अधांतर - ४ अनु... द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अधांतर - ४

जिंदगी के स्कुल की,
बस एक ही शर्त है।
इम्तिहान देकर ही,
सबक पढना होता है।


प्रख्यात कादंबरीकार अर्नेस्ट हमिंगवे म्हणतात, "सम्पूर्ण काळोखातच प्रकाशाला शिरता येतं.." म्हणजे अंधार असल्याशिवाय प्रकाशाला काही महत्त्वच नाही असं माझं स्पष्ट मत आहे. काय म्हणतात अभय सर, 'पोटेन्शीयल'....ते म्हणतात आपलं खर पोटेन्शीयल आपण किती यश मिळवलं त्यात नाही तर आपल्या अपयशांना कश्याप्रकारे पचवलं यात आहे...त्यांच्या याच गोष्टी मला खराब परिस्थिती सोबत दोन हात करायला प्रोत्साहन देतात..खूप वेळा अस होत की पहिल्या प्रयत्नातच यश मिळत आणि खूप वेळा मात्र यशस्वी होण्याच्या रस्त्यात स्वतःला झिजवावं लागतं...आणि पहिल्या परिस्थितीपेक्षा दुसरी परिस्थिती आपल्याला जास्त प्रगल्भ बनवते अस माझं मत आहे...मला अस वाटत जी गोष्ट आपल्याला सहजच अगदी कमी कष्टाने मिळते त्याची किंमत आपल्याला कधीच नसते आणि त्यामुळेच जर आयुष्यात कधी संकटं आली तर मात्र आपण भांबावून जातो, संकटांचा सामना कसा करावा हे कळत नाही आपल्यला... त्याउलट, अपयश आपल्याला खूप काही शिकवून जातं, खर तर ते आपलं 'पोटेन्शीयल' वाढवत...आपण असावध असतांनाच संकटं धडकतात, ते 'वॉर्निंग' देऊन कधीच येत नसतात मग त्यावेळेला आपलं हे जे अपयश पचवण्याच सामर्थ्य आहे तेच कामी येत आपल्या...आणि कदाचित या सामर्थ्यामुळेच मी आयुष्यातल्या मोठ्या मोठ्या संकटांना सामना करण्याची तयारी ठेवली...पण 'तो'
त्याच काय? सगळं काही खुप सहजच मिळालं ना त्याला, ज्या गोष्टी वर बोट ठेवलं ती त्याची झाली, अगदी मी सुद्धा...हो, मी पण एखादी वस्तू असावी असच मिळवलं होत त्याने मला आणि वस्तू म्हणूनच वागणूक दिली...पण ठीक आहे, माझ्यासोबत त्याने जे काही केलं मी त्यातून बाहेर पडली, माझ स्वतःच एक विश्व निर्माण केलं आणि माझ्या प्रत्येक वाईट परिस्थितीत मी खंबीरपणे लढली....आणि त्याने काय केलं? स्वतःच विश्व उध्वस्त केलं, केळव स्वतःच्या अहंकारामुळे...आज माझ्या अस्वस्थ होण्याच्या कारणामागे एक कारण तो ही होता...नागपूरला आल्यावर त्याच्याबद्दल जे काही कळलं होतं त्यामुळे मला सहानुभूती वाटत होती त्याच्याबद्दल...त्याने जे काही केलं होतं माझ्यासोबत खर तर त्यामुळे मी तिरस्कार किंवा व्देषच करायला पाहीजे होता, पण माणुसकी, संवेदनशीलता त्याच्या मरण पावल्या होत्या, माझ्या नाही...

मी आणि अभय सर जरी हसत हसत निघालो होतो घरी यायला तरी त्यांनी माझी चलबिचल ओळखली असावी कदाचित पण गाडीत ते मला काही बोलले नाही...तस तर आम्हाला
LBSNAA मध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट ट्रेनिंग दिल जात, प्रतिकूल परिस्थितीत ही स्वतःच मन कस नियंत्रित करायचं हे सांगितलं जातं, पण आज तर दडपण आल्यासारखं वाटत होतं मनावर, घर आल्यावर मी गाडीतून उतरली आणि अभय सर पण माझ्या मागे मागे आले,

" अरे, आली ना आता मी घरी सुखरूप, तुम्ही निघा ना, काम होत ना तुम्हाला?"

