प्रेम ! जगातल्या सगळ्या प्रकारच्या भावनांचा कल्लोळ एकीकडे आणि प्रेम ही भावना एकीकडे...अस म्हणायला हरकत नाही की
या दुनियेत प्रत्येक भावनेचा उगम प्रेमातून झाला आहे...आणि माझं स्पष्ट मत आहे की बहुतांश वेळा प्रेम हे समोरचा व्यक्ती कसा दिसतो यातून निर्माण होतं...पण ते प्रेम नसतंच मुळी... ते आकर्षण असत ज्याला आपण प्रेम समजतो...आणि खूप वेळा या आकर्षणाला बळी पडतो...कोणचा स्वभाव समजून घेणं, त्याचे विचार समजून घेणं ही नंतरची गोष्ट पण सुरुवात तर दिसण्यावरूनच होते ना...आणि इथेच घात होतो...प्रेमाची परिभाषा समजून घेण्यासाठी खूप परिपक्व व्हावं लागतं, आणि यासाठी महत्त्वाचा असतो सहवास, जेंव्हा एकमेकांच्या सहवासात दोन व्यक्ती असतात तेंव्हा कळतात ते स्वभाव गुण...आणि तेंव्हाही जर ते आकर्षण अबाधित असेल तर समजावं की हे प्रेमच आहे...एकदा प्रेम काय आहे हे कळाल तर आपण कधीच "आम्ही प्रेमात फसलो" हे बोलत नाही...परंतु प्रेम काय आहे हे जाणून घेण्यासाठी पण एक निर्मळ मन लागतं, जे मानपान, अहंकार, मी पणा या सगळ्यांपासून दूर असतं...
पण मी तर फसली होती...आकर्षण काय आणि प्रेम काय हे मला आजही कळलं नाही...पण जेव्हा कधी विक्रमचा विचार करते तेंव्हा अस वाटत की त्याच्यासाठी प्रेम म्हणजे एखाद्या गोष्टीची किंमत लावणे, ज्याला तो किंमत मोजून मिळवून तर घेतो मात्र त्या प्रेमाच मूल्य त्याला करता येत नाही...आणि जेंव्हा अभय सरांचा विचार करते तेंव्हा अस वाटत की प्रेम म्हणजे अमूल्य आहे ज्याची किंमत कधीच लावू शकत नाही, त्यामुळे ते त्या प्रेमाची किंमत समजून घेण्यापेक्षा मूल्य समजतात...
विक्रम साठी मी एखादी वस्तू होती त्यामुळे त्याने प्रत्येक वेळेस माझी किंमत लावुन मला खरेदी केल आणि अभय सरांनी माझं मूल्य मलाच समजावून दिलं... माझे विचार, माझं असणं हे त्यांच्यासाठी किती अमुल्य आहे हे त्यांनी मला प्रत्येक वेळी जाणवून दिलं...
ऑस्कर वाइल्ड म्हणतात," जे तुम्हाला अतिसामान्य समजतात किंवा तशी वागणुक देतात त्यांच्यावर कधीच प्रेम करू नका"...आणि मी हेच तर केलं....विक्रमला मी खूप खास समजली होती, त्याच्या अभ्यासाच, त्याच्या हुशारीच मला नेहमीच कौतुक वाटायचं, तो बोलेल ती पूर्व दिशा मी समजायची पण त्याने मला मात्र त्याच्या विचारांच्या वर्चस्वाखाली दाबून ठेवलं...आणि मी मूर्ख... मलाही हेच वाटायचं की मला काही कळत नाही आणि मी सहजच त्याच्यासमोर शरण पत्करायची..माझीही मतं बरोबर असु शकतात याचा विचार केलाच नाही कधी..आणि जेव्हा विचार केला आणि मतं मांडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा मला सगळे 'विद्रोही' समजले...
"हो हो...जा, मी पण बघतो कोण विचारत तुला, पुरुषाशिवाय स्त्रीची काही किंमत नसते एवढं लक्षात ठेव, भटकून जेंव्हा थकून जाशील ना तेंव्हा तर परत इथेच यावं लागेल तुला माझे पाय पकडायला..."
