kasa chalvava pudhe varsa books and stories free download online pdf in Marathi

कसा चालवावा पुढे वारसा..?

गुरुपौर्णिमा!
मानवी कल्याण हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ज्यांनी अठरा पुरणांचे ज्ञानदान अखिल विश्वाला दिले त्या तेजस्वी ज्ञानी वेदव्यास मुनींची जयंती. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्राची सांगड घालून 'महाभारत:' हे संस्कृत महाकाव्य रचणारे कविराज! मानवी जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रश्नांचा विचार करून मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे महाभारत! महाभारतात जे असेल ते अन्य ग्रंथात असू शकेल पण जे महाभारतात नाही ते-'न तत्र अन्यत्र!' ते कुठेहि असणार नाही, अशी व्यासांच्या या महाकाव्याची ख्याती आहे. महर्षी व्यासांनी एवढे काम करून ठेवले आहे की त्यानंतर वेगळे काहीच उरले नाही, हे सांगणारी 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' ही उक्ती प्रसिद्ध आहे. ज्ञानमय ज्योत मानव कल्याणासाठी प्रज्वलित करणाऱ्या या गुरूंची कृतज्ञता आपण मनात नित्य ठेवावी, म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. खरे दान म्हणजे मालमत्तेचे दान नव्हे; खरे दान असते सत्वगुणांचे, ज्ञानाचे. जो कोणी हे दान निस्वार्थपणे करू शकतो तो गुरू! गुरू या शब्दातील ‘गु’कार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि ‘रु’कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज; म्हणून अज्ञानरूपी अंधकार घालविणारा तो गुरू होय.

वाढ आणि विकास ही जीवनाची लक्षणे आहेत. वाढ म्हणजे शरीराचे काळानुसार वाढत जाणारे आकारमान. आणि विकास म्हणजे संस्कारांनी घडवून आणलेली मनाची वृद्धी! ही वृद्धी समृद्ध करतात ते गुरू! समाजाच्या आवश्यकतेप्रमाणे योग्य नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षणपद्धतीच्या खांद्यावर असते. प्राचीन भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये याचे आदर्श अनुसरण होत असे. गुरुकुल पद्धतीचा अवलंब केला जात असे तेव्हा. गुरूंच्या घरी जाऊन घेतलेले शिक्षण म्हणजे गुरुकुल पद्धत इतकाच अर्थ आज आपल्याला महिती असतो. पण ज्या पध्दतीत श्रीराम-कृष्णसारखे युगपरिवर्तक घडले ती होती तरी कशी? गुरुकुलातील दिनचर्येची शिस्त कडक असे. पहाटे पाच वाजता प्रार्थना, मग गंगास्नान, सूर्योदयाला संध्यावंदन, गायत्रीमंत्राचा जप आणि त्यानंतर सूर्यनमस्कार अथवा योगासने करायची. नंतर सकाळी साडेअकरापर्यंत पाठ व्हायचा. मग माधुकरी मागायची. ब्रह्मचर्यव्रताचा एक भाग म्हणून माधुकरी अपरिहार्य असे. नंतर तासभर विश्रांती घेऊन सूर्यास्तापर्यंत पाठ चालत. नवीन पाठ सुरू झाला की, त्या नव्या पाठाचा मागच्या पाठाशी संबंध असे. पूर्वावलोकन व्हायचे. पाठ सुरू करण्यापूर्वी आचार्य काही वेळ आदल्या दिवशीचा पाठ कितपत समजला, त्याची चाचणी घेत. नंतर नवा पाठ सुरू व्हायचा. विद्यार्थ्यांची तयारी होते कि नाही हे रोजच समजायचे. म्हणजे रोजच परीक्षा व्हायची. त्यामुळे परीक्षा कधी आहे, परीक्षेची तयारी कशी करायची, असे प्रश्नच नसत. सुर्यास्ताला अध्ययन थांबवायचे. मग सायंसंध्या, नंतर स्तोत्रपाठ अल्पसा फराळ घ्यायचा आणि लवकर झोपायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे दिवस सुरू!! एक दोन नाही तर तब्बल बारा वर्षे ही दिनचर्या असायची. त्यामुळे शिस्तबद्ध जीवन जगण्याची सवय अंगवळणी पडायची. तेव्हा शिक्षणसंस्था कधीच शासनाच्या साहाय्यावर अवलंबून नव्हत्या. लोकच त्यांना धन देत आणि स्वतःला कृतार्थ मानीत. शासन कधीच शिक्षणव्यवस्था वा संस्थात ढवळाढवळ करीत नसे. प्राचीन राजनीती व शासनप्रणालीचा हा दंडक होता. शिक्षण पूर्ण स्वतंत्र असे. जीवननिर्मिती, मानवनिर्मिती, शील आणि चारित्र्य यांची निर्मिती अन् विचारांची एकरूपता या पाच गोष्टींचे शिक्षण देऊन आदर्श व्यक्ती घडवणारी पद्धत होती ती!