"हो, अन ते होतंच राहील, पण तू ला घाई करत आहे मला कटवण्याची,? की तुला ही भीती आहे जर मी पुन्हा तुझ्या मनातलं ओळखलं तर तुझी ही 'मला फरक पडत नाही' इमेज माझ्या समोर तग धरू शकणार नाही ते....नैना, लोकांसाठी तू स्वतःला कितीही दगड बनवण्याचा प्रयत्न केला तरी मी ओळखतो तुला, मला माहित आहे तू नक्कीच विक्रमचा विचार करत असशील.. हो ना?"

अभय सरांनी मला हे विचारलं त्याच काही आश्चर्य नाही झाल मला, आणि मला माहित होत कधी न कधी ते हे विचारतीलच पण आज मला त्या विषयावर काहीच बोलायची इच्छा नव्हती त्यामुळे मला अस वाटत होतं की त्यांनी मला काही विचारू नये,

"मला माहित आहे तुला आता काहीच बोलायचं नाही त्याच्याबद्दल, आणि मलाही नाही आवडत त्या व्यक्तीचा विषय काढायला पण एक सांगतो, त्याला एकदा भेटून घे..."

"तुम्हाला खरच वाटतं त्यांने जे काही केलं ते सगळं विसरून जाऊ मी ? माफ करू त्याला?"

"नाही...जे झाल ते अजिबात ही विसरू नको, कारण त्या वाईट गोष्टी तुझं इंधन म्हणून काम करतात तुझ्यासाठी, त्या गोष्टी तुला ऊर्जा देतात पुढे येणाऱ्या अडचणींना मात देण्यासाठी, त्यामुळे त्या गोष्टी विसरु नको, पण त्याला मात्र माफ कर..."

"सगळं माहीत असूनही किती सहजपणे सांगता की माफ करून दे. अस कस बोलू शकता तूम्ही.."

"मग माफ न केल्याने तू निघालीस का त्याच्या विचारांतून बाहेर? नाही ना...कारण त्याच्यावरचा तुझा राग...नव्हे, द्वेष तुला शांत बंसु देत नाही..आणि जेंव्हा तू त्याला माफ करशील ना तुझ मन शांत होईल, तसही त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळतच आहे, मग तू अजूनही जळत आहेस त्या अग्नीत... मला अस वाटत तू परत जायच्या आधी त्याला एकदा भेटावं...बाकी तुझी इच्छा...येतो मी"

अभय सर निघून गेले पण मला मात्र कोड्यात टाकून गेले...एखादा व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागला ते विसरायचं ही नाही आणि त्या व्यक्ती बद्दल मनात रागही ठेवायचा नाही..कस शक्य आहे हे?? कधी कधी ना खूप जड बोलुन जातात अभय सर, पण त्यातच सगळं काही दडलेलं असत...रागापेक्षाही प्रखर काय असेल तर ते असतं द्वेष आणि तिरस्कार...या अश्या भावना आहेत ज्या, आपण ज्याच्यावर करतो त्यापेक्षाही जो करतो त्याला जास्त झळ देऊन जातात....त्यामुळे नक्कीच विक्रमपेक्षा मला जास्त चिडचिड होत होती..आणि मी त्याला भेटणार नाही या निर्णयावर ठाम होती...
-----------------------------------------------------------------
आमच्या घरात मी आई बाबा आणि भाऊ एवढेच लोकं..पण माझ्यामुळे कोणाचे टोमणे ऐकायला नको त्यामुळे भाऊ जबलपूर ला त्याच्या नोकरीच्या ठिकाणी राहायला गेला.. मूळ शहर सुटत नसल्यामुळे खूप आग्रह करूनही माझे आई बाबा त्याच्या सोबत गेले नाही राहायला...मी ही खुप प्रयत्न केले होते त्यांनी माझ्या सोबत राहण्यासाठी पण मुलीकडे राहणं त्यांना मंजूर नव्हतं...मुलगी ना मी...मी कितीही केलं तरी मुखाग्नी देऊन मोक्षप्राप्ती साठी मुलगाच लागतो ना...खर मोक्ष काय आहे हे अजून कळलंच नाही कोणाला...