आणि दरवाजा बंद झाला...माझ्या समोर होता नुसता काळोख...मी कुठे जाऊ, काय करू काही कळत नव्हतं, पण पुन्हा त्या दरवाज्यावर थाप देणाऱ्यातली मी नव्हती, पण अचानक माझा श्वास गुदमरायला लागला, मी धडपडत होती, कुठून तरी थोडी हवा मिळते का, कुठेतरी उजेड आहे का हे शोधण्यासाठी, पण काहीच मिळत नव्हतं... अस वाटत होतं कोणीतरी माझा गळा घट्ट आवळला आहे... आता माझी हिम्मत तुटत जात होती आणि तेवढ्यात मला आवाज आला,
"नैना...तू करू शकते, बस थोडीशी हिम्मत दाखव.."
आणि मी माझ्या तोंडावरची उशी बाजूला फेकली..मी पूर्ण घामाघूम झाली होती...मी पुन्हा पुन्हा स्वतःला पाहुन ही खात्री करून घेत होती की मी ठीक आहे ना, आणि जेंव्हा उशी सोबत फेकल्या गेलेला माझा आणि विक्रमचा फोटो बघितला तेंव्हा कळाल की हे एक स्वप्न आहे...सकाळ झाली होती, मी रात्री माझा भूतकाळ आठवत बसली आणि त्यामुळेच आज मी पुन्हा त्या काळोखात गेली होती..त्या एका फोटोमुळे माझ्या कितीतरी जुन्या आणि पिडादायी आठवणी आज जागृत झाल्या होत्या...
उठल्यावर स्वतःला कसतरी सावरलं आणि बाहेर जाऊन बघितलं तर आई बाबा आधीच उठून तयार होऊन बसले होते, इतक्या सकाळी सकाळी ते कुठे जात असतील याच मला आश्चर्य झालं,
"अरे, इतक्या सकाळी तुम्ही कुठे निघाले, एवढं तयार होऊन", मी काळजीने विचारलं आईला,
"अमरावतीला निघालो आहे...येऊ रात्री पर्यंत परत..."
"अमरावती?? का, काय काम आहे..."
आणि अचानक मला काहीतरी आठवलं,
"म्हणजे तुम्ही अजूनही जातच आहे तिथे, काय गरज आहे, मला तर आताही नवल वाटत की तुम्हाला तुमचा समाज जास्त प्रिय आहे की तुमची मुलगी...पण असो, यात काही बोलुन फायदा नाही आता, मुलगी प्रिय असती तर काही वर्षांआधी मला घरात घेतलं असतं... अस वाऱ्यावर सोडलं नसतं..."
"आम्हाला कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली तू, आणि तु तर मोकळी झालीस सगळं मोडून, तुझ्या मागे तुझा भाऊ पण आहे याचा विचार केला का कधी?" बाबा बोलले,
"मी नाही विसरली माझ्या भावाला बाबा, पण त्याच्यासाठी मी काय सहन केलंय हे तुम्ही नका विसरू"
"आपल्याला उशीर होतोय, उद्या बोलू ना हे सगळं..."
आईने पुन्हा एकदा मध्यस्थी करून माझा आणि बाबांचा वाद विकोपाला जाण्यापूर्वीच सोडवला होता...खरं तर असं उलट उत्तर करणं माझा स्वभाव नव्हता, आणि त्यामुळेच कदाचित बाबांना ते रुचत नव्हतं...पण मी काय होती आणि काय नाही त्या आता जुन्या गोष्टी होत्या ....तेंव्हाच्या आणि आताच्या नैना मध्ये खुप फरक होता..आणि सगळ्यांत महत्त्वाच म्हणजे आताची नैना चुकीच्या गोष्टीला नाही बोलायला शिकली होती..
एक स्त्री म्हणून मला ही गोष्ट खुप प्रकर्षाने जाणवते की आपण कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही आणि त्यामुळेच कदाचित नेहमी गृहीत धरल्या जातो...जी गोष्ट आपल्या आवाक्यात नाही किंवा ज्या गोष्टी मुळे आपल्याला शारीरिक किंवा मानसिक त्रास होतो त्या गोष्टीला मनाई करण्याचा अधिकार पुर्णतः आहे आपल्याला...याचा अर्थ बहुतेक वेळा 'स्वार्थी' म्हणून घेतला जातो, पण जेव्हा दुसऱ्यांना दुखवून आपण आपली सोय किंवा समाधान पाहतो तेंव्हा आपण स्वार्थी होतो अस मला वाटतं...