काळ बदलला तशी ही शिक्षणपद्धतही बदलत गेली. गुरुकुल पद्धत हळूहळू लोप पावली. केवळ काही तास शाळेत जाऊन अध्ययन-अध्यापन सुरू झाले. विद्यार्थी ज्ञानार्थी न राहता परीक्षार्थी होऊ लागला. गुरू म्हणजे कोण, त्याचे जीवनातील महत्व काय, याचा त्याला जणू विसर पडू लागला. केवळ नोकरी मिळवण्यापूरते शिक्षण घ्यायचे, आणि परिक्षेपुरती घोकंपट्टी करायची ही मानसिकता प्रबळ होऊ लागली. ज्ञानार्जनाला असणारा अध्यात्माचा, साधनेचा ओलावा कमी होऊ लागला. त्यामुळे अभ्यासाचा कंटाळा येणे, कधी एकदा हे संपेल अशी भावना मुलांच्या मनात निर्माण होऊ लागली. 'शिक्षक आपल्याला जीवनातील अनेक मूल्ये शिकवतात आणि ती कृतीत यावीत, यासाठी आवश्यक त्या वेळी शिक्षासुद्धा करतात. त्यामागे आपण आदर्श जीवन जगावे, असा त्यांचा शुद्ध हेतू असतो.' ही आणि अशी वाक्ये फक्त पुस्तकांची पाने भरायला आणि वर्गातल्या फळ्यावर सुविचार म्हणून लिहिण्यापूरतीच शिल्लक राहिली. आता शिक्षकांनी शिक्षा केली तर दखलपात्र गुन्हा ठरवला जातो. वयाची पन्नाशीच्या ओलांडलेल्या पिढीला आजही त्यांच्या पहिलीच्या पुस्तकातील कविता खडानखडा पाठ आहेत अगदी चालीसकट! आणि आजचाच विरोधाभास म्हणजे मागच्या वर्षी काय शिकलो हे मुलांना आठवत नाही. कारण काय? केवळ घोकंपट्टी! परीक्षेत जे विचारतात तेवढे करायचे, बाकी गेले उडत! पूर्वी शिक्षण संपल्यानंतर शिक्षणसंस्था पदवीदान समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक योग्यतेप्रमाणे त्यांचा वर्णव्यवसाय निश्चित करत असत. त्यामुळे त्याने केलेल्या आजच्या भाषेतील 'करिअर'ला खऱ्या अर्थी 'स्कोप' म्हणजे बरकत असे. पण आता? दहावी-बारावी नंतर या करिअरचा निर्णय कुठे पगार जास्त मिळेल हा विचार करून मग घेतला जातो. "अमुक अमुक क्षेत्र निवडले तर मला शिक्षण पूर्ण होताच किती पगाराची नोकरी मिळेल?" असाच प्रश्न हल्लीचे मुले विचारतात. पण त्यात ज्ञानार्जनच झाले नाही तर कशी मिळणार नोकरी? आणि कुठून होणार प्रगती? पण पैसा म्हणजे सर्वस्व मानणाऱ्या आजच्या चंगळवादी मनोवृत्तीला हे समजवावे कोणी? शिक्षकांची ढासळत असलेली नीतिमत्ता याला किती कारणीभूत ठरतेय हा आणखी वेगळा चर्चेचा विषय आहे. शेवटी काय "कालाय तस्मै नमः।"

