....नियती...
आज तिला जाऊन बारा वर्षे झालीत.असं वाटते ती अगदी आमच्यातच आसपास आहे. तिचा उल्लेख केल्याशिवाय आम्हा दोघीही मैत्रीणींचं बोलणंच सुरू होत नाही. तशीच होती ती कायम कुणाच्याही स्मरणात राहील अशी..
वीणा तिचं नाव दिसायला सामान्य नाकी-डोळी ठीकठाक, सावळी नटणं,थटणं आवडायचं तिला..नावाप्रमाणेच कुठल्याही परिस्थितीत आनंदीत असणारी..अत्यंत गरीब मुलगी तिला लहान तीन बहिणी, बाप दारूड्या त्यामुळे आई चारही मुलींना घेऊन घर सोडून तिच्या आजीच्या घरी आश्रयास आली.मामाची नोकरी बाहेर गावी असल्यामुळे तो तिथेच पत्नीला घेऊन राहायचा.
आम्ही सातवीला होतो तेव्हा तिने आमच्या वर्गात प्रवेश घेतला.एकतर नवीन आणि बोलायला अगदीच फटकळ त्यामुळे तिच्या शी आम्ही जरा अंतर ठेवूनच असायचो पण हि जबरदस्ती करायची एकाच बाकावर बसायला हुशार अगदी चुणचुणीत आणि आम्ही काही म्हणू शकत नव्हतो कारण एकाच एरियामध्ये एक दोन रोडच्या अंतरावर राहत होतो. मग रोज शाळेत मिळून
जाणे मिळून घरी येणे हा दिनक्रम सुरू झाला आणि कशी इतकी घट्ट मैत्री झाली कळलेच नाही
ते म्हणतात ना मैत्री आणि प्रेम कधी ठरवून होत नाही ते बंध आपोआप जुळले जातात.
तिची आई मार्केट मध्ये जाऊन फळ विकत असे. हि घरची कामं सांभाळून,आजीच्या हातचा मार आणि बोलणे खाऊन,लहान बहिणींचं करणं त्यांना शाळेसाठी तयार करणं, शाळेत पाठवणं हे सर्व सांभाळून ती स्वतः शाळेत यायची अभ्यास ही करायची. पहिल्या नंबरने पास व्हायची इतक्या लहान वयापासून ती हे अगदी संसारी बाईसारखं करायची परिस्थिती नुसार जितकी फटकळ तितकीच समजदारही.असेच दिवस जात होते आम्ही दहावीला होतो अशातच तिच्या मामाची बदली झाली नि तो मामीला घेऊन आजीच्या घरी
आला. मामी छान होती समजून घ्यायची पण मामा तापट होता. आणि एक दिवस कडक हिवाळ्यात तिच्या मामाने भांडण करून रात्रीच्या वेळी सगळ्यांना घराबाहेर काढलं. कोणीही मदत करायला आले नाही. आणि त्यांनीही कुणाची मदत घेतली नाही.तीन दिवस-रात्र त्यांनी रस्त्यावर काढल्या आम्हा दोघी मैत्रीणीचा जीव तुटायचा पण आम्हीही काही करू शकत नव्हतो जेवण वगैरे ठीक आहे पण त्यापलीकडे काही नाही. शेवटी मामाच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात तिच्या आईने फक्त राहण्याकरिता टिनाचे शेड उभारले आणि तिथे राहू लागले आणि रोजचा दिनक्रम सुरू झाला. आमची दहावीची परीक्षा संपली. काही दिवसांनी निकाल लागला तिला उत्तम गुण मिळाले तेव्हा डि.एड. करायची तिची खूप इच्छा होती पण प्रवेश घेण्याकरिता तीन हजार रूपये देण्या इतपत परिस्थिती नव्हती. त्यामुळे शेवटी तिने अकरावी आर्ट्स ला प्रवेश घेतला आम्ही पण आधीच प्रवेश मिळवला होताच मग परत एकच बाक,कॉलेज मध्ये मिळून येणं जाणं सुरू झाले.एकमेकांच्या घरी जाणं येणं सुरूच होतं. हिंडणं-फिरणं चित्रपट बघायचं. लहान बहिणीही थोड्या समजदार झाल्या होत्या. हिला मात्र परिस्थितीची जाण लवकर आली. अकरावी मध्ये असतांना ही टेलिफोन बुथवर पार्ट टाईम जॉब करू लागली. तिच्या आईचा फळांचा धंदा होत नव्हता त्यामुळे जॉब करून आईला आर्थिक मदत करत होती. कॉलेज, घरची कामं जॉब, घरी लाईट नसल्यामुळे अंधारात अभ्यास
सुरळीत सुरू होते. आम्ही बारावी पास झालो बी.ए.ला प्रवेश घेतला. बहिणी घरातील कामं सांभाळण्या इतपत मोठ्या झाल्याच होत्या. सकाळचं कॉलेज करून ती आता फुलटाईम जॉब करू लागली आता बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती सुधारत होती. टिनाच्या शेड ऐवजी आता पाट्यांचं दोन रूमचे घर झाले. तिच्या मित्र मैत्रीणीचा परिवार दिवसेंदिवस वाढतच राहिला. या काळात तिच्या आयुष्यात वादळंही खूप आली गेली डगमगली नाही ती आमची मैत्री मात्र आणखी घट्ट होत गेली रूसवे फुगवे आले पण दुरावा कधी आला नाही. बी.ए. नंतर एम.ए.पण मिळूनच केलं दिवसेंदिवस तिचे जॉब ही बदलत गेले पगारात वाढ होत गेली. हिंडणं,फिरणं,पिकनिकला जाणं हे तिला आवडायचं आणि तिनेही मनसोक्त उपभोगलं गरीब होती पण तिच्या राहणीमाना वरून कोणी अनुमान लावू शकत नव्हते की ती इतकी गरीब असेल.तिचे कपडे मेकअप सगळं अगदी श्रीमंती झळकायची.
शिक्षण पूर्ण झालं तिचा जॉब सुरूच होता. बहिणी मोठ्या झाल्या एका बहिणीचे लग्न झाले. एक बहिण बारावी पास होऊन नर्सिंग केलं दवाखान्यात जॉब करू लागली.एक बहिण हॉकी मध्ये इंटरेस्टट होती ती हॉकी खेळायची प्रशिक्षण घेऊन ती प्रशिक्षक झाली. त्यांची परिस्थिती आता बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाली. नवीन पक्क घर बनवलं घरात सर्व आधुनिक सामान सर्व सुरळीत झालं. सगळे खुश आनंदात आप आपल्या संसारात पण..हिचे लग्न जुळलेच नाही. कदाचित विधात्याच्या मनात काही वेगळेच होते.
मित्र-मैत्रीणी सोबत पिकनिक ला गेली असता तिला अपघात झाला नी ऐन उमेदीच्या काळात इतक्या कमी वयात ती गेली खूप दूरच्या प्रवासाला कधीही परत न येण्यासाठी एक पोकळी निर्माण करून गेली.
इतके कष्ट, इतके दुःख एवढ्याशा लहान वयात इतकी मोठी जबाबदारी स्विकारून आपले कर्तव्य पार पाडत मनमुराद जगत होती पण नशीब..शेवटी म्हणतात ना नियती आपला डाव कधीच सोडत नाही...
शोभा मानवटकर....