आज जरी मी हे सगळं इतक्या ठामपणे बोलत असली तरी एक वेळ अशी होती की निमूटपणे सगळं सहन करायची...मला त्रास होतो का किंवा मला ती गोष्ट आवडेल की नाही याचा विचार दुसऱ्यांनी सोडा मी सुध्दा केला नाही, पण मग एक आघात झाला माझ्या अभिमानावर आणि मी अशी बदलत गेली... कधी कधी मला स्वाभिमानापेक्षा अभिमान जास्त महत्त्वाचा वाटतो...'सेल्फ रीस्पेक्ट' या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात...प्रत्येक व्यक्ती मध्ये, मी कोणत्यातरी गोष्टीत खूप चांगला आहे याबद्दल अभिमान असतो आणि जेंव्हा तो दुखावल्या जातो तेंव्हाच आपण पेटून उठतो आपण खरच किती किती चांगले आहोत हे प्रमाणित करण्यासाठी..आणि या गोष्टीला जोड लागते ती 'निड ऑफ सर्व्हाइव्हल' ची....आपलं जगणं किती महत्त्वाच आहे हे जेंव्हा कळत तेंव्हा आपली ताकत अजून बळकट होते...
बाबांचं बोलणं मला जिव्हारी लागलं होतं आणि आता मला वाटत होतं की विक्रमला भेटावं, पण माझं त्याला भेटणं कितपत योग्य असेल याबद्दल मी साशंक होती...पण यावेळेस मी विचार केला की जर आलीच आहे तर अधुरी राहिलेली कहाणी आता पूर्ण करूनच जाते, माझ्या घरच्यांना माझ्यासारख अधांतरीच जीवन नको आता यासाठी मला एकदा विक्रमला भेटावच लागेल हे मला माहित होतं आणि त्याच्यापर्यंत मला फक्त अभय सर पोचवणार होते, मी लगेच त्यांना फोन केला,
" मला विक्रमला भेटायचं आहे..."
".........."
"हॅलो,...ऐकताय काय??"
"हो..."
"मी काहीतरी बोलली तुम्हाला?"
"ऐकलं मी काय बोलली ते, पण..."
"पण काय?? घाबरू नका, ही नैना तुम्ही घडवली आहे, त्यामुळे इतक्या सहजासहजी पिघळनाऱ्यातली नाही आहे..."
"तयार रहा, एका तासात पोचतो..."
-------------------------------------------------------------
आज इतक्या वर्षांनी विक्रमला भेटत आहे, भरपूर काही ऐकून होती एवढ्या वर्षांत त्याच्याबद्दल..माहीत नाही तो काय प्रतिक्रिया देईल किंवा मी त्याचा सामना करताना कमजोर पडायला नको...थोडी धाकधुक होतीच मनात....स्वतःला आरश्यात बघितल्यावर लक्षात आलं की मी विचारा विचारांत निळ्या रंगाचा ड्रेस घेतला आहे... विक्रमला (आणि कधी काळी मलाही) निळा रंग खूप आवडायचा...निळा रंग समुद्राचा आणि आकाशाचा...समुद्रासारखा अथांग, खोल आणि आकाशासारखा शांत, निश्चल, स्थिर...प्रामाणिकपणा, विवेक, सत्य आणि विश्वासाच प्रतीक....पण यापैकी त्याने मला काहीच दिलं नाही..काय म्हणायचा तो,
"नैना, निळ्या रंगात तुझं सौंदर्य खुलून दिसतं, आणि तुला पाहून माझं बैचेन मन शांत होतं...आणि अशीच शांती आपल्या आयुष्यात असेल..."
आणि त्याच्या ह्याच आठवणी मला पुन्हा माझ्या भूतकाळात घेऊन गेल्या, आणि मला आठवली आमची ती भेट जेंव्हा विक्रम माझ्या मनाच्या तारा छेडून गेला होता....
माझी बारावी होऊन मी डिग्री च्या पहिल्या वर्षाला नुकतीच ऍडमिशन घेतली होती...तस ते वय काही जास्त समजदारीच नव्हतंच, पण तरीही एक गोष्ट मला जाणवायची की जेंव्हा कधी विक्रम घरी यायचा त्याची नजर फक्त मला शोधायची, जेंव्हा कधी आमची भेट व्हायची त्याचे डोळे माझ्यावरून हटायचे नाहीत.. मलाही कुठेतरी ते चांगलं वाटायचं पण एक मुलगी म्हणुन भीती ही होतीच...आणि मला ते चांगल जरी वाटत होत तरी मी स्वतःला विक्रम पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती, कारण मला आधी शिक्षण पूर्ण करून काहीतरी बनायचं होतं.. पण माझ्या नियतीला कदाचीत वेगळंच मंजूर होत...
