जेव्हा असे आम्ही सरळ रेषेत येतो ना एकमेकांसमोर, तेव्हा काय होतं माहिती? चंद्राची सावली पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडते आणि त्यामुळे मी तुम्हाला झाकोळलेला दिसतो, सावळा वाटतो... आणि त्यालाच तुम्ही म्हणतात सूर्यग्रहण!!

सूर्यग्रहण प्रामुख्याने तीन प्रकारे दिसून येते. पाहिले खंडग्रास. जेव्हा चंद्राकडून माझे पूर्ण बिंब झाकले जात नाही तेव्हा चंद्रकोरीप्रमाणे सूर्यकोर तयार झालेली तुम्हाला दिसते. खरे सांगू तर आम्हाला यातले काहीच जाणवत नाही बरे. जेव्हा तुमच्या दृष्टीची पातळी आणि मी याच्या बरोबर मध्ये येतो ना चंद्र तेव्हा तुम्हाला वाटते की मी चंद्रामुळे पूर्ण झाकला गेलो याला म्हणतात खग्रास सूर्यग्रहण. जेव्हा चंद्र आणि माझे केंद्रबिंदू अगदी एकमेकांसमोर येतात ना, तेव्हा पृथ्वीवरुन मी तुम्हाला सोन्याच्या बांगडीसारखा दिसतो, त्यालाच तुम्ही म्हणतात कंकणाकृती सूर्यग्रहण. चांदोबा माझ्यापेक्षा छोटा आहे त्यामुळे तो काही मला पूर्ण झाकू शकत नाही, त्यामुळे माझ्या कडा झाकल्या न जाता त्या बांगडीसारख्या दिसतात. मला नाही, तुम्हालाच! खग्रास सूर्यग्रहण सुरू होण्याच्या काही काळ आधी माझा म्हणजे सुर्यबिंबाचा किंचितसा भाग तेजस्वी असा शिल्लक राहतो. आणि उरलेला भाग झाकला जातो. त्या काळ्या पार्श्वभूमीवर एक तेजस्वी ठिपका अंगठीत खडा चमकावा तसा चमकतो. अनेक खगोलप्रेमीना भुरळ पाडणारे केवळ काही क्षण दिसणारे हेच माझे अत्यंत विलोभनीय असे 'डायमंड रिंग'चे रूप!! कधी कधी तर मला असे वाटते की 'जे न देखे रवी ते देखे कवी' असे तुम्ही म्हणत असावे ते यामुळेच! कारण विश्वशक्ती माझ्याकडून अशा ज्या सुंदर लिला घडवून आणते, त्या मलाच बघता येत नाहीत ना! पण एक सांगू तुमच्या कल्पनाशक्ती जितक्या अफाट आहेत ना ते बघून अनेक भावना मनात उमटत असतात.

मला जेव्हा तुमच्या ग्रहणाविषयीच्या भन्नाट कल्पना माहिती झाल्या ना पहिल्यांदा मी तर अचाटच झालो होतो!! काय तर म्हणे राहू-केतू नावाचे राक्षस मला गिळतात, कसे शक्य आहे? मी सांगितलं ना तुम्हाला मी किती मोठ्ठा आहे ते? आणि ग्रहण लागते म्हणजे अवकाशात कशी लपाछपी चालते ते? मग कसे कोणी मला गिळणे शक्य आहे तुम्हीच करा बरं एकदा विचार... हसू येईल तुम्हाला पण!! आणि अजून किती काय काय अंधश्रद्धा बाळगता रे तुम्ही! ग्रहण सुरू होण्याआधीच पाण्यात काय जाऊन बसतात, खायला-प्यायला काय बंदी घालतात, इतके कमी म्हणून की काय पण एरवी पुण्याचे काम वाटणारी देवपूजा तुम्हाला पाप वाटायला लागते लगेच!! कोंडून ठेवतात तुम्ही त्या बिचाऱ्यांना कपाटात!! का तर सूर्यग्रहण आहे म्हणून? अरे अरे अरे!! काय हे? शोभते का तुम्हाला? पशूंपेक्षा स्वतःला प्रगतही म्हणवता आणि अशा अंधश्रद्धापण बाळगता! अगदी पूर्वी तुम्हाला माहिती नव्हते की ग्रहण लागते म्हणजे नक्की होते काय, पण आता विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की या सगळ्यांचे भौगोलिक कारण तुम्हाला कळले आहे, मग का घाबरता? आणि जरी काही परंपरा पूर्वजांनी तुम्हाला ग्रहणात पाळायला लावल्या आहेत, तरी त्यामागे असणारी शास्त्रीय कारणे तुम्ही जाणून घेतलीत का कधी?