आईला उतारवयात जास्त काम होतं नव्हती त्यामुळे मी विचार केला जायच्या आधी एकदा घरातली सफाई करून जाते, तेवढंच थोडे दिवस बर वाटेल आई बाबांना... त्यामुळे मी सगळी सफाई करायला घेतली..सगळ काही झाल्यावर जेंव्हा मी कचरा फेकला तर त्यातून एक कागद बाहेर पडला, कागद नाही एक जुना फोटो होता माझ्या न विसरता येणाऱ्या आठवणीपैकी....ते पाहिल्यावर मात्र माझ्या काळजात धस्स झालं....मी तो उचलला आणि नीट न बघताच आईला न दाखवता हळूच माझ्या बॅगेत ठेऊन दिला...दिवसभर घरातली कामं आटोपली आईसोबत, पण मनात मात्र काहूर माजल होतं, लक्ष कुठे लागत नव्हतं पण आईसमोर मला हे सगळं दाखवायचं नव्हतं त्यामुळे मी स्वतःला खूप नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत होती...रात्री सगळी काम झाल्यानंतर आईबाबा झोपले आणि मी खूप हिम्मत करून तो फोटो बॅगेतून काढला....मी नववीत असतानाचा तो फोटो होता आमचा...हो, आमचा पहिला फोटो सोबतचा आणि आमची पहिली भेट होती ती...खूप दिवसांनी पुन्हा त्याच आठवणींसोबत माझी अनावधानाने भेट झाली होती, आणि पुन्हा ही आठवण मला भूतकाळात घेऊन गेली, जिथून माझ्या आयुष्याने कलाटणी घ्यायला सुरुवात केली होती....

उन्हाळ्याच्या सुट्टीत मी अमरावतीला मावशीकडे गेली होती तेंव्हाची ती आठवण....माझ्या मावस भावाच्या वाढदिवसाचा तो फोटो, त्या फोटोत मी, माझा मावस भाऊ आणि त्याचा मित्र ...'विक्रम'....त्या दिवशी पहिल्यांदा विक्रमने मला पाहिलं आणि त्यांनंतर सुरू झालं सत्र आमच्या भेटींच...कधी या भेटी योगायोगाने व्हायच्या तर कधी ठरवून....माझ्यासाठी विक्रम फक्त माझ्या भावाचा मित्र होता आणि कधी कधी त्याच बोलणं, वागणं मला प्रभावित करून जायचं...खर तर ते वय अस असत की आपण फक्त एखाद्या व्यक्तीच बाह्यरुप बघू शकतो, आणि त्यामुळेच आकर्षक वाढत जात...आपण कोणाच्या अंतर्मनात जाऊ एवढं प्रगल्भ नसतो.....

विक्रम त्यावेळी बारावीला होता, माझं अधे मध्ये जाणं व्हायचं मावशीकडे तेंव्हा भेट घडायची त्याच्यासोबत माझ्या मावसभावाच्या माध्यमातून... खर तर तो अभ्यासात खूप हुशार होता आणि मी ही बऱ्यापैकी होती त्यामुळे तो घरी आला की व्हायच्या गप्पा आमच्या...त्याची हुशारी बघून मला तो नक्कीच आवडायचा, पण ती फक्त आवड होती माझी..त्यापेक्षा जास्त भावना त्याच्याबद्दल कधीच माझ्या मनात आल्या नाहीत..किंवा मी त्या येऊ दिल्या नाहीत...मला अभ्यासात काही अडचणी आल्या तर सोडवायचा तो...२००२ चा तो काळ...तेंव्हा मोबाईल ही अतिशय दुर्मीळ गोष्ट होती..त्यामुळे जेंव्हा कधी मी अमरावतीला जायची तेंव्हा आमची भेट व्हायची, खूप वेळा त्याने मला लँडलाईन चा नंबर ही दिला पण मला भीती वाटायची फोन करायला..