विक्रम तसा आधीपासूनच हुशार आणि त्यात त्याला हवं ते घरून लगेच मिळून जायचं...आणि या सगळ्यांची साथ होती त्याला त्यामुळे त्याने पहिल्याच प्रयत्नात DySP ची पोस्ट काढली...फार खुश होता तो तेंव्हा, पेढे द्यायला घरी आला, माझ्या घरच्यांनाही खूप आनंद झाला, मला त्यादिवशी खूप अभिमान वाटला त्याचा... माझ्या भावाचा मित्र म्हणून तो घरी सगळ्यांना परिचित होता आणि आता तर घरच्यांचा त्याच्याबद्दल विश्वास अजून दृढ झाला होता....माझ्यासाठी घरचं वातावरण तस खूप शिस्तीचं होत, कधी कॉलेज ला एकटीला पाठवलं नाही, भाऊ किंवा बाबा सोडायला आणि घ्यायला यायचे....आता मात्र कधीतरी विक्रमही यायचा, घरच्याना त्याच्यावर खूप विश्वास होता त्यामुळे त्यांनी कधी आपत्ती दाखवली नाही...हळू हळू विक्रम माझ्या मनात घर करायला लागला, त्याच दिसणं, त्याची हुशारी मला पुन्हा त्याच्या कडे आकर्षित करत होत...
माझ्या भावाच्या वाढदिवसाला त्याला एकदा घरी जेवायला बोलावलं, जेवण वैगरे झाल्यावर आई किचन मध्ये होती, बाबा बाहेर फिरायला गेले आणि भाऊ फोन वर मित्रांशी गप्पा मारत होता, मी जेवणाची ताट उचलत असताना अचानक विक्रम माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला, तो अचानक समोर आल्यामुळे मला काही सुचनासच झालं, माझी धडधड वाढत होती, तो हळूच माझ्या जवळ येत बोलला,
"निळ्या रंगात तू खूप सुंदर दिसतेस..."
हे ऐकून आता मात्र मला अजून थरथर होत होती, चांगलं ही वाटत होतं, भीती ही होती, आणि शरमेने माझी मान खाली झुकली होती, आणि तेवढ्यात त्याने माझा हात पकडला, आणि बोलला,
"अजून काहीतरी सांगायचंय तुला, "
त्याच्या ह्या कृतीवर मात्र माझ्या तोंडातून आवाज निघत नव्हता, मी फक्त 'हम्म' एवढंच बोलू शकली,
"उद्या कॉलेज झाल्यावर भेट मला तेंव्हा सांगेन.."
आणि अस बोलून त्याने माझा हात घट्ट दाबला आणि घाबरल्यामुळे माझ्या हातातून ताटं खाली पडली...
आणि मला जाणवलं कोणीतरी दरवाजा खूप वेळेपासून वाजवत आहे आणि मी भानावर आली, दरवाज्याच्या आवाजाने मला पुन्हा भूतकाळातून वर्तमानात आणलं होतं...मी जाऊन दरवाजा उघडला तर अभय सर होते,
"झोपली होती का, किती फोन केले, गाडीचे हॉर्न वाजवले, कितीवेळेपासून दरवाजा वाजवत आहे, कुठे होती, अजून थोडा वेळ उघडला नसता तर दरवाजा तोडण्याच्या विचारात होतो मी..."
"हम्म, चला मी तयार आहे..."
"काय झालं? अशी का वाटत आहेस...एकदम विचलित.."
"ना..नाही, काही नाही.."
"पुन्हा ते सगळं आठवत बसली होतीस?"
"नाही...चला उशीर होतोय.."
"मला उत्तर द्यायचं जरी टाळलं तरी स्वतःच्या मनाला तरी उत्तर द्यावच लागेल ना नैना..."
अभय सरांच्या या प्रश्नाला काय उत्तर देऊ कळत नव्हतं...आठवलं तर होत सगळंच.. किंवा अस म्हणावं की मी ते सगळं कधी विसरलीच नव्हती...आपल्या हृदयाला चार चेंबर असतात म्हणे रक्तपुरवठा करण्यासाठी, मी अस म्हणेल की स्त्रियांना एक अधिकचा चेंबर दिला असतो देवाने आणि तो असतो आठवणींचा, न पूर्ण झालेल्या अपेक्षांचा आणि असंख्य साठवून ठेवलेल्या वेदनांचा...आज कितीतरी दिवसांनी माझ्या हृदयाचा तो चेंबर खुला झाला होता.. आणि त्यातून आता खूप काही बाहेर पडणार होत.....
-------------------------------------------------------------
क्रमशः