जसे की ग्रहणकाळात उपवास करायला का सांगितले जाते? ग्रहणकाळात पृथ्वीवरील माझ्या प्रकाशाची तरंगलांबी आणि तीव्रता बदलत असते. विशेषतः अतिनील आणि अवरक्त किरणे, जी नैसर्गिकरित्या निर्जंतुकीकरणाचे काम करतात, ती ग्रहणकाळात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. ह्यामुळे अन्नात सूक्ष्म जीवजंतूंची अनियंत्रित वाढ होऊ शकते आणि असे झाले तर त्यामुळे ते अन्न सेवनास योग्य राहत नाही. आणि त्याचा तुमच्या तब्येतीला त्रास होऊ शकतो हे त्याचे कारण आहे. पण तुम्ही काय करता? उपवास करायचा इतकेच लक्षात ठेवतात आणि घरातली वडीलधारी मंडळी, गर्भवती स्त्रिया यांनाही बळजबरी ते नियम पाळायला लावता, भूक लागली आणि खाल्ले नाही तर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नाही का कमी होणार? आणि ग्रहण सुटल्यावर खाल्ले की अचानक साखर वाढल्यामुळे त्यांना त्रास नाही का होणार, करा बरं विचार. ग्रहण संपल्यावर अंघोळ करण्याचा सल्ला का दिला आहे? कारण आधी सांगितले त्या प्रमाणे जर अतिनील किरणांच्या कमतरतेमुळे या काळात जिवाणूंची वाढ झाली असेल तर तुम्ही स्नान केल्यामुळे ते धुतले जातात आणि त्यामुळे तुम्हाला कोणताही संसर्ग होण्याचा धोका संभवत नाही बस्स!! पण किती भयानक बाऊ करत बसता तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींचा. खूप हसतो चांदोबा आणि मी तुम्हाला.

अरे, विज्ञानयुगातले प्रगत मनुष्य तुम्ही! उद्या निश्चय कराल तर माझ्यावरही संशोधनासाठी यान पाठवाल... मी ही वाट बघेल आनंदाने त्याची पण जरा जपून हा... माझ्या प्रचंड उष्णतेत ते जळून नको जायला याची पूर्ण खबरदारी घ्या बरं!! ते असो! तर मला सांगायचे हे आहे की आता विज्ञान-तंत्रज्ञानाने तुम्हाला ग्रहण म्हणजे काय आहे ते कळले आहे, मग सोडा ना त्या अंधश्रद्धा... जरा त्याकडे डोळसपणे बघा! ग्रहण ही आम्हा ग्रहांची दिनचर्या आहे. त्यासाठी तुम्ही तुमची दिनचर्या का बदलता? त्यापेक्षा समाजात रूढ झालेल्या अंधश्रद्धा बदला. माझ्या अतिनील किरणांना उघड्या डोळ्यांनी पाहिले तर अंधत्व येऊ शकते. योग्य खबरदारी घेऊन सूर्यग्रहणाचा आनंद घ्या... कारण,
आभास सावली हा असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते असती नितांत भास
हसतात सावलीला हा दोष आधळ्यांचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा...
हा खेळ सावल्यांचा...

~ मैत्रेयी ~

इतर रसदार पर्याय