मला सुरुवातीपासूनच अभ्यासाची फार आवड...सतत काहीतरी नवीन शिकण्याची माझी धडपड असायची... त्यामुळे जर माझ्यापेक्षा हुशार कोणी मला भेटल तर मला त्याच्यासोबत चर्चा करायला, त्याच्याकडून काही शिकून घ्यायला नेहमीच आवडतं...
जेंव्हा कधी विक्रमसोबत भेट व्हायची, त्याची हुशारी मला आधीपेक्षा जास्त आकर्षीत करून जायची, आम्ही खूप चांगले मित्र झालो होतो...कधी कधी त्याच्या बोलण्यातून अभिमान झळकायचा, पण मला वाटायचं की जर तो हुशार आहे तर त्यात चुकीचं तरी काय आहे...आमची मैत्री जरी बहरत असली तरी कालांतराने माझ्यावरच विक्रमच आकर्षण ही कमी होत गेलं...पण हे आकर्षण फक्त माझ्या बाजूने कमी झालं होतं...विक्रमच्या मनात काय होत मला याचा थांगपत्ता नव्हता...

माझ्या मावस भावाने बारावी नंतर पदवीसाठी नागपूरला प्रवेश घेतला, तो आमच्याकडेच राहणार होता...मला हे ऐकून नक्कीच आनंद झाला...आणि यासाठी ही आनंद झाला की विक्रमही त्याच्यासोबत नागपूरला येणार होता...विक्रमच्या येण्याची खुशी मला नक्कीच होती, आणि त्यामागचं कारण ही खूप स्पेशल होत...
विक्रमने त्या वेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला होता आणि मला त्यासाठी खूप अभिमान वाटायचा त्याचा...जेंव्हा कधी आमची भेट व्हायची तो मला एक एक विषय खूप समजवून संगायचा...पण जेव्हा कधी मी काही सांगायची किंवा आपलं मत प्रकट करायची तेंव्हा मात्र तो खिल्ली उडवायचा... त्याच्यामते अस होत की मला पुढे जाऊन घरच सांभाळायचं आहे तर पदवी मिळवण्यासाठी केलेला अभ्यास खूप झाला माझ्यासाठी... मी ही ती गोष्ट हसण्यावरती न्यायची...

माझं बारावी सुरू झालं आणि विक्रमचीही पदवी पूर्ण व्हायला आली... आता त्याचा अभ्यास, माझा अभ्यास यातुन वेळ काढणं जमत नव्हतं त्यामुळे भेटनही खूप कमी व्हायला लागलं...पण तरीही जेंव्हा भेटायचो मला त्याच ऐकून घ्यायला आवडायचं, एक मित्र म्हणून मी नेहमीच त्याचा आदर केला..पण मला हे जाणवायला लागलं की प्रत्येक वेळी विक्रम त्याच बोलणंच किती खर आहे हे पटवून द्यायचा आणि मी किती चुकीची आहे हेच सांगायचा..मलाही वाटायचं की कदाचित हाच बरोबर आहे आणि मीच अज्ञान आहे...माझ्या मनात ही गोष्ट घर करायला लागली होती की काही झालं तरी मी विक्रमपेक्षा कमीच असणार आहे...इथूनच सुरुवात झाली होती माझ्या आयुष्यातल्या पहिल्या पर्वाची आणि माझ 'पोटेन्शीयल' मी स्वतः न ओळखण्याची पहिली चुकीची गोष्ट हीच घडली होती..

-----------------------------------------------------------
क्रमशः