सध्याच्या मुलांना पंचतंत्र, इसापनीती, रामायण, महाभारत, शिवराय आणि क्रांतीवीर यांच्या कथा माहिती नसतात. कारण स्वतःचे करिअर करण्यात त्यांचे पालक इतके व्यस्त झालेत की आपल्या पाल्याचे प्रथम गुरू म्हणून हे संस्कार त्याच्या मनावर करणे आपले कर्तव्य आहे याचाच त्यांना विसर पडलाय. हॅरी पॉटर वाचून संस्कारीत पिढी निर्माण होणार नाही. 'स्वराज्य मिळाल्यापासून गेल्या साठ वर्षांत आपण सुसंस्कारी पिढीच निर्माण करू शकलो नाही' असा आरोप आज अनेक जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ करतात, तो काही खोटा नाही असे वाटते हे बघून. हल्लीचे शिक्षण म्हणजे डोक्यात कोंबलेली केवळ माहिती. ही डोक्यात शिरलेली माहिती न पचल्यामुळे सर्व जीवनभर गोंधळ उडत रहातो. आज देशातील आतंकवाद, भ्रष्टाचार, महागाई, लोकसंख्या विस्फोट, बेरोजगारी आणि पाणीटंचाई हे प्रश्‍न उद्या अराजकता निर्माण करतील. त्यामुळे शिक्षण कसे हवे, याचा विचार आणि कृती आवश्यक आहे. भारतात जे जे क्रांतीकारक झाले, जे संत झाले, जे देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले आणि त्यासाठी हुतात्मा झाले, जे शास्त्रज्ञ झाले, जे समाजाच्या उन्नतीसाठीच जगले, ज्यांनी समाजाच्या उत्थानासाठी संघटना निर्माण करण्यास जीवन दिले, त्या सर्वांचे पूर्ण चरित्र हे तरुण पिढीला, लहान मुलांना अभ्यासासाठी असलेच पाहिजे. मुलांना सक्तीने लष्करी शिक्षण असावे. क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर आणि स्वा. सावरकर यांच्या सर्व कथा तरुणांसमोर आल्या पाहिजेत. जेणेकरून देशासाठी जगणे आणि मरणे, याची प्रेरणा मिळेल व देश वैभवशाली होईल.

पण आज तर परिस्थिती अशी झालीये की आता तर फळा बघणेसुद्धा सध्या मुलांना दुर्मिळ झाले आहे. इतके दिवस ज्या मुलांना मोबाईलला हात लावला म्हणून बोलणे खावे लागायचे, त्यांच्या शाळा आज मोबाईलवर भरू लागल्या आहेत. पूर्वी गुरुकुलात जाऊन अध्ययन केले जायचे, तसे आता शिष्यकुलात म्हणजे विद्यार्थ्यांच्या घरी मोबाईल मधून जाऊन अध्यापन सुरू झाले आहे. कारण काहीही असो त्यामागे, पण हीच शिक्षणपद्धती रूढ होणार का, त्याचे परिणाम, फायदे-तोटे अशा अनेक विषयांवर चर्चासत्र घडताय. काळ त्याचा निर्णय घेईल, पण तरीसुद्धा या मध्ये जीवन मूल्ये घडवणारे शिक्षण कसे देता येईल हा मोठा अनुत्तरीत प्रश्न तसाच राहतो. एकाकीपणा, नैराश्य या समस्यांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जातेय. मुलांच्या संवादकौशल्य, संघकौशल्य, मित्रत्व भावना यांची प्रगती होणार नाही असेही अंदाज वर्तवले जात आहेत. माहितीचा अथांग सागर तळहातावर असताना त्याला आत्मसात करण्यास कमी पडून कसे चालणार? पण त्या ज्ञानाला आत्मसात करायला मार्गदर्शन करणारे गुरुच जर समोर नसतील तर त्यांचा आदर आणि पूजन हे केवळ 'पुराणातली वनगी' बनून रहातील का? आपल्यापर्यंत तर हे संस्कार आले, पण 'कसा चालवावा हा पुढे वारसा?' प्रश्न तर अनेक आहेत, आणि उत्तरे ? ती तर आपणच विचार करून शोधायची आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेले हे विचारमंथन हीच गुरूंना केलेले वंदन असू शकेल ना?

मैत्रेयी

इतर रसदार पर्याय